नव्या वर्षात पर्यटनाला जाण्याचा विचार करताय? मग हे 7 ट्रॅव्हल ट्रेंड लक्षात घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लॉरा हॉल
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
जगातील आघाडीचे हॉटेल समूह, ट्रॅव्हल कंपन्या आणि ट्रेंडचं भाकित करणाऱ्यांच्या आकडेवारीनुसार, 2026 हे वर्ष पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
येत्या वर्षात पर्यटक शांत ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यावर भर देतील, अल्गोरिदमच्या आधारे तयार केलेल्या प्रवासाच्या योजना आखतील. तसंच अतिशय वैयक्तिक अपेक्षांनुसार एकांतातील ठिकाणं निवडतील आणि शांतपणे, घाई न करता, अधिक विचारपूर्वक प्रवास करण्यावर भर देतील.
मोठ्या आकडेवारीचं विश्लेषण करणारे, वर्तनाच्या अभ्यासातील तज्ज्ञ आणि ट्रॅव्हल कंपन्या गेल्या काही महिन्यांपासून पर्यटन, प्रवासाशी संबंधित आकडेवारी, माहिती संकलित करत आहेत. पर्यटन उद्योग कोणत्या दिशेनं जातो आहे, याचं आकलन करण्यासाठी, अंदाज घेण्यासाठी ते याचं विश्लेषण करत आहेत.
या काही वर्षांपूर्वी उदयास आलेल्या 'कूल्केशन्स'पासून ते 'फ्लॅशपॅकिंग' या संज्ञेपर्यंत, पर्यटनाच्या वार्षिक ट्रेंडमध्ये सहसा एखाद्या विचित्र, दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झालेल्या नव्या शब्दांचा उल्लेख असतो. त्यातून आपण कसं जगतो किंवा आपल्याला कसं जगायचं आहे, हे जवळपास नेहमीच दिसून येतं.
'कूल-केशन्स' आणि 'फ्लॅशपॅकिंग' हे दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झालेले शब्द आहेत. कूल्केशन्स हा 'कॉलिन्स डिक्शनरी'तील एक वर्ड्स ऑफ द ईयर, शब्द बनला होता.
तर फ्लॅशपॅकिंग ही बॅकपॅकिंगचीच पुढील आवृत्ती आहे. हा शब्द वरच्या दर्जाच्या किंवा श्रेणीच्या बॅकपॅकिंगसाठी वापरला जातो.
पर्यटनाच्या बाबतीत या वर्षासाठीच्या सर्वोत्तम अंदाजांमधून, तयार केलेल्या शब्दांसह, आम्ही ट्रेंड्सची निवड केली आहे. पर्यटनाचे 2026 मधील काही प्रमुख संभाव्य ट्रेंड्स पुढीलप्रमाणे आहेत.
1. रोजच्या धावपळीपासून दूर शांततेच्या शोधात
एक ट्रेंड 2026 मध्ये वर्चस्व गाजवणार आहे. तो म्हणजे, 'क्वाएटकेशन्स'. त्याला 'हशपिटॅलिटी' असंही म्हटलं जातं. आराम, शांतता आणि आजच्या आधुनिक जीवनशैलीतील वाढत्या तणावांपासून सुटका मिळवण्यावर हा ट्रेंड केंद्रित आहे.
सध्याच्या काळात एकीकडे आपण सतत डिजिटल संस्कृतीमध्ये जगत असतो. तर दुसऱ्या बाजूला रिअल टाइममध्ये आपल्यापर्यंत जागतिक घटनांची अंतहीन मालिका पोहोचत असते. या दोन्ही गोष्टींमधील संघर्ष लक्षात घेता, आपल्यापैकी अनेकजण यापासून दूर राहण्याचा, निवांतपणा शोधण्याचा प्रयत्न करत असतात, यात आश्चर्य नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हेक्टर ह्युजेस 'अनप्लग्ड'चे सह-संस्थापक आहेत. ही युकेमधील कंपनी लोकांना फोन, स्क्रीन यासारख्या डिजिटल गोष्टींपासून दूर राहत निसर्गाशी जोडून घेण्यासाठी डिजिटल डिटॉक्स केबिन्सची सेवा पुरवते. हेक्टर हा नवा ट्रेंड आकार घेत असल्याचं पाहत आहेत.
