नुसता प्रवास शब्द म्हटला की मळमळायला लागतं का? मग ही बातमी नक्की वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज
विमानातून, ट्रेननं किंवा कारनं प्रवास करण्याचा निव्वळ विचार जरी केला तरी काही जणांना अस्वस्थ वाटतं, चिंता वाटते.
यालाच मोशन सिकनेस (motion sickness) म्हणतात.
या मोशन सिकनेसच्या भीतीची सावली सुट्ट्यांमध्ये फिरायला जायच्या, मजा करायच्या उत्साहावर पडते आणि मग सर्व आनंदावर विरजण पडतं.
मोशन सिकनेसमुळे (motion sickness) दररोज करायचा प्रवास देखील एखाद्या दु:स्वप्नात रुपांतरीत होतो. थोडक्यात मोशन सिकनेसमुळे प्रवासच नकोसा होऊन जातो.
जेव्हा मेंदू गोंधळलेल्या स्थितीत असतो, आपले डोळे जे पाहतात आणि आपल्या शरीराला ज्या संवेदना होतात याच्या परस्परविरोधी संदेश देतो. त्याचबरोबर आपण एखाद्या चालत्या वाहनात बसलेलो असतो म्हणजेच आपण प्रवास करत असतो तेव्हा मोशन सिकनेसची (motion sickness) समस्या उद्भवते.
उदाहरणार्थ आपण जेव्हा एखाद्या कारमध्ये बसून प्रवास करत असतो तेव्हा कार जरी पुढे जात असली तरी आपलं शरीर मात्र कारमध्ये स्थिरच असतं. मात्र आपल्या डोळ्यांना बाहेरच्या वस्तू हलताना किंवा सरकताना दिसतात.
'मोशन सिकनेस'ची समस्या असणाऱ्यांना मळमळ होणं, चक्कर येणं आणि अस्वस्थ वाटणं यासारखी लक्षणं उद्भवतात.
काहीजणांना ही लक्षणं किंवा हा त्रास इतका तीव्रपणे होतो की ते लांबचा प्रवास करणंच टाळतात. तर काहीजण या समस्येवर चमत्कारी उपायांच्या शोधात असतात.
मात्र ही मोशन सिकनेसची समस्या कशामुळे होते आणि त्यावर काय उपचार करता येतील?
मोशन सिकनेस कशामुळे होतो?
मोशन सिकनेस कशामुळे होतो हे समजून घेण्यासाठी आपला मेंदू कशाप्रकारे काम करतो, आपल्या शरीराकडून आलेले संवेदनात्मक संदेश कशाप्रकारे स्वीकारतो, त्यावर प्रक्रिया कशी होते हे समजून घेणं उपयोगाचं ठरेल.
कानाच्या आतल्या भागातून, स्नायू, स्नायूंना हाडांना जोडणाऱ्या बळकट पेशींकडून आणि सांध्याकडून शरीराची हालचाल आणि स्थिती याबद्दलचे संवेदनात्मक संदेश मेंदूला सतत मिळत असतात.
कानाच्या आतील भाग हा शरीराचा तोल सांभाळण्याचं केंद्र असतो. वेस्टिब्युलर सिस्टम या नेटवर्कचा तो एक भाग असतो.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रणालीमध्ये अर्ध-वर्तुळाकार छोट्या नलिकांच्या तीन जोड्या आणि दोन पिशव्या असतात. त्यांना सॅक्युल (saccule) आणि युट्रिकल (utricle) म्हणतात. शरीराची हालचाल आणि स्थिती याबाबतची माहिती ते मेंदू पाठवत असतात.
या अर्ध-वर्तुळाकार नलिकांमध्ये एक द्रव असतो. जेव्हा आपण डोक्याची हालचाल करतो, डोके वळवतो तेव्हा हे द्रव देखील हलतं.
यातून या अर्ध-वर्तुळाकार नलिकांना डोक्याच्या हालचालीची दिशा, वरच्या बाजूला किंवा खाली झुकणं, डावीकडे होणं किंवा उजवीकडे होणं आणि बाजूला वळणं यासारख्या गोष्टींचा बोध होतो.
