कौटुंबिक हिंसाचार: '10 वर्षं माझी बायको माझ्यावर बलात्कार करत होती'

फोटो स्रोत, Getty Images
जगभरातून घरगुती हिंसाचाराच्या ज्या तक्रारी येतात त्यात बहुतांश पीडित या महिलाच असतात. जगातल्या एकूण महिला आणि मुलींपैकी एक तृतिआंश जणी स्वतःच्या घरातच शारीरिक किंवा लैंगिक शोषणाला बळी पडत असल्याची संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी सांगते.
पुरूषांना अशा काही हिंसाचाराला सामोरं जावं लागत असेल, अशा तक्रारी तुरळक आहेत. पुरुषांवर होणारा घरगुती हिंसाचार आपल्या समाजात टॅबू मानला जातो आणि म्हणूनच अशा हिंसाचाराला बळी पडणारे पुरूष बरेचदा एकट्याने सगळा त्रास सहन करत असतात.
युक्रेनमधल्याही एका पुरूषाला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. या व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर बीबीसीशी संवाद साधला. ते काय म्हणाले आणि तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, पाहूया.
माझ्या मित्रांनी याची काही कल्पना आली होती की नाही, मला माहिती नाही. बाहेरून बघताना सगळं छान-छान दिसत होतं - हसरे चेहरे, मित्रमंडळी, बक्कळ पैसा, आनंद आणि आत्मविश्वास. आम्ही सोबत निम्म्या जगाची भटकंती केली.
आम्ही प्रवासात असताना मला तिची भीती वाटत नव्हती. कारण इतर कुणासमोर ती मला मारझोड करत नसे. तिच्यासोबत एकट्याने रहाणं टाळणं, हे अत्यंत महत्त्वाचं होतं.
माझी पूर्व पत्नी थोडी थोडकी नाही तर तब्बल 10 वर्षं माझ्यावर बलात्कार करत होती, हे आत्ता आत्ता माझ्या लक्षात आलं.
इरा माझी पत्नी होती. आम्ही विशीत असताना आमची भेट झाली आणि तिनेच मला लग्नाची मागणी घातली.
मुलीला डेट करायला सुरूवात केल्यानंतर माझ्या पालकांनी मला लगेच दुसरं घर शोधायला सांगितलं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुमच्या आयुष्यात जोडीदार आला म्हणजे तुम्हाला कुटुंबीयांना सोडावं लागतं. ज्या छताखाली लहानाचं मोठे झालात ते छत सोडावं लागतं.
हे माझ्यासाठी त्रासदायक होतं. त्यामुळे एकटं राहण्यासाठी पुरेसा पैसा कमावल्यानंतरच कुठलंही नवं नातं जोडणं मला परवडणारं होतं.
'स्वतःविषयी न्यूनगंड'
भरीस भर म्हणजे माझ्या रंगरुपावरून माझ्या आईला माझी लाज वाटायची. त्यामुळे मला माझ्याविषयी एकप्रकारचा न्यूनगंड होता.
मी सर्वांत पहिले शरीरसंबंध ठेवले तेही इराशीच. पुढे मला ते हवेहवेसे वाटू लागले. पण तेही नॉर्मल नव्हतं. संभोगही खूप आक्रमक आणि वेदनादायी होता. आमचा पहिला संभोग जवळपास 5 तास चालला आणि माझ्या संपूर्ण शरीरावर त्याच्या जखमा होत्या.
तिला एकप्रकारचं खूळ किंवा उन्माद असायचा की संभोगाच्या शेवटी वीर्यपतन म्हणजेच इजॅक्युलेशन व्हायला हवं. त्यामुळे ती मला खूप वेळ रब करायची. जवळपास एक ते दोन तास.

फोटो स्रोत, Getty Images
प्रणयक्रीडेतून खरंतर आनंद मिळायला हवा. मात्र, मला तो कधीच मिळाला नाही. मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मला वाटायचं की हे असंच असतं. त्यामुळे मी अशा वेदनादायी संभोगासाठी होकार द्यायचो.
