'तो पॅनिक अटॅक होता, मला वाटलं की हार्ट अटॅक आहे'...मानसिक समस्येवर मात करणाऱ्या व्यावसायिकाची कहाणी

- Author, नियाल मॅकक्रॅकन
- Role, बीबीसी न्यूज एनआय मिड अल्स्टर रिपोर्टर
उत्तर आयर्लंडमधील जॉन केली (John Kelly) या व्यावसायिकाला एका विचित्र वैद्यकीय समस्येला तोंड द्यावं लागलं.
झालं असं की जॉन केली कामानिमित्त कारनं डब्लिनला जात होते. तेव्हा त्यांना छाती भरुन आल्यासारखी वाटली. त्यांची छाती ताणली जात होती. दंडाला टाचण्या आणि सुया टोचल्यासारख्या वेदना जाणवल्या.
जॉन सांगतात, "त्यामुळे मला कार थांबवून, आपत्कालीन सेवांना फोन करावा लागला. त्या क्षणी मला वाटलं की मला हृदयविकाराचा झटका येतो आहे."
त्यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला. त्यानंतर पुढील तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. तिथे त्यांच्या अनेक सखोल चाचण्या झाल्या. मात्र नंतर या चाचण्यामधून शारीरिकदृष्ट्या काहीही गंभीर असं निघालं नाही.
"मी माझ्या डॉक्टरकडे गेलो. त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की माझ्या ह्रदयात काहीही समस्या नव्हती." असं जॉन केली सांगतात.
"त्यावर मी डॉक्टरांना विचारलं की मग नेमकी समस्या काय होती. याचं उत्तर देताना त्यांनी माझ्या डोक्याकडे इशारा केला." असं जॉन म्हणाले.


पॅनिक अटॅक आणि मानसिक आरोग्य
जॉन यांना गंभीर स्वरुपाचा पॅनिक अटॅक आला होता.
जॉन केली यांचा जन्म उत्तर आयर्लंडमधील डंगॅनन (Dungannon) या शहरात झाला होता. त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे.
मात्र त्याआधी त्यांनी त्यांच्या करियरमधील बराच काळ कॉर्पोरेट जगतात काम केलं आहे. ते एका सॉफ्ट ड्रिंक्स कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते.
2000 च्या दशकाच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सेल्स ट्रेनिंग म्हणजे विक्रीसंदर्भातील प्रशिक्षण देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर कामाच्या व्यापामुळे लवकरच त्यांच्यात तणाव, चिंता, काळजी या गोष्टींची लक्षणं दिसू लागली.

काही वर्षांपासून माझा स्वत:चा व्यवसाय आहे. मला वाटत होतं की माझं मस्त चाललं आहे. माझ्याकडे एक छान घर आहे. प्रेमळ कुटुंब आहे. मात्र माझ्यावरील कामाचा दबाव सातत्यानं वाढतच चालला होता.
"एक दिवस मला विचित्र त्रास झाला. मला स्पष्टपणे विचार करण्यात किंवा लक्ष्य केंद्रित करण्यात (Brain fog)अडचण आल्यासारखं जाणवलं. त्यावेळेस नेमकं काय होतं आहे हे मला कळलं नाही. पण मी माझं काम करू शकत होतो."
(यामध्ये एकाग्रता साधण्यात अडचण येते, गोष्टींचं विस्मरण होतं, बोलताना योग्य शब्द सूचत नाहीत आणि प्रतिक्रिया देण्याचा कालावधी वाढतो)
त्यानंतर काही दिवसांनी जॉन यांना त्यांचा पहिला पॅनिक अटॅक आला होता.
मानसशास्त्रीय उपचार
त्यानंतर जॉन केली यांच्या डॉक्टरनं त्यांना कॉग्निटिव्ह बिहेविरल थेरेपी (CBT) घेण्याचा सल्ला दिला.
नॅशनल हेल्थ सर्व्हिसकडून (NHS)या टॉक थेरेपीला मान्यता आहे. रुग्णाच्या विचारपद्धतीत आणि वर्तवणुकीत या थेरेपीद्वारे बदल करून त्याच्या समस्यांचं व्यवस्थापन केलं जातं.
(एनएचएस ही युकेमधील सार्वजनिक निधीवर चालणारी आरोग्य व्यवस्था आहे)
या थेरेपीमुळे आपण बरे होण्यास सुरूवात झाल्याचं जॉन सांगतात.
त्यांना येणाऱ्या विचित्र विचारांबद्दल जॉन सांगतात, "मला वाटायचं की एखादी बोट जिला गळती लागली आहे त्यात मी बसलो आहे. त्यानंतर ती बोट वाचण्यासाठीच्या योग्य त्या वस्तू माझ्या हाती येतात."
"एका चांगल्या बादलीच्या साहाय्यानं बोटीत जमा झालेलं काही पाणी मी बाहेर फेकत होतो. मात्र त्या बोटीत अजूनही पाणी शिरत होतं."

