टेस्टीज कॅन्सर नेमका काय असतो? त्याची लक्षणं आणि उपचार काय?

टेस्टीज कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॉ. दिलिप निकम
    • Role, कॅन्सरतज्ज्ञ

भारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो तर क्रिकेटपटू देव. आपल्याही नकळतपणे आपण त्यांना रोल मॉडेल बनवून त्यांचे अनुकरण करीत असतो. असाच एक अनेकांचा आवडता क्रिकेटपटू ज्याने 2007 मध्ये T20, 2011 मधील वर्ल्डकप जिंकून देण्यास मदत केली. तो म्हणजे युवराजसिंग.

तुम्हाला वाटेल त्याचा इथे काय संबंध? युवराजसिंगला वृषणाचा (Testis) कॅन्सर झालेला होता आणि उपचारांती तो पूर्णपणे बरा झाला आहे.

आणि नुसता बराच झाला नाही तर त्यांने मेहनत करून पुन्हा भारतीय टीममध्ये जागा मिळवली. इतकेच काय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करून एकहाती सामना जिंकून दिला. यावेळी आपली खेळी त्याने कॅन्सरशी झगडत जगणाऱ्या लोकांना अर्पण केली.

आपल्याला कॅन्सर आहे म्हणून तो हताश झाला नाही तर उलट जिद्दीने त्याच्यावर मात करून इतर कॅन्सर रुग्णांपुढे फार मोठा आदर्श त्याने ठेवला आहे.

आपण त्याचा केवळ आदर्श न ठेवता त्याच्या सारखं जगायला शिकलं पाहिजे.

पुरुषांमध्ये आढळणारा हा वृषणाचा कॅन्सर नेमका काय असतो?

पुरुषांमध्ये प्रजननासाठी आवश्यक स्पर्म आणि टेस्टेस्टेरॉन हार्मोन अंडाशयामध्ये (Testis) तयार होतात. पुरुषांच्या शरीरात दोन अंडाशय असून ती त्वचेपासून बनलेल्या पिशवीत म्हणजेच स्क्रोटम मध्ये असतात.

अंडाशयाच्या आतमध्ये स्पर्म तयार करणाऱ्या पेशी म्हणजेच जर्म सेल (germ cell) तसंच त्यांना आवश्यकतेनुसार पुरवठा करणाऱ्या पेशीं म्हणजेच सेक्स कॉर्ड-स्ट्रॉमल सेल (sex cord- stromal cell) असतात.

या दोन्ही पेशींपासून वृषणाचा कॅन्सर होऊ शकतो. साधारणपणे 90 टक्के टेस्टीजचा कॅन्सर जर्म पेशी पासून होतो. त्यांना जर्म सेल टयूमर (germ cell tumor) म्हणतात. राहिलेला 10 टक्के कॅन्सर सेक्स कॉर्ड-स्ट्रोमल सेल (sex cord- stromal cell) किंवा वेगळ्या पेशींमध्ये तयार होतो.

दरवर्षी जगामध्ये 50 हजारांपेक्षा जास्त वृषणाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांची नोंद होते तसंच जवळपास 10 हजार रुग्ण वृषणाच्या कॅन्सर मुळे मृत्यू होतो.

युवराज सिंग

फोटो स्रोत, Getty Images

हेच प्रमाण भारतामध्ये अनुक्रमे 3 हजार आणि दीड हजार असं आहे. वरील आकडेवारी पाहता भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. याचं मुख्य कारण रोग नंतरच्या टप्प्यात माहिती पडणे हे होय.

मागील काही वर्षांचा विचार केल्यास प्रगत देशांमध्ये (अमेरिका/ युरोप) वृषणाच्या कॅन्सर रुग्णांचं आयुष्यमान वाढल्याचं आढळतं. त्याचं मुख्य कारण रोगाची सुरुवातीच्या टप्प्यातच माहिती होणं आणि नवीन केमोथेरपीचं औषधं यांना जातं.

टेस्टीज म्हणजेच वृषणाचा कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत?

वृषणाचा कॅन्सर नेमका कशामुळे होतो याचा अजूनतरी उलगडा झालेला नाही. साधारणपणे टेस्टीजचा कॅन्सर 15 ते 35 वर्षं या वयोगटाच आढळतो.

अनडिसेन्डेड टेस्टीज किंवा अनुवंशिकता हीसुद्धा इत्यादी करणे असू शकतात. अनडिसेन्डेड टेस्टीज म्हणजे जिथे वृषण त्या तयार होतात तिथं पोटातच अडकून राहाणे.

