छातीत धडधड कारणेः तुमच्याही छातीत अचानक धडधडतं का? पॅनिक अॅटॅक म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'तो' एकेदिवशी घरी आला. ऑफिसात बॉसबरोबर थोडी बाचाबाची झाली होती खरी पण घरी आल्यावर नेहमीप्रमाणे तो जेवून झोपला. अचानक रात्री त्याला आपल्या छातीची धडधड वाढतेय असं वाटू लागलं. वाटू लागलं नाही वाढलीच आहे हे त्याच्या लक्षात आलं. लगेच त्याला श्वास कोंडल्यासारखं वाटू लागलं.
आता त्याला घाम फुटला, चक्कर आल्यासारखं वाटू लागलं मनामध्ये लाखो प्रकारचे विचार येऊ लागले. हे अचानक काय होतंय याकडेच सगळं त्याचं लक्ष, मन, शरीर एकवटलं गेलं.
आजवर आपण टीव्ही सिनेमात, पुस्तकात, पेपरमध्ये वाचलेला 'हार्ट अॅटॅक' तो 'हाच' असं त्याला वाटू लागलं. त्याची खात्रीच पटली की हाच तो हृदयविकाराचा धक्का. आली... आली.. माझी वेळ आली... आता आपण मरणार असं त्याला वाटलं...
झालं... आपल्याला हृदयविकार झाला आहे असं समजून त्यानं आधी गुगलवर छातीत धडधडणे या विषयाची कारणं, उपाय शोधायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरला गाठून आपल्याला हार्ट अॅटॅक आला असं सांगूनही टाकलं.....
या गोष्टीतला 'ही कोणी दुसरी तिसरी व्यक्ती नसून आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतात त्यापैकीच एक आहे. असा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो.
अचानक निष्कारण छातीची धडधड वाटून असं श्वास कोंडल्यासारखं होणं हा अनुभव अनेक व्यक्तींना येऊन गेला आहे. असा अनुभव येतो त्याला पॅनिक अॅटॅक असं म्हणतात. असं वारंवार होण्य़ाला आणि याप्रकारची सर्व लक्षण एकत्रित येण्याला पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डर असं म्हणतात.
पॅनिक अॅटॅकची लक्षणं
चिंता आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात जाणवत असतेच पण अचानक तीव्रतेने चिंता वाटायला लागून जेव्हा गोंधळलेली अवस्था निर्माण होते तेव्हा पॅनिक अॅटॅक आला असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पॅनिक अॅटॅक आलेल्या व्यक्तीला अचानक छातीत धडधडू लागतं, घाम येतो, भीती वाटते, अस्वस्थ वाटून कुठंतरी मोकळ्या हवेत जावं असं वाटू लागतं, तोंड सुकतं. सर्व लक्ष शरीराकडे केंद्रित होतं. अशा रुग्णाने घाबरुन अधिक धावपळ केल्यास हृदयाचे ठोके अधिक जलदगतीने पडून आणखी भीती वाटायला लागते. घाबरल्यामुळे या लक्षणांमध्ये अधिकच वाढ होते.
पॅनिक अॅटॅकविषयी गैरसमज
अशी लक्षणं दिसल्यावर धावपळीने डॉक्टरकडे जाऊन इसीजी काढल्यावर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं समजतं. तुम्हाला पॅनिक अॅटॅक आला असावा असं डॉक्टर सांगतात. पण घरी आल्यावरही व्यक्तीला आपल्या दुखण्याचं मूळ कारण शरीरातच असावं असं वाटत असतं आणि ते डॉक्टरांनाच सापडत नाहीये असं वाटून रुग्ण डॉक्टर बदलत राहातो.

फोटो स्रोत, Getty Images
एखादे डॉक्टर त्याला शेवटी मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतात. तेव्हाही व्यक्तीला हे पटत नसतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शारीरिक लक्षणं दिसत असल्यामुळे त्याचं मूळ मनामध्ये असेल असं व्यक्तीला वाटत नाही. त्यामुळे रुग्ण मनोविकारतज्ज्ञाकडे जायला टाळाटाळ करतात.
अशा रुग्णांशी नीट संवाद करून त्यांना विश्वासात घेऊन चिंतेचं मूळ शोधावं लागतं. घरच्याघरी तसेच कोणत्याही तपासण्यांविना निदान करू नये असं डॉक्टर सुचवतात. पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अॅटॅक यातला फरक डॉक्टरच तपासणीनंतर, चाचणीनंतर सांगू शकतात. त्यांनी केलेले निदान लक्षात घेऊन मग उपचार घेतले पाहिजेत.

फोटो स्रोत, Getty Images
छातीत अकारण धडधड होण्याच्या एकूणच आजाराला पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डर म्हणतात असं मुंबईस्थित मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, "पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डरमध्ये व्यक्तीला रात्री अचानक किंवा कधीही श्वास कोंडल्यासारखं वाटून हृद्ययाची धडधड वाढायला लागते. आपल्याला हृदयविकाराचा धक्का बसल्याची शंका येऊ लागते. यामागे रक्तामधील अॅड्रनलिन मोठ्या प्रमाणात वाढू लागतं आणि अत्यंत उत्तेजित अवस्था (एक्साइटमेंट) येऊ लागते. आता आपल्याला हृदयविकार किंवा कोणता तरी मोठा आजार झालाय, आपण मरणार असे विचार मनात येऊ लागतात."

