'शेरगर' : असा रेसिंग हॉर्स ज्याचं अपहरण करून मागितली '25 कोटी' खंडणी, पुढे काय झाले?

फोटो स्रोत, Micheal Daines/Mirrorpix/Getty Images
- Author, ग्रेग मॅकेविट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
शेरगर हा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि अतिशय मौल्यवान रेसहॉर्स (शर्यतीचा घोडा) होता. एका आयरिश स्टड फार्ममधून काही सशस्त्र लोकांनी 8 फेब्रुवारी 1983 रोजी त्याला पळवून नेलं.
ही घटना इतकी धक्कादायक होती की, बीबीसीने त्याची विशेष दखल घेतली होती.
हिवाळ्यातील एका रात्री 1983 मध्ये आयर्लंडमधील एका स्टड फार्मवरून शेरगर नावाचा अतिशय मौल्यवान घोडा चोरीला गेला.
बीबीसीचे पत्रकार निकोलस विचेल म्हणाले की, "रेसिंगच्या जगात कधीकधी डोपिंग किंवा फिक्सिंगसारखे घोटाळे होतात, पण ही घटना वेगळीच होती. सशस्त्र गुन्हेगारांनी लोकांच्या सर्वात मोठ्या हिरोंपैकी एकाला पळवून नेल्याने प्रचंड संतापाची भावना होती."
त्या काळात शेरगर अफलातून रेसिंग कामगिरीनंतर स्टड फार्ममध्ये नवं आयुष्य सुरू करणार होता. एखाद्या नर घोड्याचा (स्टॅलियन) रेसिंगमधील विक्रम जितका मोठा, तितकी त्याच्या सेवेची किंमत जास्त असते.
1981 मध्ये एप्सम डर्बीतील विजयामुळे शेरगर खूपच मौल्यवान ठरला होता. ही शर्यत त्या स्पर्धेच्या 246 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महान क्षणांपैकी एक मानली जाते.
शेरगरने तब्बल 10 अंतरांनी विक्रमी विजय मिळवला होता. त्या वेळी बीबीसीचे समालोचक पीटर ब्रॉमले आश्चर्याने म्हणाले होते की, "शर्यतीत फक्त एकच घोडा दिसतोय, बाकी घोडे पाहायला दुर्बिणीची आवश्यकता आहे."
शेरगर शर्यतीत धावत असे, त्यावेळी तो हिरव्या रंगाचा सिल्कचा पोशाख आणि लाल खांद्यावरील शोभेचे पट्टे (इपॉलेट्स) घातलेला असायचा. हे रंग त्याचे मालक असलेले अब्जाधीश आध्यात्मिक नेते आगा खान यांचे रेसिंगचे रंग होते.
'चॅम्पियन शेरगरवर कोट्यवधींची गुंतवणूक'
2011 मध्ये त्यांनी बीबीसीला सांगितलं की, शेरगरचा तो विजय आजही त्यांच्या मनात कोरलेला आहे. ते म्हणाले, "मला दोन गोष्टी फारच आश्चर्यकारक वाटल्या. एक म्हणजे तो घोडा किती सहजपणे धावत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिनिशिंग करताना सरळ रेषेत तो पुढेच पुढे जात राहिला. ते दृश्य खरंच विलक्षण होतं."
आयरिश डर्बी आणि किंग जॉर्ज सहाव्या शर्यतीत मिळालेल्या विजयांमुळे शेरगर हा जागतिक स्तरावरचा सुपरस्टार घोडा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.
त्याचे मालक आगा खान यांनी शेरगरची किंमत तेव्हा तब्बल 10 दशलक्ष पाऊंड (आजच्या किंमतीनुसार सुमारे 4 अब्ज 45 कोटी 6 लाख रुपये) इतकी ठरवली होती.
त्यांनी शेरगरचे 34 शेअर्स प्रत्येकी 2.5 लाख पाऊंडला (सुमारे 3 कोटी 8 लाख रुपये) विकले, तर सहा शेअर्स स्वतःकडे ठेवले.

