1 रुपयाच्या सुईपासून ते दीड कोटीच्या घोड्यापर्यंत; माळेगावची यात्रा एवढी स्पेशल का?

फोटो स्रोत, Shrikant Bangale
"दरवर्षी माळेगावची वारी करितो, कधीच वारी चुकना आमची. पहिल्यापासून. 1972 पासून येताव आम्ही इथं."
ही भावना घेऊन वर्षानुवर्षं माळेगावच्या खंडोबा यात्रेत अनेक जण येतात.
माळेगाव हे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातलं गाव. दरवर्षी इथं खंडोबाची यात्रा भरते. मार्गशीर्ष अमावस्येला ही यात्रा सुरू होते.
तेव्हा बेल भंडारा, खोबऱ्याच्या उधळणीनं, 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या निनादानं इथला परिसर दणाणून जातो.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
माळेगावच्या खंडोबाची यात्रा जवळजवळ 400 वर्षांची परंपरा असलेली यात्रा आहे. शेतकरी, गोरगरीब आणि जे भटके-विमुक्त आहेत, या सगळ्यांसाठी ही यात्रा फार आकर्षणाचा विषय असते.
दक्षिण भारतातली मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं. या यात्रेत महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश या राज्यांमधून भाविक आणि व्यापारी येतात. दरवर्षी 18 ते 20 लाख भाविक आणि 10 ते 15 हजार व्यापारी इथं येत असल्याचं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं 1 रुपयांच्या सुईपासून ते दीड कोटी रुपयांपर्यंतचा घोडा पाहायला मिळतो. इथं उंदरापासून उंटापर्यंत, सर्व पक्षी-प्राण्यांची खरेदी-विक्री केली जाते.
यात्रेत आमची भेट सुलोचना जाधव यांच्याशी झाली. त्या तेलंगणातल्या आदिलाबादहून आल्या होत्या.

फोटो स्रोत, Kiran Sakale
सुलोचना म्हणाल्या, "आम्हाला दर्शन घेऊन आनंद झाला, दरवर्षी येऊन आम्ही दर्शन घेतो. पुष्कळ वर्षं झाले आता आम्ही येऊन दर्शन घेताव."
सुलोचना यांच्या गावातून 10 जण माळेगावच्या यात्रेसाठी आले होते.

फोटो स्रोत, Kiran Sakale
आम्ही यात्रेत पोहचलो तेव्हा खंडोबा मंदिरासमोर दर्शनासाठी रांग लागली होती. दर्शनासाठी VIP पास 100 रुपये आणि वेळ दीड तास, तर मोफत दर्शनासाठी 4 तास लागतील असं सांगण्यात आलं.
या पासेसच्या पैशांतून भाविकांच्या 10 दिवसांच्या जेवणाची सोय केली जात असल्याचं यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Kiran Sakale
माळेगावच्या यात्रेत पूर्वी जातपंचायत भरवली जायची. कालांतरानं ती बंद करण्यात आली. माळेगावची यात्रा ही अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे इथं भरणारा घोड्यांचा बाजार.
इथला घोड्यांचा बाजार देशातील प्रमुख बाजारांपैकी एक आहे. चेतक, मारवाडी, पंजाबी अशा उच्च जातीचे घोडे इथं विक्रीला येतात. व्यापारी गोपाल रंगभाळ गेल्या 40 वर्षांपासून माळेगावमध्ये घोडे आणतात.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
गोपाल रंगभाळ सांगतात, "यावेळेस मोठे तीन आणि एक छोटा असे 4 घोडे आहेत. त्यापैकी प्रदर्शनात 2 राहणार आहेत. पहिल्या नंबरचा एक विकायचा आहे. त्याची साडेतीन लाख रुपये किंमत आहे. आणि हे दोन आहेत, पुष्करहून आणलेले आहेत. एक आणला साडेनऊ लाखाचा, दुसरा आणला साडेचार लाखाचा."

फोटो स्रोत, Kiran Sakale
यात्रेत राजकीय व्यक्तीही त्यांच्याकडील घोडे प्रदर्शनासाठी ठेवतात. पूर्वी गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांच्याकडील घोडे यात्रेत प्रदर्शनासाठी आणले जायचे. यंदा मात्र ते दिसले नाही.
राजकीय लोकांच्या घोड्यांचं प्रदर्शन ज्या जागेवर भरतं, त्या जागेला VIP लोकांची राहुटी म्हणून ओळखलं जातं. दिवसेंदिवस घोड्यांची मागणी वाढत चालल्याचं व्यापारी सांगतात.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
मनोहर माने सांगतात, "घोड्याचा एक असा शौक आहे, घोड्याचा शौक एकदा का लागला की कधीच कमी होणार नाही. घोड्याचा शौक दिवसेंदिवस वाढलाय. काही नाही, लोक घेणार घोडा आणि उगं बांधून ठेवणार गोठ्यासमोर मोठेपणापायी."
परीट समाजातील मनोहर माने 3 पिढ्यांपासून माळेगावच्या यात्रेत येतात. यात्रा संपली की ते गावी जाऊन लाँड्रीचा व्यवसाय करतात.

