नामदेव ढसाळ : अगणित सूर्य लेखणीने पेटवणारा चळवळीतला विद्रोही कवी

फोटो स्रोत, BBC Hindi
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी, मरेपर्यंत राहायचं का युद्धकैदी?
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता शहराशहराला आग लावत चला - 'गोलपिठा' - कविता संग्रहातून
नामदेव ढसाळ म्हटलं की समोर येतो तो फ्रेंच कट असलेल्या माणसाचा हसरा चेहरा आणि रंगबिरंगी शर्ट. हे जरी दर्शनी रूप असलं तरी या माणसाची खरी ओळख काय या गूढाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे.
जसा प्रश्न नामदेव ढसाळांनी आपल्या कवितेतून विचारला, 'तुही यत्ता कंची, तुही यत्ता?' असाच प्रश्न मला स्वतःला अनेकदा विचारावा वाटतो. 'तुला कंचा नामदेव जास्त आवडतो साहित्यिक की चळवळीतला, कंचा नामदेव?'
असाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सातत्यानं पडला आहे म्हणून वाटलं की आज आपणही आपल्या परीने याचा शोध घेऊया.
नामदेव ढसाळ कवी आहेत की दलित चळवळीचे नेते म्हणजेच 'पँथर' आहेत की या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा शोध अनेकांनी यथाशक्ती घेण्याचा प्रयत्न केला. पण ढसाळच स्वतः संवाद कार्यक्रमात राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगतात की 'माझ्याजवळ हे द्वैतच नाही. कविता करणं ही माझी राजकीय कृतीच आहे. तर चळवळीतले काम करताना देखील कविता माझ्या मनात कुठे ना कुठे सुरूच असते. मंडपासाठी खांब रोवताना सुद्धा माझ्या डोक्यात कविता सुरू असू शकते.'
ढसाळ म्हणत असत की 'मला अशी एक कविता करायची आहे जी वाचल्यावर ती व्यक्ती 24 तास फक्त त्याच विचारात राहील'. पण त्यांनी अशी एकच नाही तर शेकडो कविता केल्या आहेत ज्या वाचल्यावर अनेक दिवस त्या कविता तुमच्या मेंदूत घर करून बसतात.
ज्या व्यवस्थेविरोधात ढसाळांनी एल्गार पुकारला होता त्याच व्यवस्थेनं पुरवलेल्या ऐवजांवर आपला पिंड पोसला असल्याची जाणीव ते निदान एकदा तरी तुम्हाला करुन दिल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.
'जात व्यवस्था-वर्ग व्यवस्था तोडण्याचं काम हे केवळ एकट्या दुकट्या जातीनं एकत्र येऊन होणार नाही. त्यासाठी सर्व समाजानंच एकत्र येऊन हे बंधन झुगारायला हवं,' हा उद्देश घेऊनच त्यांनी कविताही लिहिली आणि चळवळीचं कार्यही केलं.