फोटो स्रोत, Getty Images
एनएचएसमध्ये आपल्या पहिल्या कॉग्निटिव्ह बिहेविरल थेरेपी (CBT) साठी अपॉईंटमेंट मिळण्यासाठी जॉन यांना अनेक महिने वाट पाहावी लागली. मग त्यांना पहिल्या सहा सत्रांची अपाईंटमेंट देण्यात आली.
त्यानंतर पुढील सत्रांसाठी जॉन यांनी खासगी सेवा घेतली.
जॉन म्हणाले की सीबीटी ही त्यांच्या उपचाराच्या प्रदीर्घ प्रवासाची सुरुवात होती. यात मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आत्म चिंतनाचा समावेश होता.
"त्यानंतर मला माझ्या विचारांची पुनर्मांडणी करता येऊ लागली. एखाद्या संकट किंवा विनाशाचे विचार येणं बंद झालं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ते फक्त विचार आहेत. त्यावर मी प्रत्यक्षात कृती करण्याची आवश्यकता नाही."
"मात्र यासाठी मला खूप आत्मचिंतन करावं लागलं, विचारांची दिशा बदलावी लागली आणि स्वत:वर देखील काम करावं लागलं."
"यातून माझ्या मनात विचार आला की हे जर माझ्या बाबतीत घडलं असेल...तर ते इतरांच्या बाबतीतसुद्धा घडत असावं."

