भारत वि. झिम्बाब्वे: चेन्नईत टीम इंडियाचा 72 धावांनी विजय, पण सेमी फायनल गाठण्यासाठी संघर्ष कायम

फोटो स्रोत, Getty Images
आयसीसी वर्ल्ड कप टी-20 च्या सुपर एटमध्ये मध्ये आज चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना रंगला. भारताने प्रचंड धावसंख्येचा डोंगर उभा केला आणि हा सामना 72 धावांनी जिंकला.
गेले चार सामने धावांसाठी झगडणाऱ्या अभिषेक शर्माला अखेर आज सूर गवसला. अभिषेकनं मेन्स ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सुपर एट फेरीत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकून भारताच्या धावाची पायाभरणी केली.
टीम इंडियानं टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील आपली सर्वोच्च धावसंख्या आज गाठली. भारताने 256 धावा केल्या. झिम्बाब्वेसमोर 257 धावांचे आव्हान ठेवलं. भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला.
भारताला प्रत्युत्तर देताना झिम्बाब्वेनी 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने नाबाद 97 धावांची खेळी केली. अवघ्या 59 बॉलमध्ये त्याने 97 धावा केल्या.
भारताने हा सामना जिंकला असला तरी सेमी फायनलला जाण्यासाठी भारताचा संघर्ष अजून कायम असेल.

फोटो स्रोत, ANI

फोटो स्रोत, Getty Images
भारतानं अशा लुटल्या धावा
चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. त्याचा फायदा उचलत संजू सॅमसननं छोटी पण झंझावाती खेळी केली. संजूनं 15 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांसह 24 धावा केल्या.
इशान किशनच्या फलंदाजीचा क्रम बदलून अभिषेक शर्माबरोबर संजू सॅमसनला सलामीला पाठवण्यात आलं होतं. त्यानं आणि अभिषेक शर्मानं पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली.
जम बसतोय अस वाटत असतानाच चौथ्या षटकांत मुझरबानीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात संजू झेलबाद झाला. मात्र त्यानंतर अभिषेक आणि ईशान किशननं 72 धावांची भागीदारी रचत धावांचा ओघ सुरू ठेवला.