फोटो स्रोत, Alamy
उरलेले शेअर्स जगभरातील श्रीमंत गुंतवणूकदारांनी विकत घेतले होते. भविष्यात शेरगरकडून चॅम्पियन घोडे जन्माला येतील, या आशेवर त्यांनी ही गुंतवणूक केली होती.
या अद्भुत सिझननंतर शेरगरला रेसिंगमधून निवृत्त करून आयर्लंडमध्ये स्टड हॉर्स म्हणून ठेवण्यात आलं. ही आयर्लंडच्या वाढत्या आणि फायदेशीर थरोब्रेड घोडा (घोड्यांची एक अत्यंत वेगवान, चपळ आणि उच्च वंशावळीची जात) उद्योगासाठी मोठी उपलब्धी मानली गेली, कारण या क्षेत्रात घोड्याची जात आणि वंशाला सर्वाधिक महत्त्व असतं.
जगातील सर्वात महागडा स्टॅलियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेरगरने 1982 मध्ये 44 मादी घोड्यांसोबत (मेअर्स) 'कव्हर' (ब्रिडिंग) केलं होतं. प्रत्येक मादीसाठी त्याची फी 80 हजार पाऊंड होती (आजच्या किंमतीनुसार 98 लाख 45 हजार रुपये).
1983 च्या सुरुवातीला आगा खान यांच्या बॅलीमनी स्टड फार्म (काउंटी किल्डेअर, आयर्लंड) येथे शेरगरचा दुसरा हंगाम आधीच पूर्णपणे बूक झाला होता. त्यामुळे शेरगरमध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांना आणखी एक फायदेशीर वर्ष मिळणार, हे जवळपास निश्चित होतं.
'इतका मौल्यवान घोडा पण सुरक्षाच नाही'
परंतु, 8 फेब्रुवारीच्या रात्री, बंदुका हातात घेतलेले आणि चेहऱ्यावर मुखवटे घातलेले अपहरणकर्ते अचानक फार्ममध्ये घुसले.
इतका मौल्यवान घोडा असूनही शेरगरसाठीची सुरक्षा फारशी कडक नव्हती. मुख्य देखभाल करणारे कर्मचारी जेम्स फिट्झगेराल्ड यांच्या कुटुंबाला बंदुकीच्या धाकाने ताब्यात ठेवण्यात आलं. त्याच वेळी फिट्झगेराल्ड यांना शेरगरला ट्रेलरमध्ये चढवण्याचा आदेश देण्यात आला.
यानंतर फिट्झगेराल्ड यांना वेगळ्या व्हॅनमध्ये बसवून काही तासांसाठी इकडे-तिकडे फिरवलं. सुमारे 40 मैल दूर नेऊन सोडण्यापूर्वी अपहरणकर्त्यांनी त्यांना 'किंग नेपच्यून' हा पासवर्ड दिला. खंडणीच्या वाटाघाटीमध्ये आपणच खरे अपहरणकर्ते आहोत हे सिद्ध करण्यासाठी ते हा पासवर्ड वापरणार होते.
त्यांनी धमकावल्यामुळे फिट्झगेराल्ड ताबडतोब कुणालाही काही सांगू शकले नाहीत. त्यामुळे अनेक तास उलटल्यानंतरही त्यांनी अलार्म वाजवला नाही..

फोटो स्रोत, Getty Images
यानंतरच्या गोंधळात अनेक तातडीचे फोन कॉल करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलिसांना कळवण्याआधीच आयर्लंडमधील दोन कॅबिनेट मंत्र्यांना या अपहरणाची माहिती होती. पोलिसांना तब्बल आठ तासांनी कळवण्यात आलं.
तोपर्यंत महत्त्वाचा वेळ वाया गेल्यामुळे अपहरणकर्त्यांचा कोणताही मागमूस मिळेनासा झाला होता. या तपासाचा चेहरा म्हणून मुख्य अधीक्षक जेम्स मर्फी हे पुढे आले.