हेक्टर म्हणतात, "आम्ही 2020 मध्ये जेव्हा पहिल्यांदा अनप्लग्ड सुरू केली होती तेव्हा डिजिटल डिटॉक्सिंग आणि ॲनालॉग लिव्हिंग (डिजिटल गोष्टींविरहित जगणं) याविषयी फारसं कोणी ऐकलेलं नव्हतं."
"आता आमच्या निम्म्याहून अधिक पाहुण्यांनी, शारीरिक आणि मानसिक थकवा तसंच स्क्रीनच्या वापरामुळे आलेला थकवा हे त्यांचे बुकिंग करण्यामागचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं आहे."
हा ट्रेंड आता सर्वत्र दिसतो आहे. 'व्हिजिट स्केन्स'चा 'मॅप ऑफ क्वाएट्यूड' हे स्वीडनच्या दक्षिण भागातील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांचं नेटवर्क आहे. इथे डेसिबलनुसार क्रमवारी असलेली ठिकाणं आहेत. तिथे तुम्ही शांततेत आणि निवांतपणे राहू शकता.
तर ओरेगॉनच्या 'स्कायकेव्ह रिट्रीट्स'मध्ये, पाहुणे किंवा पर्यटक पूर्ण अंधारात तीन दिवस केबिनमध्ये राहतात. केबिन म्हणजे निसर्गात किंवा निवांत ठिकाणी असलेलं छोटंसं कॉटेज किंवा खोली.
2. नियोजन, बुकिंगसाठी जनरेटिव्ह एआयचा वाढता वापर
आपल्याला 2026 मध्ये प्रवास, पर्यटनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर केल्याचं निश्चितपणे दिसेल. अमाडीअस रिसर्चनुसार, पर्यटनासाठीचं नियोजन आणि बुकिंग करण्यासाठी वाढत्या संख्येनं प्रवासी जनरेटिव्ह एआयचा वापर करत आहेत.
एक्सपेडिया आणि बुकिंगडॉट कॉम सारख्या प्रमुख कंपन्या चॅटजीपीटी सारख्या एआय टूल्सचा वापर करत आहेत. त्यामुळे रोबोट्सना तुमच्या सुट्ट्यांमधील पर्यटनाचं नियोजन करणं पूर्वीपेक्षा सोपं होतं आहे.
रिअल टाइममध्ये केलेलं भाषांतर आणि मोबाईल डिजिटल चेक-इन्सची भर घातल्यास, तंत्रज्ञान प्रवास किंवा पर्यटनातील अनेक प्रशासकीय कामं हळूवारपणे काढून टाकत आहेत. पूर्वी ही प्रशासकीय कामं ही पर्यटनाची ओळख होती.
मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढीमुळे गुंतागुंतदेखील निर्माण झाली आहे. पर्यावरणपूरक गोष्टींना संस्था किंवा कंपन्यांशी जोडणारे तज्ज्ञ (सस्टेनॅबिलिटी एक्सपर्ट) इशारा देत आहेत की अल्गोरिदमद्वारे देण्यात येणाऱ्या शिफारशींमुळे अति-पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ त्याच काही निवडक पर्यटन स्थळांकडे जातो.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचप्रमाणे पर्यटनाशी निगडित फसवणुकीत (ट्रॅव्हल स्कॅम) होत असलेल्या वाढीमागे देखील हेच कारण आहे. त्यामुळेच या साधनांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे.
जॅस्मिन बिना, कॉन्सेप्ट ब्युरोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांस्कृतिक ट्रेंड तज्ज्ञ आहेत.
त्या म्हणतात की "जनरेटिव्ह एआयमुळे आपण कशाप्रकारे इच्छा व्यक्त करतो यामध्ये बदल होतो आहे. पण जनरेटिव्ह एआयमुळे मुळात आपण प्रवास किंवा पर्यटन का करतो यात बदल होत नाहीये."
"तुम्हाला रोजच्या कामातून किंवा तणावातून आलेला थकवा घालवण्यासाठी एखाद्या रिसॉर्टमध्ये जायचं असेल. मात्र आता टिकटॉकवर फक्त रिसॉर्ट शोधण्याऐवजी तुम्ही स्वत:विषयीच्या अनेक गोष्टी जाणून घेऊ पाहता."
"म्हणजेच तुम्हाला नेमका कोणत्या प्रकारचा ताण किंवा थकवा आला आहे, कोणत्या गोष्टी किंवा संवेदनात्मक गोष्टींना तुम्ही प्रतिसाद देता आणि तुमच्या आंतरिक स्थितीसाठी कोणतं ठिकाण सर्वोत्तम आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅटजीपीटीचा वापर करता."