फोटो स्रोत, ANI
साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत अभिषेकला भोपळाही फोडता आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातही तो चाचपडत खेळताना दिसला होता. परंतु, या सामन्यात अभिषेकनं जणू सगळी उणीव भरून काढली.
त्यानं आक्रमक पवित्रा दाखवत अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. टी-20 क्रिकेटमधलं त्याचं हे नववं अर्धशतक ठरलं.
त्यानं 30 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांसह 55 धावांची खेळी केली. त्यामुळेच टीम इंडियाने दहाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर शंभर धावांचा पल्ला ओलांडला.
ईशान किशननंही 24 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या. पण चौकारांची आतषबाजी करत असतानाच ईशान झिम्बाब्वेचा कर्णधार सिंकदर रझाच्या गोलंदाजीवर तो फसला आणि रिचर्ड नगारावाने त्याचा झेल टिपला.
त्यानंतर सिकंदर रझानं अभिषेक शर्माची तर नगारावानं सूर्यकुमार यादवची विकेट काढली. सूर्यानं तेरा चेंडूंमध्येच 3 चौकार आणि 2 षटकारांसह 33 धावा फटकावल्या.
त्यानंतर हार्दिक पंड्यानं फटकेबाजी सुरू ठेवत भारताला अडीचशे धावांचा पल्ला ओलांडून दिला.
हार्दिकनं 23 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 50 धावा केल्या तर तिलकनं 16 चेंडूंमध्येच 3 चौकार आणि 4 षटकारांसह 44 धावा ठोकल्या.
टीम इंडियानं 20 षटकांत 4 बाद 256 धावांची मजल मारली. ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
झिम्बाब्वेचं ढिसाळ क्षेत्ररक्षण, टीम इंडियाचा आक्रमकपणा
टीम इंडियाच्या फलंदाजीमध्ये आज आत्मविश्वास दिसून आला.
ठराविक अंतराने विकेट जरी पडत गेल्या तरी भारताच्या धावांमध्ये सातत्याने भर पडत होती. प्रत्येक फलंदाजाने आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा दिसून आला. त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून महत्त्वाच्या क्षणी टीम इंडियाच्या फलंदाजांचे झेल सुटले. त्याचा मोठा फटका झिम्बाब्वेला बसला.
हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने अखेरच्या षटकांमध्ये झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. प्रत्येक षटकांत दोघांनी चौकार-षटकरांची आतषबाजी केली.
शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून हार्दिकचं अर्धशतक
हार्दिक पांड्याने 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 23 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या.
त्याला तिलक वर्माने 16 चेंडूत 44 धावा करत चांगली साथ दिली. त्यानेही 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले. भारताने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 256 धावा केल्या.
तत्पूर्वी, टीम इंडियाने फलंदाजीच्या क्रमवारीत फेरबदल केले. सलामीला येणाऱ्या इशान किशनला दुसऱ्या स्थानी पाठवण्यात आलं. तर तिलक वर्माला पाचव्या स्थानी पाठवलं. त्याच्या आधी हार्दिक पांड्याला बढती देण्यात आली.
फलंदाजीतील हा बदल टीम इंडियासाठी फायदेशीर ठरला. तिलक वर्माही फॉर्मसाठी धडपडत होता. परंतु, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याच्यात आत्मविश्वास दिसून आला.
दरम्यान, नाणेफेक जिंकून टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावणं झिम्बाब्वेला महागात पडलं. त्यात गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या निराशाजनक कामगिरीचा फटकाही त्यांना बसला.
भारतासाठी निर्णायक सामना
टी-20 वर्ल्ड कप आता रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. सुपर 8 चे सामनेही आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून दिग्गज संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
भारतासाठी आजचा (26 फेब्रुवारी) झिम्बाब्वे विरुद्धचा सामना निर्णायक आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडिअमवर होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण या सामन्यातील विजयाच्या गणितावर भारताचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग ठरणार आहे.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. चेपॉकच्या स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांवर पुढच्या फेरीत जाण्यासाठी मोठा दबाव आहे. झिम्बाब्वेनं साखळी फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाचा पराभव केला होता. भारताला या सामन्यात केवळ विजय आवश्यक नाही. मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागणार आहे.
दरम्यान, आज दुपारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीज टीमचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला. वेस्ट इंडीजचं 176 धावांचं आव्हान आफ्रिकेने 16.1 षटकांत केवळ गडी गमावून पूर्ण केलं.
दुसरीकडे भारताने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धचा सर्वात मोठा दावेदार म्हणून सुरुवात केली होती. कारण 2024 चं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाविरोधात जबरदस्त कामगिरी केली होती.
वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाने 41 टी-20 सामन्यांपैकी 31 मध्ये विजय मिळवला होता. टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या टप्प्यात टीम इंडियाने आपल्या चारही सामन्यांत विजय मिळवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला होता.
वॉशिंग्टन आऊट-अक्षर इन, संजू सॅमसनलाही संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने आपल्या अंतिम संघात दोन बदल केले आहेत. मागील सामन्यात ऑफ स्पिनर संघात असावा म्हणून संधी देण्यात आलेला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी पुन्हा एकदा डावखुरा फिरकीपटू आणि टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेल हा पुन्हा संघात परतला आहे.
वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी आणि फंलदाजीत फारशी चमक दाखवता आली नव्हती.
तर दुसरीकडे रिंकू सिंगच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मागील काही सामन्यात संजू सातत्याने अपयशी ठरला आहे. परंतु, संघाची गरज आणि उजव्या हाताचा फलंदाज म्हणून त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळालं आहे.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे-
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सुर्यकुमार यादवर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