"आमच्याकडे अजून एकही धागा नाही," असं त्यांनी एका पत्रकार परिषदेत अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं
'मशीन-गनसह मास्क घातलेली टोळी'
या अपहरण किंवा चोरी मागचं कारण काय असू शकतं, यावर सर्वत्र तर्क-वितर्क सुरू होते. बीबीसीचे रेसिंग वार्ताहर ज्युलियन विल्सन यांनी स्पोर्ट्सनाइटचे अँकर डेस लिनम यांना सांगितलं, "कोणत्याही घोडे चोराला शेरगरकडून शिंगरू मिळवायचा मोह होणं साहजिकच आहे. पण आजकाल अशा शिंगरूंची ओळख पटवण्यासाठी आणि रक्त तपासणीसाठी इतकी अचूक पद्धत आहे की, शेरगरचं एखादं बेकायदेशीर शिंगरू आयरिश रेसिंगमध्ये लपवून आणणं जवळजवळ अशक्य आहे."
आणखी एक अतिरंजित वाटणारा तर्क असा होता की, शेरगरला आयर्लंडहून लिबियाचे कर्नल गद्दाफी यांच्याकडे पाठवण्यात आलं आणि त्याच्या बदल्यात आयआरएला (आयरिश रिपब्लिकन आर्मी) शस्त्रं मिळाली असावीत.
पैशांची टंचाई असलेली आयआरए निमलष्करी गट या प्रकरणातील मुख्य संशयित मानली जात होती. कारण आपल्या हिंसक मोहिमेसाठी पैसा उभारण्यासाठी त्यांनी यापूर्वीही मानवी अपहरणांचे प्रकार केले होते.

फोटो स्रोत, Getty Images
शेवटी हे स्पष्ट झालं की, अपहरणामागचं कारण फक्त पैसा होता. शेरगरला पळवून नेल्यानंतर 24 तासांपेक्षा कमी वेळात अपहरणकर्त्यांनी 'किंग नेपच्यून' हा कोड वापरून बॅलीमनी स्टड फार्मवर फोन केला आणि 20 लाख पाऊंडची खंडणी मागितली (आजच्या किंमतीनुसार सुमारे 24 कोटी 61 लाख रुपये).
शेरगरमध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांमध्ये खंडणी द्यावी की नाही, यावर मतभेद होते. अमेरिकेचे प्रशिक्षक ब्रायन स्वीनी खंडणी देण्याच्या बाजूने होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "ज्या मुलाचं अपहरण झालं आहे, त्याच्या आईला विचारलं, तर ती नक्कीच खंडणी द्यायला होकार देईल आणि तेही लगेच."
मात्र लॉर्ड डर्बी यांचा याला ठाम विरोध होता. लॉर्ड डर्बी हे या प्रसिद्ध शर्यतीला नाव देणाऱ्या 18व्या शतकातील इंग्लिश सरदारांचे वंशज होते, आणि त्यांचं म्हणणं होतं की, "जर खंडणी दिली, तर येत्या वर्षांत आणखी घोड्यांची अपहरणं होण्याचा धोका आहे, आणि ते अजिबात सहन केलं जाणार नाही."
'पत्रकारांना चर्चेसाठी बोलावलं'
शेरगरच्या शोधाला एक वेगळं वळण लागलं जेव्हा, दुसऱ्या दिवशी बीबीसीच्या बेलफास्ट येथील न्यूज रूममध्ये एक फोन आला. बेलफास्ट हे शेरगर पळवून नेण्यात आलेल्या ठिकाणापासून सुमारे 130 मैल दूर होतं.
फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली नाही. त्यानं सांगितलं की, फक्त इंग्लंडमधील प्रसिद्ध घोड्यांच्या शर्यतीवर लिहिणाऱ्या तीन पत्रकारांशीच चर्चा केली जाईल.
त्यांना दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत बेलफास्टमधील युरोपा हॉटेल येथे पोहोचायचं होतं. उत्तर आयर्लंडमधील संघर्षाच्या काळात हे हॉटेल जगातील सर्वाधिक बॉम्बहल्ले झालेलं हॉटेल म्हणून ओळखलं जात होतं.
