गरोदरपणात मधुमेह का होतो? तो टाळण्यासाठी काय उपाय करायला हवा?

गरोदर महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
    • Role, स्त्रीरोगतज्ज्ञ

"डॉक्टर ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियमित व्यायाम आणि डाएट आणि गोळ्या सगळं व्यवस्थित चालू आहे माझं. आजची fasting आणि pp sugar 89 आणि 118 आली आहे. ठीक आहे ना?"

नीनाचा मेसेज वाचून दोन मिनिटं मन भूतकाळात गेलं. दीड वर्षांपूर्वी नीना ने पहिल्या गर्भारपणात अनियंत्रित मधुमेहामुळे तिचं बाळ गमावलं होतं. तेव्हा ती गावाकडे होती. नीनाचं वजन पहिल्या गर्भारपणात सुरवातीपासूनच खूप जास्त होतं. आधी वजन कमी करून मग प्रेग्नन्सी प्लॅन कर म्हणून डॉक्टरांनी खूप समजावून सांगून सुद्धा नीना आणि तिच्या घरच्यांनी तिकडे साफ दुर्लक्ष केलं.

गरोदर राहिल्यानंतरसुद्धा तिचं वजन खूप वेगाने वाढलं आणि सातव्या महिन्यापासून शुगर वाढायला सुरवात झाली. गावाकडच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी नीनाला कडक पथ्य, रोज नियमित चालायला जाणं, शुगर नियंत्रणासाठी गोळ्या असं सगळं समजावून सांगितलं पण घरातल्या जुनाट विचारसरणीच्या काही लोकांनी "काही होत नाही, तू दोन जीवांची आहेस, भरपूर खा" म्हणून तिला उत्तेजनच दिलं.

शेवटी ज्याची भीती तिथल्या डॉक्टरांना होती तेच झालं. नीनाच्या बाळाचे हृदयाचे ठोके ऐन नवव्या महिन्यात बंद झाले आणि तिनं बाळ गमावलं. मग मात्र सगळ्यांचेच डोळे खाडकन उघडले आणि पुढच्या प्रेग्नन्सीच्या आधी तिला शहरात आणायचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी मात्र नीनाने पूर्ण मनावर घेऊन प्रेग्नन्सीच्या आधीच दहा किलो वजन घटवलं. Hba1c ची पातळी ६% किंवा कमी आहे, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या सुरू आहेत, नियमित व्यायाम आणि योग्य आहार चालू आहे अशी सगळी खात्री करूनच आम्ही नीनाची ही प्रेग्नन्सी प्लॅन केली आणि आता सगळं प्लॅन प्रमाणे सुरळीत चालू आहे.

आत्ता नुकत्याच पुण्यात झालेल्या स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञांच्या परिषदेत गर्भारपणातील मधुमेह म्हणजे Gestational Diabetes mellitus(GDM) च्या वेगाने वाढणाऱ्या केसेस बद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

पूर्वी ह्या प्रकारचा मधुमेह फक्त उच्चभ्रू समाजातील स्त्रियांमध्ये आढळत होता, पण आता सर्व स्तरातील स्त्रियांमध्ये हा मधुमेह आढळत आहे. ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये सुध्दा अशा गर्भवती मोठ्या प्रमाणात येतात आणि वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या समस्यांना बाळ आणि आई दोघेही बळी पडत आहेत.

याची कारणे अर्थातच व्यायामाचा अभाव, अन्न पदार्थांची भरपूर रेलचेल तसंच उपलब्धता आणि आरोग्याबद्दलची अनास्था ही आहेत. भारतीयांमध्ये गेल्या काही वर्षात लठ्ठपणाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आपल्या जेवणात कर्बोदकं खूप जास्त आणि प्रथिनं कमी झाली आहेत. खाण्यावर संयम राहिला नाही म्हणूनच भारतात जगातले सर्वांत जास्त मधुमेही दिसून येत आहेत.

गरोदरपणा

फोटो स्रोत, Getty Images

आधुनिक संशोधनानुसार गर्भधारणा होताना आणि झाल्यावर स्त्रीचं कुपोषण होत असल्यास तिच्या पोटातील गर्भावर त्याचे विपरीत परिणाम होतात.

कुपोषण म्हणजे पोषक आहार नसणे याबरोबरच अतिवजन असणे हेही एक प्रकारचे कुपोषणच आहे. हे परिणाम त्याच्या जनुकीय रचनेवर झाल्यामुळे हे बाळ मोठं झाल्यावर त्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता खूप जास्त वाढते.

गरोदरपणातील मधुमेहाचे दोन प्रकार

पहिला प्रकार म्हणजे प्रेगन्सी राहण्याच्या आधीच असलेला मधुमेह आणि दुसरा प्रकार म्हणजे साधारण सातव्या महिन्यात होणारा मधुमेह (Gestational Diabetes). स्त्रियांमध्ये बहुतांशी दुसऱ्या प्रकारचा डायबेटिज दिसून येतो.

