मासिक पाळी : PCOD मुळे खरंच गर्भधारणा होऊ शकत नाही का?

महिला

फोटो स्रोत, Science Photo Library

    • Author, डॉ. साईजा चंदू
    • Role, बीबीसीसाठी

"त्या दिवशी मला सकाळीच ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं होतं. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडले आणि बघितलं तर ओपीडीमध्ये जरा जास्तच गर्दी दिसली. माझ्या रूमसमोर चार ते पाच पेशंट्स वाट बघत बसले होते. "

मी माझ्या स्टाफला व्हिलचेअरमध्ये बसलेल्या आजीला आत पाठवायला सांगितलं. त्या आत येत असताना आमच्याच हॉस्पिटलमधल्या डायलिसिस विभागात काम करणाऱ्या नर्सने त्यांना थांबवलं आणि विनवू लागल्या, "मॅडम प्लीज, खूप महत्त्वाचं आहे. आधी आम्ही आत गेलो तर चालेल का?"

व्हिलचेअरमध्ये बसलेल्या आजी तयार झाल्या. त्या म्हणाल्या, "ठीक आहे. मी जवळपास तासभर वाट बघतेय. आणखी 15 मिनिटं वाट थांबेन. तुम्ही जा आत."

पाळी

फोटो स्रोत, Getty Images

मी बघितलं. नर्ससोबत एक तरूण मुलगी मला दिसली. यांना एवढं काय तातडीचं काम आहे? असा विचार करत मी म्हणाले, "मी आधी त्या आजींना तपासते. तुम्ही 10 मिनिटं थांबा." त्या तरुण मुलीने होकारार्थी मान हलवली आणि खाली बघतच खांद्यावरची बॅग पुन्हा मांडीवर ठेवली. तिचा चेहरा कोमेजला होता आणि ती खूप अशक्त दिसत होती. तिला घेऊन येणाऱ्या नर्सला मात्र माझं म्हणणं पटलेलं नव्हतं. ती तशीच उभी होती. तिच्या मनातली अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्या आजीला तपासेपर्यंत ती नर्स अस्वस्थपणे येरझरा मारत आपला नंबर कधी येतो, याची वाट बघत होती.

मी त्यांना आत यायला सांगितल. ती जवळपास धावतच माझ्या रूममध्ये आली आणि आर्जवाच्या स्वरात बोलू लागली. "आम्ही खूप आशा घेऊन आलोय. मॅडम प्लीज. आता तुम्हीच काहीतरी करा."

ही नर्स तिच्या भावाच्या बायकोला म्हणजे तिच्या वहिनीला घेऊन माझ्याकडे आली होती. तिला दिवस जात नव्हते.

"त्याने काल दिवसभर पाण्याचा एक घोटही घेतला नाही. तोच नाही तर आम्हा सगळ्यांनाच खूप काळजी लागून आहे."

"काय झालं?"

"वंध्यत्व मॅडम. घरी कुणीच खुश नाही. तुम्हीच काहीतरी करा ना. चांगल्यात चांगली औषधं द्या. गरज असेल तर परदेशातल्या औषधी द्या. पण सगळ्यात आधी तिला काय झालं ते तपासा", नर्स न थांबता बोलत होती.

मी विचारलं, "तुझं नाव काय?"

पण नर्सनेच उत्तर दिलं. "वर्धनी मॅडम. माझ्या आईचं ऑपरेशनही तुम्हीच केलं होतं. आईनेच मला हिला तुमच्याकडे घेऊन यायला सांगितलं."

पाळी

फोटो स्रोत, Getty Images

मी त्या तरुण मुलीकडे बघत होते. ती खाली मान घालून बसली होती. ती वहिनी असली तरी वयाने खूप लहान वाटत होती. छान, कोरलेलं नाक, निमुळती हनुवटी, लिप्स्टिक लावायचीही गरज नाही इतके लाल ओठ. पण, डोळे मात्र निस्तेज होते.

मी तिला विचारलं, "तू बरी आहेस ना?"

तिने मान वर करून माझ्याकडे बघितलं. किती निष्पाप डोळे होते. तिच्या वेदना मला कळत आहेत की नाही, याबद्दलची साशंकता तिच्या डोळ्यात जाणवली. कधीकधी शब्दांपेक्षाही डोळे बोलके असतात.

मी पुन्हा तिला धीर देत विचारलं, "तू मला सांगू शकतेस. तू बरी आहेस ना?"

