विकास लवांडे यांच्यावर शाईफेकीचे प्रकरण; एफआयआरमध्ये 'या' कलमांखाली दाखल झाला गुन्हा

फोटो स्रोत, UGC
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात शाई ओतण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
लवांडे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा गंभीर आरोपही केला आहे.
त्यांच्यावर शाईफेक करतानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे हे साथीदारांसह लवांडे यांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर शाईफेक करताना दिसत आहेत.
दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी वाढत असल्याचे विधान केले होते.
यानंतर या मुद्द्यावर विलास लवांडे सातत्याने सार्वजनिकपणे भाष्य करत होते. याच कारणामुळे आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा विलास लवांडे यांनी केला आहे.
एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 9 मे 2026 रोजी एक प्रथम खबर अहवाल (FIR) दाखल झाला आहे.
या एफआयआरमधील माहिती सारांश रुपाने पुढीलप्रमाणे, 'तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी तक्रारदाराला अडवून जबरदस्तीने थांबवले. या वेळी त्यांनी तक्रारदाराच्या वाहनाची तोडफोड केली आणि त्याच्यावर हल्ला केला. आरोपींकडे लोखंडी रॉड, काठीसारखी हत्यारे असल्याचे तक्रारीत नमूद आहे.'
'या घटनेत तक्रारदार जखमी झाला असून त्याच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. आरोपींनी धमकावून दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत विविध कलमांखाली (127(2), 189(2), 191(2), 190, 115(2), 351(2), 352) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती FIR मध्ये नमूद आहे.'
एफआयआरमधील कलमं कोणत्या गुन्ह्यांच्या संदर्भातील आहेत?
भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 127(2), 189(2), 191(2) आणि 190 ही कलमे एकत्रितपणे बेकायदेशीर जमाव, जबरदस्तीने अडवणे, धमकी देणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृत्यांशी संबंधित आहेत. या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला अडवणे, दहशत निर्माण करणे किंवा हिंसक हेतूने जमाव करणे हे गुन्हे ठरतात.
तसेच कलम 115(2), 351(2) आणि 352 ही कलमे मारहाण, दुखापत करणे, शस्त्रांचा वापर करून हल्ला करणे आणि गुन्हेगारी बळाचा वापर यांसंदर्भातील आहेत. एखाद्या व्यक्तीवर शारीरिक हल्ला करून जखमी करणे किंवा नुकसान पोहोचवणे हे या कलमांखाली दंडनीय गुन्हे मानले जातात.
लवांडेंनी काय म्हटलं होतं?
काही दिवसांपूर्वी लवांडे यांनी एक पत्रकारपरिषद घेतली होती.
त्यात ते म्हणाले होते, "आम्ही संतांच्या भागवत वारकरी संप्रदायात धर्मांध आणि मनुवादी विचाराच्या लोकांनी वैचारिक आणि सांस्कृतिक स्वरुपाने कशाप्रकारची घुसखोरी केलीय आणि त्यातल्या 20 लोकांची नावं जाहीर केली होती.
ही 20 नावं आहेत यात वारकरी संप्रदायांच्या संतांच्या विचारांच्या एकूणच परंपरेत मनुवादी विचारांची वर्णवर्चस्व विचारांची त्याचबरोबर पुरोहितशाहीची कर्मकांड यासगळ्या सनातन वैदिक धर्माची वैचारिक घुसखोरी केली आहे. त्यावर आजही आम्ही ठाम आहोत.
यात काही लोक भगवे कपडे घालून त्याच्यामध्ये वारकरी असल्याचं दाखवत आहे. खरंतर त्यांची परंपरा, गादी वेगळी आहे. त्यांनी संतांच्या गादीवर येऊन नाचायचं कारण नाही. कारणं तुमचे विचार तत्वज्ञान वेगळं आहे."

फोटो स्रोत, YT/@Vikaslawandeofficial
हे सांगताना त्यांनी काही लोकांची नावं घेतली होती तसेच या लोकांचे फोटो असलेलं एक पत्रकही दाखवलं होतं.
साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत शरद पवार यांनीही वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांची घुसखोरी झाल्याचं म्हटलं होतं.
"धर्मांध शक्तींना बळ देणारी ते मांडणी करतात असं ते म्हणाले होते. वारकरी संप्रदायात 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे म्हणून आम्ही यादी करायला सुरुवात केलीय.
आता साधारणतः चाळीस एक लोक वारकरी संप्रदायात कीर्तन-प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्देवाने प्रबोधनाच्या या मार्गावर महिला कुठेच दिसत नाहीत," असंही लवांडे म्हणाले होते.
शाईफेकीबाबत काय म्हणाले लवांडे?
विकास लवांडे यांनी एक्स या हँडलवरुन आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे.
त्यात ते म्हणतात, "आज सकाळी म्हतोबाची आळंदी येथे माझं प्रवचन होतं. ते संपल्यावर गावाच्या बाहेर आल्यावर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी मला अडवून माझ्यावर शाई ओतली. "

फोटो स्रोत, X/@VikasLawande1
"मला धक्काबुक्की केली. दोघा तिघांकडे पिस्तुल होतं. मला मारण्याची धमकी देत होते. पण लोक जमत असताना ते तात्काळ पळून गेले. त्याची तक्रार देण्यास मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे आलो आहे.
मी त्या सर्वांचा निषेध करतो. पोलिसांनी त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहील," असंही लवांडे म्हणाले.
या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तर खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

फोटो स्रोत, @VikasLawande/X
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे, हे उघड आहे.
कायदा‑सुव्यवस्थेच्या दृष्टीनेदेखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत."
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,
"महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध!
असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा‑तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळे या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही.
या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढे लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी!"
संग्राम भंडारे यांनी काय सांगितलं?
या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं संग्राम भंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पण सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करत त्यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे.
विकास लवांडे यांनी आमच्या गुरुवर्यांवर सतत टीका केल्यानं त्यांच्यावर शाई ओतल्याचं भंडारे म्हणाले.

फोटो स्रोत, UGC
"ज्या गुरुवर्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. हिंदू धर्माची शिकवण दिली. त्यांच्याबद्दल विकास लवांडे घुसखोर, मनुवादी, धर्मांध म्हणत होते. ते आम्ही कसं सहन करू.
गेल्या अनेक दिवसांपासून ते वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर सतत टीका करत होते. त्यांनी आमच्याशी भिडावं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतोय. त्यांच्यावर आम्ही शाई ओतली," असं संग्राम भंडारे यांनी व्हीडिओमध्ये म्हटलं.
लवांडेंनी पिस्तुल आणि गुंडांबाबत केलेले आरोप त्यांनी फेटाळले. त्यांचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलं. आम्ही चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट आहोत. असं ते म्हणाले.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. ज्ञानोबा तुकारामांचे आम्ही वारकरी आहोत. इथून पुढेही त्यांनी वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका केली तर त्यांना पुढेही याला सामोरं जावं लागेल, असंही भंडारे म्हणाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




