फोटो स्रोत, BBC Hindi
नामदेव ढसाळ जर आज असते तर त्यांनी आज 76 वर्षांत पदार्पण केलं असतं. त्यांच्या निधनाला 11 वर्षं झाली. ते असताना आणि नंतर देखील जागतिक स्तरावर मराठी कविता पोहचवणारा अशीच त्यांची ख्याती होती.
2001 साली बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवणं असो किंवा अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड असो, यातून त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व स्पष्ट होतं. साहित्यामुळं जग हादरवता येतं की नाही यावर वाद असू शकतात, पण नामदेव ढसाळ वाचलेल्यांचं सांस्कृतिक जग त्यांनी नक्कीच हादरवून सोडलं.
ढसाळ 64 वर्षांचं आयुष्य जगले. जे त्यांनी पाहिलं जगलं तेच त्यांनी लिहिलं आणि त्यांनी जे लिहिलं ते जगले. अशी व्यक्ती सापडणं खरंच दुर्मीळ असतं.
जरी नामदेव ढसाळांनी त्यांच्या आयुष्याचा पट सर्वांसमोर खुलेपणानं मांडला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं गूढ काही केल्या संपत नाही हे देखील तितकंच खरं आहे. त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या चळवळीतील कार्याबद्दल, त्यांच्या चित्रकलेबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आधीची पिढी आकर्षित झालीच आहे पण येणाऱ्या पिढ्या देखील होतच राहतील यात शंका नाही.
नामदेव ढसाळांचे 'शापित बालपण'
'बालपणीचा काळ सुखाचा' असं अनेक लेखक कवी म्हणताना दिसतात. पण जातिव्यवस्थेमुळं आपलं बालपण शापित गेल्याचं ते म्हणतात. पुण्यातील खेड तालुक्यातील (आताचे राजगुरूनगर) कनेरसर-पूर या गावात त्यांचा जन्म झाला. तत्कालीन उच्चवर्णीयांची चाकरी करण्याचं काम त्यांच्या कुटुंबाकडं होतं. गावात दवंडी पेटवणं, निरोप पाठवणं, लाकडं फोडणं, रखवाली करणं अशा कामांची जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर होती.
त्यांचे वडील मुंबईत नोकरी करत होते. ढसाळ हे आईसोबत गावी राहत असत. लहानपणीच त्यांच्या वाट्याला काम करणं आलं. हसण्या-बागडण्याच्या वयातच या जबाबदारीचं ओझं आणि त्यातून होणारा अपमान-अवहेलना देखील त्यांच्या वाट्याला आली. जातीचं वास्तव हे लहानपणीच आपल्याला कळल्याचं ते आपल्या लिखाणात नमूद करतात. त्यांची 'हाडकी हाडवळा' ही कादंबरी त्यांच्या याच अनुभवांवर आधारित आहे.
अस्पृश्य समाजानं ठरवून दिलेल्या घरी जाऊन भाकरी मागावी असा नियम त्याकाळी होता. असं भाकरी मागायला जाणं ढसाळांना आवडत नसे आणि त्यांच्या आईंना देखील. पण आपण आपला धर्म सोडू नये असं त्या म्हणायच्या. त्यामुळे ढसाळांना ते करावंच लागे.
डोक्यावर भाकरीचे टोपले घेऊन ऊन-पावसाची पर्वा न करता त्यांना भाकरी मागण्यासाठी अनेक मैलांची पायपीट करावी लागायची. अनेक वेळा तर पदरात शिव्यांशिवाय काहीच पडायचं नाही, पण त्यातही असं व्हायचं की सवर्णांनी पाळलेली कुत्री अंगावर यायची. त्यांना बाजूला करेपर्यंत या भीषण प्रसंगाला समोर जाण्याशिवाय गत्यंतर नसायचं.

फोटो स्रोत, Vikrant Bhise
लहानग्या नामदेवला शाळा देखील आवडत नसे. याचं कारण म्हणजे तथाकथित सवर्णांच्या मुलांसाठी वेगळी जागा आणि अस्पृश्य समाजातील मुलांसाठी वेगळी जागा असायची. मास्तरांचे लक्ष या मुलांकडे जायचेच नाही. मास्तर देखील सवर्णांच्याच मुलांना वाचायला सांगायचे.
एकवेळा ढसाळ म्हणाले की, 'मास्तर कधी आम्हाला पण वाचू देत जा ना'. त्याच वेळी त्या मास्तरांनी पाठीत जोरदार रट्टा घातला. शिवी हासडली आणि परत पायाच्या अंगठ्याला हात धरून उभं केलं. कित्येक तास ते त्या अवस्थेतच होते.
शाळेत नाव घालताना तर त्यांना त्यांच्या आईनं आणि काकानं बडवत-बडवत नेलं होतं. तिथं एक मोडक मास्तर होते. ते अतिशय चांगले होते आणि त्यांच्याकडूनच आपण 'समाजवादाची दीक्षा' घेतल्याचं ते सांगतात. मोडक मास्तरांनी आईला आणि त्यांच्या काकाला सांगितलं की त्याला मारू नका. नामदेवच्या कलाकलाने घ्या असं बजावलं.
तसेच मास्तरांनी त्यांना साठे बिस्किट आणि रंगबिरंगी गोळ्या खायला दिल्या. 'जेव्हा तुला गोळ्या खायच्या असतील तेव्हा शाळेत येत जा' असं ते म्हणाले. त्यानंतर ढसाळांना शाळा आवडू लागली. याच सरांनी मुलांना साने गुरुजींचं 'श्यामची आई', 'धडपडणारी मुले', 'तीन भावंडे' ही पुस्तकं वाचायला दिली. यामुळेच आपण समाजवादाच्या मार्गाला लागल्याचं ढसाळ नमूद करतात.