टेस्टीज कॅन्सरची लक्षणं

कॅन्सर

टेस्टीज कॅन्सरची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. त्यात टेस्टीजला गाठ किंवा सूज येणे, टेस्टीजमध्ये दुखणे, पोटात दुखणे, पोटात पाणी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पाठीत दुखणे, भूक न लागणे आणि वजन कमी होणे अशी लक्षणं दिसून येतात.

ही लक्षणं दिसून आल्यानंतर काही तपासण्या कराव्या लागतात. त्यात रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, सोनोग्राफी सी.टी. स्कॅन आणि HCG, AFP, LDH या रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात.

तसंच इंग्वायनल ऑरकिडेकटोमी करून टेस्टीज काढून रोग आणि त्याच्या नेमक्या प्रकाराची खातरजमा केली जाते. इंग्वायनल ऑरकिडेकटोमी म्हणजे पोटाचं ऑपरेशन करून वृषण आतल्या भागातून काढून टाकणे.

वृषण कॅन्सरवरील उपचार

कॅन्सर

वर उल्लेख केल्याप्रमाणे 90 टक्के टेस्टीजचा कॅन्सर जर्म पेशी पासून होतो ज्याला जर्म सेल टयुमर (germ cell tumor) म्हणतात यामध्ये प्रामुख्याने सेमिनोमा (Seminoma) व नॉन-सेमिनोमा (Non-Seminoma) असे दोन उपप्रकार पडतात.

शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओथेरपी या सर्व प्रकारच्या उपचार पध्दती टेस्टीज कॅन्सर समूळ नष्ट करण्यासाठी वापरल्या जातात.

रोग पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण अतिशय चांगलं असून ते रोगाचा प्रकार, स्टेज, आकार, पोटातील लिम्फनोडच्या गाठी आणि HCG, AFP, LDH यावर अवलंबून असते.

वृषणाचा कॅन्सर साधारणपणे प्रजनन काळात म्हणजे 15 ते 35 वर्षांत येणारा रोग असून उपचारांती मूल न होण्याची (Infertility) शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत करून स्पर्मबँकमध्ये स्पर्म जतन करणं योग्य ठरू शकतं.

Inguinal Orchidectomy शस्त्रक्रिया

कॅन्सर

फोटो स्रोत, Getty Images

रोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया करून रोग असणारे अंडाशय काढणे गरजेचे असते.

काढलेले अंडाशय पॅथोलॉजिस्टकडे पाठवून त्याच्या रिपोर्टनुसार कोणत्या प्रकारचा रोग आहे ते पाहून रुग्णाला पुढे इतर उपचारांची गरज आहे की, नाही ते ठरवलं जातं.

सेमिनोमा (Seminoma)

हा प्रकार मुख्यत्वे टेस्टीजमध्ये आढळतो किंवा काही वेळा मेडियास्टिनममध्ये देखील आढळतो. क्लासिक सेमिनोमामध्ये HCG, AFP वाढत नाहीत. हा रोग केमोथेरपी, रेडीओथेरपीला अतिशय सेन्सिटीव्ह असून पूर्ण पणे बरा होतो. अगदी रोग पसरलेला असला तरीही बरा होतो.

शस्त्रक्रिया करून रोग असणारे टेस्टीज काढल्यानंतर पहिल्या टप्प्यात असणाऱ्या रोगास कुठल्याही उपचाराची गरज नसते.

केवळ सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या करून रुग्णास निगराणीखाली ठेवले जाते. दुसऱ्या टप्प्यातील रोगास रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात. रोग मोठा असल्यास किंवा तिसऱ्या टप्प्यात असल्यास BEP केमोथेरपीचे उपचार आणि गरज असल्यास नंतर रेडीओथेरपीचे उपचार दिले जातात.

नॉन-सेमिनोमा (Non-Seminoma)

नॉन-सेमिनोमा कॅन्सरमध्ये पॅथोलॉजी आणि HCG, AFP नुसार एम्ब्रिओनल (Embryonal), कोरिओकार्सिनोमा (Choriocarcinoma), योल्क स्याक ट्युमर (Yolk Sac Tumor), टेराटोमा (Teratoma) इत्यादी वर्गीकरण केलं जातं.

उपचारांमध्ये केवळ शस्त्रक्रिया, केमोथेरपी, याच उपचार पध्दती वापरल्या जातात. रेडीओथेरपी उपचाराची या प्रकारात गरज नसते.

कोरिओकार्सिनोमा (Choriocarcinoma) अतिशय अॅग्रेसिव्ह रोग असून तो फुफ्फुसात किंवा मेंदूमध्ये लगेच पसरू शकतो. त्यामुळे केमोथेरपी (BEP)चे उपचार सुरू कारवे लागतात. (लेखक मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कॅन्सरतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)