सॅक्युल आणि युट्रिकल गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात. जेव्हा शरीर पुढच्या बाजूला हालतं, मागच्या बाजूला हलतं किंवा बाजूला होतं, वर किंवा खाली होतं तेव्हा सॅक्युल आणि युट्रिकल मेंदूला त्यासंदर्भातील संदेश पाठवतात.
मात्र जेव्हा तुमचे डोळे एक गोष्ट पाहतात आणि तुमच्या स्नायूंना दुसराच अनुभव होतो आणि तुमच्या कानाच्या आतील भागाला तिसऱ्याच गोष्टीची संवेदना होते, तेव्हा मेंदूला स्पष्ट संदेश मिळवण्या ऐवजी मिश्र स्वरूपाचे संदेश मिळतात.

फोटो स्रोत, Getty Images
संदेशांच्या या गोंधळामुळे मोशन सिकनेस ची समस्या निर्माण होते.
उदाहरणार्थ, समजा तुम्ही कारमध्ये बसून प्रवास करत आहात. तुमची कार पुढे जात असताना आजूबाजूला तुम्हाला अनेक वस्तू दिसत राहतात. त्यावेळेस तुमचे डोळे तुमच्या मेंदूला संदेश पाठवतात की तुमच्या शरीराची हालचाल होते आहे.
मात्र तुमच्या कानाच्या आतील भाग आणि तुमच्या स्नायू आणि सांध्यांमधील चेतातंतूंना या गोष्टीची संवेदना होते की तुम्ही अजूनही बसलेले आहात. म्हणजेच स्थिर आहात. त्यामुळे ते तशा प्रकारचे संदेश मेंदूला पाठवतात.
यातून मेंदूला विसंगत किंवा परस्परविरोधी संदेश मिळतात.

त्याउलट विमानात किंवा जहाजात असताना उलटी गोष्ट घडू शकते. तुमच्या कानाचा आतील भाग आणि स्नायूंना शरीराची हालचाल झाल्यासारखं वाटतं. मात्र समोर किंवा आजूबाजूला क्षितिज स्थिरच दिसत असतं.
त्यातून मेंदूला एक संदेश शरीराची हालचाल झाल्याचा दिला जातो तर दुसरा शरीर स्थिर असल्याचा दिला जातो.
त्याचा परिणाम म्हणून मळमळ होणं, डोकेदुखी, अस्वस्थ वाटतं आणि दिशेचं भान नसणं यासारखे त्रास होतात.
मोशन सिकनेसची लक्षणं काय असतात?
मोशन सिकनेस मुळे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं उद्भवतात.
सर्वसाधारणपणे ही लक्षणं हळूहळू जाणवू लागतात आणि ज्या हालचालीमुळे ती सुरू झाली आहेत ती हालचाल बंद झाली नाही तर ही लक्षणं फार मोठ्या प्रमाणात वाढत जातात.
अशी असतात लक्षणं,
- चक्कर येणं, डोकं हलकं पडल्याची संवेदना, तोल गेल्यासारखं वाटणं किंवा गरगरल्यासारखं वाटणं
- मळमळ होणं, आजारी असल्यासारखं वाटणं
- उलट्या
- डोकेदुखी
- निस्तेज त्वचा
- घाम येणं
- थकवा येणं
सर्वसाधारणपणे ही लक्षणं थांबवण्यासाठी किंवा तुमची स्थिती पूर्ववत होण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी लागतो.
मात्र गंभीर लक्षणं कमी होण्यासाठी 24 तास देखील लागू शकतात.
मोशन सिकनेसचा त्रास कोणाला होऊ शकतो?
मोशन सिकनेसचा त्रास कोणालाही होऊ शकतो. मात्र काहीजण इतरांच्या तुलनेत याबाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
उदाहरणार्थ 2 ते 12 वर्षादरम्यानची लहान मुलं, गरोदर महिला आणि ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास होता अशांना मोशन सिकनेसचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे लहान बाळांना मात्र मोशन सिकनेसचा त्रास अजिबात होत नाही. जॉन गोल्डिंग (John Golding) लंडनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठात उपयोजित मानसशास्त्राचे (applied psychology) प्राध्यापक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जॉन म्हणतात, लहान बाळांना मोशन सिकनेसचा त्रास न होण्यामागचं कारण त्यांच्या मेंदूचा डोळे आणि कान यांच्यातील परस्परसंबंध अद्याप निर्माण झालेला नसतो.
