ज्योतिरादित्य शिंदे : जेव्हा विजयाराजे शिंदेंनी काँग्रेसमधून फुटून मध्य प्रदेशमधलं सरकार पाडलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एखाद्या आईवर स्वतःच्या मुलाविरोधात प्रचार करण्याची वेळ भारतीय राजकारणात पहिल्यांदाच आली असावी. 1984 साली ती वेळ ग्वाल्हेरमध्ये आली. विजयाराजे शिंदे आणि माधवराव शिंदे हे या माता आणि पुत्राला एकमेकांच्या विरोधात राजकीय प्रचार करण्याची वेळ आली.
एका बाजूला स्वतःचा पुत्र माधवराव शिंदे आणि दुसऱ्या बाजुला 'धर्मपुत्र' अटलबिहारी वाजपेयी अशा विचित्र कोंडीत राजमाता विजयाराजे सापडल्या होत्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
1984 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर लोकसभेची निवडणुकीचं पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं गेलं. सर्व सहानुभूती काँग्रेसच्या बाजूने असल्याचं तेव्हा स्पष्ट दिसतच होत. त्यामुळे लोकसभा प्रवेशासाठी अटलबिहारी वाजपेयी यांना सुरक्षित मतदारसंघ निवडण्याची गरज होती.
त्यामुळेच वाजपेयी यांनी ग्वाल्हेरची निवड केली. एकतर या मतदारसंघाचं त्यांनी 1971 साली प्रतिनिधित्व केलं होतं. ते त्यांचं जन्मगावही होतं. त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ सुरक्षित वाटला असावा. पुन्हा मदतीसाठी राजमाता होत्याच.
माधवराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर शेजारच्या गुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं. त्यामुळे वाजपेयी यांना लोकसभा प्रवेशासाठी हा एक आदर्श मतदारसंघ वाटणं अगदीच साहजिक होतं. त्यांच्याविरोधात काँग्रेसने विद्या राजदान यांना उमेदवारी दिली होती.
पण सगळं ठरल्यासारखं होणार नाही हे निवडणुकीच्या आधीच दिसून आलं. निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवट्या दिवशी मुदत संपायच्या फक्त दीड तास आधी माधवराव शिंदे आपल्या सहकाऱ्यांबरोबर ग्वाल्हेरमध्ये आले आणि त्यांना ग्वाल्हेरमधून अर्ज भरला. अटलबिहारी वाजपेयी यांना यावर काहीच करता आले नाही. आता माधवराव शिंदे विरुद्ध अटलबिहारी वाजपेयी असा सामना अटळ होता.

फोटो स्रोत, Getty Images
आपण विजयाराजे शिंदे यांचे धर्मपुत्र आहोत असं अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केल्यामुळे विजयाराजे यांच्यासमोर आता कोणाच्या विरुद्ध प्रचार करायचा असा पेच निर्माण झाला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात म्हणजेच आपल्याच मुलाच्या विरोधात प्रचार करण्याचं निश्चित केलं. वीर संघवी आणि नम्रता भंडारे यांनी लिहिलेल्या अ लाइफ ऑफ माधवराव सिंदिया या पुस्तकात या सर्व घटनेचा साद्यंत वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे.
विजयाराजेंचे प्रयत्न अपुरे पडले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसबद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये माधवराव शिंदे विजयी झाले. पण या निमित्तानं ग्वाल्हेरच्या या राजघराण्यातल्या आई-मुलाचे ताणलेले नातेसंबंध पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आले. या निवडणुकीच्या काळात विजयाराजेंनी 'मुलांनी आपल्या आयांना अशा अग्निपरीक्षेला सामोरं जायला लावू नये,' असं म्हटलंही होतं.
ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर या इतिहासाला पुन्हा उजाळा दिला जातोय. पण शिंदे कुटुंबाचा इतिहासच नाही तर वर्तमानही ज्योतिरादित्यांनी काँग्रेस सोडेपर्यंत दोन पक्षांत विभागलेला होता.
विजयाराजेंच्या म्हणजे आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत वसुंधराराजे (राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री) आणि यशोधराराजे या भाजपमध्ये गेल्या. माधवराव शिंदे आणि त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य हे काँग्रेसमध्येच राहिले. शिंदे घराणं असं दोन विचारधारांमध्ये कसं आणि कधी विभागलं गेलं? या राजकीय ताण-तणावाचे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नेमके काय परिणाम झाले? ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलेल्या राजकीय यू-टर्नच्या निमित्तानं या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणंही रंजक आहे.
ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा इतिहास
शिंदे घराणं हे मूळचं साताऱ्यातल्या कण्हेरखेडचं. याच घराण्यातील सरदार राणोजी शिंदे हे बाजीराव पेशव्यांच्या विश्वासातले होते.
शिवपुरी शहरामधील शिंदे घराण्यातील पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या 'छतरी'चे व्यवस्थापन अधिकारी अशोक मोहितेंनी जुन्या दस्तऐवजांचा दाखल देत सांगितलं, "1740 च्या आसपास राणोजी शिंद्यांपासून या घराण्याचा इतिहास सुरू होतो. त्यांनी माळवा भागामध्ये विजय मिळवत उज्जैन इथं आपली राजधानी स्थापन केली."