प्रत्येक गर्भवतीची सातव्या महिन्यात GTT नावाची टेस्ट करण्यात येते. यामध्ये 75 ग्रॅम ग्लुकोज देऊन दोन तासांनी गर्भवतीची शुगर तपासतात. ती 140 mmol/lit पेक्षा कमी येणे अपेक्षित असते. 75 ग्रॅम ग्लुकोज देऊन सुद्धा ज्या स्त्रियांची शुगर 140 पेक्षा कमी येते त्यांचं शरीर ग्लुकोजचं व्यवस्थित विघटन करू शकत आहे असा याचा अर्थ आहे. ज्या स्त्रियांचं शरीर हे करू शकत नाही त्याची शुगर वाढते आणि मग मधुमेहाचं निदान केलं जातं.

140 पेक्षा जास्त शुगर आली म्हणून लगेच घाबरून जाण्याचं कारण नसतं. त्यानंतर भात, बटाटा, साखर, मैदा अशी कर्बोदकं आहारातून वगळली आणि रोज एक तास चालण्याचा व्यायाम सुरू केला तर शुगर नियंत्रणात येऊ शकते. गरोदरपणात उपाशीपोटी म्हणजे fasting bsl 90च्या खाली आणि जेवणानंतरची म्हणजे ppbsl 120च्या खाली असावी लागते.

गरोदर महिला

फोटो स्रोत, Getty Images

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात स्त्रवणारे सगळेच हॉर्मोन्स तिची शुगर वाढवण्याचं काम करत असतात. एरवी हे बाळाच्या पोषणासाठी गरजेचं असतं पण मधुमेही गर्भवतीच्या शरीरातील चयापचय वेगळं असल्यामुळे तिची शुगर प्रमाणाबाहेर वाढत जाते.

आईची शुगर वाढल्यामुळे बाळावर हळूहळू विपरित परिणाम होऊ लागतात. बाळाचं वजन अनियंत्रित वाढू लागतं, बाळाभोवतीचं पाणी झपाट्याने वाढू लागतं. बाळामध्ये हृदय, किडनी, मेंदू, पाठीचा कणा, पचन संस्था यातील विकृती, दुभंगलेले टाळू, ओठ अशी वेगवेगळी व्यंग निर्माण होऊ शकतात. अशी बाळं वजन जास्त असूनही तब्येतीने अतिशय नाजूक होतात. जन्मानंतर त्यांना शुगर कमी होणे, कावीळ यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं.

गरोदरपणातील मधुमेहामुळे बाळाचं वजन वाढतं तसंच प्रसूतीच्या कळा सहन करण्याची ताकद खूपच कमी होते त्यामुळे सिझरियनची शक्यता वाढते. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास बाळाचं डोकं किंवा खांदे अडकून बसल्याने फार मोठा धोका उद्भवू शकतो.

हा मधुमेह अनुवांशिकसुद्धा असू शकतो. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह होतो त्यांना नंतरच्या आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. तसंच वयात आल्यानंतर PCOD असणाऱ्या मुलींमध्ये याचे प्रमाण जास्त आढळतं.

यावर उपाय काय?

खरंतर खूप अवघड नाहीये. वयात येणाऱ्या मुलींची नीट काळजी घेतली तर भविष्यात हे प्रमाण कमी करता येईल. या मुलींना नियमित व्यायाम आणि योग्य आहार याची सवय लहानणापासूनच लावली तर त्याचं वजन नियंत्रणात राहायला मदत होईल. पाळी सुरू होऊन दोन ते तीन वर्षांत नियमित झाली नाही तर स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेऊन पाळी नियमित येईल इकडे बारीक लक्ष ठेवायला हवं.

प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधी आपलं वजन योग्य आहे ना याबाबत सल्ला जरुर घ्यावा. नसेल तर वजन कमी करूनच पुढील प्लॅन करावा. आधी वजन कमी करून मग प्रेग्नन्सी प्लॅन करा असं सांगितल्यावर खूप वेळा मुली नाराज होतात, आमचा पण पुढच्या समस्या टाळण्याचा तो प्रयत्न असतो हे लक्षात घ्यायला हवं.

गर्भपात होण्याचं प्रमाणही जास्त वजनाच्या मुलींमध्ये लक्षणीय आहे. गर्भवती दर वेळी तपासायला येतात तेव्हा आमचं त्यांच्या वाढत्या वजनाकडे बारीक लक्ष असतं. खूप वेगानं वाढणारं वजन हा धोक्याचा इशारा आहे. कर्बोदकं कमी आणि प्रथिनं जास्त हा नियम पाळला जायला हवा. आणि गर्भवतीला अतिखायला घालणं पुर्णपणे टाळायला हवं.