डोळे आणि कानाद्वारे शरीराच्या हालचालींचे संदेश मेंदूपर्यंत पोहोचवण्याची किंवा त्याची नोंद घेण्याची प्रक्रिया लहान बाळांमध्ये अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसते.
याशिवाय अनुवांशिकतेचीही मोशन सिकनेसमध्ये महत्त्वाची भूमिका असते. 65 टक्क्यांपर्यंत लोकांना मोशन सिकनेसचा त्रास अनुवांशिकतेतून होत असतो, असं प्राध्यापक गोल्डिंग म्हणतात.
मोशन सिकनेसची लक्षणं कमी कशी करावीत?
उपचारापेक्षा समस्येला केला जाणारा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो.
मोशन सिकनेसचा त्रास टाळण्यासाठीच्या काही टिप्स पुढीलप्रमाणे आहेत,
प्रवासापूर्वी:
- भरपेट जेवण, पचनास जड अन्न किंवा मसालेदार पदार्थ टाळा
- कॅफिन आणि अल्कोहोलचं मर्यादित सेवन करा
- भरपूर झोप घ्या
प्रवासात:
तुमची सीट किंवा बसण्याची जागा काळजीपूर्वक निवडा. कारमध्ये पुढील बाजूस बसा, बोटीत किंवा ट्रेनमध्ये मध्यभागी बसा, पुढील बाजूस पाहणाऱ्या खिडकीजवळच्या सीटवर बसा
- क्षितिजाकडे पाहा
- डोक्याची अचानकपणे होणारी हालचाल टाळा
- शक्य असेल तिथे खिडकी उघडून ताजी हवा घ्या
- वाचन करू नका, सिनेमा किंवा व्हिडिओ पाहू नका आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा
- संगीत ऐकणं किंवा इतर एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कृतीमध्ये तुमचं लक्ष गुंतवा
- डोळे बंद ठेवा
- भरपूर पाणी प्या
आलं (Ginger)
काही अभ्यासात असं आढळून आलं आहे की गोळी, बिस्किट किंवा आलं खाल्ल्यास उलटी आणि चक्कर येण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
मात्र प्राध्यापक गोल्डिंग म्हणतात की यासंदर्भात वेगवेगळे अभ्यास आहेत आणि त्यांचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात की जर आलं खाल्ल्यामुळे बरं वाटत असेल तर ते कदाचित, "त्यातील मुख्य औषधी घटक (active ingredient) पोट किंवा आतडे शांत राहण्यास उपयुक्त ठरत असेल. म्हणजेच आल्यामुळे मोशन सिकनेस ची समस्या थेट बंद होत नाही तर आलं खाल्ल्यामुळे तुम्हाला बरं वाटतं."
श्वासांचं नियमन किंवा संतुलित श्वासोच्छवास (Controlled breathing)
श्वास नियंत्रणात ठेवणं म्हणजे शांतपणे, स्थिर किंवा सामान्य गतीनं श्वास घेणं.
प्राध्यापक गोल्डिंग सुचवतात की श्वास स्थिर ठेवणं हे अर्धी अँटि-मोशन सिकनेस गोळी घेण्याइतकंच फायद्याचं असतं. शिवाय ते मोफत असतं आणि औषधांप्रमाणे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात.
श्वासोच्छवासामुळे मेंदू मोशन सिकनेसवरून विचलित होतो. तसंच त्यामुळे मळमळ देखील नियंत्रणात येते किंवा कमी होते, असं प्राध्यापक गोल्डिंग सांगतात.
अॅक्युप्रेशर आणि रिस्टबँड्स
अॅक्युप्रेशन (Acupressure)आणि रिस्टबॅंड्सचाही (wristbands) वापर मोशन सिकनेसमध्ये केला जाऊ शकतो.
