बायडन यांना ज्या प्रोस्टेट कॅन्सरमुळे रेडिएशन थेरपी घ्यावी लागली तो का होतो, त्याची लक्षणं काय? जाणून घ्या सर्वकाही

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन त्यांच्या प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारांचा एक भाग म्हणून रेडिएशन थेरपी घेत आहेत, अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे.
82 वर्षीय बायडन हार्मोन उपचार घेत होते, असंही प्रवक्त्याने सांगितलं. परंतु याबद्दल अधिक तपशील दिलेले नाहीत.
यावर्षी मे महिन्यात, जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झाल्याचं त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनातून सांगितलं होतं.
हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचंही या निवेदनातून सांगण्यात आलं होतं. लघवीशी संबंधित समस्येबाबत काही लक्षणं दिसून आल्यानंतर वैद्यकीय तपासणीत या कॅन्सरचं निदान झालं.
दरम्यान, रेडिएशन उपचार 5 आठवड्यांपर्यंत चालण्याची अपेक्षा होती आणि हा त्यांच्या उपचारांमधला एक नवा टप्पा असल्याचं एनबीसी वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.
या पार्श्वभूमीवर प्रोस्टेट कॅन्सर कशामुळे होतो आणि त्याची लक्षणं काय असतात? जाणून घेऊयात.

प्रोस्टेट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी ही इतर कोणत्याही आजारपणामुळे होणाऱ्या मृत्युदरापेक्षा जास्त आहे. लॅन्सेटच्या नवीन अभ्यासानुसार, 2040 पर्यंत प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झालेल्या पुरुषांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.
आकडेवारीवरून असं दिसतं की, दरवर्षी नव्याने निदान होत असलेल्या प्रोस्टेट कॅन्सर रुग्णांची संख्या 2020 मध्ये 14 लाख होती ती 2040मध्ये प्रतिवर्षी 29 लाख वर जाण्याचा अंदाज आहे.
भारतात सध्या दरवर्षी 33,000 ते 42,000 हजार प्रोस्टेटचे नवे रुग्ण आढळतात ही संख्या 2040 पर्यंत प्रतीवर्ष 71,000 पर्यंत जाण्याची शक्यता यात वर्तवली गेली आहे.
अभ्यासानुसार, कमी आणि मध्यम उत्पन्न देशातील पुरुषांमध्ये वार्षिक मृत्यूदर 85% ने वाढून त्याच कालावधीत जवळपास 7,00,000 इतका होण्याचा अंदाज आहे. संशोधकांच्या मते, वाढती लोकसंख्या आणि आयुष्य वाढल्यामुळे येत्या काही वर्षांत वृद्ध पुरुषांची संख्या वाढेल.

प्रोस्टेट कॅन्सर हा शब्द गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या कुटुंबामध्ये या कर्करोगाशी संबंधित चर्चा झाली असेल.
प्रोस्टेट ही ग्रंथी पुरुषांच्या जननेंद्रियाजवळ असते. या ग्रंथीजवळ कर्करोग तयार होऊन तो पसरण्याची शक्यता असते. तसंच याची लक्षणंही अनेकदा दिसून येत नाहीत.
कोणत्याही कर्करोगाच्या निदानामुळे रुग्णावर जसा मानसिक ताण येण्याची शक्यता असते तसाच ताण या कर्करोगाबाबतीतही पुरुषांवर येण्याची शक्यता असते.
त्यामुळे अशा स्थितीत रुग्णांशी सतत बोलत राहून, त्यांच्या अडचणी समजून घेणं ही कुटुंबीयांची जबाबदारी आहे.
प्रोस्टेट ग्रंथी संदर्भात शस्त्रक्रीया झालेले लोक किंवा इतर कर्करोगग्रस्त लोक यांच्याशी बोलून ते कशा पद्धतीने यावर मात करत आहेत याची माहितीही रुग्णांनी घेणं गरजेचं आहे.
शरीरात होणारे कोणतेही बदल तात्काळ डॉक्टरांना सांगावेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घेतले पाहिजेत.
हा कॅन्सर ओळखण्यासाठी एकमेव अशी चाचणी नाही. त्यासाठी रक्ताची चाचणी, बायोप्सी, हाताने केलेली तपासणी अशा चाचण्यांचा समावेश असतो. युनायटेड किंग्डमच्या एनएचएस या आरोग्यसेवेने प्रोस्टेट कॅन्सरविषयी विस्तृत माहिती दिली आहे.
प्रोस्टेट काय आहे?
प्रोस्टेट ही एक पुरुषांच्या जननेंद्रियाजवळ असणारी लहानशी ग्रंथी असते.
एखाद्या अक्रोडाच्या आकाराएवढी ही ग्रंथी असते. ती शिश्न आणि मूत्राशय यांच्या मधल्या भागात असते. तसेच ती मूत्रमार्गाजवळ असते.

