एका मराठी राणीनं उत्तर भारतात संस्थान कसं सांभाळलं?

बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS, हिंदुराव घाटगे, HinduRao

फोटो स्रोत, D. B. PARASNIS

फोटो कॅप्शन, हिंदुराव घाटगे आणि बायजाबाई शिंदे
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आताच्या काळामध्ये ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याची राणी असं म्हटलं की डोळ्यासमोर राजमाता विजयाराजे सिंदिया यांचं नाव आणि प्रतिमा येते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राजकारणात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं. 'राजमाता' या त्यांच्या ओळखीमुळे त्यांची ग्वाल्हेरची राणी ही प्रतिमा आपल्या डोळ्यात येते.

पण आपण इथं ग्वाल्हेरच्या एका वेगळ्या राणीची माहिती घेणार आहोत. ती राणी म्हणजे बायजाबाई शिंदे.

या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागलच्या या मुलीने केवळ शिंदे घराण्याची सून म्हणून नाव कमावलं नाही तर अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार पाहिला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केलं आहे.

घाटगे घराण्याचा ग्वाल्हेरशी संबंध कसा आला?

कागल येथिल देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले.

सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.

बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS, हिंदुराव घाटगे, HinduRao

फोटो स्रोत, D. B. PARASNIS, Getty Images

फोटो कॅप्शन, बायजाबाई शिंदे आणि ग्वाल्हेरचा किल्ला

सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि मार्च 1798 मध्ये बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.

शिंद्यांच्या दरबारातील वाढत्या वजनामुळे अप्रिय झालेल्या सर्जेराव घाटग्यांची आनंदराव नावाच्या एका सरदारांनी आणि मानाजी फाकडे यांच्या मुलाने 1810 साली हत्या केली.

दत्तात्रय बळवंत पारसनिस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे या नावाने 1902 साली एक चरित्र प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात या सर्व घडामोडींचे वर्णन केलं आहे. पारसनिसांचं पुस्तक मुंबईच्या बाबाजी सखाराम आणि कंपनीने प्रकाशित केलं होतं.

दक्षिणेची सौंदर्यलतिका

बायजाबाई शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असं वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलं आहे. इंग्रज लेखकांनी तिला ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असं म्हटलं आहे.

बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS

फोटो स्रोत, D. B. PARASNIS

फोटो कॅप्शन, द. बा. पारसनीस यांनी लिहिलेलं बायजाबाई यांचं चरित्र

बायजाबाई शिंदे ग्वाल्हेरला गेल्यावर त्यांचा सर्व कारभारात वावर असे. शिकारीमध्येही त्या सहभागी होत. भाला फेकणे, बंदुकीने शिकार करणे, घोडेस्वारी अशा सर्व कलांमध्ये त्या निपुण होत्या.

दौलतराव शिंदे यांचा 1827 साली मृत्यू झाला. तत्पुर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई शिंदे यांनीच सांभाळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बायजाबाई शिंदे यांच्याकडे ग्वाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रं आली.

राज्यकारभार आणि हिंदुराव घाटगे

1810 साली सर्जेराव घाटगे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजा हिंदुराव (मूळ नाव जयसिंगराव) ग्वाल्हेरला येऊन राहिला. हे हिंदुराव दौलतराव शिंदे यांच्याबरोबर काम करू लागले. हिंदुराव घाटगे यांचं ग्वाल्हेरच्या दरबारात मोठं प्रस्थ तयार झालं.

दौलतराव शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर बायजाबाईंनी शिंदे घराण्यातील मुकुटराव नावाच्या पुत्रास दत्तक घेऊन राजगादीवर बसवलं आणि त्यांचं नाव जनकोजी असं ठेवण्यात आलं.

त्यानंतर बायजाबाई यांनी आपला भाऊ हिंदुराव, बापूजी रघुनाथ, यशवंतराव दाभाडे, यशवंतरावभाऊ बक्षी, लालाभाऊ, फकीरजी गाढवे, माधवरावपंत ब्रह्माजी, लक्ष्मणराव विठ्ठल, रामराव फाळके, मणिराम शेट, दाजीबा पोतनीस, आत्माराम वाकडे या सरदारांच्या मदतीने आणि काही इंग्रज सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.

बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्वाल्हेरचा किल्ला

बायजाबाई यांच्या राज्यकारभाराचं कौतुक अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. 1 जुलै 1832 साली इंडिया गॅझेटमध्ये त्यांच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे, "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of late Maharaja" रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे, असं त्यात छापण्यात आलं होतं.

तर मिल्स हिस्ट्रीमध्ये बायजाबाई शिंदे या तेजस्वी, सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असं म्हटलं आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहाता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजतं. त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या", अशा आशयाचं वर्णन 1833 साली प्रसिद्ध केलं आहे. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही बायजाबाईंना ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचं वर्णन लिहिलं आहे.

जनकोजी शिंदे आणि बायजाबाई शिंदे यांच्या बेबनाव

काही वर्षांनी दत्तकपुत्र जनकोजी आणि बायजाबाई यांच्यात राजकारभार कोण चालवणार यावरून वितुष्ट येऊ लागलं. या दोघांमधील कलह मिटवण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. साक्षात गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक यांनीही 1832 साली ग्वाल्हेरमध्ये आल्यावर मसलत केली होती.

बायजाबाईंच्या नशिबी वनवास

1833 साली जनकोजी यांनी उघड बंड केले. बायजाबाई यांना अटक करण्याच्या हालचाली होत असतानाच बायजाबाई राजवाड्यातून निसटल्या आणि त्या हिंदुराव यांच्या वाड्यात आश्रयाला गेल्या आणि त्यांनी ब्रिटिश रेसिडेंट कॅव्हेंडिश यांच्याकडे मदत मागितली. परंतु या सर्व खटाटोपात जनकोजी शिंदे यांचं पारडं जड ठरलं आणि बायजाबाईंना ग्वाल्हेर सोडावं लागलं.

त्यांना धोलपूर, फत्तेगड, अलाहाबाद, बनारस असं फिरत राहावं लागलं. त्यांच्या हालअपेष्टांचं वर्णन तेव्हा 'दिल्ली अखबार', 'मुसफल आखबार' या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालं होतं.

अखेर 1840 ते 1845 अशी पाच वर्षं त्यांना नाशिकला काढावी लागली. 1844 साली जनकोजी शिंदे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी ताराबाई हिने जयाजीराव शिंदे यांना दत्तक घेऊन राज्यकारभार सुरु केला. त्यानंतर बायजाबाई पुन्हा ग्वाल्हेरला आल्या.

1857 चे बंड

1857 साली उत्तर हिंदुस्तानात बंडाचं वारं आल्यानंतर बंडवाल्या सैनिकांनी बायजाबाईंना ग्वाल्हेरचं संपूर्ण संस्थान देऊन आपल्या बाजूने येण्याची विनंती केल्याचं सांगण्यात येतं. मात्र बायजाबाईंनी बंडवाल्या सैनिकांबरोबर जाणं टाळलं.

1858च्या मे महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, बांद्याच्या नवाबांनी ग्वाल्हेरवर हल्ला करून ग्वाल्हेर ताब्यात घेतलं. त्यामुळे सर्व राजस्त्रियांना बाहेर पडावं लागलं. साक्षात जयाजीराव शिंदे आणि त्यांचे दिवाण दिनकरराव राजवाडे यांना आग्र्याला पळून जावं लागलं होतं.

बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS, झाशीची राणी, Ranee of Jhansi

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटिश सैनिकांच्या गराड्यात झाशीच्या राणीचे सैनिक

या वेळेस सर्व खजिना पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला हे सर्व वर्णन विष्णूभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकात केलं आहे. बायजाबाई शिंदे सर्वतोमुख यज्ञ करणार आहेत असं पत्र मिळाल्यामुळेच त्यांनी कोकणातील वरसई गावातून उत्तर भारतात भ्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पुस्तकात बायजाबाई शिंदे यांचा उल्लेख अनेकदा आढळतो.

पेशव्यांनी आणि बंड करणाऱ्या फौजेने ग्वाल्हेर ताब्यात घेतल्याचं समजताच ब्रिटिश सैन्याधिकारी ह्यू रोजने ग्वाल्हेरवर स्वारी केली. या युद्धात झाशीच्या राणीचा मृत्यू झाला आणि पेशवे, तात्या टोपे, बांद्याचे नवाब यांना ग्वाल्हेर सोडून निघून जावं लागलं. अखेर ग्वाल्हेरमध्ये इंग्रजांच्या मदतीने पुन्हा एकदा शिंदे यांचं सरकार स्थापन झालं.