त्यांच्या आईची इच्छा होती की, नामदेव यांनी खूप शिकावं. जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून कोटी कोटी कुळांचा उद्धार केला तसा नामदेवनं देखील करावा असं त्या म्हणत. त्यामुळं शाळा सोडून ढसाळ मित्रांसोबत खेळायला गेले किंवा शाळेला बुट्टी मारली, तर त्यांच्या आईचा धपाटा त्यांना खावाच लागायचा.
पुढच्या वर्गात गेल्यावर दुसरे मास्तर आले. ते जातीयवादी होते. त्यामुळे ढसाळांचं मन पुन्हा शाळेत लागत नव्हतं. ढसाळ यांचे वडील मुंबईत कत्तलखान्यात नोकरी करायचे. वडिलांनी निर्णय घेतला की पत्नी आणि मुलाला देखील आता सोबत घेऊन यायचे.
त्यामुळे त्या गावातून आपली सुटका झाली असं ढसाळ म्हणतात. याबद्दल त्यांनी 'माझं शापित बालपण' या लेखात म्हणलंय, " गावच्या शाळेचे दिवस संपले ते मुंबईला आल्यामुळे - खरेच वडिलांना आजही मी धन्यवाद देतो - त्यांनी एकार्थी नरकातून आमची सुटका केली. नरक गावगाड्याचा नरक - अजून कितीतरी गोष्टी या नरकाशी जोडलेल्या आहेत. माझ्या चरित्राशीसुद्धा - वाटते आपले चारित्र्य - या नरकानं कलंकित करुन सोडले होते! माझं बालपण शापित करुन टाकणारे गावचे ते दिवस आठवले की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते."


अधोविश्वाची ओळख
नामदेव ढसाळांना 'पोएट ऑफ द अंडरवर्ल्ड' म्हटलं जातं. अंडरवर्ल्डचा आजचा अर्थ गुन्हेगारी जगताशी संबंधित आहे. पण अंडरवर्ल्डचा या ठिकाणी अर्थ आहे, ते अंध:कारमय जग जे पांढरपेशा वर्गातील लोकांच्या नजरेला पडत नाही. या विश्वात सारं काही आहे, पण ते कुणाच्या नजरेस पडलेलं नाही.
इथे गरीब लोकांची वस्ती आहे, कामगार, कष्टकरी लोक आहेत, गंभीर आजारानं ग्रस्त लोक दाटवस्तीत राहत आहेत, तृतीयपंथी आहेत, इथे वेश्याही आहेत, त्यांची कुटुंबे देखील आहेत. बारमध्ये काम करणारे लोक, बारमध्ये येणारे लोक, नशा करणारे आणि नशा विकणारे पेडलर्स देखील आहेत. आणि हो स्मगलर्स, गँगस्टर्स देखील आहेत.
ढसाळ मुंबईत आल्यावर कामाठीपुरा या भागात राहत असत. ही वस्ती कष्टकऱ्यांची आणि गरीब लोकांची होती. मोलकरीण, हातगाडीवाले, कारखान्यात काम करणारे, कत्तलखान्यात काम करणारे लोक या ठिकाणी राहत. तिथे राहताना आजूबाजूच्या लोकांची सुख-दुःखं त्यांनी पाहिली आणि ती त्यांनी शब्दबद्ध केली आणि चित्रबद्ध देखील केली.

