बद्धकोष्ठता म्हणजे काय? पोट साफ राहाण्यासाठी काय करावं? वाचा-

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बद्धकोष्ठता किंवा ज्याला इंग्रजीत Constipation कॉन्स्टिपेशन म्हणतात, हे शब्द आपल्या कानावरुन गेले नाहीत असं होणारच नाही. रोजचा शरीर-मनाचा क्रम सुरळीत राहाण्यासाठी पोट साफ होणं, भूक लागणं, नीट आणि पुरेशी झोप येणं या क्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातल्याच एका गोष्टीवर परिणाम करणाऱ्या आजारावर येथे माहिती घेणार आहोत.
बद्धकोष्ठता हा त्रास बहुतेक सर्व वयोगटातल्या लोकांना होताना दिसून येतो. आपली जीवनशैली, आहारविहार यांच्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. त्यापैकीच बद्धकोष्ठ हा एक आजार आहे.
पुन्हा बद्धकोष्ठ हा एकमेव आजार नसून यामुळे पुढे अनेक आजारांची सुरुवात होते.
त्यामुळे वेळीच त्याला थांबवणं गरजेचं आहे आणि बद्धकोष्ठाची स्थिती येऊ नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
याला बद्धकोष्ठ, मलावरोध अशाही संज्ञांनी ओळखलं जातं.
एनएचएस या आरोग्यसेवेच्या माहितीनुसार त्यांनी काही लक्षणं प्रसिद्ध केली आहेत.
जर पुढील लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर आपल्याला बद्धकोष्ठ आहे का याचा विचार करा असं एनएचएस सांगतं
- जर तुम्ही आठवड्याभरात 3 वेळा तरी शौचालयाला गेला नसाल
- तुमची विष्ठा मोठी, कोरडी, घट्ट किंवा गाठीसारखी असेल तक
- शौचालयात तुम्हाला फार जोर लावावा लागत असेल किंवा तेव्हा वेदना होत असतील तर
- पोटात दुखून ते फुगत असेल किंवा आजारी वाटत असेल तरीही बद्धकोष्ठ असण्याची स्थिती असते.
आपल्याला बद्धकोष्ठ आहे हे ओळखण्यासाठी काही लक्षणांचा विचार करायला सांगितलं जातं. बहुतांशवेळा आपल्याला बद्धकोष्ठ आहे याचा अंदाजच लोकांना नसतो.
अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंटेरोलॉजीमध्ये 411 डॉक्टरांनी आणि 365 गॅस्ट्रोएंट्रोलॉजी तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनावर माहिती प्रसिद्ध झाली होती. यासाठी 2557 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
यापैकी एक तृतियांश लोकांना आपल्याला असणारी बद्धकोष्ठाची लक्षणं आजिबात ओळखता आली नव्हती.
शौचालयात भरपूर वेळ बसून राहाणं, शौचाला गेल्यावर फार जोर लावावा लागं तसेच शौचासाठी रेचकद्रव्यं घ्यावी लागणं ही लक्षणं बद्धकोष्ठाच्या अधिकृत लक्षणात समाविष्टच केली नसल्याचं या तज्ज्ञांच्या लक्षात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
किंग्ज कॉलेज, लंडनच्या संशोधकांनी यावर अभ्यास करुन काही वेगळ्या निरीक्षणांचाही विचार केला. यामध्ये
- पोट बिघडणं, पोटात दुखणं, पोट फुगणं- नेहमीच कपडे नीट बसण्यात अडथळा येणं.
- गुदद्वाराजवळच्या भागात रक्त येणं, विष्ठा पुढे सरकण्यात त्रास होणं, त्या जागेवर जळजळ होणं
- शौचाला जाण्याच्या वेळा अनियमित होणं, शौचाला घट्ट होणं
- शौचाला जावसं न वाटणं
- पोटात गॅस होणं आणि फुगणं
- शौचावरचा ताबा जाणं, गुदद्वारातून रक्त येणं
अशाप्रकारची लक्षणं आपल्यामध्ये दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना भेटणं चांगलं असं तज्ज्ञ सुचवतात.
बद्धकोष्ठ का होतो?
पोटातील अन्न पचून ते वेळीच बाहेर पडत नसल्यास अनेक कारणं असू शकतात. त्य़ासाठी सर्वप्रथम आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बद्धकोष्ठाची काही लक्षणं पुढीलप्रमाणे
- पुरेशा प्रमाणात पाणी आणि पातळ द्रव्यं आहारात नसणं
- तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स आहारात नसणं.फळं, भाज्या तसेच तृणधान्यांचा आहारात अभाव
- सतत एकाजागेवर बसून राहाणं, व्यायाम किंवा हालचालीचा अभाव, बसून राहाण्याबरोबर सतत पडून राहाणं
- शौचाला जाण्याच्या भावनेकडे लक्ष न देणं
- ताणतणाव, चिंता तसेच नैराश्य
काहीवेळेस विशिष्ट औषधांमुळेही असा त्रास होऊ शकतो. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
उपाय काय?
- बद्धकोष्ठ दूर होण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या रोजच्या आहारात पाण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. तसेच तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स मिळतील असे पदार्थ खाल्ले पाहिजेत. यात फळं, भाज्या, कटिण कवचाची फळं, पूर्ण तृणधान्य यांचा समावेश होतो.