"पोट दुखतंय. आज दुसरा दिवस आहे."

म्हणजे काल पहिला दिवस होता आणि या महिन्यातसुद्धा सूनबाईला दिवस गेले नाही म्हणून घरी सगळे चिडले होते. सगळे अस्वस्थ झाले होते.

मासिक पाळी सुरू झाल्यावर त्या मुलीला वेदना होत होत्या. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण याकडे जराही लक्ष न देता नर्स पुढे सांगत होती, "तिचे पिरेड्स वेळेवर येत नाहीत. नेहमीच उशिरा येतात.

मासिक पाळीत तिला काही त्रास होतो, हे आम्हाला लग्नाच्या आधी माहिती नव्हतं. तिला मुल होऊ शकतं का, हे एकदा तपासून बघा ना मॅडम."

मी तिला विचारलं, "दुखणं कमी करण्यासाठी काही औषध घेतलंस का?"

पण आमचं बोलणं मध्येच तोडत नर्स म्हणाली, "नाही, नाही. नाही मॅडम. गोळ्या घेतल्या तर प्रेग्नन्सी आणखी पुढे जाईल. त्यामुळे ते नकोच."

मी नर्सला सांगितलं, "दुखणं म्हणजे पहिल्या दिवशी अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर येत असल्याचं लक्षण आहे. हा आजार नाही. वेदना कमी करणाऱ्या टॅबलेट घेतल्याने कसलाच त्रास होणार नाही. गोळ्या घेतल्या तरीही मुलं होतात."

मी फोनवरून दुसऱ्या नर्सला टॅबलेट आणायला सांगितली.

त्या वहिनीने गोळी घेतल्यावर तिला घेऊन आलेली नर्स पुढे सांगू लागली, "तिचे पिरेड्स नेहमीच उशिरा येतात मॅडम."

"किती उशिरा?"

ती मुलगी म्हणाले, "पाच किंवा सहा दिवस."

"पिरेड्स उशिरा आले तरी ती आई होऊ शकेल का, मॅडम? माझं असं नाहीय. माझे पिरेड्स अगदी ठरलेल्या दिवशी येतात. कॅलेंडर बघायचीही गरज नाही. एका दिवसाचाही फरक पडत नाही."

"काही स्त्रियांची सायकल 35 दिवसांची असते. प्रत्येकीला ठरलेल्या दिवशीच पाळी येईल, असं गरजेचं नाही. हे अनैसर्गिक नाही आणि त्यामुळे आई होण्यात अडथळा येतो, असंही नाही."

"फक्त एवढंच नाही मॅडम. तिला PCOD सुद्धा आहे. तिच्या चेहऱ्यावर केस आहेत. वहिनी, डॉक्टरांना दाखव. डॉक्टरांसमोर लाजायचं नसतं."

तिने हनुवटी वर करून दाखवण्याचा प्रयत्न केला. मलाच कसनुसं झालं आणि मी उठले.

मी तिला म्हणाले, "याची काही गरज नाही. माझ्यासोबत ये."

यावर नर्स तिला म्हणाली, "वहिनी, डॉक्टर मॅडम तुला तपासतील. थोडं दुखेल. पण, सहन कर आणि त्या सांगतील तसं कर."

आपल्या देशात नवऱ्यांचा उद्धटपणा चार भिंतींच्या आतच असतो. पण, नणंद नावाचा जो 'हाफ हसबंड' प्रकार आहे ते चार-चौघात कुठेही उद्धटपणा करायला कमी करत नाही, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

तिला आमच्या स्कॅनिंग रुममध्ये घेऊन गेल्यावर आमच्या नर्सने तिला बेडवर झोपायला सांगितलं. ती टेबलावर चढण्याचा प्रयत्न करत असताना मी तिला थांबवलं आणि बसायला सांगितलं.

मासिक पाळीचा दुसरा दिवस, त्यामुळे दुखणारं पोट आणि आलेला थकवा. शिवाय, तिने काही खाल्लंही नव्हतं. अशा परिस्थितीतही ती त्या टेबलावर चढायला तयार झाली होती.

"आज टेस्ट नको करायला. नंतर करुया", असं म्हणत मी तिची फाईल घेतली आणि त्यावर नजर टाकली. फाईल बरीच जाड होती. यावरून ते बऱ्याच डॉक्टरांकडे गेले होते, हे मला कळलं. सर्व रिपोर्ट्स जवळपास नॉर्मल दिसत होते.

