असं औषध ज्यामुळे लोकांना लागलं सेक्स, जुगाराचं व्यसन; या औषधांचे साइड इफेक्ट्स कोणी लपवले?

एम्माला समजत नव्हतं की, तिला अचानक जुगाराची सवय कशी लागली. परंतु, अलीकडेच बीबीसी न्यूजच्या लेखात जेव्हा याबद्दल तिने वाचलं, तेव्हा तिला याचं उत्तर मिळालं.
गेल्या वर्षभरात तिने हजारो पाऊंड जुगारात गमावले होते, पण तिला कधीच वाटलं नव्हतं की तिच्या औषधांमुळे तिला ही सवय लागली असावी.
एम्मा त्या 250 पेक्षा जास्त लोकांपैकी एक आहे, ज्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना औषधांमुळे व्यसनं लागली. काहींना जुगार, सेक्स किंवा शॉपिंगची सवय किंवा व्यसन लागलं. ही औषधे हालचालींसंबंधित आजारांसाठी दिली जात होती.
ज्यांनी संपर्क केला त्यात महत्त्वाच्या कामांवरील जबाबदार लोकही होते. यात पोलीस अधिकारी, नर्स, डॉक्टर आणि एका बँकेचे महत्त्वाचे निर्णय घेणारे संचालकही.
जवळजवळ एक वर्ष उलटलं तरी, अनेक रुग्ण सांगतात की डॉक्टर अजूनही त्यांना डोपामाइन अॅगोनिस्ट औषधांच्या साइड इफेक्ट्सबाबत सावध करत नाहीत, आणि हे किती सामान्य आहे हेही सांगत नाहीत.
अलीकडेच या औषधांना 'रेस्टलेस लेग्स सिंड्रोम'साठी पहिल्या पसंतीच्या उपचारातून कमी केलं गेलं असलं, तरी इंग्लंडमध्ये सामान्य डॉक्टर्स रुग्णांना अजूनही हेच औषध लिहून देत आहेत.
गेल्या आठवड्यात, खासदारांच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी यूके ड्रग रेग्युलेटरला या साइड इफेक्ट्सविषयी सूचना तपासण्यास सांगितली आणि सरकारने आमच्या ताज्या निष्कर्षांना 'खूप चिंताजनक' असल्याचंही म्हटलं.
'माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं'
इतर अनेक महिलांप्रमाणेच, एम्माला गरोदरपणात रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम (आरएलएस) झाला. या आजाराचा लोहाच्या पातळीशी संबंध असतो असं मानलं जातं.
पुढील काही वर्षांत तिच्या लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यावर, तिला रोपिनिरोल औषध देण्यात आलं. या औषधाचं उत्पादन ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी जीएसके करते.
एम्मा सांगते की, तिला अचानक जुगार खेळण्याची आणि महत्त्वाच्या नसलेल्या म्हणजेच फालतू वस्तू खरेदी करण्याची सवय लागली. तिला असं वाटू लागलं की, कोणीतरी 'मला नियंत्रित करत आहे'.
ती सांगते की, तिला तिच्या औषधांचा जुगाराशी संबंध तेव्हा समजला, जेव्हा तिच्या पतीने तिच्या औषधांचा अभ्यास केला आणि आमचा एका लेखही त्यांना मिळाला.
"मी ते वाचलं आणि म्हटलं, 'अरे देवा! ही तर मीच आहे,'" ती म्हणाली.
जेव्हा एम्मा आपल्या स्थानिक डॉक्टरकडे अपॉइंटमेंट बुक करते, तेव्हा तिला ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो, ज्यात ती घेत असलेली सर्व औषधं लिहून द्यावी लागतात.
तिने डॉक्टरांना सांगितलं की, तिला जुगाराची सवय लागली आहे आणि ती रोपिनिरोल औषध घेत आहे. तरी डॉक्टरांनी कधीच तिच्या वागणुकीला या औषधांच्या माहिती असलेल्या साइड इफेक्ट्सशी जोडलं नाही, असं एम्मा म्हणते.
एम्मा जुगार खेळत राहिली आणि नंतर आमचे लेख वाचल्यावर तिने तिची औषधं बदलण्याची विनंती केली. ती सांगते की, तिने यात किमान 30 हजार पाऊंड (सुमारे 37 लाख रुपये) गमावले.
"यामुळे माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. आम्ही कर्जात बुडणार आहोत. देव जाणो याची परतफेड करण्यास आम्हाला किती काळ लागेल," ती म्हणते.
ही औषधं डोपामाइन क्रियाशीलता वाढवण्याचं काम करतात. हा औषधांचा एक गट आहे. जीएसकेसोबतच आणखी दोन कंपन्या याचं उत्पादन करतात.
'औषधामुळे वर्तणुकीत अचानक बदल'
डोपामाइन हा एक रासायनिक पदार्थ आहे, जो हालचाली नियंत्रित करतो, पण प्रेरणा आणि आनंद मिळण्यासही महत्त्वाचा असतो. ही औषधे हे प्रमाण जास्त वाढवू शकतात.
