'आई 9 महिने पोटात वाढवते, मग आपण डुप्लिकेट कशाला निघायचं', विद्रोही साहित्य संमेलनातील 2 दिवस

20 वे विद्रोही साहित्य संमेलन नांदेड येथे पार पडले.

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, 20 वे विद्रोही साहित्य संमेलन नांदेड येथे पार पडले.
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

"सरकारी स्कूल बंद पडल्या, शाळेत जाईना पिंट्या,

मागून नाही फायदा, खूप केल्या मागण्या विनत्या"

अक्षय पाईकराव या तरुणानं विद्रोही साहित्य संमेलनात सादर केलेल्या रॅप साँगमधील या काही ओळी.

20 वे विद्रोही मराठी साहित्य संमलेन नुकतेच नांदेडमध्ये पार पडले. 'भयंकराच्या दरवाजात कोण?' या नाटकानं 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी संमेलनास सुरुवात झाली.

मयूर शितोळे यांनी दिग्दर्शित केलेलं कवी नामदेव ढसाळांच्या कवितांवर आधारित हे नाटक. संमेलनाच्या मुख्य मंडपात नाटक सुरू झालं तेव्हा मंडप पूर्ण भरलेला होता.

नाटक सादरकर्ते 2 तरुण एकमेकांशी संवाद साधत होते.

त्यातल्या एकानं दुसऱ्याला म्हटलं, "देवावर काहीच बोलू नका, आधी नॉन बेलेबलची वेळ होती, आता डायरेक्ट बुलडोझर चढतो."

त्यांच्या या संवादावर उपस्थित लोकांकडून त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.

पुढे एकानं दुसऱ्याला प्रश्न केला, "कोण नामदेव ढसाळ?"

तर, त्याला उत्तर देताना, "तुला ढसाळ माहिती नाही, तर तुला काहीच माहिती नाही," असं उत्तर दुसऱ्यानं दिलं.

'भयंकराच्या दरवाजात कोण?' हे नाटक पाहण्यासाठी जमलेले लोक

फोटो स्रोत, Kiran Sakale

फोटो कॅप्शन, 'भयंकराच्या दरवाजात कोण?' हे नाटक पाहण्यासाठी जमलेले लोक

पुढे तरुणींनी नृत्य नाट्य सादर केलं.

'उंबऱ्याच्या पलीकडं जग असतं', हे त्यातलं वाक्य उपस्थितांना विचारप्रवृत्त करणारं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच नांदेडच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला वंदन करुन सांस्कृतिक यात्रा निघाली.

यावेळी आदिवासी बांधवांच्या ढोल, पावरी अशा पारंपरिक वाद्यांवर उपस्थित सगळेच थिरकत होते.

'इथं आदिवासी परंपरा मांडल्या जातात'

यात्रा निघाली तेव्हा अशोक रामसिंग गावित एका बाजूला पोस्टर घेऊन उभे होते. 'दैव नशिबा नाही थारा, मेंदू मनगट आमचा नारा,' असं त्यावर लिहिलं होतं.

अशोक नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या दापूर गावचे.

7-8 वर्षांपासून ते विद्रोही साहित्य संमेलनाला येतात. यंदाच्या संमेलनाला गावातून 5 जण आल्याचं त्यांनी सांगितलं.

अशोक रामसिंग गावित

फोटो स्रोत, Shrikant Bangale

फोटो कॅप्शन, अशोक रामसिंग गावित

अशोक म्हणाले, "विद्रोही साहित्य संमेलनात आदिवासी परंपरा मांडल्या जातात. इथले लोक आमच्या प्रश्नावर आम्हाला साथ देतात. सातबारा नावावर पाहिजे, जमीन नावावर पाहिजे, यासाठी आम्ही लढत आहेत. त्यासाठी हे लोक साथ देतात. म्हणून आम्ही इथे येतो."

'आम्ही सारे विद्रोही', असा जयघोष करत ही यात्रा किलोमीटरभर अंतरावर असलेल्या संमेलनस्थळाकडे जात होती.