मात्र, लवकरच मी नकार द्यायला लागलो. मात्र, त्यामुळे तिला काहीच फरक पडला नाही आणि इथूनच बलात्काराची सुरुवात झाली.
'जाळ्यात अडकलो'
व्यवसायानिमित्ताने मला एकदा परदेशात जायचं होतं. मी तिथे जास्त दिवस राहणार होतो. मी इराला गमावून बसेन, अशी भीती मला वाटली. त्यामुळे मी तिला माझ्यासोबत येतेस का म्हणून विचारलं. आधी लग्न करूया, असा प्रस्तावही दिला. मात्र, तिने लग्न करायला नकार दिला. पण ती माझ्यासोबत आली. तिथूनच या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली.
मी कामावरून परत आलो आणि दमलो होतो. मला आराम करायचा होता. पण ती सेक्सची मागणी करू लागली. मी होकार दिला. असं एकदा घडलं, दुसऱ्यांदा घडलं. ती म्हणायची, "मला हे हवं आहे. मला याची गरज आहे. तुला करावंच लागेल. मी खूप वेळची वाट बघतेय." मी म्हणायचो, "नाही, मला नकोय. मी दमलो आहे. मला आराम करायचा आहे."
मग ती मला मारझोड करायची आणि मी काहीच करू शकत नव्हतो. ती वाढलेल्या नखांनी रक्त येईपर्यंत माझी कातडी ओरबाडायची. ती मला ठोसे मारायची. ती माझ्या चेहऱ्यावर मारझोडीचा एकही डाग येऊ द्यायची नाही. फक्त जेवढा भाग झाकून राहतो म्हणजे छाती, पाठ आणि हात यावरच ओरबाडायची.
पण मी तिला कधीच मारलं नाही. कारण मला वाटायचं स्त्रीवर हात उगारणं चुकीचं आहे. माझ्यावर असेच संस्कार झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
मी स्वतःला तिच्यापुढे खूप कमी लेखू लागलो. तिला जे हवं ती मिळवायची.
एकदा हॉटेलमध्ये मी स्वतःसाठी वेगळी खोली घ्यायचा प्रयत्नही केला. मात्र, मला त्यांची भाषा येत नव्हती आणि त्यामुळे मला काय हवंय हे त्यांना कळलंच नाही आणि मला तिच्या जाळ्यात अडकून पडल्यासारखं वाटलं.
मला ऑफिसवरून हॉटेलवर परत यायची भीती वाटू लागली. मग मी ऑफिस संपल्यानंतर मॉलमध्ये जाऊन वेळ घालवू लागलो. मॉल बंद होईपर्यंत मी तिथेच असायचो. त्यानंतर शहरात भटकायचो. ते थंडीचे दिवस होते. खूप थंडी असायची. थंडी, पाऊस आणि माझ्याकडे थंडीचे कपडेही फारसे नव्हते.
त्यामुळे मला युरिनरी इन्फेक्शन झालं. ताप आला. पण याचाही इराला काहीच फरक पडला नाही. ती जे म्हणायचे ते मला करावंच लागायचं.
'तिला सोडण्याचे अपयशी प्रयत्न'
युक्रेनला आल्यावर मी माझ्या आई-वडिलांच्या घरी परतलो. इराला भेटायलाही जात नसे. तिच्यासोबत खूप कमी थांबायचो. पण तिला सोडण्याच्या प्रयत्नात अनेक वर्षं गेली.
आम्ही भांडायचो. मी माझा फोन बंद करायचो. तिला नंबर ब्लॉक करायचो. ती भेटायला आली की लपून बसायचो. पण बंद दाराच्या बाहेर ती बसून असायची. ती मला कॉल करून सॉरी म्हणायची, सगळं नीट होईल म्हणायची.
आणि अशाप्रकारे मी परत तिच्याकडे जायचो. मी एकटा पडेन, अशी भीती मला वाटायची.

