तुम्हाला सतत 'खाण्याचा' आजार आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
होय. सतत खाणं ही एक सवय नसून तो आजार असू शकतो.
बहुतेकवेळा आपलं खाणं, आपण खात असलेल्या पदार्थांचा आकार आणि वेळा यांचं समीकरण पाहिलं तर आपण अनेक चुका करत असल्याचं लक्षात येतं.
गेल्या काही वर्षांमध्ये वस्तूंची, खाद्यपदार्थांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे तसेच आर्थिक प्रगतीमुळे भारतात आणि इतरत्रही वैयक्तिक सवयींमध्ये मोठे बदल झाले आहेत.
एकाच जागेवर फारवेळ बसून राहाणे, बैठे व्यवसाय- नोकऱ्या, पाकिटबंद पदार्थांची उपलब्धता, खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये आलेली विविधता तसेच काही मानसिक प्रश्नांमुळे आपल्या आहारावर मोठा बदल झाला आहे.
खाण्या-पिण्याच्या वेळा, पदार्थांचा आकार, त्यातील विविधता, बदलता बाजार आणि आपल्यात झालेल्या बदलांमुळे उच्च कॅलरीचा आहार घेणं, वारंवार घेणं सुरू झालं आहे.
यामध्येच एक सतत खाण्याचा आजार म्हणजेच ‘बिंज इटिंग डिसॉर्डर’ (Binge eating disorder) नावाचा आजार दडलेला आहे.
बिंज इटिंग डिसॉर्डरमध्ये लोक नक्की काय करतात?
सतत खाण्याच्या आजारामध्ये व्यक्तीच्या रोजच्या आहारात दोन खाण्यांमध्ये अत्यंत कमी वेळ असतो.
ते सतत काहीतरी खात राहातात, अत्यंत कमी वेळात भरपूर खातात आणि अगदी तडस लागेल, अस्वस्थ होण्याइतपत पोट भरण्याचा प्रयत्न करतात.

फोटो स्रोत, Getty Images
काही लोकांच्या मनात हे खाऊन झाल्यावर थोडी उपरतीची भावना किंवा लाजही वाटते. हा आजार साधारणपणे वयाच्या विशीमध्ये सुरू होतो आणि तो पुढे सुरू राहातो.
बहुतांशवेळा बिंज इटिंग करणारे लोक जास्त साखर, मीठ असलेले किंवा तळलेले पदार्थ खातात. पाकिटबंद पदार्थांमधून भरपूर कॅलरीज आणि साखर पोटात जात राहाते. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.
बिंज इटिंग डिसॉर्डरबद्दल बोलताना मुंबईस्थित मनोविकारतज्ज्ञ डॉ. कीर्ती तांडेल म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला हा त्रास आहे का हे ओळखण्यासाठी 'डायग्नोस्टिक अँड स्टॅटस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल हेल्थ'नुसार काही मापदंड आहेत. त्यात गेल्या तीन महिन्यात आठवड्यातून एकदा तुम्हाला खाताना स्वतःवरचं नियंत्रण सुटलंय का हे पाहिलं जातं. त्या काळात कमी कालावधीत अधाशासारखं खाल्लं गेलं का हे पाहिलं जातं. असे अनेक मापदंड विचारात घेतले जातात.
"परंतु बिंज इटिंग डिसॉर्डर हा थेट प्रश्न म्हणून समोर येत नाही. ताण, नैराश्य, चिंता अशा विविध त्रासांना सामोऱ्या जाणाऱ्या रुग्णांशी चर्चा केल्यावर, त्यांची जीवनशैली विचारल्यावर ते याही आजाराला बळी पडले आहेत, असं लक्षात येतं.”
बिंज इटिंगची कारणं
बिंज इटिंग कशामुळे होत असेल याची विशिष्ट अशी कारणं नसली तरी आपल्या सवयींचा त्यावर मोठा प्रभाव दिसून येतो.
काही कुटुंबामध्ये आहाराच्या सवयीच चुकीच्या असल्यास, काही कुटुंबामध्ये सतत खाण्याचा आजार अनुवंशिक असल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढीला लागते.
घरामध्ये दारू किंवा अंमली पदार्थांचा वापर होत असेल तरीही अशा कुटुंबातील लोकांना या आजाराचा धोका असतो.

फोटो स्रोत, Getty Images
मानसिक ताण, नैराश्याच्या अनेक टप्प्यांवर असलेले लोकही सतत खाण्याच्या आजाराला बळी पडतात. स्वतःबद्दलच्या अपेक्षा पूर्ण न करता येणं, कौशल्यं नसल्याची भावना किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्यात येत असलेल्या अडथळा यामुळेही आहाराच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो.
ताण-तणाव आणि नैराश्यामुळे उच्च कॅलरींचा आहार कळत किंवा नकळत घेणं दिसून येतं.