अनेक जण लहान मुलांना घेऊन आले होते. लहान मुलांपासून ते 70-80 च्या आजोबापर्यंत सगळे यात्रेत सहभागी झाल्याचं दिसत होतं.

'विषमतावाद नाकारू, समतावाद स्वीकारू,' असं पोस्टर एका लहानग्याच्या होतं. यात्रेतले लोक त्याच्यासोबत फोटो काढत होते.

त्याच्यासोबत असणाऱ्या माणसाला विचारलं, तर ते म्हणाले, "हा लोकनाथ यशवंत यांचा नातू. अंतरिक्ष त्याचं नाव. 3 वर्षांचा आहे."

विद्रोही साहित्य संमेलनस्थळ, नांदेड

फोटो स्रोत, Kiran Sakale

लोकनाथ यशवंत हे प्रसिद्ध कवी असून त्यांच्या कवितांतून त्यांनी शोषितांचे, वंचितांचे प्रश्न मांडले आहेत. ते 20 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होती.

संमेलनस्थळी मुख्य प्रवेशद्वारापाशी यात्रा पोहचली, तेव्हा 'तुम्ही करा किती बी हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला,' या गाण्यावर तरुण नाचत होते.

संमेलनस्थळी महापुरुषांच्या प्रतिमा, रोहित वेमुलाचा पुतळा ठेवलेला दिसून आला.

संमेलनस्थळी मुख्य व्यासपीठावर एक मोठं बॅनर लावलेलं होतं. त्यावर महापुरुषांचे फोटो आणि 'मानवमुक्तीच्या लढवय्यांना जय भीम!' असं ठळक अक्षरात लिहिलेलं होतं.

'विचार आमचा, साहित्य आमचे, पैसेही आमचे'

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली, तेव्हा स्वागताध्यक्ष राहुल प्रधान यांनी कवी नामदेव ढसाळांची कविता म्हणून दाखवली.

'आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे', अशी नामदेव ढसाळांची ही माणसावरची कविता होती.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रतिमा परदेशी भाषणात म्हणाल्या, "विचार आमचा, साहित्य आमचे पैसेही आमचे, हा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. सरकारकडे एक रुपयाचीही याचना आम्ही केलेली नाहीये. एक मूठ धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी ही भूमिका घेत हे साहित्य संमेलन आज इथे संघटित झालंय."

पुढे त्यांनी त्यांच्या भाषणात अन्नामधील जात वर्चस्वाचा मुद्दा उपस्थित केला.

त्या म्हणाल्या, "तुम्ही जर अन्नात जात आणत असाल, तर आम्हीसुद्धा वशाट महोत्सव साजरा केल्याशिवाय राहणार नाही."

त्यांच्या या वाक्यावर त्यांना उपस्थितांकडून टाळ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

विद्रोही साहित्य संमेलनस्थळ, नांदेड

फोटो स्रोत, Shrikant Bangale

एव्हाना संमेलनस्थळी पुस्तकांचे स्टॉल्स लागले होते. अनेक लोक पुस्तक चाळत-चाळत त्यांची खरेदी करत होते. विचारपूस करत होते.

इथं आमची भेट 500 किलोमींटर अंतराहून, पुण्याहून आलेल्या काही तरुणांशी झाली.

त्यातली निहारिका नावाची तरुणी म्हणाली, "विद्रोही साहित्य संमेलन जितकं सांस्कृतिक, साहित्यिक असतं, तितकंच ते लोकविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवणारं असतं."

पुढे एका स्टॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या दिसून आल्या.

तिथं एकानं बाबासाहेब आंबेडकरांची एक मूर्ती दीड हजाराला खरेदी केली.

"ही मूर्ती अडीच हजाराची आहे. आम्ही बाबासाहेबांच्या मूर्तीचा भाव नाही करत. पण हे पहिलंच गिऱ्हाईक असल्यानं दीड हजाराला दिली," असं विक्रेता म्हणाला.

मुंबईच्या दादरहून हे विक्रेते आले होते.

'विद्रोहासाठी मेंदू लागतो'

एव्हाना संमेलनस्थळी मुख्य मंडपात अध्यक्ष लोकनाथ यशवंत यांचं भाषण सुरू झालं होतं.

