संभाजी ब्रिगेड संघटनेची स्थापना नेमकी का करण्यात आली होती? ती कसं काम करते?

फोटो स्रोत, Facebook/Sambhaji Brigade
5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर अचानक एक जमाव आला आण त्यांनी हल्ला सुरू केला.
या हल्ल्यात संस्थेच्या इमारतीचं प्रचंड नुकसान झालंच होतं. तसंच दुर्मिळ पुस्तकं आणि हस्तलिखितं यांचीही मोठी नासधूस झाली.
मग चर्चा सुरू झाली हा हल्ल कुणी केला याची, तिथूनच पुढे संभाजी ब्रिगेड या संस्थेचं नाव महाराष्ट्रभर चर्चेत आलं.
हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. सर्व स्तरातून या घटनेबाबत प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
हा हल्ला आम्ही विचारपूर्वक केल्याचं संभाजी ब्रिगेडनं त्यानंतर म्हटलं होतं. हल्ल्यात सहभागी संभाजी ब्रिगेडच्या 72 जणांना पुढे अटक करण्यात आली.
14 वर्षांनंतर 2017 साली या खटल्यातील 68 जणांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली. चार आरोपींचं सुनावणीदरम्यान निधन झालं होतं.
अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेल्या 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकातील आक्षेपांमुळे हा हल्ला झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा होता. या घटनेनंतर राज्य सरकराने पुढे या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदीही घातली.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील दोन दशकांपूर्वी झालेल्या हल्ल्याची आता आठवण येण्याचं कारण म्हणजे, प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी (14 जुलै) झालेला हल्ला.
'...अवघा मुलूख आपला'
प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ही संघटना मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करते.
संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की, "संभाजी ब्रिगेडची ओळख ही प्रामुख्याने आक्रमक आंदोलने करणारी संघटना अशीच राहिली आहे.
मराठा समाजाची शक्ती, वेळ, पैसा या गोष्टी गेली 35-40 वर्षे केवळ आरक्षण या विषयाभोवती केंद्रित झाल्या आहेत. मात्र आजही मराठ्यांच्या हातात म्हणावे तसे यश मिळाले नाही.
उलट हजारो केसेस, अनेक आंदोलकांचा बळी, राजकारण्यांकडून फसवणूक, सामाजिक सलोख्याचे बिघडलेले वातावरण, इत्यादि नको असणाऱ्या गोष्टी पदरात पडल्या.

फोटो स्रोत, facebook/PravinGaikwadPage
केवळ आरक्षणाने मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, म्हणून आता उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात उतरायला हवे असे प्रविणदादांचे सांगणे आहे."
2022 सालापासून "अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूख आपला !" या नावाचा उपक्रम प्रवीण गायकवाड चालवतात.
"आपल्या लोकांनीही ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलूखगिरी करावी, तिथं जाऊन नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात, त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग करावी अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे."
'आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आमची लोकं समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील', असं प्रवीण गायकवाड सांगतात.
संभाजी ब्रिगेड - राजकीय पक्ष म्हणून घोषणा
2016 साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रीयपणे उतरण्याचा निर्णय घेतला.
30 नोव्हेंबर 2016 रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वत:ला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं.
तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीस झाले.

फोटो स्रोत, facebook/PravinGaikwadPage
प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघाच्या अखत्यारित संभाजी ब्रिगेड असताना, तिचे पाच वर्षं अध्यक्षही होते. 2016 साली संभाजी ब्रिगेडचा पक्ष स्थापन करणारे मनोज आखरे हे त्यावेळी प्रवीण गायकवाड यांचे सहकारी होते, जे पुढे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही झाले होते.
प्रवीण गायकवाड यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्येही प्रवेश केला. मात्र, त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही.
पुण्यातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही. त्यामुळे गायकवाड नाराज असल्याची चर्चाही झाली.
मात्र, प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेश किंवा पक्षांतरं सुरू असतानाही, संभाजी ब्रिगेडचं काम सुरू ठेवलं.
गिरीश कुबेरांवर शाईफेक का केली होती?
नाशिकमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती.
गिरीश कुबेर लिखित 'रेनेसाँ स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र' पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे. यासंदर्भातील सविस्तर बातमी तुम्हाला इथं वाचता येईल.
नाशिकमध्ये घडलेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटल्या.
कुणी कृत्याचं समर्थन केलं, कुणी विरोध केला. याच निमित्तानं शाईफेकीचं कृत्य करणाऱ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेचीही पुन्हा चर्चा सुरू झालीय.

