आपण आजारी पडू असं तुम्हाला सतत वाटतं का?

हेल्थ अँझायटी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी, प्रतिनिधी

थोडं इकडे लक्ष देऊन पाहा. अशी व्यक्ती तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा आजूबाजूला आहे का ते पाहा...

काही व्यक्ती सतत आपल्या आरोग्याबद्दल काळजी करत राहातात.. सतत आरोग्याच्या चाचण्या करणं, डॉक्टरांना भेटत राहाणं तसेच आरोग्याच्या समस्यांबद्दलची लक्षणं इंटरनेटवर पाहाणं अशा गोष्टी हे लोक करत असतात.

अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल तर त्यांना नक्की कसली भीती वाटतेय, कोणता त्रास होतोय याची नीट तपासणी करण्याची गरज आहे. कारण कदाचित त्यांना हेल्थ अँग्झायटी म्हणजे आरोग्याविषय वाटणारी अकारण चिंताग्रस्तता या मानसिक अवस्थेचा त्रास होत असू शकतो.

हेल्थ अँग्झायटी म्हणजे जेव्हा आपण आजारी पडलो आहोत अशी सतत भीती वाटू लागणं, आजारी पडू अशी काळजी वाटणं.

वास्तविक आपण सगळे आपल्या आरोग्याची काही ठराविक प्रमाणात काळजी करत असतोच पण या काळजीनं मर्यादा ओलांडून आपलं सगळं आयुष्यच व्यापून टाकलं तर ती अवस्था त्रासदायक असते. त्यामुळे नेहमीची ठराविक मर्यादेतील चिंता आणि ही आरोग्य चिंताग्रस्तता यातील फरक समजून घेतला पाहिजे.

कोरोनाच्या काळानंतर या स्थितीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. कोरोनासह विविध प्रकारचे येणारे ताप, सर्दी, खोकला, सततच्या आजारपणाच्या लाटा यामुळे अशा व्यक्तींना अधिकाधिक त्रास होतो.

आजारांबद्दल माहिती गोळा करत राहाणं, सतत आजाराची लक्षणं तपासत राहाणं, शरीर कायम निरोगीच राहिलं पाहिजे अशा दुराग्रही अट्टाहास बाळगणं, कोणत्याही प्रकारे आजाराशी संबंध येऊ नये यासाठी धडपडत राहाणं अशी लक्षणं या स्थितीमध्ये दिसतात.

हेल्थ अँझायटी

फोटो स्रोत, Getty Images

हेल्थ अँग्झायटीची लक्षणं

युनायटेड किंग्डमच्या एनएचएस या आरोग्यसेवेने या स्थितीची काही लक्षणं दिली आहेत. एनएचएस सांगतं

  • सतत आरोग्याबद्दल चिंता बाळगणं
  • आजाराची चिन्हं, लक्षणं दिसतात का हे सतत पाहाणं (जसं की गाठ, वेदना वगैरे)
  • आपण आजारी तर नाही ना ? अशी लोकांकडून खात्री करत राहाणं
  • आऱोग्य चाचण्या किंवा डॉक्टरांच्या नजरेतून आपला एखादा आजार तर निसटला नाही ना अशी चिंता करणं
  • इंटरनेट किंवा कोणत्याही माध्यमांत सतत आरोग्याची एका मर्यादेपलिकडे माहिती मिळवत राहाणं
  • गंभीर आजाराशी संबंधित कोणतीही गोष्ट अगदी टीव्हीवरील कार्यक्रमही पाहाणं टाळणं
  • आजारी असल्यासारखं वागणं (जसं की शारीरिक हालचाली कमी करणं)
  • अशा चिंताग्रस्ततेमुळे कधीकधी डोकेदुखी, हृदयाचे ठोके वेगाने पडणं अशी लक्षणंही दिसतात.

कोरोनाच्या काळानंतर ही स्थिती अनेक लोकांमध्ये दिसू लागली.

कोरोनाच्या साथीमध्ये आपल्यावर अनेक बंधनंही होती. स्वच्छता पाळणं, जंतुनाशकाने हात धुणं, मास्क लावणं असे अनेक नियम पाळले. पण काही लोकांच्या मनात याची भीती नंतरही राहिली.

घराच्या खिडक्याही न उघडणं, घरातून बाहेरच न पडणं, तासनतास घर स्वच्छ करत राहाणं अशा गोष्टी त्यांच्याकडून होत राहिल्या. त्यामुळे त्यांना याचा त्रास अधिक होऊ लागला.