या तिघांपैकी एक होते डेरेक थॉम्पसन. 2013 मध्ये व्हिटनेस हिस्ट्री या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, ते हॉटेलमध्ये पोहोचताच लगेचच अपहरणकर्त्यांकडून एक फोन आला.
त्यानंतर त्यांना बेलफास्टपासून सुमारे 30 मैल दूर, डाउनपॅट्रिकजवळ असलेल्या रेस हॉर्स ब्रीडर जेरेमी मॅक्सवेल यांच्या दूरच्या भागात असलेल्या फार्महाऊसकडे जायच्या सूचना देण्यात आल्या.
ते ग्रामीण भागातून जात असताना, मशीनगन हातात घेतलेले पाच मुखवटाधारी लोक त्यांच्या कारसमोर आले आणि त्यांनी गाडी थांबवली.

फोटो स्रोत, Steve Powell/Allsport Getty Images
डेरेक थॉम्पसन यांनी सांगितलं की त्यांनी काच खाली केली तेव्हा, त्यापैकी एकाने विचारलं, "तुम्ही डेरेक थॉम्पसन आहात का?" मी त्याच्याकडे पाहून 'हो' असं उत्तर दिलं, असं थॉम्पसन म्हणाले. त्यावर त्या व्यक्तीने सांगितलं, 'आम्ही पोलीस आहोत.' ते ऐकून मी म्हटलं, "देवाचे लाख लाख आभार!"
पुढील आठ तासांत थॉम्पसन यांना 10 ते 12 फोन कॉल्स आले. प्रत्येक कॉलची सुरुवात वेगळ्या पासवर्डने होत होती. त्याच वेळी पोलीस हे कॉल्स कुठून येतात, हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र बोलणी पुढेच गेली नाहीत.
अपहरणकर्ते सुरुवातीला 40 हजार पाऊंड (आजच्या किंमतीनुसार सुमारे 49 लाख 22 हजार रुपये) देण्याची मागणी करत होते. तर थॉम्पसन यांचा आग्रह होता की, शेरगर जिवंत आहे याचा फोटो पुरावा म्हणून दाखवावा.
परंतु, काही तास शांतता राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी शेवटचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने फक्त एवढंच सांगितलं, "घोड्याचा अपघात झाला आहे. तो मरण पावला आहे." आणि त्याने लगेच फोन बंद केला.
'भविष्य सांगणाऱ्यांकडून मदत घेण्याचा प्रयत्न'
2018 मधील सर्चिंग फॉर शेरगर या बीबीसी डॉक्युमेंटरीनुसार, हे फोन कॉल्स खोटे आणि दिशाभूल करणारे होते, असा अंदाज आहे. खरी बोलणी कुठेतरी दुसरीकडे सुरू होती आणि हे कॉल्स फक्त लक्ष विचलित करण्यासाठी केले जात होते.
तोपर्यंत खरे अपहरणकर्ते थेट आगा खान यांच्या कार्यालयाशी संपर्कात होते. मात्र खंडणीबाबतची चर्चा कुठेच पुढे जात नव्हती. पोलिसांनी रेकॉर्ड केलेल्या एका कॉलमध्ये एक व्यक्ती धमकी देताना म्हणतो,"आज रात्री 9 वाजता फोन उचलला नाही, तर घोड्याबद्दल विसरून जा. तो तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाही."
अपहरणानंतर तीन दिवसांनी शेवटचा, अंगावर शहारे आणणारा संदेश आला. खंडणीची मागणी पूर्ण झाली नाही, तर 'सगळं संपलं', असं स्पष्टपणे सांगण्यात आलं.
पोलीस शेरगरचा शोध घेत असतानाच, लोकांची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी पत्रकारांना या बातमीचे नवे पैलू शोधावे लागत होते. आणि त्या बाबतीत मुख्य अधीक्षक जेम्स मर्फी सतत चर्चेत राहिले.