मानसिक आरोग्याच्या संदर्भातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

पॅनिक अटॅकची लक्षणं
अचानक निष्कारण छातीची धडधड वाटून असं श्वास कोंडल्यासारखं होणं हा अनुभव अनेक व्यक्तींना येऊन गेला आहे. असा अनुभव येतो त्याला पॅनिक अॅटॅक असं म्हणतात. असं वारंवार होण्य़ाला आणि याप्रकारची सर्व लक्षण एकत्रित येण्याला पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डर असं म्हणतात.
चिंता आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात जाणवत असतेच पण अचानक तीव्रतेने चिंता वाटायला लागून जेव्हा गोंधळलेली अवस्था निर्माण होते तेव्हा पॅनिक अॅटॅक आला असं म्हणतात.
पॅनिक अॅटॅक आलेल्या व्यक्तीला अचानक छातीत धडधडू लागतं, घाम येतो, भीती वाटते, अस्वस्थ वाटून कुठंतरी मोकळ्या हवेत जावं असं वाटू लागतं, तोंड सुकतं. सर्व लक्ष शरीराकडे केंद्रित होतं. अशा रुग्णाने घाबरुन अधिक धावपळ केल्यास हृदयाचे ठोके अधिक जलदगतीने पडून आणखी भीती वाटायला लागते. घाबरल्यामुळे या लक्षणांमध्ये अधिकच वाढ होते.
अशी लक्षणं दिसल्यावर धावपळीने डॉक्टरकडे जाऊन इसीजी काढल्यावर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं समजतं. तुम्हाला पॅनिक अॅटॅक आला असावा असं डॉक्टर सांगतात. पण घरी आल्यावरही व्यक्तीला आपल्या दुखण्याचं मूळ कारण शरीरातच असावं असं वाटत असतं आणि ते डॉक्टरांनाच सापडत नाहीये असं वाटून रुग्ण डॉक्टर बदलत राहातो.
एखादे डॉक्टर त्याला शेवटी मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतात. तेव्हाही व्यक्तीला हे पटत नसतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शारीरिक लक्षणं दिसत असल्यामुळे त्याचं मूळ मनामध्ये असेल असं व्यक्तीला वाटत नाही. त्यामुळे रुग्ण मनोविकारतज्ज्ञाकडे जायला टाळाटाळ करतात.
अशा रुग्णांशी नीट संवाद करून त्यांना विश्वासात घेऊन चिंतेचं मूळ शोधावं लागतं. घरच्याघरी तसेच कोणत्याही तपासण्यांविना निदान करू नये असं डॉक्टर सुचवतात. पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अॅटॅक यातला फरक डॉक्टरच तपासणीनंतर, चाचणीनंतर सांगू शकतात. त्यांनी केलेले निदान लक्षात घेऊन मग उपचार घेतले पाहिजेत.
पॅनिक अॅटॅक हे सर्वसाधारपणे शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे येतात. शारीरिक कारणांमध्ये उत्तेजित अवस्था (एक्साइटमेंट) येण्यामुळे हे होऊ शकतं. कॉफी किंवा कॅफिन असणारी कोल्ड्रिंक्स, निकोटीन, अतिरेकी चहापान किंवा उत्तेजक द्रव्यांचे सेवन यामुळे ही स्थिती येऊ शकते.
तसेच सेराटोनिन, थायरॉईड, अॅड्रनलिन यांच्या प्रमाणात होणारी अनियमितता कारणीभूत असते. वेगाने श्वास घेणाऱ्या व्यक्तींनाही त्रास उद्भवू शकतो असं डॉक्टर सांगतात.
शारीरिक कारणांबरोबरच सतत चिंताग्रस्त असणे, नैराश्य, तीव्र भीती (फोबिया) अशा कारणांमुळेही पॅनिक अॅटॅक येऊ शकतात. एखादी नको असलेली, भीती निर्माण करणारी घटना, गोष्ट घडल्यास, तशी व्यक्ती, प्राणी समोर आल्यास व्यक्तीला असा अनुभव येऊ शकतो. काही व्यक्तींना कोणत्याही स्पष्ट कारणांविना अचानक पॅनिक अॅटॅक येऊ शकतो.
मानसशास्त्रीय उपचारांसाठी प्रतीक्षा यादी
20 वर्षानंतर मानसिक समस्येवरील थेरेपीसाठीची प्रतिक्षा यादी आणि टॉक थेरेपीच्या प्रवेशासाठीच्या समस्या कायम आहेत.
उत्तर आयर्लंडमध्ये आरोग्य विभागाकडून अशी सूचना करण्यात आली आहे की मानसिक आरोग्यासाठीची मदत किंवा उपचार नऊ आठवड्यांच्या आत उपलब्ध करून दिली पाहिजे.
मात्र यावर्षी जून महिन्यात उत्तर आयर्लंडच्या मानसिक आरोग्य मोहिमेद्वारे प्रकाशित झालेल्या संशोधनात दिसून येतं की प्रत्यक्षात असंख्य रुग्णांच्या बाबतीत ही बाब शक्य होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
नॉर्दर्न आयर्लंड लाइफ अँड टाइम्स सर्व्हेच्या आकडेवारीतून दिसून येतं की ऑक्टोबर 2021 च्या आधी ज्यांनी या प्रकारच्या सेवा मिळवण्याचा प्रयत्न केला त्यातील 47 टक्के लोकांना नऊ आठवड्यांच्या आत प्रभावी उपचार मिळाले नाहीत.
आरोग्य विभागानं ही बाब मान्य केली की या प्रकारच्या सेवांच्या वाढत्या मागणीमुळे आरोग्य संस्थांवर "लक्षणीय दबाव" येतो आहे.
त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की मानसिक आरोग्यासंदर्भातील उपचार किंवा सेवा मिळवण्यासाठी असलेली प्रतिक्षा यादी कमी करण्यावर विभाग काम करतो आहे आणि लोकांना संकटाच्या वेळी मदत पुरवली जाते आहे.
अनेकजण गुपचूप त्रास सहन करतात
प्राध्यापक शोहान ओ'निल (Siobhán O'Neill) या उत्तर आयर्लंडमधील निष्णात मानसिक आरोग्य तज्ज्ञ आहेत.
त्या म्हणाल्या की मानसशास्त्रीय उपचार हे खूपच प्रभावी असतात. मात्र या उपचारांसाठी असलेली रुग्णांची प्रतिक्षा यादी खूपच मोठी आहे.
प्राध्यापक ओ'निल म्हणाल्या की प्रतिक्षा यादी मोठी असल्यामुळे मानसिक आजार किंवा समस्यांची स्थिती आणखी वाईट होत चालली आहे. कारण अनेकांचा नंबर येईपर्यंत त्यांना उपचार न घेताच "गुपचूप ही समस्या सहन करावी" लागते आहे.
"या प्रकारच्या समस्येला तोंड दिलेल्या एखाद्या व्यक्तीनं पुढे येऊन सार्वजनिकरित्या याबद्दल बोलणं हे खूपच महत्त्वाचं आहे. या समस्येतून तो कसा बरा झाला आणि त्याच्यासाठी कोणते उपचार योग्य ठरले हे सांगणं खूपच महत्त्वाचं आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.
जॉन केली यांनी अनेक वर्षे स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काम केलं आहे. आता ते व्यवसायांना, कंपन्यांना सकारात्मक सांस्कृतिक बदल करण्यास म्हणजे कार्यसंस्कृतीतील सकारात्मक बदल करण्याचं मार्गदर्शन करतात.
जॉन यांना स्वत:ला कामाच्या तणावामुळे, दबावामुळे मानसिक समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. त्यातून बोध घेत ते आता कंपन्यांना देखील याचं महत्त्व पटवून देत आहेत.

