मानसिक आरोग्यः अतिविचार (Overthinking) म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत राहाता का?

तुम्ही सतत विचार करत राहाता?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछान्यावर पडलं की तात्काळ तुमच्या मनात विचार सुरू होतात का? पुढच्या काळात आपल्यावर हे संकट तर नाही ना येणार? किंवा काही दिवस-वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण तुमच्या मनात सारखी आणि रोज येते का? मनातले विचार संपतच नाहीत किंवा एकापाठोपाठ एक विचार येतच राहातात, मन कधी शांतपणे बसलंय असं वाटतच नाही का? असं काही होत असेल तर ही माहिती नक्की वाचा.

विचार करणं आणि अतिविचार करणं यातला फरक आपण जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना हा अतिविचाराचा त्रास होत असतो. सतत एकच विचार मनामध्ये असणं किंवा एकापाठोपाठ सलग विचारांची माळ मनात सुरू होणं असं सुरू असतं.

ऑफिसचा कॉम्प्युटर लॉग आऊट केला तरी मनातून ऑफिसचं काम लॉग आऊट होत नाही. सतत नोकरीचे, व्यवसायाचे विचार मनात येत राहातात.

काही लोकांमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे, भविष्याचे, नोकरी मिळतील का याचे विचार येत असतात. आपण परीक्षेत नापास होऊ, आपली नोकरी जाईल, आपल्याला नोकरीच मिळणार नाही, आपल्या प्रेमसंबंधात अडथळा येईल, आपला जोडीदार सोडून जाईल, अपघात झाला तर कसं होईल? एखादा आजार झाला तर त्याचा खर्च कसा भरुन काढायचा? मुलं वाईट वळणाला लागतील का? असे विचार येत राहातात.

हे विचार सतत मनात येत असतील तर अतिविचारांचा त्रास आपल्याला होतोय का हे पाहाणं गरजेचं आहे.

अतिविचार म्हणजे गरजेपेक्षा जास्त विचार, चिंता करत राहाणं. यामुळे आपली भरपूर शारीरिक, मानसिक ऊर्जा खर्च होत असते.

मानसिक आरोग्यः अतिविचार (Overthinking) म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत राहाता का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुमच्या शरीराचा, मनाचा ताबा अतिविचाराने घेतलाय का?

यातील बहुतांश विचार टोकाचे आणि नकारात्मक असतात. ते कधी प्रत्यक्षात येतील असे नाहीच पण अतिविचार करणारी व्यक्ती त्यावर विचार करते.

यामुळे अनेक रुग्णांना झोप येत नाही, झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या पुढच्या दिवसावर आणि एकूणच जगण्यावर परिणाम होतो. सतत थकवा आल्यासारखं वाटतं. गळून गेल्यासारखं वाटतं.

विचार किती करायचा?

विचार करणं हे माणसाला मिळालेलं वरदान समजलं जातं. याच विचारांच्या जोरावर मनुष्याने आजवरची प्रगती केली आहे. पण आपल्या विचारप्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास मोठे प्रश्न उदभवू शकतात.

विचार हे माणसाचे शस्त्र मानले तर हे शस्त्र दुधारी आहे याचंही भान ठेवलं पाहिजे. विचारांचा चांगला आणि वाईट असा दोन्हीप्रकारे वापर करता येतो. विचारांचा उपयोग होतो तसा दुरुपयोगही होतो. त्यामुळे अतिविचार करणं म्हणजे त्या शस्त्राचा अतिवापर, अयोग्य मार्गाने वापर करण्यासारखं आहे.

मानसिक आरोग्यः अतिविचार (Overthinking) म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत राहाता का?

फोटो स्रोत, Getty Images

अतिविचाराला मनुष्याच्या विचार करण्याच्या शक्तीचा दुरुपयोग आणि गैरवापर समजलं जातं. पुढचा विचार करणं चांगलं असलं तरी एकामर्यादेपेक्षा जास्त हवेत इमले बांधत बसणं चुकीचं आहे. त्यामुळे आताचा वर्तमानातला महत्त्वाचा वेळ वाया जाऊ शकतो.

जर आपलं रोजच्या वेळेचं गणित चुकत असेल त्यामुळे आपल्या कामावर परिणाम होत असेल तर आपण अतिविचार करत आहोत का हे तपासलं पाहिजे.

