सुगंधासाठी लावली जाणारी अगरबत्ती आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कोट्टेरू श्रावणी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
घरात सुगंधासाठी लावली जाणारी अगरबत्ती तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते, असं सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण वैज्ञानिकांच्या अभ्यासातूनच हे समोर आलं आहे. त्यासंबंधीच आम्ही तुम्हाला या बातमीतून विस्ताराने सांगणार आहोत.
विशेषतः मुलं, वृद्ध लोक आणि फुप्फुसं दुर्बल असलेल्यांसाठी हा धूर धोकादायक ठरतो.
बहुतांश प्रत्येक भारतीयांच्या घरात दररोज सुगंधी अगरबत्ती लावली जाते. सणासुदीच्या दिवसांत तर हमखास अगरबत्ती लावण्यात येते.
या अगरबत्तीमधून येणाऱ्या धूर आणि वासामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं विविध वैज्ञानिकांच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
अगरबत्तीचा धूर रोज श्वासात गेला तर आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. त्यातून निघणारा धूर हे फुप्फुसांना हळूहळू नुकसान करणारं एक घातक 'विष' आहे, असा इशारा फुप्फुस तज्ज्ञ (पल्मोनोलॉजिस्ट) सोनिया गोयल यांनी दिला आहे.
नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हीडिओत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अगरबत्तीमधून निघणारा विषारी धूर हळूहळू फुप्फुसांचं नुकसान करतो. धूम्रपान करणाऱ्यांच्या जवळ असताना आपण श्वासात घेत असलेल्या धुराइतकाच अगरबत्तीचा धूरही धोकादायक असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अगरबत्तीच्या धुरामुळे आरोग्याला धोका
गेल्या वर्षी बोस्टनमध्ये झालेल्या 'अॅलर्जी, अस्थमा आणि इम्युनॉलॉजी' या अमेरिकन वैद्यकीय संस्थेच्या (एसीएएआय) वार्षिक परिषदेत अगरबत्तीच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांबद्दल इशारा देण्यात आला होता.
अॅलर्जी किंवा दमा असलेले लोक, लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी हा धूर सर्वात जास्त धोकादायक ठरू शकतो, असं त्यांनी आपल्या इशाऱ्यात सांगितलं होतं.
इलिनॉय राज्यातील अर्लिंग्टन हाइट्स येथे मुख्यालय असलेल्या या वैद्यकीय संस्थेत सुमारे 6,000 डॉक्टर्स कार्यरत आहेत.
अगरबत्तीचा धूर श्वासात गेल्यावर डोकेदुखी, श्वसनाचे त्रास, त्वचेच्या समस्या आणि अॅलर्जी होऊ शकते, असा इशारा या संस्थेने आपल्या अहवालात दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका ग्रॅम अगरबत्तीमधून सुमारे 45 मिलीग्रॅम सूक्ष्म धूर कण (पार्टिक्युलेट मॅटर-पीएम) बाहेर पडतात. पण सिगारेटमधून फक्त सुमारे 10 मिलीग्रॅम कणच निघतात, असे एसीएएआयच्या अहवालात म्हटलं आहे.
याचाच अर्थ असा की, सिगारेटच्या तुलनेत अगरबत्तीमधून चार पट जास्त सूक्ष्म कण बाहेर पडतात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अगरबत्तीच्या धुरामुळे हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा धोका 1.12 पटीने वाढतो आणि स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूंचाही धोका तितक्याच पटीने वाढतो.
"अगरबत्ती लावणाऱ्यांना यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, विशेषतः लहान मुलांना याचा त्रास जास्त होऊ शकतो, याची माहिती किंवा जाणीव त्यांना नसते," असं एसीएएआयच्या सदस्य आणि वरिष्ठ संशोधक मेरी ली-वाँग यांनी सांगितलं.
आरोग्याच्या समस्या तर होतातच, पण अगरबत्तीमुळे घरातील हवेचे प्रदूषण वाढतं आणि काही वेळा आग लागण्याचाही धोका निर्माण होतो, असे एसीएएआय सांगते.
अगरबत्तीमध्ये कोणते घटक हवेत प्रदूषण करतात?