- आहारात अचानक फायबर्स वाढवणं त्रासदायक ठरू शकतं. काही लोकांना पोट फुगणं किंवा अस्वस्थ वाटू शकतं. त्यामुळे फायबर्सचं प्रमाण हळूहळू वाढवलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
- बद्धकोष्ठ होऊ नये किंवा बद्धकोष्ठ झालेल्या लोकांनी आपल्या शरीरातील बदलांचं निरीक्षण केलं पाहिजे. रोजचा ठराविक असा क्रम पाळण्याची गरज आहे. दारू पिणं टाळलं पाहिजे. शौचाला जाण्याची भावना झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
- कमोडवर शौचाला बसणाऱ्यांनी आपले पाय थोडे उंचावर होतील असे लहानसे स्टूल पायाखाली घ्यावे यामुळे शौचाची क्रिया सोपी होईल. दररोज थोडा व्यायाम, चालणं फिरणं ठेवल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
शिस्त महत्त्वाची
बद्धकोष्ठतेसारखे आजार टाळण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात थोडी शिस्त महत्त्वाची आहे असं तज्ज्ञ सांगतात.
कोल्हापूरस्थित आहारतज्ज्ञ डॉ. प्रिया दंडगे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, “बद्धकोष्ठता हा मूलतः जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. जंकफूड, साखर, मैदा यांचं प्रमाणात वाढलं आहे. फायबर्सचं प्रमाण आहारातून कमी झालं आहे. तसेच पाणीही कमी प्यायलं जातं. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
त्यामुळे आहारात कोशिंबिरी, पालेभाज्या देठांसह, सालीसह फळं खाणं गरजेचं आहे, ऋतुमानाप्रमाणे पाण्याचं प्रमाण असलं पाहिजे. एकाजागी बसून राहाण्याऐवजी अधूनमधून उठून फेरी मारणं, व्यायाम गरजेचा आहे. तसेच वेळेवर जेवणंही आवश्यक आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या सवयींचं निरीक्षण करण्याची गरज आहे असं सांगताना डॉ. दंडगे म्हणाल्या, दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही अर्ध्या तासात शौचाला जात का, शौचाच्यावेळेस अवयवांवर फार ताण द्यावा लागतोय का? शौचालयात आपण किती वेळ घालवतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. शौचाला भारतीय पद्धतीनुसार बसलं तर पोट साफ होणं सहज शक्य होतं.”
याबरोबरच आपण आता जे खातोय ते खरंच आवश्यक आहे का? भूक लागली आहे म्हणून खात आहोत की जिभेचे चोचले म्हणून खात आहोत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रात्री उशीरा जेवल्यामुळेही सकाळी पोट साफ होण्याला त्रास होतो असं डॉ. दंडगे सांगतात.
पोट नीट राहाण्यासाठी काय कराल?
पोटाचं काम नीट सुरळीत राहावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काही जीवनशैलीत बदल करता येतील.
1) ताण कमी करणं
सर्वात पहिलं आवश्यक काम म्हणजे ताण कमी करणं. अतिरिक्त ताणामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
काही लोकांमध्ये ताणामुळे पचनक्रिया मंदावते, पोटफुगी होणं, वेदना, बद्धकोष्ठ असं दिसतं. तर काही लोकांमध्ये ही क्रिया वेगाने होऊन डायरियासारखे आजार होतात. काही लोकांची भूकच नष्ट होते.
ताणामुळे पोटात अल्सर होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे ताण कमी करणं गरजेचं आहे.
2) धूम्रपान बंद करणं
धूम्रपानामुळे अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये आपल्या अन्ननलिकेवरही परिणाम होतो.
अन्ननलिकेच्या खालच्या टोकाचे स्नायू दुर्बल झाल्यामुळे पोटातील आम्ल विरुद्ध दिशेने प्रवास करू शकतं. त्यामुळे जळजळ होऊ शकते किंवा अल्सर होऊ शकतात.
पोटाच्या कर्करोगासाठीही धूम्रपान कारणीभूत ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
3) जेवताना काळजी घ्या
कोणतंही अन्न खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. अधासासारखं अन्नावर तुटून पडू नये. अन्नाचा घास योग्यप्रकारे चावूनच गिळावा.
एकाचवेळी तडस लागेल इतकं पोट भरुन जेवू नये. योग्य प्रमाणात पाणी, पातळ पदार्थ आहारात घ्यावेत.
4) वजन कमी करणं
जर तुम्ही लठ्ठ असाल किंवा वजन गरजेपेक्षा जास्त असेल तर ते कमी करणं चांगलं. अतिवजनामुळे पोटासह सर्व शरीरसंस्थांवर ताण येतो. त्यामुळे पचनावरही परिणाम होतो.
5) मद्यपान नको
दारुमुळे पचनावर परिणाम होतो. एकाचवेळी भरपूर दारू पिण्यानेही पोट खराब होतं. थोडक्यात दारूपासून लांब राहाणं कधीही चांगलं.
तुमची विष्ठा तुमच्याबद्दल काय सांगते?
पचन झालेल्या तसेच ज्यातून पोषक घटक शोषून घेतले आहेत अशा अन्नातील टाकाऊ भाग म्हणजे विष्ठा. विष्ठेला शास्त्रीय भाषेत faeces म्हटलं जातं.
तुमच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तसेच आजाराचे निदान करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या विष्ठेचा आकार, रंग, वास, त्याचा पोत यांचा विचार करतात.
सामान्य प्रकारची विष्ठा ही मऊ, सॉसेजसारखी असते. किंवा सॉसेजसारख्या दंडाकृती विष्ठेवर भेगा असू शकतात.
सुटी सुटी किंवा कठीण खडे असल्यास तुम्ही पाणी कमी पित आहात असा अर्थ होतो.
अगदी मुलायम किंवा द्रवरुप शी असेल तर तुम्हाला डायरिया असण्याची तसेच कसला तरी संसर्ग झाला असण्याची शक्यता असते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