फोटो स्रोत, Getty Images
विकेंड्सचा विचार करूनच अंगावर काटा यायचा. आता मी युक्रेनला परत जाण्यासाठी दिवस मोजू लागलो. युक्रेनला परत गेल्यावर आमचं नातं संपेल असं मला वाटत होतं. पण, तसं घडलं नाही.
सुरुवातीला तिला सोडण्याचा मी खूप प्रयत्न केला. पुढे पुढे कमी आणि शेवटी मी हात टेकले. ती लग्न करू म्हणाली. माझी इच्छा नव्हती. मात्र, तरीही आमचं लग्न झालं.
इरा सगळ्यांचा द्वेष करायची, माझ्या मित्रांचा, माझ्या कुटुंबाचा. मी कुठेही गेलो तरी मला तिला उत्तर द्यावं लागायचं. "मी त्या कॉन्फरन्सला का गेलो? मित्रांना का भेटलो? मला कायम तिच्याच सोबत रहावं लागायचं."
ती माझ्याशिवाय कुठेच जायची नाही. जणू मी तिच्यासाठी तिच्या मनोरंजनाची एखादी वस्तू किंवा खेळणं होतो.
इराला नोकरी नव्हती. त्यामुळे घरखर्च मीच करायचो. मी एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता. घरात दोन बाथरूम होते. पण मुख्य मोठं बाथरूम वापरायची मला परवानगी नव्हती. मला कायम गेस्ट बाथरूम वापरावं लागायचं. रोज सकाळी जाग येऊनही मी उठू शकत नव्हतो. कारण ती 9-10 वाजेपर्यंत झोपायची आणि मी उठलो तर तिची झोपमोड व्हायची.
वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायचं, असा नियम तिनेच केला आणि मला जी खोली दिली तिला लॉक नव्हतं. म्हणजे मला अजिबात प्रायव्हसी नव्हती.
माझ्या हातून काही चूक झाली की ती मला खूप ओरडायची. मारायची. हे नित्याचंच होतं.
काहीही घडलं की त्याचा दोष ती मला द्यायची. ती कायम मला तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा सांगायची. त्याने काय करावं आणि काय करू नये. मी तिच्यापुढे काहीच करू शकत नव्हतो. ती चिडू नये, म्हणून ती म्हणेल ते करायचो. पण मला त्याचा खूप त्रास व्हायचा आणि मी ढसाढसा रडायचो.

फोटो स्रोत, Getty Images
एक दिवस असचं पायऱ्या उतरून मी कारमध्ये जाऊन बसलो आणि खूप रडलो. त्या दिवशी ती माझ्या मागे आली. तिने मला रडताना बघितलं. मी घरात आल्यावर ती म्हणाली तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप आहे. पण तो तिचा स्वभाव आहे. तिला स्वतःवर ताबा ठेवता येत नाही.
मात्र, तिने माफी मागूनही काहीच उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा सगळं पहिल्यासारखंच सुरू झालं.
मीही परफेक्ट नव्हतो. हा सगळा त्रास टाळण्यासाठी मी दिवसातून 10, 12 तर कधीकधी 14 तास काम करू लागलो. विकेंडला, सुट्ट्यांमध्येही मी ऑफिसला जायचो. दुःख, वेदना, त्रास विसरण्यासाठी काही जण दारूच्या आहारी जातात तर काही जण कामात स्वतःला गुंतवून घेतात.
हिंसाचाराला बळी पडणारे छळ करणाऱ्यांना सोडत का नाहीत?
- वाद, भांडणतंटे, मारझोड अशा घरात वाढलेली मुलं मोठी झाल्यावर तशीच वागतात.
- एकटे पडण्याची किंवा समाज काय म्हणेल याची भीती असते.
- पहिला टप्पा असतो मानसिक छळाचा. आपला मानसिक छळ होतोय हे कळणं अवघड असतं. त्यामुळे ज्याचा मानसिक छळ होतो त्याता हळूहळू याची सवय होते आणि परिस्थिती आणि कृती यांची आकलन क्षमता गमावून बसतो.