यूकेमधील अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की, या औषधांमुळे अचानक वागण्याची सवय लागल्यामुळे त्यांना मोठं कर्ज, नात्यातील दुरावा, गुन्हेगारी आणि आत्महत्येपर्यंतच्या समस्या भेडसावत आहेत.
आम्हाला लोक असंही सांगतात की, काही रुग्णांना बिंज इटिंग म्हणजेच भूक नसतानाही कमी वेळेत जास्त प्रमाणात खाण्याची सवय लागणं, क्रॉस ड्रेसिंग म्हणजे विरुद्ध लिंगासाठी (ऑपोजिट सेक्स) ठरलेले कपडे परिधान करणे, बेफिकीरपणे पैसे गुंतवणे आणि काहींनी पहिल्यांदाच समलैंगिक संबंध अनुभवले.
आणखी एक सामान्य बाब म्हणजे, काही वृद्ध महिला सांगतात की त्यांच्या पतींनी त्यांच्यावर लैंगिक दबाव आणायला सुरुवात केली.
साधारणपणे, रुग्णांना अशा वर्तणुकीचा कोणताही इतिहास नव्हता. त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या कुटुंबालाही ही औषधं कारणीभूत ठरू शकतात असं कधी वाटलं नव्हतं.
'पॅकेजिंगवर स्पष्ट इशारा नाही'
पार्किन्सन्सच्या सहापैकी एक रुग्ण या औषधांमुळे अचानक कसाही वागू लागतो. त्यामुळे हे साइड इफेक्ट्स 'खूप सामान्य' मानले जातात.
पण हे साइड इफेक्ट्स किती सामान्य आहेत, हे औषधांच्या पॅकेजिंगवर सांगितलेलं नसतं. पॅकेजिंगवर सतत टीका केली जाते की, ते फक्त अचानक होणाऱ्या वागणुकीबद्दल थोडक्यात सांगतात, पण जसं की पोर्नोग्राफीची सवय यासारख्या विशिष्ट परिणामांचा उल्लेख करत नाहीत.
मागील आठवड्यात, आम्ही एका कुटुंबाची बातमी प्रकाशित केली होती. जिथे वडील आणि मुलाने स्वतःचं जीवन संपवलं होतं. वडिलांच्या आवेगपूर्ण वागण्यामुळे त्याने सेक्स आणि अँटिक्ससाठी (पुरातन वस्तू) आपल्या ग्राहकांचे 6 लाख पाऊंड (सुमारे 74 कोटी रुपये) चोरले होते.
यानंतर आणखी पुरुषांनी आम्हाला संपर्क केला आणि सांगितलं की, त्यांनी अशा वर्तणुकीचा अनुभव घेतला आहे. आणि सध्या तेही अशा अतिलैंगिकतेचा सामना करत आहेत.

फोटो स्रोत, Family handout
'मला सेक्सचं वेड लागलं'
मायकलने (नाव बदललं आहे), अलीकडेच रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमसाठी या औषधांचा वापर सुरू केल्यावर तो सेक्स वर्कर्सकडे जाऊ लागला आहे.
"मला सेक्सचं वेड लागलं असं वाटतं," तो म्हणाला की, मी विवाहित असूनही सुमारे 20 पुरुष आणि महिलांसोबत संबंध ठेवले आहेत. पूर्वी आपल्या पत्नीची त्याने कधीही फसवणूक केली नव्हती किंवा समलिंगी संबंधही अनुभवलेले नव्हते.
तो सांगतो की, सुरुवातीला त्याला ही सवय मजेशीर वाटत होती, पण आता त्याला यात अडकल्यासारखं वाटतं. तो डॉक्टरांना किंवा आपल्या पत्नीलाही सांगू शकत नाही, कारण ती देखील त्याच्या अपॉइंटमेंट्सच्या वेळी तिथे हजर असते.
"मला मदतीची गरज आहे हे मला माहिती आहे, पण जे मदत करू शकतात, त्यांच्याशी मी बोलू शकत नाही," तो म्हणतो. "माझ्याकडे कुठे मदत मागायलाही जागा नाही."
पार्किन्सन्स यूके आणि आरएलएस-यूके सारख्या संस्थांकडून मदत मिळू शकते. एनएचएस देखील सांगते की, जर तुम्ही ही औषधं घेत असाल आणि काही शंका किंवा चिंता असेल, तर डॉक्टरांशी बोलणं गरजेचं आहे.
'पेडोफिलियाचं प्रकरण आलं समोर'
बीबीसीला आता माहिती मिळाली आहे की, जीएसकेला 2000 साली त्यांच्या औषधाशी संबंधित पीडोफिलियाचं (मोठ्या व्यक्तीला लहान मुलांबद्दल चुकीच्या लैंगिक इच्छा निर्माण होणं) प्रकरणाची माहिती झाली होती. पण लैंगिक इच्छांचा इशारा देण्यास त्यांना सात वर्षे लागली.
