नारायण सुर्वे: 'अनाथ' म्हणून जन्मलेला आणि 'पृथ्वीच्या पाठीवर नाव सोडून गेलेला' कवी

फोटो स्रोत, Doordarshan/screen Grab
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'मला माहीत नव्हतं की हे नारायण सुर्वेंचं घर आहे. जर माहीत असतं तर मी या घरात कधीच चोरी केली नसती. मी तुमच्या घरातून चोरलेल्या वस्तू परत करत आहे. सॉरी.'
जुलै 2024 मध्ये आलेल्या बातमीतील हा मजकूर. ख्यातनाम मराठी कवी नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी झाली. चोराने आधी वस्तू देखील चोरल्या होत्या पण दुसऱ्यांदा चोरी करताना त्याच्या लक्षात आलं की आपण नारायण सुर्वेंच्याच घरात चोरी केली. त्याचा नंतर त्याला पश्चाताप झाला आणि त्याने माफी देखील मागितली.
या आगळ्या वेगळ्या चोरीने आणि चोराचे झालेल्या मतपरिवर्तनाची चर्चा वर्षभराखाली चांगलीच रंगली होती. अनेक मोठमोठ्या साहित्यिकांच्या घरी चोऱ्या झाल्या आहेत. बऱ्याचदा पुस्तकांशिवाय आणि काही ट्रॉफींशिवाय नसल्यामुळे चोर वैतागून कसे परतले याचे किस्से सभा-संमेलनात चवीने सांगितले जातात.
एकदा तर चक्क रविंद्रनाथ टागोरांचे नोबेल पारितोषिक पदकच चोरीला गेले. ते आजतागायत सापडले नाही. पण नारायण सुर्वेंच्या घरी झालेल्या चोरीचा किस्सा मात्र या चोऱ्यांहून वेगळा आहे कारण चोराने चिठ्ठी लिहिली आणि सुर्वेंच्या घरी चोरी केल्याचं लक्षात आल्यावर त्याने माफी मागितली.
घरफोडी करुन चोरी करणे अर्थातच गुन्हा आहे आणि त्याची कायद्याने शिक्षा ठरवलेली आहे हे वास्तव जरी असले तरी नारायण सुर्वे हे तळागाळाच्या लोकापर्यंत कसे पोहचलेत त्याचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
(15 ऑक्टोबर) आज नारायण सुर्वेंचा जन्मदिन आहे. हे वर्ष नारायण सुर्वेंचे जन्मशताब्दीचे पदार्पण वर्ष म्हणून साजरे होते आहे. 99 वर्षांपूर्वी गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराला गिरणगावात एक सोडून देण्यात आलेला मुलगा सापडला. त्या मुलाला गंगाराम सुर्वेंनी आपले नाव दिले आणि वाढवले.
हा मुलगा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढला, हाती पडेल ते काम त्याने केले, चळवळीत काम केले आणि कवी म्हणून नावारूपाला आला, असं जर नव्या पिढीतील मुला-मुलांना सांगितलं तर कदाचित खरं देखील वाटणार नाही. पण याच मुलाने साठोत्तर मराठी कविता सातासमुद्रापार नेली.
'माझे विद्यापीठ'
नारायण सुर्वेंनी किती कविता लिहिल्या असतील बरं? 145 हो अगदी खरंय. त्यांच्या समग्र कवितेचं पुस्तक ज्यात त्यांचे चारही कविता संग्रह आणि काही नंतर सापडलेल्या कविता, ज्याला 'गवसलेल्या कविता' असं म्हटलंय, हे पुस्तक देखील 260 पानांचं आहे. इतकी कमी संख्या असलेल्या कवीने महाराष्ट्राला वेड कसे लावले असेल, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
पण त्यांची एक एक कविता हीच एखाद्या महाकाव्याहून कमी नाहीये हे देखील तितकं खरंय.
असं म्हटलं जातं की एक चित्र हे हजार शब्दांहून जास्त प्रभावशाली असतं. पण जेव्हा हे शब्द नारायण सुर्वेंचे असतात तेव्हा असं म्हणावं वाटतं की त्यांचा एक एक शब्द हा हजार चित्रांहून अधिक प्रभावशाली आहे. कारण मोजक्याच शब्दात ते जे चित्र आपल्या डोळ्यासमोरच उभं राहत नाहीत तर ते थेट अंतःकरणात जातं.