बंड शमल्यानंतर बायजाबाई ग्वाल्हेरला जयाजीराव शिंदे यांच्याबरोबरच राहू लागल्या. अखेर वृद्धापकाळातील आजारांमुळे त्याचं 27 जून 1863 साली निधन झालं. ग्वाल्हेर संस्थानाच्या कारभाराच्या, वाटचालीच्या त्या सहा दशकांहून अधिक काळ साक्षीदार होत्या.

बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS, तात्या टोपे, TATYA TOPE

फोटो स्रोत, TWITTER/@MulaMutha

फोटो कॅप्शन, बायजाबाई शिंदे यांच्या समाधीच्या दुरवस्थेचे इतिहासअभ्यासक उदय कुलकर्णी यांनी काढलेले छायाचित्र

कागलच्या राजाचा दिल्लीत राजवाडा

बायजाबाई शिंदे यांचे भाऊ हिंदुराव घाटगे यांचे ग्वाल्हेर दरबारात विशेष वजन होतं. मात्र जनकोजी शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे त्यांनाही ग्वाल्हेर सोडावं लागलं आणि 1835 साली ते दिल्लीला इंग्रजांचं पेन्शन घेऊन राहू लागले.

हिंदुराव घाटगे, Hindurao, Hindurao Hospital, delhi दिल्ली, कोल्हापूर,kolhapur

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिंदुराव यांचा दिल्लीतला वाडा. या वाड्याचं 1857 च्या बंडाच्या काळात मोठं नुकसान झालं होतं. आता तिथं हिंदुराव हॉस्पिटल आहे.

दिल्लीला त्यांचा स्वतःचा वाडा होता. इंग्रजांशी मिळून मिसळून राहाण्याचं धोरण त्यांनी ठेवलं होतं. 1856 साली त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी 1857 चं बंड झालं. या बंडात या वाड्याचं मोठं नुकसान झालं. परंतु आजही या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत.

बायजाबाई शिंदे, सिंदिया, ग्वाल्हेर किल्ला, Baijabai Shinde Scindia, Gwalior Fort, कोल्हापूर घाटगे, पेशवे, महादजी शिंदे, ज्योतिरादित्य शिंद, Jyotiraditya. कागल, सखाराम सर्जेराव घाटगे, Kagal, Sakharam Ghatage, पारसनीस द. बा. PARASNIS, हिंदुराव घाटगे, HinduRao

फोटो स्रोत, D.B. PARASNIS

फोटो कॅप्शन, राजा हिंदुराव घाटगे

आज इथं दिल्लीतलं प्रसिद्ध हिंदुराव हॉस्पिटल आहे. 19 व्या शतकात झालेल्या घडामोडींमुळे कोल्हापूर आणि कागलचं नाव उत्तर भारतात गेलं ते कायमचंच.

शिंदे घराणे आणि ज्योतिबा देवस्थान

कोल्हापूर जवळचं ज्योतिबा देवस्थान हे शिंदे घराण्याचं कुलदैवत आहे. 1730 साली राणोजी शिंदे यांनी ज्योतिबाचं सध्याच्या मंदिराचं बांधकाम आणि डागडुजी केली, अशी माहिती मिळते. तसंच दौलतराव शिंदे यांनीही 1808 साली मदत केल्याचा उल्लेख सापडतो. अशा प्रकारे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कोल्हापूरशी आणखी संबंध दिसून येतो.

संदर्भ आणि अधिक वाचनासाठी

1) महाराणी बायजाबाई शिंदे ह्यांचे चरित्र- द. बा. पारसनीस- बाबाजी सखाराम आणि कंपनी.

2) माझा प्रवास- विष्णूभट गोडसे- प्रतिभा प्रतिष्ठान

3) झाशीची राणी लक्ष्मीबाई- प्रतिभा रानडे- राजहंस प्रकाशन

4) पुण्याचे पेशवे- अ. रा. कुलकर्णी- राजहंस प्रकाशन

5) ट्रॅवेल्स ऑफ इंडिया- सुखमणी रॉय- रोहन प्रिंट्स

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)