जेम्स लेन प्रकरणानंतर पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील हल्ल्यानंतर प्रामुख्यानं प्रकाशझोतात आलेल्या संभाजी ब्रिगेडनं पुढे अनेकवेळा विविध मुद्द्यांवर निदर्शनं केली आणि चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली.
2004 च्या जानेवारीत भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर प्रामुख्यानं प्रकाशझोतात जरी संभाजी ब्रिगेड आली असली, तरी या संघटनेची सुरुवात तेव्हापासून दशकभरापूर्वी झाली होती. 1990 साली स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या निर्मितीत संभाजी ब्रिगेडची बिजं आहेत.
संभाजी ब्रिगेडची स्थापना कुणी केली?
पुरुषोत्तम खेडेकर यांनी या 1 सप्टेंबर 1990 रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती.
मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते.
मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता.
पुढे मराठा सेवा संघानं 30 हून अधिक विभाग सुरू केले. याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं की, "नव्वद साली जेव्हा मी मराठा सेवा संघाची स्थापना केली तेव्हा माझ्यासोबत निर्मलकुमार देशमुख, अमृतराव सावंत यांच्यासारखे एकूण 17 जण प्रमुख कार्यकर्ते होते. मर्यादित उद्देशासह सुरू झालेली संघटनेनं पुढे मोठं रूप घेतलं."
मराठा सेवा संघानं स्थापनेच्या काही वर्षांतच 32 ते 33 विभाग सुरू केले. त्यात पुढे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते महिलांसाठीचं जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठीचं संभाजी ब्रिगेड.
भांडारकर, वाघ्या कुत्रा, गडकरी पुतळा ते बाबासाहेब पुरंदरे
1991 नंतर संभाजी ब्रिगेडची स्थापन केल्याचं पुरुषोत्तम खेडेकर सांगतात. मात्र, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील हल्ल्यानंतर ही संभाजी ब्रिगेड प्रामुख्यानं चर्चेत आल्याचंही ते मान्य करतात.
भांडारकर संस्थेवरील हल्ल्याबाबत या बातमीच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलंच आहे. मात्र, ही एकच घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडवली गेली, अशातलाही भाग नाही. त्यानंतरही अनेक घटना घडल्या, ज्यातून संभाजी ब्रिगेड वादात राहिली आणि या संघटनेवर टीकाही होत राहिली.
भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांच्यावरून वाद सुरू झाला.
दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा दावा करत, दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी मराठा संघटनांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली. यात संभाजी ब्रिगेड अग्रस्थानी होती.

फोटो स्रोत, Facebook/Pravin Gaikwad
या प्रकरणी सरकारने समितीही नेमली. या समितीच्या अहवालाचा आधार घेत क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख काढून टाकण्यात आला. तसंच दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही रद्द करण्यात आला.
त्यानंतर दादोजी कोंडदेवप्रकरणी पुन्हा वाद तापला तो 2010 साली. त्यानंतर डिसेंबर 2010 मध्ये लाल महलातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आला.
त्यानंतर 2012 साली संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता, असं म्हणणं संभाजी ब्रिगेडचं होतं आणि आहे.
त्यानंतर चर्चा करण्यासारखं संभाजी ब्रिगेडचं गेल्या काही वर्षातील निदर्शन म्हणजे 2017च्या जानेवारी महिन्यात पुण्यातील संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकणं.
राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे.