फोटो स्रोत, Kiran Sakale
माळेगाव यात्रेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो. पोलिसांकडून लाऊडस्पीकर वेळोवेळी सूचना दिल्या जातात. चोरांपासून सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
माळेगावच्या यात्रेतील गाढवांचा आणि उंटांचाही बाजार देशात प्रसिद्ध आहे. इथं 20 हजारांपासून ते 60 हजार रुपयांपर्यंत किंमतीची गाढवं विक्रीस आलेली पाहायला मिळतात. वीटभट्टी व्यावसायिक आणि परराज्यातील व्यापारी इथं गाढवं खरेदी करतात.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
नांदेडच्या बिलोलीतील इबिदार गंगाधर यांनी 2 गाढवं विकत घेतलीय. ते म्हणतात, "28 हजारला 2 गाढवं घेतलं. पसंद आले आपल्याला. घेतले वाहतुकीला पाहिजे म्हणून."
उंटांच्या बाजारात आमची भेट कर्नाटकातील काही व्यापाऱ्यांशी झाली. उंटाची किंमत 60-70 हजारांदरम्यान असल्याचं त्यांनी सांगितलं. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यात्रेतील उंटांची संख्या 60 ते 70 टक्क्यांनी कमी झाल्याचंही ते म्हणाले. बाजारात यंदा केवळ 10 उंट दिसले.

फोटो स्रोत, Kiran Sakale
माळेगावची यात्रा आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे इथं भरणारा जुन्या कपड्यांचा बाजार. भटक्या विमुक्त समाजातील लोक हा बाजार भरवतात. अगदी 1 महिन्याच्या बाळापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचे कपडे या बाजारात मिळतात.
या बाजारातील बहुतांश विक्रेते हे गोंधळी समाजातील असून खरेदी करणारे हे अठरापगड समाजातील असल्याचं इथले विक्रेते सांगतात.
या बाजारात काही महिला त्यांच्या लहान मुलांसाठी कपडे खरेदी करताना दिसतात. लहान मुलंही मोठ्या आनंदानं ती अंगाला लावून पाहताना दिसतात.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
काही जण या बाजाराला गरिबांच्या कपड्यांचा मॉलही संबोधतात. पण, हे कपडे अंगावर लावून पाहताना लहानग्यांचा चेहऱ्यावर दिसणाऱ्या समाधानापेक्षा श्रीमंत ते दुसरं काय असू शकतं, असा प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
यात्रेत डोंबारी समाजातली मुलगी 'सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ' या गाण्यावर दोरीवरचे खेळ करताना दिसते. तेव्हा तिला पाहणारे लोक म्हणतात, 'लेकराची कमाल हाये. पोटासाठी करावं लागतं!'

फोटो स्रोत, Shrikant Bangale
माळेगावची यात्रा म्हणजे 'काठी अन् घोंगडं' असं समीकरण. इथं घोंगड्यांची अनेक दुकानं थाटलेली दिसतात. सांगलीचे अण्णा खामकर हे सनगर समाजातून येतात. त्यांचा घोंगडी बनवण्याचा परंपरागत व्यवसाय आहे.
आता हातमाग बंद पडल्यानं मशीनवर घोंगडी तयार होत असल्याचं तो सांगतात. यात्रेत 700 रुपयांपासून ते 6000 रुपयांपर्यंत घोंगडी मिळते.
अण्णा खामकर सांगतात, "जावळी घोंगडं माळेगाव यात्रेत जास्त प्रमाणात विकलं जातं. ओरिजिनल माल लागतो सगळा, तिचं दर 1700, 1800 रुपये पासून पुढे आहेत."