ते त्यांच्या विदर्भ स्टाईलनं बोलत होते. विनोदी शैलीत त्यांचं भाषण सुरू होतं. त्यांच्या दर दुसऱ्या वाक्यावर त्यांना लोकांकडून टाळ्या मिळत होत्या.

आतापर्यंत मी अनुभवलेल्या साहित्य संमेलनांमध्ये लोकनाथ यशवंत यांचं भाषण अत्यंत वेगळं होतं. त्यांनी ना कोणता कोट घातला होता, ना चष्मा. साधं पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घालून ते बोलत होते.

अत्यंत सोप्या, साध्या मायभाषेत, बोलीभाषेत ते बोलत होते. त्यामुळे त्यांचं बोलणं लोकांना समजत होतं.

'प्रमाण' असं काहीही त्या बोलण्यात नव्हतं, म्हणून लोकांना ते चटकन समजत होतं. "विद्रोह खूप महत्त्वाचा असतो, कारण विद्रोहासाठी मेंदू लागतो," असं ते म्हणाले.

विद्रोही मराठी साहित्य संमेलनस्थळ, नांदेड

फोटो स्रोत, Shrikant Bangale

लोकनाथ यशवंत MSEB मध्ये बाबू म्हणून काम करायचे. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालंय.

"कलावंतांच्या कोट्यातून म्हणजेच कवितेमुळे मला नोकरी लागली. 32 वर्षे बाबू म्हणून नोकरी केली. कधी प्रमोशन घेतलं नाही, कारण मला माझं शहर सोडायचं नव्हतं," असं ते म्हणाले.

आपण आपल्या डोळ्यांनी जग पाहिलं पाहिजे, हा त्यांच्या भाषणातला अत्यंत महत्त्वाचा संदेश.

लोकनाथ म्हणाले, "माझी धारण ही आहे की, आपली आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते. मग मोठं करते. तिचं स्वप्न असते की माझा मुलगा ओरिजिनल निघेल, मग आपण डुप्लिकेट कशाला निघायचं?

आपल्या आईला हिशेब द्यायचा आहे आपल्याला. स्वतःच्या डोळ्यानं दुनिया बघा. दुसऱ्याच्या डोळ्यानं दुनिया कशाला बघायची?"

अन्याय झाला की ठोकून काढलाच पाहिजे, हे मी माझ्या कवितेतून मांडल्याचं ते म्हणाले.

संध्याकाळी संमेलनस्थळी मोठी गर्दी जमली होती. काही जण पुस्तक खरेदी करत होते. काही जण गप्पा करत होते. शेजारच्या मंडपात सुरू असलेल्या कविता वाचन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

निर्वासितांच्या, शेतकऱ्यांच्या वास्तवाचं चित्रप्रदर्शन

इथंच आमची भेट 30 वर्षांच्या नवनाथ रेपे या तरुणाशी झाली. नवनाथ बीडच्या अंजनडोह गावचे. त्यांचं हे 5 वं विद्रोही साहित्य संमेलन. त्यांच्या गावातून 15 लोक गाडी करुन संमेलनासाठी आलेले.

इथं का यावंसं वाटतं, या प्रश्नावर ते म्हणाले, "इथं मानवतावादी विचारधारा, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचा जागर केला जातो आणि आमचे जे प्रश्न आहे त्याच्यावर विचार मंथन केले जाते.

शेतकऱ्यांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न यावर चर्चा केली जाते."

नवनाथ रेपे

फोटो स्रोत, Shrikant Bangale

फोटो कॅप्शन, नवनाथ रेपे

नवनाथ रेपे यांचे आई-वडील शेती करतात. तर नवनाथ कारखान्यावर काम करतात.

नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गाव काही दिवसांपूर्वी पाण्याखाली गेलं होतं. लेखिका सारिका उबाळे यांनी हसनाळमधील नागरिकांच्या मनावरील जखमा चितारणारं चित्रप्रदर्शन भरवलं होतं.