त्यावर "PCOD" लिहिलं होतं.

मी तिचं शिक्षण बघितलं. ती कायद्याची पदवीधर होती. पण, तिला पॉलिटिकल सायन्समध्ये रस असल्याचं दिसत होतं. पण, कदाचित चांगलं स्थळ मिळालं म्हणून तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं.

"तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली?"

"10 महिने."

"अच्छा. फक्त 10 महिने. मग इतकी काळजी कशाला करता? तू अजूनही पुढे शिकू शकतेस."

"मॅडम, प्रेग्नन्सीची काळजी मिटली की करिअर करता येईल. मी एका बाळाला जन्म दिला तर…"

बोलता बोलता ती मधेच थांबली.

PCOD: पाळी यायला उशीर झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते का?

फोटो स्रोत, Getty Images

तिचं बोलणं खूप यांत्रिक वाटत होतं. एकदा सांबाराला उकळी आली की मग कुकरमध्ये भात लावेन, असं बोलल्यासारखं वाटत होतं.

ती पुढे सांगत होती, "त्यांचे ऑफिसमधले सहकारी 'गुड न्यूज' आहे का, अशी सारखी चौकशी करत असतात. माझ्या नणंद लग्नानंतर तीन महिन्यातच प्रेग्ननंट झाल्या. माझ्या सासूबाईंनाही वर्षभरात मूल झालं. त्यामुळे मलाच का अजून दिवस गेले नाही, याची घरात सगळ्यांना काळजी वाटते."

मी तिला तिच्या मासिक पाळीबद्दल विचारलं.

"सुरुवातीला मासिक पाळी अगदी नियमित यायची. पण लग्न झाल्यापासून 5 दिवस उशिरा येतेय. पिरेड्सला दोन दिवसही उशीर झाला की ते मला युरीन टेस्ट करायला सांगतात. ती निगेटिव्ह आली की…."

बोलता बोलता ती मधेच थांबली आणि काहीवेळाने म्हणाली, "महिना भरत आला की मला खूप भीती वाटायला लागते. पिरेड्स येतील, या विचारानेच भीती वाटते. झोपही येत नाही."

बोलताना तिचे डोळे लाल झाले होते.

"पाळी आली की त्यांना खूप वाईट वाटतं. ते दहा दिवस माझ्याशी बोलतच नाहीत. मॅडम, मला दिवस जातील, असं काहीतरी करा."

ती इतक्या हळू आवाजात बोलत होती की तिचं बोलणं फक्त मला ऐकू येत होतं.

तेवढ्यात माझं लक्ष गेलं की तपासणीसाठी साधारण जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ झाल्यानंतर कुणीतरी दार ठोठावत होतं. कोण असेल, याचा अंदाज मला आलाच.

बाहेर वर्धनीची नणंद होती. ती विचारत होती, "झालं का? टेस्ट?"

"मॅडम, काय अडचण आहे? तिला दिवस का जात नाहीत?"

"तिला PCOD आहे का?"

तिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं जणू PCOD नसेल तर वर्धनीला दिवस जाण्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी होती.

"त्यांच्या लग्नाला किती दिवस झालेत?", मी विचारलं. दोघीही गप्प होत्या.

"फक्त 10 महिने. लग्नाला दिड वर्ष होईपर्यंत आम्ही कुठलीच टेस्ट करत नाही. जर जोडपं एकत्र राहत असेल आणि कुठल्याही गर्भनिरोधाचा वापर करत नसेल तर 83% जोडप्यांमध्ये पहिल्या वर्षात प्रेगन्सी राहते. तर 92% जोडप्यांमध्ये मुलीला दुसऱ्या वर्षात दिवस जातात. त्यामुळे काळजी करायची गरज नाही."

"पण, राजेश, आमचा चुलत भाऊ. तो मुंबईत राहतो. माझ्या भावाचं आणि त्याचं जवळपास एकाचवेळी लग्न झालं. त्याच्या बायकोला सहा महिने झालेत."

"कुणालातरी मागे टाकण्यासाठी ही काही धावण्याची स्पर्धा नाही. कुणाशीही तुलना करायची गरज नाही."

"पण मॅडम, तिला PCOD आहे आणि आम्हाला याची चिंता लागून आहे", नर्स शांतपणे सांगत होती.