फोटो स्रोत, Getty Images
अशी अचानक धडधड वाटणाऱ्या व्यक्तीनं सर्वप्रथम आपला ईसीजी काढून घेणं महत्त्वाचं असतं. त्यावर डॉक्टर तुमचे निदान करू शकतात. शारीरिक आजार नसल्यास या धडधडीचे कारण चिंतेत आहे का हे तपासता येते.
"बहुतांशवेळा रुग्ण स्वतःला हृदयविकार आहे असे गृहित धरुन अनेक डॉक्टर बदलत राहातात, एकापाठोपाठ एक चाचण्या करत राहातात. नंतर ते समुपदेशक किंवा मनोवकारतज्ज्ञांकडे येतात. त्यामुळे आपल्या लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अतिरेकी चिंतेच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी औषधे, समुपदेशन आणि इतर काही दैनंदिन बदल सुचवले जातात. त्यातून बरे होणे निश्चितच शक्य आहे," असं डॉ. बर्वे सांगतात.
हार्ट अॅटॅक आणि पॅनिक अॅटॅकमध्ये फरक काय?
बहुतांश लोकांना छातीत वाढलेली धडधड आणि इतर लक्षणं पाहून आपल्याला हार्ट अॅटॅक आला असं वाटू लागतं. त्यामुळे ते आणखीच घाबरतात आणि गुगलवर छातीत धडधड, उपाय कारणे वगैरे शोधू लागतात. त्यामुळे त्यांचा गोंधळच वाढतो. परंतु हृदयविकार आणि पॅनिक अॅटॅक यामध्ये असणारा फरक लक्षात घ्यावा लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीमधील मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुमितकुमार गुप्ता याबद्दल अधिक माहिती देतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "अशी अवस्था आल्यावर व्यक्तीला थोड्यावेळाने बरं वाटत असेल आणि तो गुगल वगैरे वापरत असेल तर तो हार्ट अॅटॅक नसतो. कारण हार्ट अॅटॅक आलेल्या व्यक्तीला काहीही करता येत नाही. त्याला रुग्णालयात न्यावे लागते.
"हार्ट अॅटॅकमध्ये घाबरल्यासारखे वाटून प्रचंड घाम येतो. व्यक्तीला छातीत तीव्र वेदना व्हायला लागतात आणि खालच्या जबड्यावरही परिणाम झाल्याचं दिसून येतं."

फोटो स्रोत, Getty Images
असं असलं तरी नव्या रुग्णाला एकदा र्ईसीजी आणि काही चाचण्या करुन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात त्यानंतर त्याचा आजार व्यवस्थित ठरवता येतो असं डॉ. गुप्ता सांगतात.
जर अशी अवस्था सतत येत असेल तर पॅनिक अॅटॅक असण्याची शक्यता जास्त असते कारण कोणत्याही व्यक्तीला दररोज हार्ट अॅटॅक येत नाहीत असं ते म्हणतात.
पॅनिक अॅटॅक येण्याची कारणं
पॅनिक अॅटॅक हे सर्वसाधारपणे शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे येतात. शारीरिक कारणांमध्ये उत्तेजित अवस्था (एक्साइटमेंट) येण्यामुळे हे होऊ शकतं. कॉफी किंवा कॅफिन असणारी कोल्ड्रिंक्स, निकोटीन, अतिरेकी चहापान किंवा उत्तेजक द्रव्यांचे सेवन यामुळे ही स्थिती येऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
तसेच सेराटोनिन, थायरॉईड, अॅड्रनलिन यांच्या प्रमाणात होणारी अनियमितता कारणीभूत असते. वेगाने श्वास घेणाऱ्या व्यक्तींनाही त्रास उद्भवू शकतो असं डॉक्टर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
शारीरिक कारणांबरोबरच सतत चिंताग्रस्त असणे, नैराश्य, तीव्र भीती (फोबिया) अशा कारणांमुळेही पॅनिक अॅटॅक येऊ शकतात. एखादी नको असलेली, भीती निर्माण करणारी घटना, गोष्ट घडल्यास, तशी व्यक्ती, प्राणी समोर आल्यास व्यक्तीला असा अनुभव येऊ शकतो. काही व्यक्तींना कोणत्याही स्पष्ट कारणांविना अचानक पॅनिक अॅटॅक येऊ शकतो.
पॅनिक अॅटॅकवर उपाय काय?
अशा प्रकारचा अनुभव आल्यावर डॉक्टर काही प्राथमिक चाचण्या करुन घेण्यास सुचवतात. उत्तेजक द्रव्यं किंवा कॅफिन असलेली पेयं, एनर्जी ड्रिंक्स, निकोटिन किंवा कोणतही उत्तेजक द्रव्यं घेतली जात असतील तर ती थांबवण्यास सांगतात. अशा व्यक्तीने ताण-तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांना भेटून सर्व लक्षणं नीट सांगितली पाहिजेत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर आणि मनोविकारतज्ज्ञ रुग्णाच्या लक्षणांचा अभ्यास करुन उपचारपद्धती ठरवतात. गुगलवर माहिती मिळवण्याऐवजी व्यवस्थित निदान करून उपचार घ्यावेत योग्य आहार, शवासनासह काही योग्य व्यायामही करावेत असं डॉक्टर सुचवतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