त्याच्याशेजारीच माझा शेतकरी या नावानं नानू नेवरे यांच्या छात्रायचित्रांचं प्रदर्शन होतं. या छायाचित्रांतून शेतकऱ्यांच्या करुण कहाणीची, दारुण परिस्थितीचं वर्णन करण्यात आलं होतं.

'विद्रोही संमेलन हे ज्ञानाचं भांडार'

काही वेळानं आमची भेट निंबाबाई ब्राह्मणे यांच्याशी झाली. त्यांनी लुगडं परिधान केलं होतं. त्यांच्या कपाळावर मोठं कुंकू होतं.

निंबाबाई या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या खोरी गावच्या. 65-70 च्या दरम्यान वय असल्याचं त्यांनी सांगितलं.

निंबाबाई म्हणाल्या, "विद्रोही संमेलन हे ज्ञानाचे भांडार आहे. इथं आंबेडकर आणि महापुरुषांचे विचार डोक्यात फिट होतात. हे विचार गावात जाऊन आम्ही बाकी बायायला सांगतो."

जालना वगळता आतापर्यंत पार पडलेल्या 19 विद्रोही साहित्य संमेलनांना उपस्थित राहिल्याचं त्या सांगतात. पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाची आठवण आजही त्यांच्या लक्षात आहे.

निंबाबाई ब्राह्मणे

फोटो स्रोत, Kiran Sakale

फोटो कॅप्शन, निंबाबाई ब्राह्मणे

"पहिल्या संमेलनाला आम्ही गावातून मूठभर धान्य आणि एक रुपया वर्गणी जमा केली होती," त्या सांगतात.

निंबाबाई शेती करतात. त्यांच्या गावातून 11 लोक संमेलनासाठी आले होते.

"आम्ही गावातून गाडी करून मालेगावपर्यंत आलो. तिथून बसने मनमाड पर्यंत आलो. मनमाडहून नांदेडला रेल्वेनं आलो. संमेलन झालं की परत जाणार," असं त्या म्हणाल्या.

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी आदिवासी वाद्य आणि समूह नृत्याचा कार्यक्रम पार पडला. नंदुरबार येथील 'सत्यशोधक कला पथका'ने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

नंदुरबार येथील कलापथक समूह नृत्य करताना

फोटो स्रोत, Kiran Sakale

फोटो कॅप्शन, नंदुरबार येथील कलापथक समूह नृत्य करताना

यावेळी ढोल, पावरी, शिबली, काठी या पारंपरिक आदिवासी वाद्यांवर उपस्थितांनी नृत्याचा आनंद घेतला.

शेजारच्या मुख्य मंडपात धोतर-टोपी घातलेली एक व्यक्ती कविता सादर करत होती. भगवानदास असं त्यांचं नाव.

"व्यसनमुक्त होईल तरुण तेव्हा वाढेल शान भारताची, अन्याय विरुद्ध पेटेल तरुण तेव्हा वाढेल शान भारताची," अशा आशयाची त्यांची कविता होती.

पुस्तकांच्या स्टॉलवर आम्ही काही विक्रेत्यांशी चर्चा केली. गेल्यावेळच्या साहित्य संमेलनापेक्षा यंदा वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं ते म्हणाले.

संमेलनस्थळी मुख्य मंडपात AI पासून ते शेतकरी आत्महत्यांपर्यंत, पायल तडवी-रोहित वेमुलापासून ते गलगोटीयापर्यंत अशा वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा सुरू होती.

संमेलनस्थळाच्या प्रवेशद्वारापाशी लावलेल्या चहाच्या स्टॉलकडे आम्ही निघालो. तेव्हा एका बाजूला लावलेल्या मंडपात जेवणाची व्यवस्था केलेली दिसून आलं. संमेलनासाठी आलेले लोक तिथं जेवत होते.

जल, जंगल आणि जमिनीसाठीची लढाई

इथं करणसिंग कोकणी हे त्यांच्या गावकऱ्यांसोबत चर्चा करताना दिसून आले.

करणसिंग हे नंदुरबारच्या खोलविहीर गावचे शेतकरी. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे ते अध्यक्ष.