एकदा मधुमेहाचं निदान झाले की स्त्रीरोगतज्ज्ञ काही गोळ्या सुरु करतात. गर्भवतीने BSL(blood sugar levels) करून डॉक्टरांना नियमित कळवत राहणं अत्यावश्यक आहे. गोळ्या, आहार आणि व्यायाम करूनही शुगर नियंत्रणात आली नाही तर मग मात्र इन्सुलिनची इंजेक्शन्स सुरू करावी लागतात. यासाठी कधी कधी पेशंटला अडमिट करून शुगरची वारंवार तपासणी करून डोस ठरवावा लागू शकतो. इन्सुलिनचं इंजेक्शन कसं घ्यायचं हे पेशंट किंवा तिच्या नातेवाईकांना शिकवलं जातं.

इन्सुलिन सुरू केल्यानंतर पेशंटवर बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं. शुगर कमी झाल्यास साखर कायम जवळ ठेवणं महत्त्वाचं असतं. या पेशंटने glucometer घरात ठेवणे उत्तम. म्हणजे शुगरची तपासणी घरीच नियमित करता येते. सुरवातीला लॅबमध्ये रक्त देताना त्याच सॅम्पलची घरच्या glucometer वर पण तपासणी करावी. म्हणजे लॅबचा रिपोर्ट आणि glucometer वरचा रिपोर्ट यांची तुलना करून कॅलिब्रेशन करता येतं. आणि बऱ्यापैकी अचूक शुगरची तपासणी घरीच करता येते.

मधुमेह असलेल्या गर्भावतीच्या बाळाकडेही खूप लक्ष ठेवावं लागतं. यासाठी सोनोग्राफी जरा जास्त वेळा केली जाते त्याबरोबरच doppler study ही तपासणी सुद्धा केली जाते. यामध्ये बाळाला आई कडून होणारा रक्तपुरवठा तपासून बघितला जातो. मधुमेही स्त्रियांची बाळं बहुतेक वेळा वजनानं जास्त असतात पण काही वेळा त्यांची वाढ खुंटते आणि त्याचं वजन आणि वाढ कमी होऊ लागते. हा चिंतेचा विषय असतो आणि अश्या बाळांची प्रसूती वेळेआधी करावी लागू शकते.

गरोदर महिला

मधुमेहाबरोबर कधी कधी गर्भावतीचा रक्तदाब पण वाढू लागतो. त्यासाठी वेगळी औषधं सुरू करून त्याकडे पण बारकाईने लक्ष ठेवावं लागतं.

गर्भवतीचे दिवस जसजसे भरत येतात तसतसं शुगर आणि रक्तदाब (वाढला असेल तर ) हळूहळू वाढायला लागतो. अशा वेळी या गर्भवतींच्या तब्येतीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागतं आणि धोक्याची शक्यता वाढल्यास वेळेआधी प्रसूती करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.

मधुमेह असलेल्या गर्भवतीची प्रसूती कधी करायची हे शुगर नियंत्रणात आहे की नाही यावर ठरवण्यात येतं. मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात असेल तर दिवस भरेपर्यंत थांबता येतं पण तसं नसेल आणि सोनोग्राफीमध्ये बाळावर प्रतिकूल परिणाम होत आहेत असं दिसले तर प्रसूती आधी करण्याचा निर्णय घेतला जातो.

अश्यावेळी बाळाचं फुफ्फुस अधिक चांगलं कार्यरत व्हावं यासाठी गर्भवतीला स्टिरॉइड्सची इंजेक्शन्स दिली जातात आणि मग प्रसूती केली जाते. बाळाची आणि आईची तब्येत नाजूक असल्याने सिझेरियनची शक्यता वाढते.

बाळाचं वजन जास्त असणं, बाळाभोवतीचे पाणी जास्त असल्यामुळे बाळाचे डोके वरच तरंगत राहणं, मधुमेह आणि रक्तदाब यामुळे बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होणं अशी कारणं सिझेरियन होण्यास कारणीभूत असू शकतात.

प्रसूती झाल्यानंतरही या बाळांच्या तब्येतीकडे बारीक लक्ष ठेवावं लागतं. त्यांना रक्तातील साखर कमी होणं, कावीळ अशासारख्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो.

गर्भारपणात मधुमेह झालेल्या स्त्रियांनी प्रसूतीनंतर ही आयुष्यभर काळजी घेणं आवश्यक आहे. प्रसूतीनंतर मधुमेह तात्पुरता नाहीसा होतो. परंतु नंतर नियमित व्यायाम आणि आहार याचं पथ्य न पाळल्यास मधुमेह परत येऊन कायमचा पाठीशी लागू शकतो. हृदय रोग, किडनीचे आजार, काही प्रकारचे कॅन्सर याचीही शक्यता वाढते.

असा हा त्रासदायकच आजार आहे, पण आपण तो सहज टाळू शकतो किंवा आटोक्यात ठेवू शकतो. आणि हो आपल्या नीनाची सुखरूप प्रसूती होऊन ती आता एका गोंडस मुलीची आई झाली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)