त्या काळात बीबीसीचे आयर्लंड प्रतिनिधी असलेले निकोलस विचेल यांनी 2018 च्या डॉक्युमेंटरीत सांगितलं की, "सुपरिटेंडंट मर्फी एक वेगळ्याच प्रकारचं व्यक्तिमत्त्व बनले होते. ते रोज सकाळी आपली हॅट घालून यायचे, आम्हाला प्रत्यक्षात काहीच नवीन सांगायचे नाहीत, पण ते इतक्या गोड आणि प्रभावी पद्धतीने बोलायचे की सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जायचं."
ते पुढे म्हणाले,"ठोस माहिती काहीच नसल्यामुळे, ही बातमी कशी मांडायची यासाठी आम्हाला बरंचसं कल्पनाशक्तीवरच अवलंबून राहावं लागायचं."

फोटो स्रोत, Getty Images
शेरगर गायब झाल्यानंतर आठवडाभराने, मुख्य अधीक्षक जेम्स मर्फी यांनी हसत हसत पत्रकारांना सांगितलं की, त्यांना मदतीच्या ज्या ऑफर येत आहेत, त्या फक्त भविष्य सांगणाऱ्यांकडूनच येत आहेत.
ते म्हणाले, "डिव्हायनर्स (ज्योतिषी), क्लेअरव्हॉइंट्स (दिव्यदृष्टी) आणि सायकिक लोक अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांमधून आतापर्यंत सुमारे 50 जणांनी संपर्क केला आहे."
हा धागा तपासण्यासाठी बीबीसीचे पत्रकार निकोलस विचेल पश्चिमेकडे काउंटी गॉलवे येथे गेले. इंग्लंडमधील माध्यम मानले जाणारे बॉब आणि आयलीन आयसन यांनी दावा केला होता की, त्यांना शेरगर एका उद्ध्वस्त मठात असल्याचं दर्शन झालं आहे.
आयसन दाम्पत्याने सांगितलेल्या ठिकाणावर ड्युनिरी गावात ते गेले. तिथे खरंच एक जुना, पडझड झालेला मठ दिसला, "पण घोड्याचा कोणताही मागमूस नव्हता."
काळ जसजसा पुढे गेला, तसतसं शेरगर कुठे गेला याचं रहस्य जगातील मोठ्या पण न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक बनलं. लोक याची चर्चा लॉर्ड लुकन यांच्या अचानक गायब होण्याच्या घटनेसोबत, तसेच 'एल्विस अजून जिवंत आहे' (एल्विस लाइव्ह्स) अशा अफवांसोबत करू लागले.
'आजपर्यंत न सुटलेलं अपहरणाचं कोडं'
हे प्रकरण जितकं गूढ होतं, तितकंच काहीसं विनोदाचं कारणही बनलं.
आयआरएचा माजी सदस्य आणि नंतर माहिती देणारा (इन्फॉर्मर) बनलेला सीन ओ'कॅलघन यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं की, अपहरणकर्त्यांना शेरगर सांभाळता न आल्यामुळे अपहरणानंतर लवकरच त्याचा मृत्यू झाला.
मात्र शेरगरच्या अपहरणाशी संबंधित एकाही व्यक्तीला आजपर्यंत शिक्षा झालेली नाही. हे प्रकरण अजूनही खुले आहे आणि आजपर्यंत ते न सुटलेलं एक गूढच राहिलं आहे.
अपहरणानंतर काही महिन्यांनी आगा खान यांनी आपल्या नवीन, वेगवान आलिशान यॉटला 'शेरगर' असं नाव दिलं. हे नाव त्यांनी आपल्या लाडक्या घोड्याच्या आठवणीप्रित्यर्थ ठेवलं होतं.
अनेक वर्षांनंतर त्यांनी कबूल केलं की, शेरगरने जिंकलेल्या त्या अद्भुत डर्बी शर्यतीचा व्हीडिओ त्यांनी शेकडो वेळा पाहिला आहे. ते म्हणाले, "ही आठवण कधीही पुसली जाऊ शकत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











