'कमतरता माझ्यात आहे, बायकोत नाही, म्हणून मी उपचार घेतोय'

फोटो स्रोत, bambam kumar jha/getty images
"माझ्या पत्नीमध्ये कोणतीही कमतरता नाही. डॉक्टरांनी टेस्ट केल्यानंतर आम्हाला काळालं की दोष माझ्यात आहे. मला इजोस्पर्मीआ नावाचा आजार आहे."
अताउल्लाह (बदललेले नाव) यांचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं. पण त्यांची पत्नी गरोदर राहत नव्हती म्हणून दोन वर्षांपासून त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत.
ते सांगतात, पत्नीला एक किरकोळ इन्फेक्शन झालं होतं. पण हे इनफेक्शन एवढंही गंभीर नव्हतं की ज्यामुळे ती गरोदर राहणार नाही.
शेवटी अताउल्लाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ची टेस्ट केली. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कळालं की त्यांना इजोस्पर्मीआ नावाचा आजार आहे.
सीमेनमध्ये स्पर्म नसल्यास त्या आजाराला इजोस्पर्मीआ म्हणतात. यावर वैद्यकीय उपचार घेतल्याशिवाय वडील होणं शक्य नाही.
अताउल्लाह पाकिस्तानातील कबायली परिसरात राहतात.

कबायली परंपरांच्या विपरीत
अताउल्लाह यांनी सांगितलं की, वैद्यकीय टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी कबायली परंपरेचा विचार न करता दोष आपल्यात असल्याचं पत्नीला स्पष्ट केलं. यावर ते उपचार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पेशावरमध्ये एका वैद्यकीय संस्थेच्या इन्फर्टिलिटी विभागात ते उपचार घेत आहेत.
ते सांगतात, "मला कोणताही लैंगिक आजार नाही. केवळ स्पर्मची कमतरता आहे. यासाठी उपचार घेताना मला जराही संकोच वाटत नाही. माझ्यासाठी हा अहंकाराचा मुद्दाही नाही. जर एखादी समस्या असेल तर त्यावर उपाय शोधून समस्या सोडवता येते."
पाकिस्तानात ठिकठिकाणी भींतींवर पुरूष वंध्यत्वावरील उपचारासाठी जाहिराती लावलेल्या असतात. पण कधी विचार केला आहे का की इतर आजारांसंदर्भात अशा जाहीरपणे जाहिराती का लावल्या जात नाहीत?
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, सरकारी हॉस्पिटलमध्ये यासंदर्भात उपचार दिले जात नाहीत म्हणूनच जाहीरपणे याबाबत बोलले जात नाही. यामुळे काही लोक कमी पैशात उपचार करण्याचं लालूस देऊन सर्वसामान्य लोकांचा फायदा उचलतात.

फोटो स्रोत, Getty Images
सामाजिक समस्या
पाकिस्तानात वडील बनण्यास असमर्थ ठरत असलेल्या पुरुषांवर उपचार करण्याला एक समाजिक समस्या समजलं जातं. सहसा पुरुष अशा आजारांवर उपचार घेण्यासाठी संकोच करतात किंवा अहंकाराचा मुद्दा बनवतात.
वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आपल्या पत्नीवर वर्षानुवर्ष उपचार करतात पण स्वत: मात्र एकही टेस्ट करत नाहीत.
पाकिस्तानात पहिल्यांदाच पेशावरमध्ये हयात आबाद मेडिकल कॉम्लेक्समध्ये संतती आणि लैंगिक आजारांवर उपचारासाठी एक विभाग सुरू केला आहे. यासाठी तज्ज्ञांची टीम तैनात करण्यात आली आहे. अशा तज्ज्ञांची पाकिस्तानात कमतरता आहे.
या विभागात काम करणारे डॉक्टर मीर आबिद यांनी बीबीसीसी बोलताना सांगितलं, "सहसा संतती विषयक समस्या आणि लैंगिक आजारांचा संबंध यूरोलॉजीशी असतो. यासाठी विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण पाकिस्तानात असे तज्ज्ञ कमी संख्येने आहेत."
खासगी हॉस्प्टिलमध्ये असे उपचार केले जातात. पण सरकारी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच पेशावरमध्ये यासाठी विशेष विभाग सुरू केला आहे.