फोटो स्रोत, Getty Images
एक प्रकारचा पांढरा प्रवाही पदार्थ तयार करणे हे या ग्रंथीचं मुख्य काम असतं. हा स्राव आणि वृषणं (टेस्टिकल्स)मधून तयार झालेले शुक्रजंतू (स्पर्म) एकत्र होऊन वीर्य (सिमेन) तयार होतं.
प्रोस्टेट ग्रंथी कोणाला असते?
- पुरुष
- ट्रान्सवूमन
- ज्यांना जन्मावेळेस पुरुष घोषित केलंय असे नॉन बायनरी लोक
- काही इंटरसेक्स लोक
प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?
जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितरित्या वाढतात तेव्हा हा कॅन्सर तयार होतो.

फोटो स्रोत, Getty Images
काही रुग्णांमध्ये या कॅन्सरची वाढ अत्यंत मद असते. परंतु काही रुग्णांमध्ये हा कॅन्सर वेगाने वाढतो आणि पसरण्याची शक्यता असते. यामुळे रुग्णाचा त्रास वाढू शकतो आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपचारांची गरज असते.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं सहसा मूत्राशय (ब्लॅडर) आणि पेनिस (शिश्न) यांना जोडणाऱ्या नलिकेवर परिणाम होईल इतकी ही ग्रंथी मोठी झाल्याशिवाय दिसत नाहीत.
असा परिणाम झाल्यावर तुम्हाला काही गोष्टी दिसून येतील-
- सतत लघवीला जावं लागणं
- लघवीच्यावेळेस ताण येणं.
- लघवी पूर्ण झाली आहे असं न वाटणं.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणं आहेत याचा अर्थ तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर आहे असा होत नाही. परंतु अशा लक्षणांनंतर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. अशी लक्षणं प्रोस्टेट एन्लार्जमेंटचीही असू शकतात.
प्रोस्टेट कॅन्सरची कारणं
एनएचएस आरोग्यसेवेने प्रोस्टेट कॅन्सरच्या कारणांबद्दल माहिती दिली आहे. याची कारणं बहुतांश अज्ञात आहेत असं ही सेवा सांगते. परंतु काही गोष्टींमुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
वयपरत्वे हा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
पुरुषांनी पन्नाशी ओलांडल्यावर तसंच वृद्धत्वामध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता असते.
ज्या पुरुषांचे भाऊ, वडील यांना हा कर्करोग झाला आहे अशांना याचा त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते.

