कोरोना व्हायरस : घरात आहेत पण हिंसाचारापासून सुरक्षित नाहीत त्यांचं काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
30 वर्षांची अनिता (बदललेलं नाव) सध्या घाबरलीये. ती लोकांकडे धुणं भांडी करते आणि तिचा नवरा मिस्त्रीकाम करतो. अनेक गरीब आणि पिचलेल्या कुटुंबातील महिलांना सहन करावा लागतो तसा त्रास अनितालाही करावा लागतो.
नवरा दारू पितो, कधी कधी मारझोडही करतो पण बाईच्या जातीला हे चालायचंच म्हणून ती सहन करते. इतर वेळेस ठीक चालणारं तिचं आयुष्य आता पूर्णपणे बदलून गेलंय.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात जो लॉकडाऊन झालाय आणि राज्यात जो कर्फ्यू लागू झालाय त्यामुळे अनिताचा नवरा आता दिवसभर घरी असतो. हाताला काम नाही, प्यायला दारू नाही आणि डोक्यात विचार यामुळे अनिताला आता रोजचाच मार खावा लागतोय. तिच्या दीड खणातल्या घरात कोंडून असल्यामुळे तिला सुटकेचा मार्गही दिसत नाहीये.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी जगभरात लॉकडाऊन आहे. घरात राहा, तरच सुरक्षित राहाल असाच संदेश सगळीकडून दिला जातोय, पण त्यांचं काय जे घरात आहेत म्हणून सुरक्षित नाहीयेत?

कोरोनाबद्दल अधिक माहिती-

कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशी परिस्थिती आता उद्भवली आहे, त्यामुळे त्याच्याशी दोन हात करताना सगळ्यांना भांबावून जायला होतंय. पण अशा परिस्थितीही जे घरात अडकले आहेत, विशेषतः ज्या महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत किंवा जी लहान मुलं लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत त्यांचं काय? अशा परिस्थितीत त्यांनी मदत मागायची तरी कुठे?
सुजाता लवांडे, कोरो या सामाजिक संस्थेच्या महिला सक्षमीकरण विभागात काम करतात. घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडितांना मदत देण्याचं कामही त्या करतात. त्या सांगतात, "घरातल्या बाईची परिस्थिती वाईट झाली आहे. सगळेच घरात अडकून पडल्यामुळे घरातल्या महिलेला स्वतःची अशी जागा नाहीये. त्यामुळे तिची अवस्था वाईट झालीये."
कोरो संस्था दुर्बल घटकातल्या महिलांसाठी, विशेषतः दलित आणि मागायवर्गीय महिलांसाठी काम करते. यातल्या अनेक महिला आधीपासूनच घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरत आल्या आहेत.
हिंसा करणारे घरातच
वर दिलेल्या सर्व्हेनुसार महिलांवर अत्याचार करणारे त्यांच्या घरचेच असतात. 31 टक्के विवाहित महिलांना त्यांच्या नवऱ्याकडून शारीरिक, मानसिक किंवा भावनिक अत्याचार सहन करावा लागतो. 27 टक्के महिला शारीरिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं तर 13 टक्के महिलांना भावनिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं.
2019 साली नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातली 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची दर तिसरी महिला घरगुती हिंसाचाराची बळी पडली आहे. याच सर्व्हेमध्ये हेही म्हटलंय की 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 27 टक्के महिलांवर शारीरिक हिंसेचा सामना केलेला आहे.
घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, 2005 नुसार घरगुती हिंसाचारच्या अंतर्गत शाब्दिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक, लैंगिक अशा सगळ्या प्रकारचा हिंसाचार येतो. हिंसाचारा झाला नसला आणि तो होईल अशी धमकी महिलेला दिली असली तरी या कायद्याने त्या महिलेला संरक्षण मिळतं.
सध्याच्या परिस्थिती महिला त्याच घरात अडकल्यात ज्या घरात त्यांच्यावर अत्याचार करणारे राहातात आणि सध्या तेही 24 तास घरातच आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"लॉकडाऊनचा काळ मोठा आहे, त्यामुळे आमच्या लक्षात आलं की घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाहीये. त्यामुळेच आम्ही जी अन्नाची पाकीटं वाटत आहोत त्यावर घरगुती हिंसाचाराची समस्या असेल तर आम्हाला फोन करा असं सांगणारे स्टीकर लावले आहेत, त्यावर आमच्या स्वयंसेवकांचे नंबर्सही आहेत," सुजाता सांगतात.
त्यांच्या संस्थेने हे स्टीकर वाटल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पाच फोन आले. यातल्या काही महिलांनी त्यांची आधीही मदत घेतली आहे. काही जणींना फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं तर काही जणींनी आपले अनुभव कथन केले.
"आम्हाला महिला सांगताहेत की त्यांना कशा परिस्थितीत राहावं लागतंय. एका महिलेचा फोन आला होता. आता घरात सगळे जण असल्यामुळे तिच्या नवऱ्याला बायकोजवळ जाता येत नव्हतं. त्याचा राग त्याने तिला चिमटे घेऊन काढला. तिचा पूर्ण पाय काळानिळा पडला होता. आणि काय झालं हे ती नो कोणाला सांगू शकत होती, ना दवाखान्यात जाऊ शकत होती."
लॉकडाऊनचा काळ वाढेल तसं घरगुती हिंसाचाराच्या केसेस वाढतील सुजाता यांना वाटतं. त्यासाठी त्यांच्या संस्थेने तयारी करायला सुरुवात केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"पहिली स्टेप म्हणजे महिलांपर्यंत आमचे नंबर पोहचवणं म्हणजे ज्यांना आमच्याशी बोलायचं असेल, संपर्क करायचा असेल त्या करू शकतात. दुसरं म्हणजे जर कोणी अत्यंत अडचणीत असतील किंवा ज्यांना तातडीची गरज असेल त्यांच्यासाठी काही शेल्टर होम्सची व्यवस्था करता येतेय का तेही आम्ही पाहातोय. आमच्या माहितीतली एक महिला तक्रार घेऊन पोलिसांकडे गेली होती पण सध्या लॉकडाउन असल्यामुळे तक्रा दाखल करायला नकार दिला. तर आम्ही पोलीसांशीही बोलून त्यांच्या सहकार्याने काही करता येईल का त्याचाही आढावा घेत आहोत."
याबाबत आम्ही पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. "नाशिक ग्रामीणच्या डीसीपी शर्मिष्ठा वालावलकर म्हणतात की असं काही होत नाहीये. आमच्याकडे तक्रारी आल्या की आम्ही त्यांची नोंद करून घेतो आहोत. परवाच आमच्याकडे याबाबत एक तक्रार आली आणि आम्ही दाखल करून घेतली."
जगभरात काय चाललंय?
सोशल मीडियावर एक जोक खूप व्हायरल होतोय ज्यात लिहिलंय सध्याच्या काळातली पोलीस स्टेशनमधली आकडेवारी
चोऱ्या - 0
खंडणी - 0
खून – 0
घरगुती हिंसाचाराचे बळी - 87435
अर्थात यातले आकडे काल्पनिक आहेत, आणि आपल्या बायकोच्या हातून त्रस्त झालेल्या नवऱ्याला उद्देशून हा जोक आहे. आणि म्हणूनच खरंतर जोक आहे, कारण प्रत्यक्षात आकडे कित्येक पटीने जास्त असू शकतात आणि पीडित महिला असू शकतात, नव्हे आहेतच.
हा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव जागतिक संघटना यूएन ने याची दखल घेऊन याबद्दल ट्वीट केलं यावरूनच येईल. युनायटेड नेशन्सनी याबद्दल ट्वीट करून म्हटलं आहे की, 'या क्वारंटिनच्या दिवसात कदाचित घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना मदतीची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.’
यूएनने हेही म्हटलंय की घरगुती हिंसाचाराविरूद्ध मदत मागण्यासाठी जितक्या हेल्पलाईन आहेत, त्या सुरूच राहतील आणि त्याची गणना 'अत्यावश्यक सेवांमध्ये' होईल.