हेल्थ अँझायटी

फोटो स्रोत, Getty Images

यामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे आपल्य़ाला आता असलेल्या आजारामुळे मनात आलेली भीती आणि एखादा आजार होईल याची भीती. काही लोक याचा आजिबात विचार करत नाहीत, तर काही लोकांच्या मनातून आजाराच्या भीतीचा विचारच जात नाही.

आरोग्य चिंताग्रस्तता या विषयाचे तज्ज्ञ आणि बिहेवियरल थेरपिस्ट डॉ. रॉब विल्सन सांगतात, हेल्थ अँग्झायटीबद्दल कोरोनानंतर पूर्वीपेक्षा भरपूर प्रमाणात लोक मदत मागण्यासाठी येऊ लागले आहेत.

इंग्लंडमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. मरियान ट्रेंट सांगतात, "श्वास घ्यायला त्रास होणं हे लक्षण कोरोना आणि अँग्झायटी दोन्हीचं आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात याचं एक वाईट चक्र तयार व्हायचं. आणि जितकी चिंता करू तितकं आजारी पडल्यासारखं वाटायचं किंवा आजार वाढायचा. परत संसर्ग होण्याची अनिश्चित भीती होती. हे एखाद्या अदृश्य शत्रूशी लढल्यासारखं आहे."

मेंदू

फोटो स्रोत, Getty Images

हेल्थ अँग्झायटीचा त्रास आपल्याला होतोय का हे ओळखण्यासाठी एनएचएसने काही उपाय सुचवले आहेत. आपण आपले शरीर कसं आहे हे कितीवेळा तपासतो, आपण लोकांकडून आपल्या आरोग्याची कितीवेळा खात्री करतो, आपण कितीवेळा आरोग्यासंदर्भात माहिती गोळा करतो याची नोंद केली तर आपल्याला या स्थितीचा अंदाज येईल असं या संस्थेचं मत आहे.

आपल्या आरोग्याची, शरीराची तपासणी करायची अनावश्यक तीव्र भावना मनात आली की आपले लक्ष दुसरीकडे वळवावे. जसं की फिरायला जाणं, मित्राला फोन करणं अशा गोष्टी करता येतील असं एनएचएस सुचवतं. आरोग्याचं कारण देऊन लोकांमध्ये मिसळणं बंद केलेलं असेल किंवा व्यायाम, खेळ थांबवले असतील तर ते पुन्हा सुरू करता येतील असंही ही संस्था सांगते.

हेल्थ अँझायटी

फोटो स्रोत, Getty Images

अशा व्यक्तींना या मानसिक अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा उपयोग करता येतो असं डॉ. मरियान ट्रेंट सांगतात.

त्या म्हणतात, "कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीबरोबर, संबंधित रुग्णाची विचारांची पद्धत बदलण्यासाठी त्याच्याशी बोलणं, किंवा ज्या परिस्थितीची भीती वाटतेय त्या परिस्थितीची हळूहळू ओळख करुन घेणं, अशा स्थितीत जाणं म्हणजेच एक्सपोज होणं अशा पद्धतींचा वापर होतो."

एक्सपोजर थेरपीमध्ये एखाद्या गोष्टीची अनाठायी भीती वाटत असेल तर हळूहळू ती गोष्ट करायला सांगितली जाते. त्यासाठी तज्ज्ञ लोक आधारही देतात. जसं की बाजारात जायची भीती वाटत असेल तर टप्प्याटप्प्याने ते काम पूर्ण करण्यासाठी मदत करतात आणि ती भीती नष्ट करण्यासाठी मदत होते.

हेल्थ अँझायटी

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना मनोविकास आणि मैत्र संवादक (आयपीएच) वैदेही भिडे म्हणाल्या, “कोरोनानंतर हेल्थ अँग्झायटीमध्ये वाढ झाल्याचं दिसतं. अशा व्यक्तींनी वेळेवर उपचार घेतले तर पुढचा धोका टळतो. याची लक्षणं व्यक्तीनुसार बदलतात आणि व्यक्तीनुसार गांभीर्य बदलतं. हेल्थ अँझायटी असणाऱ्या लोकांना सततच्या काळजीनुसार छातीत धडधड होणे, पॅनिक अटॅक किंवा मनोकायिक आजार होण्याची शक्यता असते. आपल्या शरीराची थरथर वाढतेय, रक्तदाब वाढतोय, चक्कर येतेय अशी शंका त्यांना येत राहाते. मग चाचण्यांमध्ये काहीच सापडलं नाही तर त्यांना अजूनही काही राहिलं असेल असं वाचत राहातं. मग काही लोक डॉक्टरही बदलतात. त्यामुळे त्यांनी आपल्यावर या चिंताग्रस्ततेचा परिणाम होतोय का हे तपासलं पाहिजे.”