अॅक्युप्रेशर बिंदूंवर दबाव टाकून ते उपयोगात आणता येतात. मात्र बहुतांश अभ्यासातून असं आढळलं आहे की बहुतांश लोकांसाठी ते प्रभावी नसतात.
औषधोपचार
अॅंटि-मोशन सिकनेस औषधांमुळे ही समस्या बरी होत नाही तर त्याची लक्षणं रोखली जातात. उदाहरणार्थ रक्तप्रवाहात कोणतंही औषध शोषलं जावं यासाठी प्रवासाआधी पुरेसा वेळ दिला जाणं आवश्यक आहे.
त्यामुळे साधारणपणे प्रवासापूर्वी 30 - 60 मिनिटे औषध घेतलं पाहिजे.


प्राध्यापक गोल्डिंग सांगतात, मोशन सिकनेस मुळे गॅस्ट्रिक स्टॅसिस (gastric stasis) होतो. पोटातील अन्नपदार्थ आतड्यांमध्ये जाण्यासाठी जेव्हा अधिक वेळ लागतो तेव्हा हे होतं.
त्यामुळे आजारी असताना तुम्ही जर गोळ्या घेतल्या तर त्या पूर्णपणे शरीरात शोषल्या जाणार नाहीत. साहजिकच अशा परिस्थितीत त्यांची परिणामकारकता कमी असेल.
गोळ्यांप्रमाणेच अॅंटि-मोशन सिकनेस पॅचेसचा देखील वापर केला जातो.
मात्र अॅंटि-मोशन सिकनेस पॅचेस गोळ्यांपेक्षा अधिक हळूहळू परिणाम करतात. कारण त्यातील औषध त्वचेद्वारे शोषलं जातं. त्यामुळे अॅंटि-मोशन सिकनेसचा वापर खूपच आधी केला पाहिजे. म्हणजेच प्रवासाला निघण्यापूर्वी जवळपास 10 तास आधी केला पाहिजे.
युके नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) याबाबतीत सल्ला देतं की पॅचेसचा वापर वयस्कांनी आणि 10 वर्षांवरील मुलांनी करावा.
मोशन सिकनेस आणि व्हर्टिगो यामध्ये काय फरक असतो?
मोशन सिकनेस आणि व्हर्टिगो (Vertigo) या दोन्हींमध्ये अनेकदा गोंधळ होतो. कारण त्यांची लक्षणं बरीचशी सारखीच आहेत. दोघांमध्येही चक्कर येणं, मळमळ वाटणं आणि उलट्यांचा त्रास होतो.
(व्हर्टिगो म्हणजे प्रचंड गरगरल्यासारखं होणं)
मात्र या दोन्हींमध्ये काही असंख्य गोष्टींचा फरक आहे:
- तुम्ही चालत्या वाहनात नसलात तरीही तुम्हाला व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो. तुम्ही लोळलेले किंवा आडवे पडलेले असलात तरीही हा त्रास होऊ शकतो.
- व्हर्टिगोमुळे प्रचंड प्रमाणात किंवा तीव्र स्वरूपात गरगरल्यासारखं होतं. तुम्ही जेव्हा डोकं हलवता तेव्हा हा त्रास होऊ शकतो.
- व्हर्टिगोचा त्रास अतिशय छोट्या कालावधीसाठी म्हणजे फक्त काही सेकंदांसाठी होतो
- व्हर्टिगो सामान्यपणे हा वयस्कांमध्ये आढळतो.
- कानाच्या आतील बाजूस असणाऱ्या द्रवात असलेल्या समस्यांशी सहसा व्हर्टिगोचा संबंध असतो. शरीराचा तोल सांभाळण्यात या द्रवाची भूमिका महत्त्वाची असते.
मोशन सिकेनसचा अनेकांच्या आयुष्यावर अतिशय नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो.
म्हणूनच मोशन सिकनेस ची लक्षणं हाताळण्यासाठी तयार राहणं आणि पुढचं नियोजन करणं कधीही चांगलं.
मोशन सिकनेसचे काही रुग्ण म्हणतात त्याप्रमाणे मोशन सिकनेसला तुमच्या आयुष्यावर ताबा घेऊ देऊ नका.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)











