मृत महिलेच्या दान केलेल्या गर्भाशयातून झाला बाळाचा जन्म; 'हे चमत्कारापेक्षा कमी नाही'

फोटो स्रोत, PA Media
वयाच्या तिशीत असलेली ग्रेस बेल तिचं बाळ म्हणजे 'चमत्कार' असल्याचं म्हणते. ग्रेसचा मुलगा ह्युगो हा दहा महिन्यांचा आहे.
ग्रेसच गर्भाशय जन्मतःच बाळ जन्माला घालण्यासाठी सक्षम नव्हतं. तिच्या बाळाचा जन्म हा एका मृत महिलेचं गर्भाशय ट्रान्सप्लान्ट करून झाला आहे. त्यामुळेच ग्रेससाठी तिचं बाळ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये.
अशाप्रकारे मूल जन्माला घालण्याचा प्रयत्न युकेमध्ये पहिल्यांदाच करण्यात आला आहे.
बेल आणि तिचा जोडीदार स्टीव्ह पॉवेल यांनी गर्भाशय दान करण्यारी महिला आणि तिच्या कुटुंबाच्या 'निःस्वार्थीपणा आणि दयाळूपणा'बद्दल आदर व्यक्त केला. त्यांच्यामुळेच आयुष्यातली 'अविस्मरणीय भेट' मिळाल्याची बेल आणि स्टीव्हची भावना आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ देणाऱ्या ऑक्सफर्ड आणि लंडन इथल्या वैद्यकीय टीमचेही दोघांनी आभार मानले.
या बाळाच्या जन्माची प्रक्रिया पार पाडणाऱ्या डॉक्टरनी म्हटलं आहे की, हा एक मैलाचा दगड आहे, ऐतिहासिक टप्पा आहे, जो अशाप्रकारची समस्या असलेल्या महिलांसाठी आशेचा किरण ठरू शकतो.
'स्वप्नातून जागं व्हायला हवं असं वाटलं'
ह्यूगोचा जन्म 2025 च्या डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या थोडा आधी झाला. पश्चिम लंडनमधल्या क्वीन शार्लोट अँड चेल्सी हॉस्पिटलमध्ये जवळपास 7 पौंड वजनाचं हे बाळ जन्माला आला.
बेलला जन्मतःच गर्भपिशवी नव्हती. पण तिची अंडाशयं नीट होती. तिला मासिक पाळी येत नव्हती. याला वैद्यकीय भाषेत MRKH सिंड्रोम म्हणतात. युकेमध्ये 5 हजार महिलांपैकी एका महिलेमध्ये ही स्थिती पाहायला मिळते.
वयाच्या 16 व्या वर्षी तिला सांगण्यात आलं की, ती स्वतःचे मूल गर्भात वाढवू शकणार नाही.
मूल होण्यासाठी या जोडप्यासमोर फक्त दोनच पर्याय होते — गर्भाशय प्रत्यारोपण किंवा सरोगसीचा मार्ग स्वीकारणे.
गर्भाशय प्रत्यारोपणासाठी डोनरची वाट पाहावी लागणार होती.
पण जेव्हा तिला गर्भाशय मिळालं असून प्रत्यारोपण शक्य असल्याचं सांगणारा फोन आला, तेव्हा तिला सुखद धक्का बसला. ती प्रचंड आनंदी झाली.
ज्या महिलेचं गर्भाशय होतं, तिच्या कुटुंबाकडून मिळालेल्या या अमूल्य भेटीची ग्रेसला जाणीव होती. त्यामुळेच तिला स्वतःच्या गर्भात मूल वाढवणं शक्य होणार होतं.

फोटो स्रोत, Getty Images
बेल सांगते की,"मी रोज मला गर्भाशय दान करणारी महिला आणि तिच्या कुटुंबाचा विचार करते. त्यांच्या मुलीने दिलेल्या सर्वांत मोठ्या देणगीमुळे मला आयुष्यभराचा आनंद मिळाला आहे. त्यामुळे त्यांना समाधान मिळावं ही प्रार्थना मी करते."
"या गर्भाशयाच्या रुपाने तिचा एक भाग कायम जिवंत राहील."
जून 2024 मध्ये ऑक्सफर्डमधील चर्चिल हॉस्पिटलमध्ये 10 तास बेलची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर काही महिन्यांनी लंडनमधील लिस्टर फर्टिलिटी क्लिनिकमध्ये या जोडप्याने आयव्हीएफ उपचार घेतले आणि मग भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले.
ह्यूगोचा जन्म झाल्यावर बेल म्हणाली, "हा खरोखरच एक चमत्कार होता. सकाळी जाग आल्यावर बोळकं पसरलेला त्याचा छोटासा चेहरा पाहिला तेव्हा या स्वप्नातून जागं व्हायला हवं असं वाटलं."
सकाळी जाग आली तेव्हा त्याचा छोटासा चेहरा, तोंडात पॅसिफायर घेतलेला पाहिला, आणि मला वाटलं जणू मी एखाद्या स्वप्नातून जागी व्हायला हवं."
"हे सगळं अविश्वसनीय होतं."