- पीडित व्यक्तीला मार्गच सापडत नाही. तो छळ करणाऱ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतो किंवा त्याची परिस्थिती नाजूक असते. उदाहरणार्थ गर्भवती महिला किंवा लहान मुलं असलेल्या स्त्रिया.
- अनेकदा प्रशासनाकडे मदत मागितल्यावर 'ही तुमची कौटुंबिक बाब आहे', असं उत्तर मिळतं.
युक्रेनच्या नॅशनल हॉटलाईन विभाग प्रमुख अॅलिओना क्रिव्ह्युलियॅक आणि लैंगिक हिसाचाराला प्रतिबंध आणि प्रतिरोधाचं काम करणाऱ्या यूएन पॉप्युलेशन फंडच्या सल्लागार ऑलेना कोचेमायरोव्हस्का यांनी ही काही कारणं दिलेली आहेत.
'मी बोलता झालो'
जेव्हा तुम्ही अशा एखाद्या परिस्थितीत असता तेव्हा काय घडतंय तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. तुम्हाला कुणाचं म्हणणंही ऐकू येत नाही. यातून बाहेर पडता येईल, असा विचारही मनात येत नाही. नैराश्य येतं.
जे मला करायचं नव्हतं तेही मी करायचो कारण मला त्याची सवय झाली होती. मला कायम वाटायचं की मी कुणाचं तरी देणं लागतो. मी स्वतःचा विचार कधी केलाच नाही. माझ्या आजीचं, माझ्या आई-वडिलांचं. नात्यासाठी तुम्ही त्याग करायला हवा, असंच मला वाटायचं.

फोटो स्रोत, Getty Images
आणि म्हणूनच मी माझ्या इच्छा आणि स्वतःचाही त्याग केला. त्यावेळी मला ते सामान्य वाटायचं. त्यामुळे परिस्थिती आणखी वाईट होत गेली.
सुरुवातीला मला ते फक्त आवडत नव्हतं. मात्र, आमच्या नात्याच्या शेवटच्या तीन-चार वर्षात सेक्सचा विचार येताच मला पॅनिक अटॅक यायचे. मी जेव्हा-जेव्हा इराच्या तावडीत सापडायचो आणि ती माझ्यावर बळजबरी करायची तेव्हा मला असे अटॅक यायचे.
जेव्हा मला अशी खूप भीती वाटायची तेव्हा मी तिला दूर सारायचो, लपायचो, पळून जायचो. घरातून किंवा किमात त्या खोलीतून तरी पळायचो.
इराला वाटायचं की माझ्यामुळे आमच्यात सेक्स प्रॉबलम्स आहेत. त्यामुळे ती मला सेक्सॉलॉजिस्टकडेही घेऊन जायची.
मी जेव्हा-जेव्हा म्हणायचो की मला आवडत नाही आणि मला सेक्स करायचाच नाही त्या त्या वेळी मला सांगितलं जायचं की माझ्यात काहीतरी प्रॉबलम आहे. पण मी छळ आणि बलात्कार याविषयी काहीच बोलत नव्हतो.
इरासाठी मात्र, डॉक्टरांच्या या व्हिजिट्स तिचा मुद्दा कसा खरा आहे, हे पटवून देण्यासाठीचे पुरावे होते. घटस्फोटाच्या काही काळ आधीच मी माझा जो छळ व्हायचा त्याविषयी बोलू लागलो. एकदा बोलल्यावर मग मागे वळून बघितलं नाही.
'मला मार्ग कसा सापडला?'
हिवाळ्याचे दिवस होते. मला ब्रोंकायटिसचा त्रास होत होता आणि जवळपास दोन आठवडे ताप होता. पण त्यावेळी कुणीच माझी विचारपूस केली नाही. त्यावेळी मला वाटलं की माझी काहीच किंमत नाही आणि याक्षणी इथेच माझा मृत्यूही झाला तरी कुणाला फरक पडणार नाही.
