प्रोस्टेट कॅन्सर झाला आणि हा रुग्ण अचानक दुसऱ्याच भाषेत बोलू लागला... हे कसं शक्य आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मॅक्स मॅत्झा
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेतील एका व्यक्तीला प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ती व्यक्ती अचानक आयरिश भाषेत बोलू लागली. विशेष म्हणजे या व्यक्तीने कधीही आयर्लंडला भेट दिली नव्हती आणि तरीही ती तिथली भाषा बोलू लागली.
ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, 50 च्या दशकात अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारी एक व्यक्ती फॉरेन एक्सेंट सिंड्रोम (FAS) ने ग्रस्त होती. हा अतिशय दुर्मिळ सिंड्रोम आहे.
या व्यक्तीच्या कुटुंबात दूरदूरपर्यंत कोणीही आयर्लंडशी संबंधित नव्हतं. पण हा सिंड्रोम ती व्यक्ती हयात असेपर्यंत होता.
पण अलिकडच्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ड्यूक युनिव्हर्सिटीने आणि साऊथ कॅरोलिनाच्या कॅरोलिना युरोलॉजिक रिसर्च सेंटरने संयुक्तपणे या प्रकरणाचा अभ्यास केला.
या रिपोर्टवर काम करणाऱ्या संशोधकांनी काही गोष्टींची नोंद केली आहे. ते म्हणतात की, "आमच्या माहितीनुसार प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या रुग्णाला फॉरेन एक्सेंट सिंड्रोम असण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे."
ही व्यक्ती कोण, तिचं नाव, राष्ट्रीयत्व यासंह बऱ्याच गोष्टी रिपोर्टमध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत.
असं म्हटलं जातं की, ही व्यक्ती तिच्या विशीत इंग्लंडमध्ये राहायला होती. त्याचे काही दूरचे मित्रमंडळी आयर्लंडमध्ये रहायला होते. पण ही व्यक्ती कधीही आयरिश भाषेत बोलली नव्हती किंवा ही भाषा बोलणाऱ्यांच्या संपर्कात आली नव्हता.
संशोधक त्यांच्या रिपोर्ट मध्ये म्हणतात की, "त्यांच्या उच्चारांवर त्यांचं नियंत्रण नव्हतं. हळूहळू त्यांचं हे वागणं नित्याचं बनलं. 20 महिने उलटल्यावर त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली."
पुढे त्याची प्रकृती बिघडू लागली आणि अवघ्या काही महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला. पण त्यांचा मृत्यू होईपर्यंत तो आयरिश भाषेतच बोलत होता.
रिपोर्ट मध्ये म्हटलंय की, "त्यांच्या न्यूरोलॉजिकल तपासणीत काहीही वावगं आढळलं नव्हतं. शिवाय मेंदूच्या एमआरआयमध्ये काहीही विकृती आढळली नव्हती. ही लक्षणं सुरू होण्यापूर्वी त्याने कोणतेही मानसोपचार घेतले नव्हते."
"त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी सुरू झाली. पण त्यांचा न्यूरोएंडोक्राइन प्रोस्टेट कॅन्सर वाढतच गेला. आणि यात मल्टीफोकल ब्रेन मेटास्टेसेस आणि पॅरानोप्लास्टिक असेंडींग पॅरालीसीसमुळे त्याचा मृत्यू झाला."
या काळात त्याचा आवाजसुद्धा बदलला होता. संशोधकांना असं वाटतं की, पॅरानोप्लास्टिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर (PND) मुळे त्याच्या आवाजात बदल झाले असावेत."
कॅन्सर झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या मेंदूच्या काही भागांवर तसेच स्नायू, मज्जातंतू आणि पाठीच्या कण्यावर हल्ला करते तेव्हा पॅरानोप्लास्टिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतो.
यापूर्वी फॉरेन एक्सेंट सिंड्रोमला बळी पडलेले लोक बीबीसीशी बोलताना सांगतात की, त्याकाळात आमचा आवाज आणि आमची भाषा आमच्या घरच्यांसाठी अनोळखी होती. ही गोष्ट अस्वस्थ करणारी होती.
2006 मध्ये ब्रिटनमधील लिंडा वॉकर या महिलेला पक्षाघाताचा झटका आला होता. यानंतर ती जमैकन भाषेत बोलू लागली.
फॉरेन एक्सेंट सिंड्रोमचं पहिलं प्रकरण 1941 मध्ये नोंदवलं गेलंय. एक तरुण नॉर्वेजियन महिला दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब हल्ल्यात जखमी झाली होती. त्यानंतर ती जर्मन भाषेत बोलू लागली.
ती नाझी गुप्तहेर असल्याचं स्थानिकांचा समज झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