फोटो स्रोत, Womb Transplant UK/PA Wire
क्वीन शार्लोट अँड चेल्सी हॉस्पिटलमध्ये झालेला ह्युगोचा जन्म एखादा 'चमत्कार' असावा असं वाटलं.
युकेमध्ये क्लिनिकल चाचणी अंतर्गत 10 प्रत्यारोपण होत आहेत. बेलचे गर्भाशय प्रत्यारोपण हे त्यांपैकीच एक. तीन प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आधीच झाल्या आहेत. पण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर जन्माला आलेलं हे पहिलंच बाळ आहे.
2025 च्या सुरुवातीला युकेमध्येच जिवंत दात्याकडून झालेल्या गर्भाशय दानातून एमी नावाच्या बाळाचा जन्म झाला. तिच्या आईला जानेवारी 2023 मध्ये तिच्या मोठ्या बहिणीचे गर्भाशय प्रत्यारोपणाद्वारे देण्यात आले होते. त्या बहिणीला आधीच स्वतःची दोन मुले होती.
ग्रेसला मात्र एका मृत महिलेचे गर्भाशय देण्यात आलं होतं.
युकेमध्ये जवळच्याच जिवंत नातेवाईकांकडून पाच गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची योजना आहे.
गर्भाशय नसलेल्या महिलांसाठी आशेचा किरण
लंडनमधल्या ज्या हॉस्पिटलमध्ये एमीचा जन्म झाला, तिथेच ह्युगोचाही जन्म झाला. या दोन्ही बाळांच्या जन्मासाठी काम करणारी वैद्यकीय टीम अनेक वर्षांपासून या क्षणांची तयारी करत होती.
इम्पिरियल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्टचे सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा. रिचर्ड स्मिथ यांनी 25 वर्षांपूर्वीच गर्भाशय प्रत्यारोपणावर संशोधन सुरू केले होते आणि ते ह्यूगोच्या जन्मावेळी उपस्थित होते. त्यांनी म्हटलं की, प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया, आयव्हीएफ, भ्रूण प्रत्यारोपण आणि प्रसूती या सगळ्या प्रक्रियेत एक 'प्रचंड मोठी टीम' सहभागी होती.
स्मिथ यांनी 'वूम्ब ट्रान्सप्लान्ट युके' ही संस्था स्थापन केली होती. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेल आणि स्टीव्ह पॉवेल यांनी आपल्या मुलाचे मधले नाव 'रिचर्ड' ठेवले.

हे दाम्पत्य दुसरं बाळ होण्याचा निर्णय घेऊ शकते, त्यानंतर बेलच्या शरीरातील प्रत्यारोपित गर्भाशय काढून टाकलं जाईल. यामुळे बेलला शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रत्यारोपित अवयवावर हल्ला करू नये म्हणून आयुष्यभर तीव्र औषधे घ्यावी लागणार नाहीत.
प्रत्यारोपण करणाऱ्या सर्जन आणि टीम लीडर इसाबेल क्युरोगा यांनी ह्यूगोच्या जन्मानंतर 'आनंद' व्यक्त केला आणि ही ब्रिटनमधल्या अवयव प्रत्यारोपणातली एक मोठी झेप असल्याचं म्हटलं.
त्यांनी म्हटलं, "युरोपमध्ये मृत दात्याकडून गर्भाशय मिळालेल्या मातांनी जन्म दिलेली बाळ अतिशय कमी आहेत."
"ज्यांचं गर्भाशय पुरेसं सशक्त नाही, अशा जास्त वयाच्या प्रजननक्षम महिलांसाठी ही प्रक्रिया मान्यताप्राप्त आणि नियमित उपचार ठरू शकते का, याचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न आहे."
स्मिथ यांनी म्हटलं की, ज्यांना गर्भाशय नाही अशा मुली आणि महिलांमध्ये या प्रसूतीमुळे आता स्वतःचं बाळ गर्भात धारण करण्याची आशा निर्माण झाली आहे.
मृत दात्याकडून गर्भाशय प्रत्यारोपणानंतर जन्मलेल्या बाळाचा दात्यासोबत कोणताही आनुवंशिक संबंध नसतो.

फोटो स्रोत, Getty Images
जगभरात 100 हून अधिक गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत आणि त्यातून 70 पेक्षा अधिक निरोगी बाळांचा जन्म झाला आहे.
प्रत्यारोपणासाठी गर्भाशय दान करणे हे किडनी किंवा हृदयासारख्या इतर अवयवांच्या दानासारखे नसते. संभाव्य दात्याच्या कुटुंबाने अवयवदानास संमती दिल्यानंतर त्यांना पुन्हा एक विशेष विनंत करून हे शक्य होतं.
जर तुम्ही अवयवदानाच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नसेल तर ब्रिटनमध्ये तुम्हाला आपसूकच ऑरगन डोनर किंवा अवयव दाता मानलं जातं.
नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असलेल्या डोनरच्या पालकांनी म्हटलं की, त्यांच्या मुलीने मागे ठेवलेल्या वारशाचा त्यांना 'प्रचंड अभिमान' आहे.
तिने आणखी पाच अवयवांचे दान केले आहे जे चार लोकांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले.
तिच्या कुटुंबाने म्हटलं की, "अवयवदानाद्वारे तिने इतर कुटुंबांना आशा आणि नवीन आयुष्याचं अमूल्य वरदान दिलं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