फोटो स्रोत, John Kelly
या आठवड्यात जॉन बेलफास्ट इथे होणाऱ्या एका कार्यक्रमात लोकांसमोर त्यांच्या स्वत:च्या कहाणीबद्दल, अनुभवाबद्दल बोलणार आहेत.
लोकांसमोर याप्रकारे स्वत:चे अनुभव सांगणारे जॉन केली हे काही फक्त एकटेच नाहीत. तर उत्तर आयर्लंडमधील रॉक संगीतकार आणि द आन्सर आणि द अनहोली गॉस्पेल या बॅंडचे प्रमुख गायक कोरमॅक नीसन देखील लोकांसमोर त्यांचे अनुभव सांगणार आहेत.
जॉन केली म्हणाले, मी स्वत: या कार्यक्रमात सहभागी होणार आहे यावरून हे दिसून येतं की तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता, किती मजल मारू शकता. मात्र दुर्दैवानं अजूनही मानसिक आरोग्य आणि समस्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मकच आहे. त्याकडे एक कलंक म्हणूनच पाहिलं जातं.
"मला माझी कहाणी, अनुभव इतरांना सांगायचा आहे. कारण मला वाटतं की यातून मानसिक समस्या असणाऱ्या इतर लोकांना मदत होईल. तुम्हाला कितीही नैराश्य येवो, तुम्ही किती दबावात, तणावात असा. मात्र तरीदेखील तुमचं आयुष्य सुरळीत होऊ शकतं याचा मी जिवंत पुरावा आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