3. स्वत:च्या निवडीपेक्षा तज्ज्ञ किंवा प्रणालीवर अधिक विश्वास
याला निर्णय घेण्याचा कंटाळा किंवा थकवा म्हणा, आळस म्हणा किंवा दुसऱ्याला निर्णय घेऊ देण्यातील रोमांच म्हणा. जिथे पर्यटकांना कोणत्याही प्रकारचे निर्णय अजिबात घ्यावे लागत नाहीत, अशा प्रकारच्या पर्यटनात एक स्पष्ट वाढ दिसून येते आहे.
फेरो बेटांवर, त्यांच्या सेल्फ-नॅव्हिगेटिंग कारच्या उपक्रमाद्वारे शाश्वततेच्या (पर्यावरणपूरकतेच्या) नावाखाली निवडीचं स्वातंत्र्य कमी केलं जातं आहे किंवा काढून टाकलं जातं आहे.
तर जगाच्या इतर भागांमध्ये याचा उपयोग खरोखरच निवांतपणा देणाऱ्या आणि आरामदायी सुट्ट्यांसाठी केला जातो आहे. अर्जेंटिनातील मेंडोसामध्ये सुसाना बालबोआच्या 'वाइनमेकर्स हाऊस अँड स्पा सूट्स'नं एक मिस्ट्री ट्रॅव्हल पर्याय सुरू केला आहे. हा पर्याय बुकिंगचा ताण कमी करण्यासाठी आणि पर्यटकांना खास आश्चर्यकारक अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
तर क्रूझ (आलिशान जहाज) उद्योगात, मिस्ट्री क्रूझ अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. मिस्ट्री क्रूझ म्हणजे जिथे प्रवासी प्रवासाचा मार्ग, नियोजन माहीत नसताना त्या जहाजावर चढतात.
लेमनग्रास या ट्रॅव्हल पीआर फर्मच्या ट्रेंडबद्दलच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, याप्रकारच्या खास तयार करण्यात आलेल्या सहली किंवा पर्यटनातून, घरी आणि परदेशात, सतत लहान-सहान निर्णय घेण्याबाबतचा थकवा आणि आकलनाबाबतचा अतिभार दिसून येतो.
4. विमान प्रवासापेक्षा रोड-ट्रिपला प्राधान्य
हिल्टनच्या 2026 ट्रेंड्स रिपोर्टनुसार, 2026 मध्ये पर्यटक रोड ट्रिपचा आनंद घेणार आहेत. त्यात नमूद केलं आहे की रोडट्रिप या हॅशटॅगला जगभरातून 59 लाख टॅग मिळाले आहेत. कारण पर्यटक मोकळ्या रस्त्यांचं आकर्षण पुन्हा अनुभवत आहेत.
हंटरमॉस हे हॉलिडे स्पेशालिस्ट आहेत. ते जरी एक पारंपारिक रोड ट्रिपचं रुपांतर एका आलिशान अनुभवात करत असले तरीदेखील अनेक पर्यटक किंवा प्रवासी अतिशय वेगळ्या कारणांसाठी त्याची निवड करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
याप्रकारच्या रोड-ट्रिपमध्ये मिशेलिनकडून रेटिंग मिळालेल्या अतिशय उत्तम रेस्टॉरंटमधील जेवणाबरोबर खास निवडक जीवनशैलीच्या ठिकाणांचा समावेश केलेला असतो.
हिल्टनच्या संशोधनानुसार, 60 टक्के ब्रिटिश लोकांचं म्हणणं आहे की ते पैसे वाचवण्यासाठी इप्सित स्थळी गाडीनं जातील.
मिलेना निकोलोवा, बिहेवियरस्मार्टच्या चीफ बिहेवियर ऑफिसर आहेत. मिलेना आपण कसा आणि का प्रवास करतो, याचं आकलन करण्यात तज्ज्ञ आहेत. रोड-ट्रिपमधील ही वाढ विशेषकरून अमेरिकन पद्धतीची वाटते. ज्यात अमेरिकेतील संस्कृती, प्रवासाच्या सवयींचा संबंध आहे.
त्या म्हणतात, "मात्र माणूस आणि कार यांच्यातील संबंधांचं स्वरूप, उत्तर अमेरिका आणि युरोपात खूपच वेगवेगळं आहे. त्यामुळे त्यांचा मनोरंजनासाठी कार चालवण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा आहे."