हेल्थ अँझायटी

फोटो स्रोत, Getty Images

सामान्यतः लोक आजारांची, लक्षणांची माहिती मिळवत असतातच. पण या सवयींमुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल तर मदतीची गरज आहे हे ओळखावं असं वैदेही भिडे सांगतात.

त्या पुढे म्हणाल्या, “गुगल हा आपला मित्र नाही तर तिथं फक्त माहिती मिळते. ती एक जनरल इन्फर्मेशन असते. त्यातलं आपल्याला काय लागू पडतं हे डॉक्टरच सांगू शकतात. डॉक्टर, समुपदेशक तुमच्याशी बोलतात, तुम्हाला नक्की काय होतंय हे जाणून घेतात आणि त्यानुसार निदान आणि उपचार ठरवतात.”

अशा व्यक्तीशी कुटुंबातल्या लोकांनी कसा संवाद साधायचा?

एकदा कुटुंबातील व्यक्तीला काही त्रास आहे हे समजलं की त्याला काही प्रश्न विचारता येतील. हे प्रश्नसुद्धा काळजीने, प्रेमाने विचारायचे असतात.

या त्रासामागे काही कारण आहे का? होणारा त्रास किती तीव्रतेचा आहे? तो सारखा होत राहातो की कधीतरी डोकं वर काढतो? तो कितीवेळा होतो असे प्रश्न विचारता येतील. अशा प्रश्नांमधून ढोबळ अंदाज येऊ शकतो.

मात्र या विचारण्यात आधार देण्याची, त्या व्यक्तीच्या वेदना जाणून घेण्याची भावना असली पाहिजे. काय धाड भरलीय? कशाला तोंड पाडून बसला आहेस? अशाप्रकारे हा संवाद होऊ नये.

हेल्थ अँझायटी

फोटो स्रोत, Getty Images

बहुतांशवेळा या प्रश्नांना नकारात्मक उत्तर येण्याची शक्यता असते. 'काही नाही सगळं ठीक आहे', असं उत्तर दिलं जातं. परंतु अशावेळेस कुटुंबीयांनी थोडं थांबून त्या व्यक्तीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मनात एखादी नैराश्य, चिंता, खंत, राग, द्वेष यासारखी एखादी नकारात्मक भावना वारंवार येत असेल. ती भावना चिवटपणे मनातच राहात असेल तर त्यावर विचार केला पाहिजे.

या विचाराचा आपल्या जीवनात अडथळा येत आहे असं दिसल्यास त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या नकारात्मक विचारांचा वर्तनावरही परिणाम दिसून येत असतो.

गैरसमजांकडे दुर्लक्ष कसं करायचं?

साधारणपणे मनाच्या कोणत्याही आजाराला वेड लागणं, किंवा डिप्रेशन अशाप्रकारची लेबलं लावली जातात.

वास्तविक ओव्हरथिंकिंग, अँग्झायटी, ओसीडी, डिप्रेशन वगैरे त्रासाच्या असंख्य प्रकारच्या टप्प्यावर माणसं असू शकतात.

समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेड लागलेलं असणं अशी समजूत काढून टाकणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबीयाच्या आरोग्यासाठी तशी चर्चाही टाळणं आवश्यक आहे.

डॉक्टरांकडे गेलं की ते 'शॉक' देतात वगैरे... शॉक ट्रिटमेंट असा शब्दप्रयोग केला जात असला तरी त्या उपचाराचं खरं नाव इलेक्ट्रो कनक्लुझिव्ह थेरपी असं आहे. त्याला ECT असंही म्हटलं जातं.

हे उपचार प्रत्येक रुग्णावर केले जात नाहीत. ज्या रुग्णावर ते केले जातात ते रुग्णही व्यवस्थित चालत घरी जातात. त्यामुळे काय उपचार करायचे हे डॉक्टरांवर सोपवलं पाहिजे. ही उपचारपद्धती सरसकट वापरली जात नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)