तुमच्या आहार पद्धती, खाणं, शरीराचा आकार, वजन यावर कोणी टिप्पणी करत असेल तसेच सतत बारीक होण्याचा विचार त्यातही समाजाकडून, कामाच्या ठिकाणी तशी अपेक्षा असेल तर या आजाराला लोक बळी पडू शकतात.
आत्मविश्वास कमी झालेल्या व्यक्ती, मंत्रचळ (ओसीडी) असलेल्या व्यक्ती तसेच लैंगिक गैरवर्तनाला बळी पडलेल्या व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो, असं एनएचएस या युकेच्या आरोग्यसंस्थेने म्हटलं आहे.
"हा आजार साधारणतः पौगंडावस्थेच्या शेवटच्या वर्षांत आणि प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या काळात जास्त दिसून येतो," असं ते सांगतात.
तसंच महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
बिंज इटिंग डिसॉर्डर असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना डॉ. कीर्ती तांडेल सांगतात, हा आजार असणारी व्यक्ती अधाशासारखी खाऊ लागते, तिला आपण हे असं करतोय हे लक्षात येत असतं पण त्यावर नियंत्रण नसतं. मग इतरांसमोर खाणं टाळणं, बाजूला जाऊन खाणं, रात्री उठून खाणं असे प्रकार सुरू होतात. त्यामुळे ही व्यक्ती इतरांपेक्षा दूर जाऊ लागते, लोकांमध्ये मिसळणं कमी होतं आणि पर्यायाने एकटेपण वाढून तणाव वाढतो.
बिंज इटिंगसाठी दृश्य माध्यमंही कारणीभूत आहेत, असं डॉ. तांडेल यांचं मत आहे.
"निराश वाटतंय मग काहीतरी गोड खा, चॉकलेट खा, आईस्क्रीम खा असं जाहिरातींमधून बिंबवलं जातं. यामुळे व्यक्तीला त्याचं अनुकरण करावसं वाटतं. मग सतत नैराश्य आणि ते घालवण्यासाठी हे पदार्थ खाणं असं एक चक्र सुरू होतं", असं ते सांगतात.
बिंज इटिंगची लक्षणं
कमी कालावधीत भरपूर खाणं हे या आजाराचं मुख्य लक्षण आहेच, एनएचएस या युनायटेड किंग्डमच्या आरोग्यसेवेने काही अधिकची लक्षणं सांगितली आहेत. यामधील लक्षणं पुढील प्रमाणे-
- भूक नसताना खाणं
- अत्यंत वेगानं खाणं
- गुपचूप किंवा लांब-एकटं बसून खाणं
- खाऊन झाल्यावर निराश, चुकल्यासारखं,अपराधी, खिन्न वाटणं
अशी लक्षणं असल्यास त्या व्यक्तीला सतत खाण्याचा आजार असू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात कोणत्याही आजाराचं निदान हे डॉक्टरांनाच करू द्यावे. स्वतःच आपली लक्षणं ठरवून कोणतेही उपचार घेऊ नयेत.
इंटरनेटवरील माहिती आपण घ्यावी मात्र कोणत्याही आजाराचं निदान, औषधाची गरज, त्याचं प्रमाण हे निर्णय डॉक्टरांद्वारेच घ्यायचे असतात. परस्पर निर्णय घेऊन त्यानुसार वागणं अत्यंत धोकादायक असतं.
जर एखादी व्यक्ती फार मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ अगदी कमी वेळात खात असेल, आपण किती खातोय हे इतरांपासून लपवत असेल, खाण्याचा विनाकारण साठा करुन ठेवत असेल तर त्यांना धोक्याची जाणीव करुन दिली पाहिजे.
यातील काही लोकांचे वजनही वेगाने वाढत असल्याचं दिसून येईल.
स्वतःचं निरीक्षण कसं करायचं?
सुरुवातीला आपण का खातो याचा विचार करणं आवश्यक आहे.
भूक, तहान, तसेच लालसा म्हणजे क्रेव्हिंग्ज आणि आपल्या त्यावेळच्या मनस्थितीमुळे आपण कोणतेही पदार्थ, पेयं खाण्यापिण्याकडे वळतो.
आपण एखादा पदार्थ किंवा पेय पोटात ढकलण्यावर पदार्थांचा वास, त्यांचं चित्र, तयार पदार्थांचं दृश्य तसेच जाहिरातींचाही परिणाम होत असतो. अशा अनेक कारणांमुळे आपण खात असतो.
परंतु आपण आता खात असलेला पदार्थ कोणत्या कारणांमुळे खात आहोत याचा विचार केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल.

फोटो स्रोत, Getty Images
हे पदार्थ मी खरंच आतून आलेल्या भूक-तहान या गरजेमुळे खात आहे की इतर कारणांमुळे याचं उत्तर सापडलं की आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमधली चूक दिसून येईल.