5. अत्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या पर्यटनाला प्राधान्य
इतरांसारखंच सामान्य पर्यटन करण्याचे दिवस आता गेले आहेत. पर्यटन उद्योग आता मोठ्या प्रमाणात अत्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या पर्यटनाकडे वाटचाल करतो आहे. आयुष्यातील विशिष्ट टप्प्यांसाठी आणि विशिष्ट परिस्थितींसाठी विशेष स्वरूपाच्या टूर्स आता उदयास आल्या आहेत.

फोटो स्रोत, pasco.photography
घटस्फोट, दु:खापासून ते रजोनिवृत्तीसाठीच्या ट्रिप, लग्नासाठी आणि अगदी रॅकेट स्पोर्ट हॉलिडे आणि कीटकप्रेमींसाठीच्या ट्रिप यासारख्या विशिष्ट आवडीनिवडींच्या ट्रिपचा यात समावेश आहे.
बिना यांच्या मते, या बदलातून आपण आता वेळेचा अनुभव कसा घेतो हे दिसून येतं.
त्या म्हणतात, "आयुष्य हे एखाद्या अंतहीन स्क्रोलसारखं झालं आहे. यात आयुष्याच्या विविध टप्प्यांशी निगडीत विधी, परंपरा आणि कार्यक्रम कमी झाले आहेत. घटस्फोट, तीव्र दु:ख आणि रजोनिवृत्तीसाठीच्या ट्रिप यासारख्या गोष्टी म्हणजे एखाद्या तीव्र भावनेवर केंद्रित असलेला पवित्र वेळेचा कप्पा तयार करणं."
"हे आपल्या आयुष्याचे नवे उंबरठे किंवा आरंभ बिंदू आहेत. लोकांना त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यातून बदललेल्या स्वरूपात बाहेर पडायचं आहे. पर्यटन उद्योगासाठी ही पूर्णपणे वेगळ्या पातळीवरील अर्थ आणि अनुभव देण्याची एक मोठी संधी आहे."
6. अनुभवलेल्या ठिकाणांऐवजी चाकोरीबाहेरच्या ठिकाणांना पसंती
"आमचे अधिकाधिक पर्यटक, विशेषकरून इन्स्टाग्राम-विरोधी गट, गर्दी असलेल्या लोकप्रिय ठिकाणांपासून दूर जात आहेत. कारण ही ठिकाणं अतिशय फिल्टर केलेल्या म्हणजे छानपणे संपादित केलेल्या , कोणतीही उणीव नसलेल्या ऑनलाइन इमेजसारखी क्वचितच असतात," असं निक पुली म्हणतात. ते 'सिलेक्टिव्ह एशिया' या पर्यटन एजन्सीचे संस्थापक आहेत.
याचा परिणाम असा झाला आहे की नेहमीच्या नसलेली वेगळी अशी पर्यटन स्थळं लोकप्रिय होत आहेत. स्पेनमधील टोलेडो, जर्मनीतील ब्रँडनबर्ग आणि अधिक धाडसी पर्यटकांसाठी इराकसारख्या ठिकाणांची आवड वाढते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युकेमध्ये या ट्रेंडमुळे लोक कॉट्सवॉल्ड्स आणि कॉर्नवॉलसारख्या प्रमुख पर्यटन काउंटीऐवजी, नॉर्थम्बरलँड, वेल्स आणि सॉमरसेटसारख्या कमी पर्यटक असणाऱ्या ठिकाणांकडे जात आहेत, असं लेमनग्रासच्या अहवालात म्हटलं आहे.
हिल्टनच्या ट्रेंडविषयक संशोधनातून जिज्ञासेवर आधारित पर्यटनात वाढ झाल्याचंही दिसून येतं. यात नमूद केलं आहे की विशेषकरून ब्रिटिश लोक अगदी काम किंवा करियर बाजूला सारून वैयक्तिक विकास आणि नवीन ठिकाणी जाण्याच्या अनुभवाला प्राधान्य देत आहेत.
साहसी पर्यटनाबद्दल आवड वाढते आहे. मग ते नेपाळमध्ये अस्सल होमस्टे शोधणं असो, की इटलीतील कमी ज्ञात असलेल्या ठिकाणांना भेट देणं असो किंवा अस्सल, वेगळ्या असणाऱ्या मात्र कमी पर्यटक जात असलेल्या ठिकाणांना भेट देणं असो.
