डिप्रेशनवरती गोळ्या घेताय? मग त्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो ते वाचाच

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर
नैराश्य किंवा डिप्रेशनसाठी वेगवेगळ्या गोळ्या आहेत. पहिल्यांदाच या औषधांचं वर्गीकरण त्यांच्या साइड इफेक्ट्सच्या आधारे करण्यात आलं आहे.
संशोधकांनी या उपचाराच्या सुरूवातीच्या आठ आठवड्यात या औषधांचा रुग्णांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला.
काही औषधांमुळे रुग्णांचे वजन 2 किलोपर्यंत वाढले, तर काही औषधांमुळे हृदयाच्या ठोके दर मिनिटाला 21 बीट्सने बदलले.
युकेमध्ये जवळपास 80 लाख लोक अँटिडिप्रेसंट्स म्हणजेच नैराश्यावरची औषधं घेतात. या गोळ्यांच्या वेगवेगळ्या दुष्परिणामांचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला

फोटो स्रोत, Getty Images
याचा अर्थ जे लोक या गोळ्या घेत आहेत, त्यांनी त्या लगेचच थांबवू नयेत. मात्र, ही औषधे व्यक्तीच्या गरजेनुसार अचूकपणे दिली जावीत, अशी मागणी संशोधकांनी केली आहे.
"वेगवेगळ्या अँटिडिप्रेसंट्सचा परिणामही वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे आणि परिणामांमधील हा फरक जास्त आहे. त्यामुळे अगदी किरकोळ बदल देखील अधिक लोकांवर मोठा परिणाम करू शकतो," असे संशोधक प्रा. ऑलिव्हर हाउज यांनी सांगितले.
लॅन्सेटच्या अहवालात निष्कर्ष प्रसिद्ध
अँटिडिप्रेसंट औषधं शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात हे पूर्वीपासून माहिती होतं. पण किंग्ज कॉलेज लंडन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात प्रथमच औषधांच्या परिणामांची क्रमवारी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे औषधांच्या परिणामांची तीव्रता लक्षात घेऊन सहजपणे तुलना करता येईल.
संशोधकांच्या पथकाने 30 अँटिडिप्रेसंट औषधांवरील 151 संशोधनांचे विश्लेषण केले, ज्यामध्ये 58,500 पेक्षा अधिक रुग्णांचा समावेश होता.
सर्व रुग्णांवर या औषधांचे दुष्परिणाम होतातच असे नाही. पण लॅन्सेट वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित करण्यात आलेले सर्वसाधारण परिणाम खालीलप्रमाणे होते-
- आठ आठवडे एगोमेलाटीन हे औषध घेतल्यानंतर वजन 2.4 किलोने कमी झालं, तर मॅप्रोटिलीनमुळे वजन जवळपास 2 किलोने वाढले.
- फ्लुवॉक्सामिनमुळे हृदयाचे ठोके मंदावले, तर नॉर्ट्रिप्टिलीनमुळे ते वाढले. यामध्ये दर मिनिटाला 21 ठोक्यांचा फरक आढळला.
- नॉर्ट्रिप्टिलीन आणि डॉक्सेपिन यांच्या सेवनाने रक्तदाबात 11 mmHg चा फरक आढळला.

फोटो स्रोत, Getty Images
किंग्स कॉलेज लंडनचे डॉ. अतीशान अरुमुहाम सांगतात की, "सगळी अँटिडिप्रेसंट औषधं एकसारखी नसतात हे स्पष्ट आहे.
ही औषधं परिणामांमधील फरकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत कारण यामध्ये हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
याचा अर्थ असा की सारखेच निदान असलेल्या लोकांसाठीही वेगवेगळ्या औषधांचा वापर त्यांची प्रकृती आणि आरोग्यविषयक परिस्थितीनुसार असू शकतो.
डॉ. टोबी पिलिंजर यांनी बीबीसी रेडिओ 4 च्या टुडे या कार्यक्रमात सांगितले की, "आम्ही जे संशोधन केले होते, ते तुलनेने अल्पकालीन होते.
आम्ही आठ आठवड्यांच्या कालावधीचा विचार करत होतो आणि त्या कालावधीतही आम्हाला शारीरिक आरोग्याच्या बाबतीत मोठे बदल दिसून आले, जे आमच्या मते वैद्यकीय दृष्टीने महत्त्वाचे आहेत."
ते पुढे सांगतात की, 'या माहितीने लोकांनी घाबरून जावं अशी माझी इच्छा नाही. उलट डॉक्टरांसोबत चर्चा करून त्यांनी औषधांच्या निवडीबाबत पुढाकार घ्यावा असं मला वाटतं."
माझ्यासाठी कोणते नैराश्यविरोधी औषध योग्य आहे?
आपण उदाहरणाने समजावून घेऊ.
सारा (वय 32), जॉन (वय 44) आणि जेन (वय 56) यांना नैराश्याचे निदान झाले आणि त्यांना औषधांची लिहून देण्यात आली आहेत.
पण तिघांनाही या औषधांच्या वेगवेगळ्या दुष्परिणामांपासून दूर राहायचे आहे.
साराला वजन वाढू द्यायचं नाहीये. जॉनला आधीच उच्च रक्तदाब असल्यामुळे काही औषधे टाळणे आवश्यक आहे. जेनचं कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे.
प्रत्येक रुग्णासाठी वेगळे अँटीडिप्रेसंट आवश्यक असल्याचं डॉ. टोबी पिलिंजर यांनी म्हटलं.
बीबीसीसाठी या उदाहरणांवर काम केलेल्या डॉ. टोबी पिलिंजर यांनी सांगितलं की, प्रत्येक रुग्णाची शारीरिक गरज आणि दुष्परिणामांची प्रवृत्ती वेगळी असल्याने औषधांची निवड त्यानुसार करणे अत्यावश्यक आहे.
सारासाठी डॉ. पिलिंजर सांगतात की ,"साराला वजन वाढू नये म्हणून अशी औषधे द्यावीत जी वजन वाढवण्याची शक्यता कमी करतात. उदाहरणार्थ- एगोमेलाटिन (agomelatine), सर्ट्रालिन (sertraline) किंवा व्हेनलाफॅक्सिन (venlafaxine).
अॅमिट्रिप्टिलिन (amitriptyline) आणि मिर्टाझापिन (mirtazapine) ही औषधे वजन वाढवू शकतात, त्यामुळे ती टाळावीत."