अतिविचाराची लक्षणं

आपण जो विचार करत आहोत ते आवश्यक प्रमाणात आहे की आपण अतिविचार करत आहोत हे ओळखणं गरजेचं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना पुण्यातील मनोविकासतज्ज्ञ डॉ. प्रसन्न गद्रे यांनी या लक्षणांबद्दल सांगितले.

मानसिक आरोग्यः अतिविचार (Overthinking) म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत राहाता का? Mental Health

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले,

  • दिवसभर सततच्या त्रासदायक विचारांचा शरीरावरही परिणाम दिसून येतो. अतिविचारांमुळे भुवयांपासून मानेपर्यंतचे स्नायूंचे तंतू आक्रसतात आणि त्या व्यक्तीला संध्याकाळपर्यंत डोकं जड झाल्यासारखं वाटून डोकं दुखायला लागतं. अशा व्यक्तीला सतत थकल्यासारखं वाटतं.
  • भीतीच्या, रागाच्या, दुःखाच्या, नकारात्मक, बदला घेण्याच्या विचारांमुळे चेहरा, जबडा, मान इथले अनेक स्नायू आक्रसतात.
  • अतिविचार करत आहोत हे समजण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे विचारांमुळे झोपेवर होणारा परिणाम. सततच्या विचारांमुळे त्या व्यक्तीला झोप लागत नाही. या व्यक्तींच्या झोपेचा पहिला टप्पा म्हणजे झोप येण्याचा टप्पाच सुरूच होत नाही. मग झोप येत नाही म्हणून पुन्हा विचार आणि विचार आले म्हणून पुन्हा निद्रानाश अशा चक्रात ती व्यक्ती सापडते.
  • अतिविचार करणाऱ्यांना काही लोकांमध्ये जेवणाची इच्छाच निर्माण होत नाही, त्यांना तहान-भूकेचं भान राहात नाही. तर काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
  • अतिविचार करणाऱ्या, सतत एकाच विचारात गुंतलेल्या व्यक्तीची तंद्री लागू शकते. घरात किंवा एखाद्या ठिकाणी तंद्री लागणं एकवेळ चालू शकेल मात्र प्रवासात, गाडी चालवताना अशा तंद्री, ट्रान्समध्ये गेल्यास अपघात होऊ शकतात.
  • ओसीडी. म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर किंवा मंत्रचळ हे सुद्धा अतिविचाराचे भाग आहेत. सतत तोच विचार येणं, त्या विचारानुसार कृती केल्याशिवाय स्वस्थ बसता न येणं, थोड्यावेळानं पुन्हा तोच विचार येऊन कृती करावी लागणं अशा दुष्टचक्रात ही ओसीडी झालेली व्यक्ती आढळते. विक्रम वेताळाच्या वेताळाप्रमाणे एकच विचार मानगुटीवर बसतो.
  • तोच तोच विचार येणं, मृत्यूचे, इतर व्यक्तींच्या अपघाताचे-मृत्यूचे विचार येणं, लैंगिक प्रश्न, अपयश, दुःखी विचार सतत मनात येणं. एकाचप्रकारचे विचार मनात पिंगा घालू लागल्यामुळे ती व्यक्ती त्या विचाराच्या भोवऱ्यात अडकून पडते. संध्याकाळपर्यंत ती व्यक्ती थकून जाते. रात्री झोपल्यावर घराचा दरवाजा बंद आहे का? गॅस, नळ बंद आहे का असे विचार येऊन ती व्यक्ती अस्वस्थ होऊन जाते. अस्वस्थ झाल्यावर सतत कुलुप, नळ, गॅस तपासणं, जंतुंची भीती वाटून स्वच्छता करत राहाणं यातच ती व्यक्ती थकून जाते. ओसीडीबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- ओसीडी मंत्रचळ : तुम्ही सतत हात धुता का? एखाद्या गोष्टीमुळे त्रास होईल अशी भीती वाटते का?
  • अतिविचारांमुळे झोप कमी येते तशी काही लोकांना झोप जास्तही येते. झोपल्यामुळे त्या विचारापासून तात्पुरती सुटका मिळते. तात्पुरती पळवाट काढता येते. त्यामुळे निद्रानाशाप्रमाणे अतिझोपेचा प्रकारही दिसतो.
  • भूतकाळातील एखाद्या गोष्टीमुळे व्यक्तीला खेद, दुःख, लाज, अपराधीपणा, चुकल्यासारखं वाटत राहातं त्यामुळे तोच विचार मनात घोळत राहातो. अतिविचाराचे हे एक लक्षण आहे. प्रेमभंग होईल का, प्रेमभंग झाल्यास तो का झाला याचा विचार मनात येत राहातो. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या विचारात त्या व्यक्तीचा बराच वेळ जातो.