फोटो स्रोत, UN Twitter
यूकेच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी स्पष्ट केलंय, की घरगुती हिंसाचाराच्या बळी पडणाऱ्या महिलांना लॉकडाऊनच्या काळातही घर सोडण्याची मुभा असेल. त्यांनी हेही स्पष्ट केलं, की ज्याच्यासाठी घर ही सुरक्षित जागा नाही त्याच्यासाठी वेगळी पावलं उचलली जातील, तसंच अशा हिंसा करणाऱ्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा केली जाईल.
अशा महिलांसाठी तसंच लैंगिक शोषणाचे बळी पडणाऱ्या लहान मुलांसाठी 1.6 अब्ज पाऊंड स्थानिक स्वयंसेवी संस्था तसंच मदतकार्य करणाऱ्या लोकांना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
भारतात सध्यातरी अशा प्रकारचं पॅकेज जाहीर झालेलं नाही. महाराष्ट्र सरकारने घरगुती हिंसाचाऱ्या बळी ठरणाऱ्या महिलांसाठी लॉकडाऊनच्या काळात काही खास उपाययोजना केल्या आहेत का हे जाणण्यासाठी आम्ही महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, "मुख्यमंत्री, गृहमंत्री तसंच इतर मंत्रीमंडळाच्या सतत बैठका होत आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार उपाययोजना केल्या जात आहेत. अडचणीत सापडलेल्या प्रत्येक घटकाच्या मदतीसाठी आम्ही आवश्यक ती पावलं उचलू."
स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे की अशा हिंसाचारात आता कित्येक पटीने वाढ झाली आहे, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पीडित महिलेला कुठे जायलाही सध्या जागा नाही. त्यामुळे पण योग्य वेळेत पावलं उचलली गेली नाही तर लाखो महिलांना मानसिक, शारीरिक आणि लैंगिक हिंसेला तोंड द्यावं लागेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