या दोनच ओळी वाचा ना..
ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते; मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.
सुर्वेंच्या माझे विद्यापीठ या कवितेतील ओळी. या कवितेतून त्यांनी त्यांचं बालपण ते तरुणपण हे सारंकाही सांगितलं आहे. त्या कवितेच्या या पहिल्या दोन ओळी आहेत.
एका बाजूला आपलं कुणीच नाही आणि त्याचबरोबर सारं काही आपलंच होतं हे सांगण्यासाठी त्यांनी दोन ओळी लिहिल्या आणि आपण थेट मुंबईतल्या त्या रस्त्यांवर त्यांच्यासोबतच आहोत असा भास होऊ लागतो. पुढे ते वर्णन करतात की कसं याच रस्त्यांनी, याच रस्त्यावरील लोकांनी आपल्याला शिकवलं आहे आणि तेच आपलं विद्यापीठ आहे.

फोटो स्रोत, Dimple Publication/ Book Cover
सुर्वेंचं शालेय शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालं होतं आणि ते देखील अनेक अडचणी असताना. पण त्यांचं खरं शिक्षण हे याच विद्यापीठात झालं, ज्यांना त्यांनी 'माझे विद्यापीठ' नाव दिलं आहे.
'अनाथ' म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीने सारा समाजच आपला केला. हे करत असताना त्यांना किती सोसावे लागले असेल, किती अवहेलना वाट्याला आली असेल पण असं होताना त्यांच्यातली माणुसकी आटली नाही.
आपल्या जन्माच्या प्रसंगाबद्दल लिहिताना ते म्हणतात, "मी अनाथ मुलगा म्हणूनच जन्माला आलो. ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. भूषणास्पद नाही. मी हा मजकूर लिहीत असतानाही शेकडो आया आजही विषण्ण अंतःकरणाने हॉस्पिटलमध्ये, रस्त्याच्या कडेला किंवा रानाशेतातून अशा हजारो अर्भकांना जन्म देऊन मोकळ्या होत असतील. त्यांना तेव्हा काय वाटत असेल हे आपण तर्कानेही जाणू शकतो. ही जन्मदात्री आई तेव्हा माझी नाळ कापून, माझ्यापासून अलग झाली असेल तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटले असेल.
"भीषण वादळात सापडलेल्या ज्योतीसारखी ती थरथरत कावरीबावरी होत शरमिंदी झाली असेल. स्त्रीला आपले बाळंतपण जर सुखावह वाटत नसेल तर तिला त्याच्यासारखा मोठा शाप नाही; अशी स्त्री ह्या कुबट जगावर थुंकेल तरी, नाहीतर सारी पोरे माझीच आहेत अशी माया तरी लावेल, दुसरा तिला पर्याय नाही. तिने पुढे काय केले असेल हे तिचे तिलाच ठाऊक."(संदर्भ- नारायण सुर्वेंची समग्र कविता, मनोगत, पॉप्युलर प्रकाशन.)
जर एखाद्या व्यक्तीची जगण्याची सुरुवात अशी झाली असेल तर त्या व्यक्तीमध्ये किती कटुता येईल. पण त्यांच्या जगण्यात आणि काव्यात ही कुठेही दिसत नाही. उलट सुर्वेंनी आपल्यासारख्यांचे दैन्य दुःख आपल्या काव्यातून जगासमोर आणले. त्यांच्या दुःखावर फुंकर घातली.
सुर्वे हे अगदी लहान वयापासूनच मुंबईतील गिरणी कामगारांमध्ये वाढले. त्या लोकांचे सुख-दुःख हे सुर्वेंचेच झाले. त्यामुळे ते दूर करण्यासाठी आपल्यालाच चळवळीवाचून पर्याय नाही हे ओळखून अगदी लहान वयापासून ते कामगार चळवळीशी जोडले गेले.

फोटो स्रोत, Sahitya Akadami/Documentary Screen Grab
चळवळ आणि सुर्वेंची कविता यामुळेच वेगळे होऊ शकत नाही. त्यावेळचे कामगार नेते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेते, लोकशाहीर या सर्वांशी त्यांचा जवळून संबंध आला.