फोटो स्रोत, BBC Hindi
मुंबईतील शाळेत शिकताना त्यांना एका गोष्टीचा आधार वाटला तो म्हणजे इथे शिवा-शिव किंवा जात-पात हा प्रकार नव्हता. त्या ठिकाणीच कोकाटे मास्तर म्हणून एक शिक्षक होते. त्यांच्यामुळे मराठी साहित्य विश्वाची त्यांना ओळख झाली. अनेक कविता ढसाळांनी तोंडपाठ केल्या होत्या.
कामाठीपुऱ्यात राहतानाच ढसाळांचं पहिलं प्रेम फुललं. किशोरवयात असताना जी स्वप्नं एक तरुण किंवा तरुणी रंगवते ती देखील त्यांनी रंगवली होती. पण या स्वप्नांवर विरजन पडलं. त्यालाही कारणीभूत जात व्यवस्थाच होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास भोगावा लागला.
निखील वागळेंना दिलेल्या मुलाखतीमध्ये ढसाळ यांनी सांगितलं की 'ते अतिशय निर्व्याज प्रेम होतं, पण लोकांनी नको ते अर्थ काढले. माझ्या घरी, गावी येऊन त्यांनी दमदाटी केली. माझ्या आईला जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळी ती शेतात काम करत होती आणि तिने माझ्या अंगावर ढेकूळ भिरकावले.' हे सांगताना आपल्याला ढसाळ यांचा कंठ दाटून आल्याचं दिसतं. त्यांच्या इतर लिखाणात आणि मुलाखतीत देखील या गोष्टीचा उल्लेख वारंवार येताना दिसतो.
सतीश काळसेकरांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की, या प्रकरणानंतर आतून उद्ध्वस्त झालो. व्यसनाच्या आहारी गेलो. पण याच काळात छंदबद्ध रचना सोडून ते मुक्तछंदात कविता देखील करायला लागले.

फोटो स्रोत, Getty Images
उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ते टॅक्सी ड्रायव्हिंग करू लागले. एकीकडे टॅक्सी चालवणं आणि त्याच वेळी कविता रचणं या दोन्ही गोष्टी ते करू लागले. एकदा एका कविता संमलेनात ते पोहचले आणि त्यांनी तिथे कविता म्हणू देण्याची विनंती केली.
अनंत काणेकर हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. 'एका टॅक्सी चालकाला आपली कविता म्हणून दाखवायची आहे,' अशी एक विनंती त्यांच्याकडे आली. त्यांनी संधी दिली आणि ढसाळांनी एक कविता म्हटली.
त्यातील नवीन भाषा, नवीन प्रतिमा, दाहकता या सर्व गोष्टींमुळं त्यांच्या कवितेनी मराठी साहित्य विश्वाला एक धक्का दिला. ज्या बंधनात, छंदात अनेक वर्षांपासून मराठी कविता अडकून पडली होती ते साखळदंड नामदेव ढसाळांनी घणाचे घाव घालून तोडले.
अर्थात त्यावेळच्या सर्वांनाच हे आवडले असे नाही. कारण प्रस्थापित वर्गासाठी तर ही कविता म्हणजे त्यांचं असलेलं-नसलेलं राज्य हिरावून घेण्याची नांदीच वाटली.
त्यांनी त्या कवितेला रांगडं म्हटलं, रासवट म्हटलं तरीही नामदेव ढसाळांवर याचा परिणाम झाला नाही. ते आपल्या कविता लिहितच राहिले. यानंतर ती वेळ आली की त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित झाला. त्या काव्यसंग्रहाचं नाव 'गोलपिठा'.

फोटो स्रोत, Shabd Prakashan
'गोलपिठा' म्हणजे मुंबईत वेश्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी एक चौक आहे. त्याला गोलपिठा म्हटलं जातं. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जगात माणसाला आपल्या शरीराची देहविक्री करावी लागते आणि त्याचं रूपक म्हणून त्यांनी या काव्यसंग्रहाला 'गोलपिठा' हे नाव दिलं.
आपल्या मनातील खदखद आणि आजूबाजूच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायामुळं ते 70 च्या दशकात चळवळीत आले.
कामाठीपुऱ्यातील वेश्या, तृतीयपंथी, त्यांच्याकडं काम करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या जाचाला सामोरं जावं लागायचं. त्यांना माणूस म्हणून सारे हक्क नाकारण्यात आले होते. त्यांच्यासाठी नामदेव ढसाळांनी मोर्चा काढला. या मोर्चाला विजय तेंडुलकर आणि सतीश काळसेकरांसारखे ज्येष्ठ साहित्यिक देखील उपस्थित होते.