फोटो स्रोत, Getty Images
नव्या संशोधनानुसार लठ्ठपणामुळेही या कर्करोगाची भीती वाढते.
या कॅन्सरशी संबंधित काही घटकांसंदर्भात 'प्रोस्टेट कॅन्सर युके' संस्थेने माहिती दिली आहे.
त्यांच्या माहितीप्रमाणे पन्नाशी उलटलेल्या आणि वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या पुरुषांना याचा धोका जास्त असतो. 65 ते 69 या वयोगटामध्ये हा कॅन्सर सापडण्याची शक्यता जास्त असते.
भारतामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण 65 वर्षांवरील पुरुषांमध्ये जास्त दिसून आल्याचं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल सांगतो.
याबरोबरच या संस्थेने कौटुंबिक इतिहास आणि अनुवंशिकतेकडेही बोट दाखवले आहे.
प्रोस्टेट कॅन्सर युके सांगते, तुमचा कौटुंबिक इतिहास ही तुमच्या कुटुंबावर परिणाम करणाऱ्या सर्व आरोग्यविषयक समस्यांची माहिती असते. कुटुंबात जनुकं, पर्यावरण, जगण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी सामाईक असतात. या घटकांमुळे काही आजार तुम्हाला होण्याची शक्यता आहे की नाही याची माहिती मिळते.
आपली जनुकं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. शरीर कसे वाढेल, कसं काम करे, कसं दिसेल हे ते ठरवतात. या जनुकांमध्ये काही बिघाड (जीन फॉल्ट, म्युटेशन) झाल्यास कधीकधी कर्करोग उद्भवतो.
प्रोस्टेट कॅन्सर अनुवंशिक आहे का?
याचं उत्तर प्रोस्टेट कॅन्सर युकेने दिलं आहे.
ही संस्था सांगते, जर तुमच्या कुटुंबात प्रोस्टेट किंवा स्तनाचा कर्करोग झाला असल्यास तुम्हाला हा कर्करोग होण्याची भीती जास्त आहे.
तुमच्यामध्ये आलेल्या काही सदोष जनुकांमुळे हे होतं.
माझ्या वडिलांना प्रोस्टेट कॅन्सर होता? मग मला याचा कितपत धोका आहे?
प्रोस्टेट कॅन्सर युकेच्या माहितीनुसार, जर तुमच्या वडील किंवा भावाला हा कॅन्सर असेल तर तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता इतर पुरुषांपेक्षा दुप्पट किंवा अडीचपटीने वाढते.
तुमचा भाऊ किंवा वडील यांना 60 पेक्षा कमी वयात असताना या कॅन्सरचे निदान झाले असल्यास किंवा एकापेक्षा जास्त जवळच्या नातलगाला (भाऊ किंवा वडील) हा कॅन्सर झाला असल्यास तुम्हाला तो होण्याची शक्यता वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
जर तुमच्या घरात आई किंवा बहिणीला स्तनाचा कर्करोग असल्यासही हा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
जरी प्रोस्टेट कॅन्सर कुटुंबात असला तरी याचा अर्थ तो तुम्हाला होईलच असं नाही. परंतु जवळच्या नातलगांत प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सर असेल तर डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे.
प्रोस्टेट कॅन्सर ओळखण्यासाठी तपासण्या
प्रोस्टेट कॅन्सर ओळखण्यासाठी कोणतीही एकमेव अशी चाचणी नाही असं एनएचएस स्पष्ट करतं.
सर्व चाचण्यांचे चांगले वाईट परिणाम याची चर्चा तुमच्या डॉक्टरांनी तुमच्याशी करायला हवी.
प्रोस्टेट कॅन्सरसाठी मुख्यत्वे खालील तपासण्या केल्या जातात-
- रक्ताची चाचणी
- प्रोस्टेट ग्रंथीची हाताने केलेली तपासणी
- एमआरआय स्कॅन
- बायोप्सी
पीएसए चाचणी म्हणजे काय?
प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन (पीएसए) ही एक रक्ताची चाचणी आहे. यामध्ये पीएसएची पातळी मोजली जाते आणि त्याची प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता लवकर समजण्यास मदत होऊ शकते.
जर तुम्ही पन्नाशीच्या पुढे असाल तर पीएसए चाचणीसाठी डॉक्टरांना विचारू शकता असं एनएचएस सांगतं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रोस्टेट कॅन्सर ओळखण्यासाठी पीएसए चाचणीचा वापर केला जाईलच असं सांगता येत नाही कारण त्यातून समजणारी माहिती विश्वसनीय मानली जात नाही.
कर्करोग नसतानाही पीएसएची पातळी वाढलेली असू शकते. तसंच पीएसएची वाढलेली पातळी पाहून तुम्हाला जीवघेणा कर्करोग झालाय की नाही हे डॉक्टरांना ठाम सांगता येईलच असं नाही.
पीएसएची पातळी वाढली असेल तर एमआरआय स्कॅन करण्यास सांगितलं जातंत. त्यावरुन पुढील चाचण्या आणि उपचार सुचवले जातात.
प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचार

फोटो स्रोत, Getty Images
काही रुग्णांच्या बाबतीत हा कर्करोग पसरल्यावरच उशीरा समजतो. त्या रुग्णांसाठी वेगळे उपचार केले जातात.
उपचारांमुळे लिंग ताठरतेत अडथळे, मूत्रविसर्जनात अडचण, वारंवार मूत्रविसर्जनास जावे लागणे, अचानक जावे लागणे असे काही दुष्परिणाम दिसून येतात.
हाय इंटेन्सिटी फोक्स्ड अल्ट्रासाऊंड, क्रायोथेरपीसारखे नवेउपचार हे दुष्परिणा कमी होतील याची काळजी घेतात असं एनएचएस सांगतं.
क्रायोथेरपीद्वारे कॅन्सरच्या पेशी गोठवल्या जाऊन त्या नष्ट केल्या जातात. त्याला क्रायोसर्जरी किंवा क्रायोब्लेशन असंही म्हटलं जातं. यामध्ये प्रोस्टेटमध्ये सुईद्वारे वायू सोडला जातो कॅन्सरच्या पेशी गोठवून नष्ट केल्या जातात.
अधिक काळजी घेण्याची गरज
अशा पुरुषांच्या डीएनएमधील बदल तसंच जेनेटीक कोडमधील बदलांमुळे त्यांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.
इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चचे संशोधक सांगतात, दरवर्षी रक्ताची चाचणी करून कॅन्सरची गाठ असल्यास ती शोधणं आणि त्यावर उपचार करणं सोपं जातं.
2019 साली युनायटेड किंग्डममधील 300 पुरुषांना Brca2 म्युटेशनमुळे या कर्करोगाचा जास्त धोका असल्याचं तपासणीत आढळलं असं इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चचे संशोधक सांगतात.
नेहमी या पद्धतीची चाचणी केलेली नसल्यामुळे हे म्युटेशन आपल्यामध्ये झाले आहे हे पुरुषांना माहिती नसतं.
ज्या म्युटेशनमुळे महिलांमध्ये स्तनाचा आणि ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता वाढते तेच हे Brca2 म्युटेशन आहे.