रोपिनिरोल औषध घेत असलेल्या 63 वर्षांच्या व्यक्तीने 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. नंतर तो याप्रकरणी तुरुंगातही गेला.
2003 च्या सुरक्षितता अहवालात ही केस घेतली गेली. त्यात रोपिनिरोल औषध जीएसकेने 'विचलित' किंवा विकृत लैंगिक वर्तन म्हणून वर्णन केलं.
जीएसके म्हणतं की, त्यांनी पुढील वर्षी यूके ड्रग रेग्युलेटरला आपला अहवाल दिला आणि काही दिवसांतच पीडोफिलियाच्या प्रकरणाबद्दल सांगितलं.
पण 'विकृती' हा विशिष्ट शब्द इशाऱ्यांमध्ये कधी दिसलाच नाही. त्याऐवजी, इशाऱ्यात फक्त 'लैंगिक इच्छा वाढणे', 'हानीकारक वर्तणूक' आणि 'लैंगिक आवड बदलणे' याबद्दलचाच उल्लेख आहे.
आम्हाला असंही समजलं आहे की, ज्या वेळी जीएसके आपले निष्कर्ष तयार करत होते, त्याच वेळी त्यांनी रोपिनिरोल औषध रेस्टलेस लेग्स सिंड्रोमसाठी वापरण्याची परवानगी मागितली होती.
नंतर 2005 मध्ये त्यांनी अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने लैंगिक समस्यांसाठी उपचार म्हणून हे औषध प्रभावी आहे का हे पाहिलं.
जीएसकेने बीबीसीला सांगितलं की, त्यांचं औषध मोठ्या प्रमाणावर चाचणीस दिले गेले, जगभरातील नियामक अजूनही त्याला मंजुरी देत आहेत, आणि साइड इफेक्ट्स स्पष्टपणे सांगितले आहेत. त्यांनी 2005 मधील चाचणीस प्रायोजकत्व दिलं नाही किंवा डिझाइन केलं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (एमएचआरए) एका निवेदनात सांगितलं की, 2007 मध्ये पॅकेजिंगवर इशारा दिसण्यासाठी अनेक वर्षे लागली, कारण असे निर्णय घेण्यासाठी सर्व उपलब्ध पुरावे पाहणं आवश्यक असतं. तसेच, पॅकेजिंगमध्ये सर्व वर्तणुकींची यादी देणं शक्य नाही, कारण अनेक वर्तणूक 'वैयक्तिक'ही असतात.
'फ्रान्सच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष'
बीबीसीशी संपर्क साधणाऱ्यांपैकी अनेकांनी म्हटलं की, त्यांनी जे साइड इफेक्ट्स अनुभवले, त्याबाबत योग्यरित्या सावध केलं गेलं नाही, त्यामुळे त्यांना न्याय मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही असं वाटतं.
परंतु, यूकेच्या बाहेर काही लोकांनी न्यायालयात खटले दाखल केले आहेत - काही नुकसानभरपाईसाठी आहेत, तर काही गुन्हेगारी प्रकरणं आहेत, जिथे आरोपी सोडण्यात आले आहेत.
एक वर्षांपूर्वी, बेल्जियमच्या एका न्यायालयाने एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. त्या व्यक्तीने आपल्या चार वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केला होता. पीडोफिलियाचा प्रकार त्याच्या रोपोनिरोल औषधामुळे झाल्याचे न्यायालयाने या खटल्यात म्हटलं होतं.
पुढील महिन्यात, फ्रान्समधील एका न्यायालयात मोठा निकाल अपेक्षित आहे. तिथे पन्नाशीतील एका व्यक्तीने जीएसके विरुद्ध खटला दाखल केला आहे. जीएसकेनं रुग्णांना या साइड इफेक्ट्सबाबत योग्यरित्या सावध केलं नाही, असं त्याचं म्हणणं आहे.
त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की, या औषधांमुळे त्याचे जोडीदाराबरोबरील संबंध संपुष्टात आले. तसेच त्याने जुगार आणि अनावश्यक पैसे खर्च करत तब्बल 90 हजार युरो (सुमारे 97 लाख रुपये) गमावले.
त्या व्यक्तीने नुकसानभरपाईची मागणी केली असून कंपनीने जबाबदारी मान्य करावी, अशी विनंतीही त्याने केली आहे.
(जर तुम्हाला या बातमीबद्दल अधिक माहिती असेल, तर तुम्ही नोएल यांच्याशी थेट आणि सुरक्षितपणे संपर्क साधू शकता. तुम्ही सिग्नल या एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅपवर +44 7809 334720 वर, ई-मेलने noel.titheradge@bbc.co.uk वर किंवा सिक्युरड्रॉपद्वारे संपर्क साधू शकता.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