निकोलोवा यांच्या मते, या बदलातून दिसून येतं की कशाप्रकारे अनुभव आता सामाजिक चलनाचं एक रूप म्हणून काम करतात.
त्या म्हणतात, "आज, सोशल मीडियामुळे, अनुभव हे अधिक वास्तविक, मूर्त झाले आहेत. ते दीर्घकाळापर्यंत आणि अधिक लोकांना प्रतिष्ठेसाठीचे पुरावे म्हणून दाखवले जाऊ शकतात."
"या प्रतिष्ठेचा एक भाग या वस्तुस्थितीमुळे देखील येतो की साहसी पर्यटन अशा लोकांशी जोडलेलं आहे ज्यांचा पर्यटनाचा समृद्ध अनुभव आहे आणि ज्यांनी सामान्य, अनेकजण करत असलेल्या पर्यटनापलीकडे प्रवास केला आहे."
7. भोगवादापेक्षा संस्कृतीला प्राधान्य
'बूकटॉक' या हॅशटॅगमुळे अंशत: प्रेरित होऊन, साहित्यिक, पुस्तकं किंवा साहित्यिक इतिहासाशी निगडित स्थळांचं पर्यटन करणं 2026 मध्ये वाढतच जाण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबतच त्याचाच एक भाग असलेला ट्रेंड म्हणजे 'सेट-जेटिंग'(टीव्ही आणि चित्रपटांमुळे प्रेरित असलेलं पर्यटन). हा ट्रेंडदेखील वाढण्याची शक्यता आहे.
जगभरातील हॉटेल, अगदी रात्रीच्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणची हॉटेलदेखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत.
इबिझापासून ते माद्रिदपर्यंत, हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अशाप्रकारच्या साहित्यिक गोष्टींचा अनुभव घेता येईल. यात दुर्मिळ पुस्तकं आणि वाचन शिबिरांपासून ते स्विमिंग पूलजवळच्या लायब्ररी आणि थीमवर आधारित मुक्कामांपर्यंत सर्व काही अनुभवता येईल.
पुढील वर्षी अनेक ठिकाणं अतिशय लोकप्रिय होण्याची आणि त्यांना मोठी मागणी असण्याची शक्यता आहे. जिथे सध्या नवीन हॅरी पॉटर टीव्ही मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे ते कॉर्नवॉल, एमराल्ड फेनेल यांच्या आगामी वदरिंग हाइट्स या चित्रपटाची पार्श्वभूमी असलेलं यॉर्कशायर मूर्स आणि ख्रिस्तोफर नोलनच्या द ओडिसीच्या रुपांतरणामुळे लोकप्रिय होण्याची शक्यता असलेलं ग्रीस ही यातील काही ठिकाणं आहेत.
बिना या ट्रेंडकडे पलायनाचं एक आधुनिक स्वरूप म्हणून पाहतात.
त्या म्हणतात, "अत्यंत वेगानं होणारे बदल किंवा संकटाच्या काळात, आपण आपल्या भीतीबद्दल आणि इच्छेबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी काल्पनिक कथांमध्ये रमतो."
"त्यामुळेच 1930 च्या आणि 1940 च्या दशकात काल्पनिक साहित्य म्हणजे कथा, कादंबऱ्यांमध्ये वाढ झाली. कारण तेव्हा जगात युद्ध सुरू होतं. 1960 च्या दशकात विज्ञान कथा, कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. कारण त्या काळात अंतराळ संशोधन आणि मोहिमांसाठीची स्पर्धा होती. प्रतिसंस्कृतीचा शोध घेण्याचा तो काळ होता."
"आताच्या काळात आपण जुन्या व्यवस्थांच्या पतनाचा आणि पुनर्जन्माचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, आजच्या काळाच्या संदर्भाचा मेळ घातलेल्या पौराणिक कथा, कादंबऱ्या (मायथिक फिक्शन) आणि वास्तविक जगापलीकडचं भविष्यातील, सुपरनॅचरल गोष्टी असलेल्या कथा, साहित्य (स्पेक्युलेटिव्ह फिक्शन) सध्या लोकप्रिय होत आहेत."
"साहित्यिक पर्यटन हे एक प्रकारचं भावनिक शमन किंवा विरेचन आहे. ते तुम्हाला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारे काल्पनिक कथाविश्वात आणखी खोलवर जाण्यास मदत करतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