- मी खरंच भुकेला/भुकेली आहे का हा प्रश्न विचारल्यास या सवयीकडे लक्ष देता येईल.
- जर खरंच शरीर-मनाच्या पोषणासाठी अत्यावश्यक अशी भूक लागली असेल तर आपण कोणते पदार्थ, पेयं किती प्रमाणात खात आहोत याचे निरीक्षण करता येईल.
- आपल्या खाण्यावर बाजारातील जाहिरातींचा, व्हीडिओचा, चित्रांचा, इंटरनेटवरील गोष्टींचा प्रभाव आहे का हे पाहता येईल.
- माझी आताची आवश्यक असलेली भूक भागवण्यासाठी पाकिटबंद पदार्थाची खरंच गरज आहे काय, मी पुढे खाण्यासाठी लागेल म्हणून गरजेपेक्षा जास्त पाकिटबंद पदार्थांचा साठा करुन ठेवत आहे का, ते पदार्थ मी सतत खात आहे का अशा सवयींकडे लक्ष देता येईल.
त्यातून आपली आहाराचा आकार, सवयी यांचा अंदाज येऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
हीच गोष्ट साखरयुक्त, कार्बोनेटेड, कॅफिनयुक्त पेयांबद्दल आणि शीतपेयांबद्दल लागू होते. आपण ते शरीराची गरज म्हणून पित आहोत की सवयींमुळे, केवळ ती पेयं उपलब्ध आहेत म्हणून पित आहोत याचाही विचार प्रत्येकाला करता येईल.
आपल्या आहाराचा कामावर रोजच्या जगण्यावर परिणाम होतोय का हे ही पाहिलं पाहिजे. जसं की तडस लागेपर्यंत जेवल्यामुळे सुस्तावल्यासारखं होणं, कामाच्या ठिकाणी झोप येणं, सतत एकाजागी बसून राहावसं वाटणं, हालचाल करणं टाळणं, व्यायाम न करणं या सवयीही आपल्याला जडलेल्या असू शकतात.
दुर्लक्ष केलं तर?
सतत खाण्याच्या आजाराकडे लक्ष न दिल्यास अनेक दुष्परिणाम वाढू शकतात.
नवे शारीरिक मानसिक त्रास सुरू होऊ शकतात. ती व्यक्ती लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी या आजाराला बळी पडू शकते. तिची जीवनशैली बिघडते, कामाचे ठिकाण, समाजातील इतर अनेक गोष्टी-घटनांमध्ये वागताना परिणाम दिसून येतात. आपले पोट आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नैराश्य, ताण, वैयक्तिक जीवनात निर्णय प्रक्रियेवर परिणाम होणं असे परिणामही दिसू लागतात.
आरोग्याच्या त्रासांचा विचार करता हृदयविकार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, पोटाचे विकार, मधुमेह, झोपेत अडथळा, घोरणे असे एकेक आजार आणि त्रास वाढीला लागू शकतात.
वाढलेल्या वजनामुळे असंख्य प्रकारचे सहआजार होण्यासाठी आपण पात्र होतो.
व्यक्ती केवळ चुकीच्या जीवनशैलीमुळे या चक्रात अडकू शकते. एका आजारामुळे पुढचा आजार अशा वर्तुळात अडकल्यामुळे तिच्या आयुष्यात गुंतागुंत तयार होते.
आपलं वागणं-खाणं-पिणं या आजारात मोडतंय का हे पाहण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी. समुपदेशक, डॉक्टर्स, आहारतज्ज्ञांच्या मदतीने यावर नक्कीच मात करता येते.

फोटो स्रोत, Getty Images
आपण काय खात आहोत, किती खात आहोत, कितीवेळा खात आहोत याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्या कारणामुळे आपल्याला खायची इच्छा होते, आपण तहान लागली असताना पाणी पिण्याऐवजी खातो का? काही मानसिक त्रास, तणावामुळे आपण खातो का? याचं निरीक्षण करुन व्यक्तीला डॉक्टरकडे जाता येईल. समुपदेशन आणि औषधांच्या मदतीने मानसोपचारतज्ज्ञ आणि डॉक्टर तुम्हाला मदत करतात.
उपचारांबद्दल बोलताना डॉ. तांडेल म्हणाले, "उपचारांमध्ये समुपदेशन आणि औषधे या दोन्हींचा समावेश होतो. नैराश्य कमी करणारी औषधं गरज असल्यास दिली जातात. तसेच कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेपरी किंवा माईंडफुलनेससारख्या उपायांनी उपचार केले जातात."
येताजाता खात राहाणाऱ्यांनी, वेळ जात नाही म्हणून फ्रिज उघडून काहीतरी खात राहाणाऱ्यांनी, टीव्ही-मोबाईल पाहात अमर्याद खात राहाणाऱ्यांनी आजच आपण धोक्याच्या पातळीवर उभे आहोत का हे पाहणं शक्य आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