चळवळीची पत्रकं वाटणे, भाषण करणे, मतदान कसं करायचे याचे कामगारांना प्रात्यक्षिक देणे, त्यांच्यासाठी गाणी लिहिणे, पोस्टर चिटकवणे हे करत असतानाच सुर्वेंमधील प्रतिभावंत कवी जागृत होत गेला आणि त्याचे दर्शन पुढे अवघ्या महाराष्ट्राला घडले.
'त्या काळी माझा प्रेमविवाह झाला आहे'
त्यांच्याच चाळीत राहणाऱ्या कृष्णाबाई यांच्याशी नारायण सुर्वेंचा विवाह झाला. आपल्या विवाहाबद्दल सांगताना सुर्वे यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "माझा 52 वर्षांखाली प्रेमविवाह झाला होता. आजही आम्ही आनंदाने आणि प्रेमाने जगतो माझी कविता ही संसार केलेल्या माणसाची कविता आहे असं म्हटलं जातं. पण संसार करण्यासाठी प्रेम हे लागतं ना. प्रेमाच्या अनेक जाती आहेत त्यात माझी कविता देखील आहे."
लग्नावेळी सुर्वे हे गिरणीत कामगार होते आणि सोबतच चळवळीचे काम करायचे. कृष्णाबाई यांच्या आई-वडिलांचेही लहानपणीच निधन झाले होते. त्या आपल्या काकांच्या घरी राहत. त्यांचे काका हे चळवळीत काम करायचे. नारायण सुर्वे यांचे त्यांच्या घरी जाणे-येणे असायचे.
नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई यांनी जेव्हा विवाहाचा निर्णय घेतला तेव्हा ती गोष्ट कृष्णाबाईंच्या काकाला आवडली नाही. नारायण सुर्वेंना आई-वडील नाहीत, ते नेमके कोण आहेत, जात-पात काय हा मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटला.
पण कृष्णाबाई या आपल्या निर्णयावर ठाम होत्या आणि त्यांनी सुर्वेंशी लग्न केले. लग्न केल्यानंतर झोपडीवजा घरात त्यांचा संसार सुरू झाला.
काही महिन्यांनी सुर्वेंना शाळेत शिपाई म्हणून नोकरी लागली. नंतर कृष्णाबाईंना देखील शिपाई म्हणून नोकरी लागली. अशा परिस्थितीतही सुर्वेंचे लिखाण, वाचन आणि चळवळीची काम सुरू होते. त्यांच्या कविता नियतकालिकांमधून छापून येत असत. सुर्वेंचे नाव साहित्य क्षेत्रात चमकू लागले होते पण त्यांची आर्थिक स्थिती मात्र या काळात नाजूकच होती.
तेव्हा सुर्वे हे तिसरी शिकलेले होते. पण वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे अनेक संदर्भ त्यांना माहीत असत, ते आपल्या सहावीत शिकणाऱ्या मुलाला इतिहास शिकवू लागले. हे पाहिल्यावर कृष्णाबाईंना वाटले की जर सहावीच्या मुलाला हे शिकवू शकत असतील तर त्यांनी पुढे शिकायला काय हरकत आहे. त्यांनी सुर्वेंना तसं सुचवलं. सुर्वेंनी देखील सातवीची परीक्षा दिली.
सातवी पास झाल्यानंतर त्यावेळी आजच्या डीएडच्या समकक्ष असलेल्या कोर्सला ॲडमिशन मिळायचं. सुर्वेंनी आपली नोकरी सांभाळून तो कोर्स पूर्ण केला आणि ज्या ठिकाणी ते शिपाई म्हणून काम करायचे त्याच ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्त झाले. कृष्णाबाई या त्यांना आधीपासूनच मास्तर म्हणत असत. त्या म्हणतात 'मास्तर हे आज खरंच मास्तर झाले होते.'

फोटो स्रोत, Popular Publication/Book cover
सुर्वेंचे लेख, कविता प्रसिद्ध नियतकालिकांमधून छापून येत असत पण त्यांचे अद्याप पुस्तक प्रकाशित झाले नव्हते. त्यांनी आपल्या मनातील इच्छा कृष्णाबाईंना बोलून दाखवली. कृष्णाबाई म्हणाल्या तुम्ही हे करायला हवं.
त्यावर सुर्वेंनी पैशांची अडचण सांगितली. कृष्णाबाईंनी आपल्याकडचे मंगळसूत्र त्यांना दिलं आणि विकून टाकायला सांगितलं.