पुरुषांसाठी संतती अक्षमता अहंकाराचा मुद्दा का आहे?
डॉक्टर मीर आबिद यांच्यानुसार, संतती विषयक समस्या घेऊन येणाऱ्या पुरुषांमध्ये 90 टक्के पुरूष असे असतात ज्यांनी अनेक वर्षं आपल्या पत्नीवर उपचार करण्याकडे भर दिलेला असतो.
ते असंही सांगतात, काही पुरूष असेही आहेत ज्यांनी स्वत:ची टेस्ट न करता मूल होण्यासाठी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा विवाह केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लैंगिक आजार आणि संतती प्राप्त करण्याची अक्षमता किती मोठी समस्या आहे?
विश्लेषकांच्या मते जगभरात सरासरी 15 टक्के जोडपी संतती प्राप्तीसाठी असमर्थ ठरतात. पण पाकिस्तानात हे प्रमाण अधिक आहे.
डॉ.आबिद यांच्यानुसार, लैंगिक आजार कोणत्याही कारणास्तव होऊ शकतो. यामध्ये मानसिक स्थितीही जबाबदार ठरू शकते.
ते सांगतात, "तरुणांनाही हा आजार होऊ शकतो. 40 वयापेक्षा अधिक वय असलेल्या 50 टक्क्यांहून अधिक लोकांना विविध प्रकारचे लैंगिक आजार असतात. यामुळे अनेक कारणांमुळे ते शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत नाहीत."
पाकिस्तानात लैंगिण शिक्षण दिलं जात नसल्याने ही समस्या अधिक गंभीर आहे, असंही डॉक्टर सांगतात. वैद्यकीय उपचाराचीही पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याचं ते सांगतात.
पाकिस्तानमध्ये कामोत्तेजक औषधांवरही बंदी असल्याचं डॉक्टर आबिद सांगतात. कारण या औषधांचा दुरूपयोग केला जाऊ शकतो, असं सरकारला वाटतं आणि समाज या औषधांकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाही.
ते सांगतात, "डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशी औषधं रूग्णांना दिली जाऊ शकतात. जर दुरूपयोग होण्याचा प्रश्न आहेच पण पाकिस्तानात अशी अनेक औषधं आहेत ज्याचा दुरूपयोग केला जातो. हे थांबवण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि अशा औषधांच्या खरेदी-विक्रीचं नियमन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत."

फोटो स्रोत, Nataliia Nesterenko/Getty Images
संतती विषयक अक्षमता असलेले पुरूष उपचारासाठी येतात?
बहुतांश पुरूष यासाठी उपचार घेण्यास तयार होत नाहीत, असं मानलं जातं. डॉ. आबिद यांच्यानुसार, 90 टक्के पुरूष वर्षानुवर्ष आपल्या पत्नीमध्ये कमतरता आहे, असा विचार करतात. त्यासाठी उपचार करतात. पण आपण स्वत: टेस्ट करावी असा विचारही ते करत नाहीत.
ते सांगतात, "आता परिस्थिती थोडी सुधारत आहे. काही तरूण आता लग्नाआधी टेस्ट करून घेतात. लग्नाआधी टेस्ट केल्यास नंतर अडचणी वाढत नाहीत असं त्या तरूणांना वाटतं. अशीही काही कुटुंब आहेत जी लग्नाआधीच मुलगा आणि मुलीच्या टेस्ट करून घेतात. जेणेकरून लग्नानंतर तणाव आणि अडचणी येवू नयेत."
डॉ.आबिद सांगतात, जे पुरूष टेस्टसाठी तयार होत नाहीत त्यांच्या पत्नीला त्यांचं मन वळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अनेक विकसित देशांमध्ये कपल थेरपिस्ट असतात. जे जोडप्यांना मार्गदर्शन करतात. आजार आणि उपचारासंदर्भात सर्व माहिती देत असतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