माझ्या मनात भीती, तिरस्कार, ग्लानी अशा भावनांचं वादळ उठलं होतं. मला कुणालातरी हे सगळं सांगायचं होतं. पण कुणाला सांगावं आणि कसं सांगावं, हेच कळत नव्हतं. मी एकदा आई-वडील घरी नसताना घरी गेलो. मला फक्त एकटं रहायचं होतं.
मी इंटरनेटवर सर्फ करत होतो. तेवढ्यात जाहिरातीच्या एका विंडोमध्ये चॅटिंगचा आयकन दिसला. तिथे सगळंच निनावी होतं. गुप्त. जणू तुम्ही अस्तित्वातच नाही.
त्यावेळी मी पहिल्यांदा माझ्यासोबत काय घडतंय, ते सांगितलं. त्यावेळीसुद्धा मला वाटत नव्हतं की माझा छळ होतोय. पण त्यानंतर मी नकार देऊ लागलो.
सुरुवातीला लहान लहान गोष्टींना नकार दिला. पण मुकाट्याने ती म्हणेल ते सगळं ऐकून घेण्यापेक्षा नाही म्हणणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला जेव्हा वाटायचं की यावेळी मला खंबीर असायला हवं. त्यावेळी मी आजारी असतानाचे दिवस आठवायचो.

फोटो स्रोत, Getty Images
पुढे माझी भेट एका फॅमिली थेरपिस्टशी झाली आणि त्यांनी मला खूप आधार दिला. त्या डॉक्टरांकडे आमचे सेशन्स व्हायचे. त्यावेळी मी आणि इरा एकमेकांशी बरंच बोलायचो. मी बोलत असताना मध्येच थांबवायचं नाही, असं तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळी मी पहिल्यांदा माझा छळ होत असल्याचं सांगितलं.
इरा खूप चिडली. माझ्यावर ओरडली आणि हे सगळं खोटं असल्याचं तिचं म्हणणं होतं.
मात्र, यानंतर तिनेच घटस्फोटाचा प्रस्ताव ठेवला. मला अजूनही वाटतं की तिला स्वतःला घटस्फोट नको होता. पण मला गप्प करण्याचा तो तिचा प्रयत्न असावा. पण मला माहिती होतं की ही संधी पुन्हा मिळणार नाही आणि मी घटस्फोटाला होकार दिला.
घटस्फोटासाठी आम्ही एका ऑफिसात गेलो तिथे खूप गर्दी होती. मग दुसऱ्या ऑफिसात गेलो. माझ्या मनात एकच विचार सुरू होता. ही एकच संधी आहे माझ्याकडे आणि कुठल्याही परिस्थितीत मी ही संधी गमावता कामा नये. अखेर आमचा घटस्फोट झाला.
महिनाभरानंतर माझ्या हातात घटस्फोटाचे पेपर आले. तो माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा दिवस होता.
घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी मी तिला सुनावलं, "तू माझा बलात्कार करत होतीस."
ती म्हणाली, "मग काय झालं?"
यावर काय उत्तर द्यावं, मला कळलंच नाही आणि अजूनही मला उत्तर मिळालेलं नाही. ती बलात्कार करायची, हे तिने एकप्रकारे मान्य केलं. पण तरीही ती हसत होती.
मी माझ्या आई-वडिलांच्या घरी परत गेलो. मी जॉब सोडला आणि काही आठवडे घरीच थांबलो. मला भीती वाटायची की ती बाहेर माझ्यावर पाळत ठेवून असेल.
एक दिवस ती घरी आली आणि जोरजोरात दार ठोठावत होती. दारावर लाथा मारत होती. किंचाळत होती. आई म्हणाली तिला भीती वाटतेय. मी तिला म्हणालो, "तू विचारही करू शकत नाही."
'लक्षात येणं गरजेचं आहे'
मी कधी पुरावे गोळा केले नाही आणि कुणाला सांगितलंही नाही.