फोटो स्रोत, Getty Images
"त्यानंतर इ.स. 1800 पर्यंत शाजापूर आणि त्यानंतर ग्वाल्हेर ही शिंदे घराण्याची राजधानी झाली. तेव्हापासून स्वातंत्र्यापर्यंत शिवपुरी, शयोपूर आणि गुणा हा सगळा भाग ग्वाल्हेरच्या राजघराण्याचा भाग होता. सुरुवातीला शिवपुरी भागात खूप हिरवळ होती, इथं झरे-तलाव होते. त्याकाळात शिंदे परिवार उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा इथं यायचा."
स्वतंत्र भारतातील शिंदे घराण्याच्या राजकीय भूमिकांबद्दल बोलताना अशोक यांनी सांगितलं, "ग्वाल्हेर राजघराण्याचे महाराज जिवाजीराजे शिंदे स्वातंत्र्यानंतर 'मध्य भारत' प्रांताचे पहिले राजप्रमुख होते. त्यानंतर 1956 साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली."
जेव्हा विजयाराजेंनी काँग्रेसचं सरकार पाडलं होतं...
मध्य प्रदेशच्या स्थापनेनंतर 1957 साली झालेल्या निवडणुकीत जिवाजीराजेंच्या पत्नी आणि माधवराव शिंदेंच्या आई विजयाराजे शिंदेंनी गुणा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि त्या जिंकूनही आल्या.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधी महाराज जिवाजीराव शिंदे यांनाच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर विजयाराजे शिंदेंना निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली. प्रचंड बहुमतानं निवडून येत त्या खासदारही झाल्या.
ग्वाल्हेरमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान विजयाराजेंचे तत्कालीन मुख्यमंत्री डी.पी. मिश्रांसोबत मतभेद झाले. त्यासोबत सरगुजा प्रांतात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईमुळेही त्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी 1967 साली काँग्रेसला रामराम केला.

फोटो स्रोत, Getty Images
"विजयाराजेंनी त्यावेळी काँग्रेसचं सरकार पाडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या सांगण्यावरून 37 आमदारांनी राजीनामे दिले आणि डीपी मिश्रांचं सरकार कोसळलं. त्यानंतर संयुक्त विधायक दलाचं सरकार स्थापन झालं. गोविंदनारायण सिंह मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिल्यांदा तडा गेला," अशी आठवण प्रजातंत्रचे डिजिटल एडिटर प्रकाश हिंदुस्तानी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली.
जनसंघ आणि भाजपच्या स्थापनेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 1971 साली इंदिरा लाटेतही जनसंघाला मध्य प्रदेशमध्ये तीन जागा जिंकता आल्या. स्वतः विजयाराजे भिंडमधून निवडून आल्या. अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून निवडून आले.
ज्योतिरादित्य शिंदेंचे पिता माधवराव शिंदे हेसुद्धा या निवडणुकीत पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. गुणा मतदारसंघातून वयाच्या 26 व्या वर्षी माधवराव खासदार बनले होते. तेही जनसंघाच्या तिकिटावर. इथपर्यंत सर्व काही आलबेल होतं. आपल्या कुटुंबानं भाजपमध्येच राहावं, अशी विजयाराजेंची इच्छा होती. पण माधवरावांचे विचार काही वेगळे होते.
माधवराव शिंदेंची वेगळी वाट
माधवराव शिंदे जनसंघात दहा वर्षं राहिले. आणीबाणी हटवल्यानंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत माधवराव शिंदेंचा मार्ग विजयाराजे आणि जनसंघापासून वेगळा झाला. त्यांनी अपक्ष म्हणून गुणामधूनच निवडणूक लढवली. त्यावेळी जनता पक्षाची लाट असूनही माधवराव निवडून आले.
1980 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. 1984 साली त्यांनी गुणाऐवजी ग्वाल्हेरमधून अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधात निवडणूक लढवली. ते केंद्रीय मंत्रीही बनले. त्यानंतर 1989 आणि 1991 सालीही ते ग्वाल्हेरमधूनच निवडून आले.
जानेवारी 1996 मध्ये जैन हवाला प्रकरणात माधवराव शिंदेंचं नाव समोर आलं. तेव्हा ते नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास मंत्री होते. त्यांनी आपल्या पदाचाच नाही तर काँग्रेसचाही राजीनामा दिला.