अतिविचार थांबवायचे कसे?

विचार थांबवणं ही तशी अवघड गोष्ट मानली जाते. परंतु स्वतःला काही ठराविक प्रकारची शिस्त लावली तर यातून सुटका होऊ शकते.

अनेक डॉक्टर्स अतिविचार करणाऱ्या लोकांना नियमित व्यायाम, योग्य आहार घेण्याचेही सुचवतात. मन शांत होण्यासाठी ते गरजेचे आहे.

मानसिक आरोग्यः अतिविचार (Overthinking) म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत राहाता का? Mental Health

फोटो स्रोत, Getty Images

अतिविचार थांबवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स काही उपाय सुचवतात. त्यातील काही उपाय येथे पाहू-

अतिविचाराला रामराम-

अतिविचाराबद्दलच अतिविचार करणं सोडून दिलं पाहिजे. काही गोष्टी स्वीकारून पुढे गेल्याशिवाय नवे काही घडणार नाही. अन्यथा एकाच विचारावर आपण अडकून पडू.

प्रक्रियेचा आनंद घ्या-

फार यश-अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे असं डॉक्टर सुचवतात. डॉ. प्रसन्न गद्रे यांच्यामते, "निर्णय़ घेण्याला अत्यंत महत्त्व आहे. सतत माझा निर्णय बरोबरच आला पाहिजे याच्या विचारात गुंतुन पडलात तर निर्णय घेताच येणार नाही."

प्लॅनिंगचा अतिरेक नको-

अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त नियोजन (प्लॅनिंग) करत राहातात. प्रत्येक गोष्टीत मायक्रो मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता नाही असं तज्ज्ञ सुचवतात.

औषधं कुणासाठी?-

काही रुग्णांना औषधं देण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु त्यांना औषधं देण्याची गरज आहे का? कोणती औषधं किती प्रमाणात द्यायची, कधी द्यायची, ती कमी-जास्त करायची हे मात्र डॉक्टरांनाच ठरवू द्यावे. स्वतःच स्वतःवर उपचार करू नये.

जरा नवं काही करा-

काही तज्ज्ञ अतिविचारातून बाहेर पडण्यासाठी नव्या गोष्टींमध्ये मन रिझवणं आवश्यक आहे. विरंगुळ्याचे नवे मार्ग शोधले पाहिजेत.

मनःशांतीसाठी-

मनःशांतीसाठी प्राणायाम, ध्यानधारणा, शवासन, योगनिद्रा असे अनेक उपाय करून पाहाता येतील.

डोक्यात सुरू असलेले विचार कधी थांबतच नाहीत का? अतिविचार म्हणजेच Overthinking करण्याची तुम्हाला सवय आहे का? Mntal Health मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

आता मग विचार, काळजी करायचीच नाही का?

  • भविष्याचा विचार करणं, दुरदृष्टी असणं, उद्याची चिंता करणं हे चांगलं मानलं असलं तरी त्याचा आपण अतिरेक करत आहोत का याकडे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे.
  • एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त काळजी करणं म्हणजेच प्रेम ही संकल्पना अयोग्यच ठरते. काळजी, अतिविचार केल्यामुळे संकट टळत नाही. म्हणजेच या चिंतेमुळे आपल्या हातात काहीच पडत नाही.
  • फक्त वाईटच घडेल, संकटंच येतील असे विचार मनात सारखे येत असतील आणि त्यामुळे रोजच्या आयुष्यावर, कामावर, कुटुंबावर परिणाम होत असेल तर मात्र ही 'काळजीची गोष्ट' आहे.
  • अतिविचार करून आपल्याला नक्की काय मिळतंय? यातून नक्की साध्य काय होतंय याचं उत्तर त्या व्यक्तीने स्वतःच शोधल्यास आपल्यावर त्याचा किती परिणाम होतोय हे दिसून येईल.
मानसिक आरोग्यः अतिविचार (Overthinking) म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत राहाता का?

