अस्थमाः दमा म्हणजे काय? दम्याचा त्रास कमी होण्यासाठी काय कराल?

अस्थमा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

2 मे हा जागतिक दमा दिन आहे. अतिशय गंभीर स्वरूपाचा हा आजार असला तरी काळजी घेतल्यावर आणि योग्य उपचार केल्यावर तो बरा होऊ शकतो.

दमा किंवा अस्थमा (इंग्रजी उच्चार अॅझ्मा) या आजाराचे रुग्ण पाहिले नाहीत असं सहसा होत नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील व्यक्तीला याचा त्रास होताना दिसून येतो. बहुतांशवेळा दम्याची सुरुवात लहानपणात होऊन ती पुढे वयस्क झाल्यावर वाढलेली दिसून येते.

दमा हा एक श्वसनाचा आजार आहे हे आपल्याला माहिती असतंच. आबालवृद्धांना होणारा त्रास कमी करण्यासाठी याची लक्षणं, कारणं ओळखण्याची गरज आहे आणि त्यावरील उपचारही माहिती असणं गरजेचं आहे.

दम्याची कारणं?

अस्थमा हा फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या श्वसननलिकेच्या दाहामुळे होत असतो. हा दाह होत असल्यामुळे ही नलिका अत्यंत संवेदनशील होते.

दमा या श्वसनाच्या आजारासाठी अनेक कारणं कारणीभूत असतात.

यात काही कारणं जनुकीय असतात. काही घराण्यांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये हा आजार दिसून येतो. त्यांच्यामध्ये काही जनुकीय घटक दमा होण्याची शक्यता वाढवत असतात.

आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील काही घटकही यासाठी कारणीभूत असतात. प्रदुषित हवा, हवेतील परागकण, धुळीचे कण किंवा इतर सुक्ष्मजिवांचा परिणाम होतो. रासायनांच्या ज्वलनातून तयार होणारा धूर तसेच सिगारेट वगैरेचा धूरही दम्याची लक्षणं वाढवू शकतात. या रुग्णांचा दमा व्यायाम आणि शारीरिक हालचालींमधूनही वाढू शकतो.

आपल्या श्वसनव्यवस्थेत एकाद्या मार्गाने संसर्ग झाल्यास दमा बळावू शकतो.

दम्याची लक्षणं

आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये दम्याची लक्षणं कशी ओळखायची याबद्दल युकेच्या नॅशनल हेल्थ सर्वेने काही लक्षणं सांगितली आहेत.

श्वास घेण्यास त्रास होत असेल, श्वासोच्छवासावेळी शिळ घातल्यासारखा आवाज येत असेल, छातीमध्ये दुखत असेल किंवा छातीला काहीतरी घट्ट बांधून टाकलंय असं वाटत असेल तर दम्याची लक्षणं असू शकतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोकला हे लक्षण असते.

काहीवेळेस ही लक्षणं एकदम बळावतात आणि रुग्णाला त्रास होतो त्याला अस्थमा अटॅक असं म्हटलं जातं, अशी माहिती एनएचएस देतं.

दम्यावर उपचार

दम्याचा अटॅक आल्यावर बहुतांशवेळा तोंडावाटे घ्यायचा इन्हेलर वापरतात. काही इन्हेलर हे त्रास सुरू झाल्यावर वापरतात, त्यामुळे त्या व्यक्तीला त्रासातून थोडा आराम मिळतो तर काही इन्हेलर हे दम्याची लक्षणं वाढू नयेत यासाठी आधीच वापरले जातात.

काही रुग्णांना गोळ्या दिल्या जातात. काही लोकांमध्ये दम्याचा त्रास आयुष्यभर दिसून येतो. लहानमुलांमधील दमा त्यांच्या पौगंडावस्थेत कमी होताना दिसतो परंतु पुढील आयुष्यात तो पुन्हा कधीतरी येण्याची शक्यताही असते. बहुतांश लोकांची लक्षणं औषधांनी नियंत्रणात राहातात. मात्र काही लोकांना जास्त मदतीची, उपचारांची गरज पडू शकते.

उपचारांविना या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्रास वाढू शकतो. अशा व्यक्तींना सतत दमल्यासारखं वाटतं, घरी, शाळेत नीट अभ्यास करता येत नाही, शाळा किंवा कामाच्या ठिकाणी योग्य काम करता येत नाही. काही लोकांमध्ये फुप्फुसापर्यंत संसर्ग होण्याचा धोका असतो. लहान मुलांच्या वाढीवरही याचा परिणाम होतो.

दमा

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत मुंबईतील वोकहार्ट हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या डॉ. हनी सावला यांनी बीबीसीला अधिक माहिती दिली.

काही दम्याच्या रुग्णांमध्ये गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते. त्याबद्दल डॉ. सावला म्हणाल्या, “काही लोकांना दम्याचे गंभीर अटॅक येऊ शकतात. त्यांना तात्काळ मदतीची गरज असते. काही रुग्णांना श्वसनसंस्थेसंदर्भातील संसर्गांचा त्रास होऊ शकतो. अनेक रुग्णांना दम्यामुळे झोप लागत नाही, झोपेत अडथळा येतो. त्यामुळे थकवाही वाढीला लागतो.”

काही काळानंतर सततच्या दम्यामुळे फुप्फुसाच्या कार्यावरही परिणाम होतो असे डॉ. सावला सांगतात.

फुप्फुसं

फोटो स्रोत, Getty Images

दमा झालेल्या व्यक्तींनी काही जीवनशैलीतील बदल करायला हवेत. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळेत घ्यायला हवीत.

डॉ. हनी सावला सांगतात, “रुग्णांनी आपल्याला एखाद्या गोष्टीच अॅलर्जी किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ते टाळलं पाहिजे. पुरेशी हालचाल आणि व्यायम केला पाहिजे. चौरस आहार घेतला पाहिजे आणि मनावरचा ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपचारपद्धतींचा वापर केला पाहिजे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)