नागपूरमधील स्फोटकांच्या कंपनीतील स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी; मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव इथल्या 'एसबीएल एक्स्प्लोझिव्ह' या स्फोटांच्या कंपनीत आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला आहे.
या स्फोटामध्ये 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झालेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या स्फोटातील जखमी व्यक्तींवर नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलंय?
राऊळगावची 'एसबीएल एक्स्प्लोझिव्ह' ही कंपनी नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर ही आहे. औद्योगिक स्फोटकं बनवणारी ही एक आघाडीची कंपनी आहे.
खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटकं, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादनं या कंपनीमध्ये तयार केली जातात.

याच कंपनीमध्ये तयार झालेल्या डिटोनेटरचा स्फोट झाल्यानं ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कंपनीमध्ये स्थानिक भागातील महिला मोठ्या प्रमाणात कामाला येतात.
रविवारी सकाळच्या शिफ्टमध्ये अनेक महिला काम करत असताना हा स्फोट झाला. त्यामुळं मृतांमध्येही मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.
याआधीही जून 2024 मध्ये नागपूरात स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी काय सांगितलं?
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

"प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील काटोल तालुक्यात 'एसबीएल एक्स्प्लोझिव्ह' कंपनीमध्ये स्फोट झाला असून यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांची संख्या वाढू शकते," असं ते म्हणाले होते.
त्यानंतर काही वेळाने मुख्यमंत्र्यांनी स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटलंय की, "नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे."
पुढे ते म्हणाले की, "मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. 'पेसो' आणि 'डिश' यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे, असं ते म्हणाले.
या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