फोटो स्रोत, Getty Images

आता लगेच या क्षणी काय करता येईल?

एखादा विचार सतत मनात येत असेल, तो मनातून जात नसेल, त्या भयंकर वाटणाऱ्या विचारामुळे आपल्यावर सतत परिणाम होत असेल तर काय करता येईल असा प्रश्न आम्ही मुंबईस्थित समुपदेशक डॉ. तेजस्विनी कुलकर्णी यांना विचारला. त्यांनी काही महत्त्वाचे उपाय सुचवले. ते पुढीलप्रमाणे-

  • शक्यता लिहून काढा- डॉ. कुलकर्णी सांगतात जो सततचा नकारात्मक विचार मनात येतोय तो सरळ कागद पेन घेऊन लिहून काढा. त्यानंतर खरंच असा वाईट प्रकार आपल्या आयुष्यात घडला तर काय होईल. या विचारानुसार वाईटातही वाईट काय शक्यता होईल हे लिहून काढा. जर अशी स्थिती आलीच तर मला त्यापुढे काहीच शक्य नाही का? खरंच मला त्या वाईट स्थितीतून बाहेर पडताच येणार नाही का हे त्यावर लिहून काढा.
  • निर्णय घेताना- डॉ. तेजस्विनी कुलकर्णी निर्णय घेताना होणाऱ्या अतिविचाराबद्दल सांगताना म्हणाल्या, "निर्णय घेताना आपण नकळत आणि अकारण स्वतःवर माझा निर्णय बरोबरच आला पाहिजे असा दबाव टाकत असतो. निर्णय घेताना स्वतःशी संवाद करता येईल. आता माझ्याकडे असलेल्या माहिती-ज्ञानानुसार मी निर्णय घेत आहे. त्यातून काय निष्पन्न होणार हे कोणालाच सांगता येणार नाही. हे स्वतःला समजावलं तर निर्णयप्रक्रिया थोडी सोपी होऊ शकेल. निर्णय घेताना अतिविचार टाळला जाईल."
  • कृती करा- अतिविचारात व्यक्ती फक्त विचारातच बुडून जाते. तिचे कृतीकडे दुर्लक्ष होते. अतिविचारात कृती करण्याकडे फार कमी लक्ष दिले जाते किंवा कृती केलीच जात नाही असं डॉ. तेजस्विनी सांगतात.
  • महत्त्व ओळखा- आता आपल्या डोक्यात जे लहानसहान गोष्टींचे विचार घोळत आहेत ते दीर्घकाळाकडे पाहिलं तर खरंच महत्त्वाचे आणि परिणामकारक आहेत का? हे ओळखलं पाहिजे. खरंच आपला वेळ ज्या लहानसहान गोष्टींच्या विचारांवर जातोय ते विचार पाच-दहा वर्षांच्या काळात आपल्या आयुष्यावर नक्की किती परिणाम करणार आहेत? म्हणजेच दीर्घकाळाचा विचार करता या गोष्टींचं महत्त्व किती आहे हे तपासायचं. त्यातून हे विचार कमी होणं शक्य होईल.
  • आपल्या हातात काय आहे?-अतिविचारात लोक काय म्हणतील, आपण हे नक्की पार पाडू शकू का? मी हे करण्यास खरंच पात्र आहे का? खरंच मला हे जमेल का असे विचार व्यक्तीच्या मनात येत असतात. अशा विचारांच्या बाबतीत डॉ. तेजस्विनी कुलकर्णी सांगतात, अशावेळेस कृती करताना माझ्या हातात फक्त प्रयत्न आणि माझा चांगला हेतू इतकेच आहे याची जाणिव आपल्या मनाला करुन द्यावी. इतर लोकांच्या प्रतिक्रिया माझ्या हातात नाही हे मनाला समजावून द्यावे.
मानसिक आरोग्यः अतिविचार (Overthinking) म्हणजे काय? तुम्ही सतत विचार करत राहाता का?

फोटो स्रोत, Getty Images

महत्त्वाची सूचना- कोणत्याही मानसिक, शारीरिक त्रासासाठी स्वतःच औषधोपचार करणं किंवा इंटरनेटवर शोधून औषधे घेऊ नयेत. त्यासाठी तज्ज्ञांचीच मदत घेतली पाहिजे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)