- सूक्ष्म कण म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर (पीएम): 2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांना सूक्ष्म कण म्हणतात. हे कण श्वसनसंस्थेत खोलवर जाऊन आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. घरात अगरबत्ती, सिगारेट आणि मेणबत्त्या यांमुळे हे धूरकण तयार होतात. जास्त प्रमाणात श्वासात गेल्यास, रोजच्या श्वासाशी संबंधित समस्या, हृदयविकार, फुफ्फुसांच्या ऊतींचे नुकसान, अकाली मृत्यू होण्याचा आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
- कार्बन मोनोऑक्साईड (सीओ): जेव्हा सेंद्रिय पदार्थ नीट जळत नाहीत, तेव्हा हा वायू निर्माण होतो. हा वायू रक्तातील हिमोग्लोबिनशी (कार्बोक्सीहेमोग्लोबिन) जाऊन रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतं. शरीरात थोड्या प्रमाणात जरी ते गेल्यास डोकेदुखी, थकवा, मळमळ अशा समस्या होतात. जास्त प्रमाणात श्वासात गेल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
- सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड, या वायूंमुळे आधीच असलेल्या हृदय, फुफ्फुस किंवा श्वसनविकारांचे प्रमाण वाढू शकते. यामुळे फुफ्फुसांचे नैसर्गिक संरक्षण कमी होऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
- बाष्पनशील सेंद्रिय संयुगे (व्होलाटाइल ऑर्गेनिक कंपाऊंड्स): हे संयुग विविध घन आणि द्रव पदार्थांमधून वायूच्या स्वरूपात निघतात. अनेक घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी वस्तूंमध्ये हे रसायन आढळतात. यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये सूज, नाक आणि घशात जळजळ, उलट्या होणे, डोकेदुखी यांसारखी समस्या उद्भवू शकते. दीर्घकाळ या संयुगांचा संपर्क झाल्यास कर्करोगाचा (कॅन्सर) धोका वाढतो आणि यकृत व मेंदूची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते.
- अल्डिहाइड्स: हे देखील बाष्पनशील सेंद्रिय संयुगे आहेत आणि खूप त्रासदायक संयुगे असतात. हे नाक, घसा आणि तोंडातील भाग (श्लेष्मल त्वचा) प्रभावित करतात, ज्यामुळे जळजळ आणि खोकला येऊ शकतो. फार्माल्डिहाइडचा (हे एक रंगहीन, तीव्र वास असलेलं रासायनिक संयुग आहे.) जास्त प्रमाणात श्वास घेणं धोकादायक आहे, कारण हा कर्करोग निर्माण करणारा (कार्सिनोजेन) घटक मानला जातो.
- पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स: हे रासायनिक संयुगे शरीरातील लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करून परिधीय धमन्यांचा आजार (पीएडी) निर्माण करू शकतात.
अगरबत्तीच्या धुराचा सर्वाधिक धोका कोणाला?
अगरबत्तीचा धूर मुलांवर, वृद्धांवर, दमा असलेल्या किंवा फुफ्फुस दुर्बल किंवा कमकुवत असलेल्या लोकांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे.
हा वायू अनेक वर्षे श्वासात गेल्यास दमा होण्याचा धोका वाढतो. यामुळे दीर्घकालीन श्वसनविकार म्हणजे क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
खेळती हवा किंवा हवेशीर नसलेल्या खोलीत अगरबत्ती लावल्यास धोका आणखी वाढतो.
या धुराचा किंवा वायूचा मानवाच्या डीएनएवरही परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
"अगरबत्तीचा धूर श्वासात गेल्यास दीर्घकालीन श्वसनविकार (सीओपीडी) होण्याचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात धूर श्वासात घेणाऱ्यांमध्ये हा आजार सामान्य आहे. ज्यांना आधीच दमा आहे अशा लोकांना हा आजार लवकर होण्याची शक्यता असते, तर दमा नसलेल्या लोकांमध्ये 10 ते 15 वर्षांत सीओपीडी होण्याची शक्यता वाढते," असं एनआयएमएस रुग्णालयातील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अनुदीप बोथिना सांगतात.
"मुलांमध्ये दमा (पिरियोडिक अस्थमा) होण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी मुलांना सतत खोकला येतो. त्यामुळे त्यांना लगेच फुप्फुस तज्ज्ञाकडे नेणं गरजेचं असतं. धूर, धूळ आणि डास प्रतिबंधकांपासून मुलांना दूर ठेवावं.
"दमा असलेल्या मुलांना अगरबत्तीच्या धुराचा त्रास होतो. अगरबत्ती लावल्यास मुलं आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी त्या खोलीतून लगेच बाहेर जावं," असं ते सुचवतात.
अगरबत्ती वापरताना कोणती खबरदारी घ्यावी?
- अगरबत्तीचा धूर जास्त काळ श्वासात घेणं टाळावं.
- अगरबत्ती लावताना खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- लहान मुले असतील तर अगरबत्ती लावणं टाळावं.
- मुलांना अगरबत्तीच्या धुरापासून दूर ठेवावं.
सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक अगरबत्ती बाजारात उपलब्ध आहेत. तरीही, तिचा धूर श्वासात घेतल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोच, असं डॉक्टर सांगतात.
सेंद्रिय किंवा नैसर्गिक घटकांपासून बनवलेली आणि पर्यावरणास अनुकूल असल्याची जाहिरात केलेली अगरबत्ती खरंच पर्यावरणास योग्य आहे की नाही, याची बीबीसीने स्वतंत्रपणे तपासणी केलेली नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