"PCOD वंध्यत्व देणारा आजार नाही. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तो होतो. PCOD असणाऱ्यांपैकी 40 ते 50% स्त्रियांमध्ये वजन वाढतं. अँड्रोजेन नावाचं एक मेल हॉर्मोन असतं. PCOD मध्ये या अँडोजेनची पातळी वाढते. त्यामुळे अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडण्यात अडथळा येतो आणि मासिक पाळीही वेळेवर येत नाही. फक्त 5% वजन कमी केल्याने स्त्रीबीज सहजपणे बाहेर येतं आणि गर्भधारणा होऊ शकते."

"मला तर लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात दिवस गेले होते."

"सिस्टर, प्रत्येक व्यक्ती दुसरीपेक्षा वेगळी असते. सगळ्यांनाच एका विशिष्ट कालावधीत दिवस जातात, असं नसतं. तसा काही नियम नाही."

"एखाद्याला PCOD आहे, हे कसं कळणार?"

PCOD: पाळी यायला उशीर झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते का?

फोटो स्रोत, PA

"अँड्रोजेन हॉर्मोनचं प्रमाण वाढतं. यामुळे चेहऱ्यावर पुरळ उठतात. काही जणांच्या चेहऱ्यावर केसही येतात."

"आम्ही स्कॅनिंग करतो तेव्हा त्यात अंडाशयाच्या बाहेर न पडलेले छोट्या-छोट्या पाण्याच्या थेंबासारखे स्त्रीबीज दिसतात. 12 पेक्षा जास्त अंडी असतील तर त्यांना पॉलीसिस्टिक ओव्हरी म्हणतात."

"मॅडम, आम्हाला अशी भीती वाटते की ती कधीच आई होऊ शकणार नाही."

"PCOD चा अर्थ असा नाही की हा असा कुठलातरी आजार आहे ज्यात गर्भधारणा होत नाही. PCOD मधे फक्त हॉर्मोन्स संतुलित नसतात आणि म्हणून PCOD असणाऱ्यांना मुल होतच नाही, असा विचार करणं चुकीचं आहे."

"जर BMI (बॉडी मास इंडेक्स) 25 पेक्षा जास्त असेल तर वजन कमी करायला हवं. त्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार महत्त्वाचा असतो."

"कमरेभोवतीचे फॅट्स कमी केले तरीसुद्धा चांगले परिणाम मिळतात. स्त्रीबीज सहजरित्या बाहेर पडतं. कुठलंही औषध न घेता नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते."

"मॅडम, पण नैसर्गिकरित्या दिवस गेले नाही तर?"

"तशा परिस्थितीत स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडण्यासाठी उपचार घ्यावे लागतात. औषधं आणि एका छोट्या सर्जरीने गर्भधारणा होऊ शकते."

PCOD: पाळी यायला उशीर झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते का?

फोटो स्रोत, Getty Images

"आईला तिच्या वंशाचा दिवा हवा. मलाही भाचा हवाय."

"आत्या होण्याची तुझी हौस मी समजू शकते. पण, तिच्या लग्नाला जेमतेम 10 महिने झालेत. तुम्ही तिच्यावर असा दबाव टाकाल तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात. जर स्त्रीवर खूप दबाव असेल तर स्त्रीबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया आणि मासिक पाळी या दोघांवरही परिणाम होतो. गर्भ राहणं आणि मुलं होणं, फार नाजूक आणि क्लिष्ट प्रक्रिया असते. शिवाय, ही खूप खाजगी बाब आहे."

सारखं-सारखं 'गुड न्यूज' आहे का विचारणं, 'अजून हिला मुलं कशी झाली नाही?', असे प्रश्न विचारणं अत्यंत असभ्यपणाचं लक्षण आहे. वारंवार अशा प्रश्नांचा भडिमार केल्याने जोडप्यावर मानसिक दबाव येतो आणि त्यांना नैराश्य येऊ शकतं. समाजाला हे कळायला हवं.

"मी कुठे बाहेरची आहे? ही माझ्या भावाची बायको आहे?"

"नवरा-बायको यांचं स्वतःचं असं वर्तुळ असतं. जवळच्या कुटुंबीयांनीसुद्धा या वर्तुळाच्या आत घुसण्याचा प्रयत्न करू नये. यातूनच त्या दोघातले बंध अधिक घट्ट होतात. मुलं हवं की नको, हवं असेल तर ते कधी हवं, हे ठरवण्याचा अधिकार केवळ त्या दोघांना आहे. तुला, मला किंवा समाजाला नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)