फोटो स्रोत, Getty Images
जॉनसाठी त्यांनी सांगितले आहे की, "जॉनला रक्तदाब वाढण्याची प्रवृत्ती असल्याने, त्याने व्हेनलाफॅक्सिन, अॅमिट्रिप्टिलिन किंवा नॉरट्रिप्टिलिन (nortriptyline) यांसारखी औषधे टाळावीत.
त्याऐवजी सिटालोप्राम (citalopram), एस्किटालोप्राम (escitalopram) किंवा पॅरॉक्सिटीन (paroxetine) ही औषधे त्याच्यासाठी अधिक योग्य ठरतील," असं त्यांनी म्हटलं.
जेनसाठी त्यांनी सांगितलं की, "काही अँटीडिप्रेसंट्समुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. उदाहरणार्थ व्हेनलाफॅक्सिन, ड्युलोक्सिटिन (duloxetine) आणि पॅरॉक्सिटीन. त्यामुळे जेनने ही औषधे टाळावीत.
सिटालोप्राम किंवा एस्किटालोप्राम ही औषधे कोलेस्ट्रॉलवर कमी परिणाम करतात, त्यामुळे ती तिच्यासाठी अधिक योग्य ठरू शकतात," असे डॉ. पिलिंजर यांनी सांगितले.
'स्वस्त औषधां'कडे वाढता कल
संशोधकांच्या मते, अँटिडिप्रेसंट औषधांबाबत चांगले किंवा वाईट असे सरळ वर्गीकरण करणे चुकीचे ठरेल. उदाहरणार्थ-अमिट्रिप्टिलीन वजन, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवते, पण ते वेदना कमी करण्यासाठी आणि झोपेच्या समस्यांवर प्रभावी ठरते.
एकूणच, सर्वाधिक वापरली जाणारी औषधांची श्रेणी म्हणजे SSRIs (सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर्स) जसे की पॅरॉक्सेटीन, सिटालोप्राम, एस्सिटालोप्राम आणि सर्ट्रालीन यांचे तुलनेने कमी शारीरिक दुष्परिणाम आढळतात.
फ्लुओक्सेटीन प्रोझॅक म्हणूनही ओळखले जाते. या SSRI औषधाचा अभ्यासात वजन घटणे आणि रक्तदाबात वाढ यांच्याशी संबंध आढळला.
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. अँड्रिया सिप्रियानी यांनी सांगितले की, किती लोकांना वेगळ्या औषधांची गरज आहे हे सांगणे अशक्य आहे.
पण त्यांनी असेही सांगितले की, 'सामान्य, स्वस्त औषधां'च्या वापरावर जोर दिला गेला आहे, ज्यामुळे युकेमध्ये 85% अँटिडिप्रेसंट औषधांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये फक्त तीन औषधांचा समावेश आहे. ते म्हणजे सिटालोप्राम, सर्ट्रालीन आणि फ्लुओक्सेटीन.
संशोधक एक मोफत ऑनलाईन टूल विकसित करत आहेत, जे डॉक्टर आणि रुग्णांना योग्य औषध निवडण्यात मदत करेल. मात्र, हे लागू करण्यासाठी NHS मध्ये धोरणात्मक मोठा बदल आवश्यक आहे.
या अभ्यासात फक्त औषध सुरू केल्यानंतरच्या आठ आठवड्यांतील परिणामांचा विचार करण्यात आला. डॉ. पिलिंजर यांनी सांगितले की, पूरक माहिती पाहिल्यास या अल्पकालीन बदलात सातत्य असेल, पण याची अजूनही योग्य चाचणी आवश्यक आहे.
बाथ विद्यापीठातील डॉ. प्रसाद निस्ताला या अभ्यासात सहभागी नव्हते. मात्र, त्यांनी सांगितलं की, रुग्णांना अनेक महिने किंवा वर्षांपर्यंत ही औषधं दिली जातात. अशावेळी धोका जास्त असतो. विशेषतः ज्या रुग्णांना दीर्घकालीन नैराश्य आहे त्यांना."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