त्यात आलेल्या पाचशे रुपयांमधून त्यांनी 'ऐसा गा मी ब्रह्मा' हे पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले आणि एक हजार रुपये देखील मिळाले तर त्याच पैशांतून सुर्वेंनी पत्नीसाठी दागिने केले.
सुर्वेंनी आठवणीने आपल्यासाठी पुन्हा मंगळसूत्र केले हाच माझ्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचं कृष्णाबाई आपल्या 'मास्तरांची सावली' या आत्मचरित्रात म्हणतात.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
पुढे सुर्वेंचा 'माझे विद्यापीठ' कविता संग्रह प्रकाशित झाला. याची तर अनेक भाषांमध्ये भाषांतरं झाली. सुर्वेंना एका पाठोपाठ कवी संमेलनाची आमंत्रणं येत असत. त्यांना भरपूर प्रसिद्धी, पुरस्कार मिळाले. त्याकाळी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार' त्यांना 1973ला मिळाला होता.
हा पुरस्कार सुर्वेंच्या आधी मदर तेरेसा, हरवंश राय बच्चन, सत्यजीत रे, कैफी आजमी आणि फिराक गोरखपुरी या दिग्गजांना मिळाला होता. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदा विदेशात प्रवास केला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना 'वर्ल्ड रायटर्स कॉन्फरन्स'चे निमंत्रण मिळाले होते. त्यासाठी ते रशियाला गेले होते.
1995 मध्ये परभणी येथे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. तर 1998 ला त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सुर्वे आणि कष्टकरी वर्ग
नारायण सुर्वेंनी प्रामुख्याने कष्टकरी वर्गावर लिहिले. जो श्रम विकतो तो श्रमकरी, कष्टकरी असं ते म्हणायचे. कधी कुणी शारीरिक श्रम विकतो तर कधी कुणी बौद्धिक श्रम विकतो त्यामुळे जितका जिव्हाळा त्यांना मिलमध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगाराबद्दल होता तसाच कारकून, शाळा मास्तर यांच्याबद्दल होता.
सुर्वेंच्या निमित्ताने कष्टकरी वर्गाची भाषा ही मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आली. त्यांच्या कवितेबद्दल कुसुमाग्रजांनी 'ऐसा गा मी ब्रह्म' च्या प्रस्तावनेत म्हटले होते, "श्री. नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी केवळ समरस झालेले नव्हते, तर ते जीवन प्रत्यक्षात अनुभवणारे कवी आहेत."
पुढे कुसुमाग्रज म्हणतात की 'जातिपातींच्या तटबंदीमध्ये मराठी साहित्यात तोचतोचपणा आला आहे. हे मोडून काढण्याचे अनेक स्तरावर यासाठी साहित्यात प्रयत्न होत आहेत आणि सुर्वेंचा हा प्रयत्न अभिनंदनीय आहे.'
'सुर्वे हे मार्क्सवादी आहेत, कधीकधी त्यांच्या साहित्यातही ते दिसतं,' अशी टीका त्यांच्यावर अनेकवेळा झाली आहे. परंतु आपल्या वैचारिक निष्टा त्यांनी कधीही लपवून ठेवल्या नव्हत्या.
अत्यंत अभिमानाने 'मारकस बाबा' म्हणजे कार्ल मार्क्सची ओळख आपल्याला कशी झाली यावर त्यांनी कविता केली आहे. सुर्वे हे चळवळीशी जोडले गेलेले होते तरी त्यांची कविता कधीही प्रचारकी झालेली नाही. सुरुवातीपासूनच त्यांच्या साहित्याचे केंद्र हा माणूसच आहे. त्यामुळेच ते जात-पात, वर्ग एवढंच काय तर भाषांची बंधनं मोडून जनमानसांपर्यंत पोहचले.
आपल्या मनोगतात नारायण सुर्वे म्हणतात, "मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करुन जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा या पृथ्वीच्या पाटीवर एक नाव ठेवून जाईन- ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे."
त्यांचे हे नावच त्यांच्या कर्तृत्व आणि काव्यासोबत अजरामर झाले असल्यामुळे कदाचित त्या चोराला आपण चुकलो ही जाणीव झाली असेल म्हणून त्याने 'सॉरी' म्हटले असावे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