ते म्हणाले, "नंदुरबार, नाशिक आणि धुळे इथून 187 आदिवासी बांधव आले आहेत. विद्रोही संमेलनात जे काही होते, ते गावात जाऊन सभा घेऊन आम्ही लोकांना सांगतो."

"12 मार्चला धुळ्याहून पायी लाँग मार्च निघणार आहे. आम्ही जी जमीन कसतो, तिचा सातबारा आम्हाला मिळाला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांसाठी योजना आहे त्या आदिवासींना मिळाल्या पाहिजेत, अशा आमच्या मागण्या आहेत," असं ते पुढे म्हणाले.

करणसिंग कोकणी त्यांच्या गावकऱ्यांसोबत

फोटो स्रोत, Kiran Sakale

फोटो कॅप्शन, करणसिंग कोकणी त्यांच्या गावकऱ्यांसोबत

एव्हाना संध्याकाळी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांचं 'शाहिरांचं गणराज्य' या विषयावरील संगीत व्याख्यान सुरू झालं होतं.

यावेळी ते म्हणाले, "सत्य लपवता येते पण ते संपवता येत नाही. म्हणून प्रत्येकाने असत्याचे शोधक व्हायला पाहिजे. जे खोटे आहे ते सांगायला हिंमत लागते."

आताच्या पत्रकारितेवरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, "पत्रकारितेत सांगतात की, कुत्रा माणसाला चावला की बातमी होत नाही. माणूस कुत्र्याला चावला की बातमी होते. आता दोन्ही बातम्या होत नाही. कारण दोघांची महायुती झाली आणि कुणीच कुणाला चावा घेत नाही. अशी स्थिती झालीय."

उपस्थित लोक मंत्रमुग्ध होऊन ज्ञानेश महारावांना ऐकत होते.

विद्रोही साहित्य संमेलनात भेटलेले अनेक जण आजच्या पत्रकारितेविषयी बोलत होते. चिंता व्यक्त करत होते. पत्रकारितेत लोकांच्या खऱ्या प्रश्नांना स्थान हवं, असा आग्रह करत होते.

संमेलनस्थळावरची संध्याकाळ.

फोटो स्रोत, Kiran Sakale

फोटो कॅप्शन, संमेलनस्थळावरची संध्याकाळ.

संमेलनस्थळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिलीप चव्हाण मराठी भाषेच्या व्याकरणाविषयी बोलत होते.

भाषेच्या व्याकरणात अडकून पडल्यामुळे मराठीचं आणि सामान्यांचं मोठं नुकसान झाल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अहिल्यानगरमधील सौंदाळा गावानं जातमुक्तीचा ठराव नेमकाच पारित केलाय. यामुळे विद्रोही साहित्य संमेलनात सौंदाळा गावच्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला.

'वैचारिक क्रांती'

संमेलनस्थळातून बाहेर पडताना आमची भेट दोन तरुणींशी झाली. दोघींचंही हे पहिलंच विद्रोही साहित्य संमेलन.

यातली दिपाली साळवे ही मुंबईहून आलेली. ती पीएचडीची विद्यार्थिनी आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाविषयी बोलताना दिपाली म्हणाली, "इथं जातीचे विषय घेतले जातात, महापुरुषांचे विचार मांडले जातात. तरुणाई येऊन त्यांना ऐकते. इथं वक्त्यांना ऐकलं की तरुणांच्या प्रश्नांविषयी जागरुकता वाढते."

दिपाली साळवे आणि भाग्यश्री बोईवारे

फोटो स्रोत, Kiran Sakale

फोटो कॅप्शन, दिपाली साळवे आणि भाग्यश्री बोईवारे

भाग्यश्री बोईवारे ही नांदेडची. ती म्हणाली, "बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "Cultivation of mind should be the ultimate goal of human being. त्यामुळे मला वाटलं की या संमेलनाला यायला पाहिजे. इथं मी जी वैचारिक क्रांती पाहिली, अनुभवली, ती कायमस्वरुपी लक्षात राहिल."

अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची, आपल्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवण्याची हीच वैचारिक क्रांती सोबत घेऊन लोक विद्रोही साहित्य संमेलनातून आपापल्या गावाकडे परत जातात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)