मी किमान माझ्या आई-वडिलांना तरी सांगायला हवं होतं. पण, मला माहिती होतं की मी त्यांना सांगितलं तर माझं हे गुपित ते स्वतःजवळ ठेवणार नाहीत. शिवाय, माझ्या मित्रांनाही हे सगळं कसं सांगायचं, हेच मला कळत नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
मी सपोर्ट ग्रुपची मदत मिळते का म्हणूनही प्रयत्न केला. पण युक्रेनमध्ये सगळे सपोर्ट ग्रुप केवळ महिलांसाठी आहेत. शेवटी मला पुरुषांसाठी ऑनलाईन काम करणारी सॅन फ्रॅन्सिस्कोमधली एक संघटना सापडली.
मी युक्रेनमधल्या ज्या पहिल्या मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो त्यांना माझं बोलणं ऐकून खूप हसू आलं. ते म्हणाले, "असं नसतं. ती मुलगी आहे आणि तू मुलगा आहेस." मी सहा डॉक्टर बदलले. जवळपास आठ महिन्यांनंतर मी कुणाच्यातरी हातात हात दिला.
पुरूषांनाही असते मानसिक आधाराची गरज
युक्रेनमध्ये एकाने पुरुषांसाठी मानसिक आधार कम्युनिटी ग्रुप सुरू केला होता. पण पुरुष सहसा मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला कचरतात. त्यामुळे हा ग्रुप बंद झाला.
युक्रेनच्या नॅशनल हॉटलाईन विभाग प्रमुख अॅलिओना क्रिव्ह्युलियॅक यांनी सांगितलं की पूर्वी त्यांच्याकडे पुरूषांचे फोन येत नव्हते. पण त्यांनी 24 तास सेवा सुरू केल्यावर रात्रीच्यावेळी पुरूष आपल्या समस्या सांगण्यासाठी फोन करू लागले.
मात्र, अजूनही पुरूषांना आपली ओळख उघड तर केली जाणार नाही ना, याची काळजी वाटते आणि कोर्टकचेऱ्यांमध्ये आपल्या हक्कांसाठी आवाज उठवायलाही त्यांना आवडत नाही.
क्रायसेस सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट युलिया क्लिमेंको सांगतात की पीडित पुरुषांना मानसिक धक्क्यातून सावराला जास्त वेळ लागतो. आपल्या समाजाचीच शिकवण आहे - 'मुलं रडत नाहीत' किंवा 'पुरूष हा स्त्रीपेक्षा अधिक बलवान असतो.' त्यामुळे समाजाकडून पुरूषांना म्हणावा तसा आधार मिळत नाही.
एखाद्या पुरूषाचा लैंगिक छळ किंवा शारीरिक अत्याचार किंवा त्याचा मानसिक छळ होत असेल, हे आपला समाज स्वीकारू शकत नाही.
'खटला दाखल करण्याचा विचार'
तिच्याविरोधात खटला दाखल करण्याचा माझा विचार आहे. तिने जे केलं ते मान्य करावं आणि माफी मागावी, अशी माझी इच्छा आहे.
मी अजूनही ऑफिसला जात नाही आणि रोज सकाळी उठणं माझ्यासाठी अजूनही फार कठीण आहे. जगण्याचं काहीच कारण मला दिसत नाही. मला तर हेही कळत नाही की मी इतकी वर्षं काय करत होतो.
मला एक गोष्ट माहिती आहे की यापुढे मी कुठलंही नातं जोडणार नाही आणि मला मूलबाळही नको.
पण एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं की मी इतकी वर्षं गप्प का बसलो आणि त्यामुळे सगळा गोंधळ झाला. कदाचित कुणीतरी असेल ज्याची परिस्थितीही माझ्यासारखीच असेल आणि आता तो माझी ही कहाणी वाचत असेल.
त्याने एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे : हे संपणार नाही आणि कधीच दुरुस्तही करता येणार नाही. हा एक मोठा गुंता आहे जो कधीच उलगडणारा नाही. तो तुम्हाला पोखरून टाकेल. हे तुम्हाला कळलं आणि वळलं तर यातून बाहेर पडण्याची संधी तुमच्याकडे आहे, एवढं मात्र नक्की.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