फोटो स्रोत, Kiran Sakale
हिंगोलीचे भगवार उर्रेवार यांचं माळेगावच्या यात्रेत काठ्यांचं दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या काठ्या त्यांनी विकण्यासाठी ठेवल्यात. त्यांच्याकडील एका काठीची किंमत 600 रुपये आहे.
तिच्या वैशिष्ट्यांबद्दल भगवान सांगतात, "या काठीची किंमत 600 रुपये आहे, कारण हिची मूठ पितळाची आहे. माळेगावच्या यात्रेचं मूळ यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे काठी आणि घोंगडं घ्यायचं आणि जत्रेतनं घरला जायचं."
वयस्कर लोकांसाठी या काठ्या उतारवायत त्यांचा आधार बनतात.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
वासुदेव समाजातील संतोष पेंढारकर यांचंही यात्रेत दुकान आहे. ते बैलाचे पट्टे, घागरमाळी, घुंगरं, काठ्या वगैरे बनवण्याचं काम करतात. पण, ही यात्रा संपल्यानंतर पुढे काय? असं विचारल्यावर ते म्हणतात,
"दुसरी जत्रा करतो. सर्व अशा याच जत्रा करतो. फिरत राहायचं."
सगळं सामान विकतं का पण? यावर ते उत्तर देतात, "आता जरा कमी झालंय, आता बैलं कमी झालेत ना. त्याच्यामुळे धंदा जरा कमी झालाय. सध्या आता ट्रॅक्टरचं प्रमाण जास्त आहे. शेती व्यवसायाकडे लोक बघत नाहीत जास्त."

फोटो स्रोत, Shrikant Bangale
माळेगावची यात्रा संपली की संतोष कर्नाटकच्या यात्रेला जाणार आहेत. माळेगावच्या यात्रेमुळे त्यांच्यासारख्या अनेकांना रोजगार मिळतो. मूळ बीडच्या, गोंधळी समाजाच्या मुक्ता भगाडे यांचं यात्रेत झुणका भाकर केंद्र आहे.
भाकरी थापता-थापता मुक्ता सांगतात, "सकाळी 8 ते संध्याकाळी 11, साडे अकरा पर्यंत दुकान चालू ठेवतो. बेसन भाकर 30 रुपये प्लेट, पार्सल भाकर 20 रुपयाला देतो."

फोटो स्रोत, Shrikant Bangale
माळेगाव यात्रेला लोककलांचं माहेरघर म्हटलं जातं. इथं तमाशा आणि लावणी हे मुख्य आकर्षण असतं.
दुर्मीळ असलेल्या देवणी-लालकंधारी गायी आणि वळूंचं प्रदर्शन हेही या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं. पशुप्रदर्शनात देशी-विदेशी कुत्रेही पाहायला मिळतात. माळेगाव यात्रेत कृषी प्रदर्शन आणि कुस्त्यांची दंगलही पाहायला मिळते.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
इथं हजारो जनावरांची खरेदी-विक्री होते. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. यात्रेत सर्वधर्मीय लोक आनंदानं सहभागी होतात. ही यात्रा म्हणजे उत्तम अशा सामाजिक सलोख्याचं प्रतीक आहे.
माळेगावच्या यात्रेत महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचा स्टॉल लक्ष वेधून घेतो. या स्टॉलवर महिला कर्मचारी 1098 हेल्पलाईन, सखी वन स्टॉप सेंटर यांसारख्या उपक्रमांबाबत माहिती देताना दिसतात.

फोटो स्रोत, Kiran Sakale
यात्रेसाठी आलेले अनेक भाविक ग्रामपंचायत कार्यालयात आराम करताना दिसतात. घोड्यांना प्यायला पाणी नाही, गाढवांच्या बाजाराशेजारील हौदात खराब पाणी आहे, अशी नाराजीही काही जण व्यक्त करतात. राजकीय नेते बॅनरबाजी जोरात करतात, पण प्रत्यक्षात येऊन इथली स्थिती पाहावी आणि यात्रेतील सुविधांकडं लक्ष द्यावं, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात.
खंडोबा यात्रा समितीचे अध्यक्ष दयानंद पाटील सांगतात, "सध्या ही यात्रा जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या वतीनं भरली जाते. पण या यात्रेला मिळणारा निधी तुटपुंजा आहे. जेणेकरुन भाविकांच्या सोयी होत नाहीत. जर महाराष्ट्र शासनानं ही यात्रा चालवली, तर त्याला निधी भरपूर येईल आणि भाविकांची व्यवस्था होईल."

फोटो स्रोत, Kiran Sakale
खंडोबा मंदिरासमोर अविनाश दंतूलवार हा तरुण आम्हाला भेटला. तो भंडारा उधळण्यासाठी लागणारी हळदीची पुडी बनवत होता. दिवसातून हजार ते दीड हजार पुड्यांची विक्री होते आणि एक पुडी 10 रुपयांला विकली जाते, असं तो सांगतो.
छोटे-मोठे व्यवसाय आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीतून यात्रेत कोट्यावधीची विक्री होती. हजारो हातांना काम देणारी माळेगावची यात्रा ग्रामीण संस्कृतीचा मोठा उत्सव समजला जातो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