फोटो स्रोत, DR. KAMAL GOKHALE
बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास हा संभाजी ब्रिगेडच्या कायमच निशाण्यावर राहिला आहे. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही त्यांनी विरोध केला होता. त्यांच्यावरही शाईफेकीची घटना घडली होती.
एकूणच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह लेखन केल्याच्या आरोपातून आजवर संभाजी ब्रिगेडनं अनेकदा आक्रमक निदर्शनं नोंदवली आहेत.
आ. ह. साळुंखे, मा. म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज किंवा नंतरच्या इतिहासाची मांडणी करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार-प्रचारही संभाजी ब्रिगेडनं केलाय.
मात्र, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अमोल काटे म्हणतात की, "वैचारिक प्रतिवाद करण्याचं कधीच संभाजी ब्रिगेडनं सोडलं नाही. आम्ही याआधीही केलंय आणि अजूनही करतोय. किंबहुना, गिरीश कुबेर यांना मी स्वत: लोकसत्ताच्या कार्यालयात जाऊन पत्र देऊन आलोय. मात्र, वैचारिक प्रतिवादाला प्रतिसादच दिला जात नाही. मग करणार काय?"
इथं एक गोष्ट आणखी नमूद करायला हवी, ती म्हणजे, गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करणारी संभाजी ब्रिगेड ही आता पुरुषोत्तम खेडेकरांच्या नेतृत्वातील नाहीय.
दोन 'संभाजी ब्रिगेड' कशा?
2016 साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रीयपणे उतरण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबर 2016 रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वत:ला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं. तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीस झाले.
मात्र, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अमोल काटे म्हणतात, संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना होती आणि त्याच धर्तीवर तिचा प्रसार झाला होता. त्यामुळे राजकीय पक्षास अनेकांचा विरोध होता, त्यातूनच पक्ष आणि सामाजिक संघटना हे दोन गट निर्माण झाले.
संभाजी ब्रिगेडच्या राजकारणातील प्रवेशास मराठा सेवा संघात आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शवला आणि त्यांनी 'मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड' नामक सामाजिक संघटना म्हणून वेगळा गट सुरू ठेवला.

फोटो स्रोत, Facebook/Pravin Gaikwad
गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करणारे कार्यकर्ते हे 2016 साली प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वात मराठा सेवा संघापासून बाजूला झालेल्या संभाजी ब्रिगेडमधील आहेत, हे इथं नमूद करणं आवश्यक आहे.
मात्र, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या विचारधारा अनेक मुद्द्यांवर आजही सारख्याच आहेत.
त्यामुळेच बीबीसी मराठीशी बोलताना मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी गिरीश कुबेरांवरील शाईफेकीचं समर्थन केलं होतं.
संभाजी ब्रिगेडला आक्रमक असूनही समर्थन का मिळतं?
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची वाटचाल पत्रकार म्हणून जवळून अभ्यासणारे राज कांदळकर यांनी याबाबत बीबीसी मराठीशी चर्चा केली.
पत्रकार राज कांदळकर म्हणतात, "संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्याबद्दल तुमचे मतभेद असू शकतील, पण त्यांनी ज्या तरुणांना गोळा केले त्यांचे मनोविश्व समजून घेतले पाहिजे."
"दोन-पाच एकर शेती असणारा, शिक्षण घेण्याच्या अडथळ्यांनी वैतागलेला, नोकरी-रोजगार नसलेला 'नाही रे' वर्गातला शेतकरी मराठा समाजातल्या तरुणांना ही संघटना आपली वाटते.
त्या 'नाही रे' तरुणांना ही संघटना शिवरायांसारखे लढायचं आवाहन करून मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेनं जवळ केलंय," असं राज कांदळकर सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Sambhaji Brigade
इथं आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे केवळ भावनेच्या आहारी जात प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वातील संभाजी ब्रिगेडनं तरुणांची मोट बांधली नाही, तर गेल्या काही वर्षात या तरुणांना उद्योजकतेविषयक प्रशिक्षणं देण्याची कामंही सुरू केली आहेत.
विशेषत: पुण्यात प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या 'बिझनेस कॉन्फरन्स 2021'कडे याचं ताजं उदाहरण म्हणून पाहता येईल. संभाजी ब्रिगेडच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं हे सुरू केलंय.
"केवळ भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठीही 'अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपुला' असं म्हणत प्रवीण गायकवाडांनी उद्योजकतेकडे या कार्यकर्त्यांना वळवलंय," असं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सचिन देसाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