फोटो स्रोत, TWITTER/JM_SCINDIA
काँग्रेसपासून वेगळे झाले असले तरी माधवराव भाजपमध्ये गेले नाहीत हे विशेष. त्यांनी स्वतःचा मध्य प्रदेश विकास पार्टी नावाचा पक्षही काढला. या पक्षाच्या तिकिटावरच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं शशिभूषण वाजपेयी यांना उमेदवारी दिली होती. पण भाजपनं मात्र त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नसल्याचं ग्वाल्हेरमधले ज्येष्ठ पत्रकार डॉ. राकेश पाठक यांनी सांगितलं.
"माधवराव हे राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या जवळचे होते. नरसिंह रावांच्या काळात त्यांची तशी घुसमटच होत होती. शिवाय काँग्रेसमध्ये त्याकाळात सोनिया गांधी सक्रियही नव्हत्या. आई भाजपमध्ये असली तरी वैचारिकदृष्ट्या माधवराव पूर्णपणे वेगळे होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता माधवराव यांनी काँग्रेस सोडली तरी भाजपमध्ये प्रवेश का केला नाही याचं स्पष्टीकरण मिळतं," असं पाठक यांनी स्पष्ट केलं.
याच सगळ्या घडामोडींमध्ये विजयाराजेंच्या मुली आणि माधवरावांच्या बहिणींचाही राजकीय पटलावर उदय होत होता.

फोटो स्रोत, REHANA KHAN
1984 साली विजयाराजे शिंदे यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. तर 1994 मध्ये यशोधराराजे शिंदेंनीही आईच्या इच्छेचा मान ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला. 1998 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. 2003 ते 2008 आणि 2013 ते 2018 या काळात वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या, तर पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या यशोधरा राजे या शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळात मंत्री होत्या.
'माझा मुलगा माझे अंतिम संस्कार करणार नाही'
एकीकडे विजयाराजे-वसुंधराराजे-यशोधराराजे आणि माधवराव राजकीय पटलावर विरोधक होते, त्याचवेळी त्यांच्या कौटुंबिक संबंधांमध्येही कटुता आली होती. पण पाठक यांच्या मते विजयाराजे आणि माधवराव यांचे संबंध खराब होण्याचे कारण हे विजयाराजेंचे सचिव सरदार संभाजीराव आंग्रे होते. विजयाराजेंवर त्यांचा प्रभाव होता. मात्र माधवरावांना ते फारसे पटत नव्हते.
"सार्वजनिकरीत्या विजयाराजेंनी माधवरावांविरोधात अनेकदा कठोर शब्द वापरले होते. पण माधवरावांनी फारसं प्रत्युत्तर दिलं नाही. ती माझी आई आहे, ती अशा गोष्टी बोलू शकते, असं माधवराव म्हणायचे. पण विजयाराजेंच्या आजारपणात त्यांचे संबंध सुधारले होते," असं पाठक यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, TWITTER/VASUNDHRARAJE
अर्थात, विजयाराजेंच्या मृत्युपत्राच्या निमित्ताने वाद निर्माण झाला होता. राजमातांचं पहिलं मृत्यपपत्रं 20 सप्टेंबर 1985 मधलं आहे. या मृत्युपत्रामध्ये त्यांनी माझा मुलगा माझे अंत्यसंस्कार करणार नाही, असं म्हटलं होतं. शिवाय शिंदे घराण्याची 80 टक्के संपत्ती मुलींना देण्यात आली होती तर 20 टक्के ट्रस्टला दिली गेली होती. 90 च्या दशकात त्यांचं दुसरं मृत्युपत्र करण्यात आलं. त्यात त्यांनी आपल्या मुलाशी जुळवून घेतलं होतं.
विजयाराजेंचं 2001 साली निधन झाल्यानंतर माधवरावांनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केलेही होते. मात्र या मृत्युपत्राच्या वादाला इतरही पैलू आहेत, त्याचा वाद कोर्टात सुरूही होता.
'ही ज्योतिरादित्यांची घरवापसी'
विजयाराजेंच्या निधनानंतर काही महिन्यांतच विमान अपघातात माधवराव शिंदेंचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांचं राजकारणात पदार्पण झालं. 2002 साली त्यांनी गुणामधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली आणि ते निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये ते दुसऱ्यांदा खासदार झाले. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीही होते. 2014 साली मोदी लाटेतही ज्योतिरादित्य शिंदेंनी आपली खासदारकी टिकवली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य हे राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या जवळचे मानले जायचे. त्यामुळे त्यांचा तडकाफडकी राजीनामा हा काँग्रेससाठी धक्का होता.

फोटो स्रोत, Getty Images
ज्योतिरादित्य यांच्या आजींचा काँग्रेस ते भाजप व्हाया जनसंघ असा प्रवास झाला, तर त्यांच्या वडिलांनी जनसंघातून राजकारणात प्रवेश करत काँग्रेसचा हात धरला. आता ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपप्रवेश करणार का हे स्पष्ट नसलं तरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची घेतलेली भेट ही त्यांच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट करत आहे. त्यामुळे शिंदे घराण्यातील राजकीय प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायचं का?
याचं उत्तर कदाचित ज्योतिरादित्य यांच्या आत्या आणि मध्य प्रदेशमधील शिवपुरीच्या आमदार यशोधराराजे यांच्या प्रतिक्रियेत दडलं आहे, असं म्हणता येईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ज्योतिरादित्य यांच्या काँग्रेसच्या राजीनाम्याच्या वृत्तावर बोलताना त्यांनी म्हटलं, की ही ज्योतिरादित्य यांची घरवापसी आहे. 'साथ चलेंगे, नया देश गढेंगे, अब मिट गया हर फासला,' असं यशोधरा यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