जे पाहिलं, जे भोगलं यातून त्यांनी या कविता लिहिल्या होत्या. या काव्यसंग्रहासाठी विजय तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहावी असं ढसाळांनी त्यांना सुचवलं. पण तेंडुलकरांना आपण यासाठी अधिकारी व्यक्ती आहोत की नाही याची शंका आली.
तरी ढसाळ त्यांच्या नावावरच कायम होते. शेवटी तेंडुलकरांनी ती भाषा, ते जगणं कसं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ढसाळांनी त्यांना सर्व वस्ती फिरवून आणली. विजय तेंडुलकरांना त्यांच्या भाषेबाबत ज्या अडचणी आल्या, ज्या गोष्टी समजल्या नाहीत ते सारं काही त्यांनी समजावून सांगितलं आणि शेवटी तेंडुलकरांनी ती प्रस्तावना लिहिली.
हे अधोविश्व कसे आहे हे ढसाळांनी त्यांच्या कवितांमधून तर सांगितलंच आहे पण त्यांची याच विषयावर एक कादंबरी आहे 'निगेटिव्ह स्पेस' या नावाची. या कादंबरीचा विषय असा आहे की, कामाठीपुऱ्यातील राजा नावाचा एक तरुण एका तरुणांच्या ग्रुपचा प्रमुख असतो. तो या भागातील महिलांना संघटित करतो आणि शेवटीला तो एक कविता करतो.
ही कादंबरी गँगस्टर आणि गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीवर सुरू होते आणि शेवट तिचा कवितेनं होतो असं का? हा प्रश्न वाचकाला आपसूकच येतो.
याचा विचार केला, तर आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की सतीश काळसेकरांना दिलेल्या मुलाखतीत ढसाळ म्हणाले होते की, 'या कवितेनीच मला तारलं. जर कविता नसती, तर मी एखाद्या गँगचा लीडर झालो असतो, ब्रॉथेलचा मालक किंवा स्मगलर झालो असतो.'
गँगस्टर न होता एक तरुण कवी होतो हा प्रवास त्यांनी या कादंबरीतून मांडला आहे. नामदेव ढसाळांच्या कवितेची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर 'निगेटिव्ह स्पेस' हे महत्त्वाचं पुस्तक आहे.
नामदेव ढसाळ आणि इंदिरा गांधींची भेट
जसं ढसाळ म्हणजे कविता तसंच ढसाळ म्हणजे दलित पँथर. आपले मित्र ज. वि. पवार, राजा ढाले, अविनाश महातेकर, भाई संघारे यांच्यासोबत मिळून ढसाळांनी दलित पँथर ही संघटना काढली. दलितांविरोधात होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांनी दलित पँथरची स्थापना केली होती. या संघटनेनं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून काढलं होतं.
अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेचं नाव 'ब्लॅक पँथर' होतं. त्याच धर्तीवर ही संघटना काढण्यात आली होती. जातिभेदानं पिडलेल्या, अडल्या-नडल्यांसाठी ही संघटना आधार होती. पण या संघटनेमुळं ढसाळ आणि इतर कार्यकर्त्यांना अनेकांशी वैर पत्करावं लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
जिथे जातील तिथे किंवा जिथे मोर्चा होईल तिथे, लोक जमा होतील तिथे त्यांच्यावर असंख्य केसेस पडू लागल्या. प्रशासनानं कार्यकर्त्यांच्या मागे सीआयडी देखील लावले. यांचा ससेमिरा पाठीमागून जावा यासाठी ढसाळांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घ्यायचं ठरवलं. त्यांची ही भेट दिल्लीत घडली. तब्बल दीड तास त्यांनी पँथरचं काम कसं चालतं, गावा-गावातील दलितांना कसा त्रास सहन करावा लागतो हे सारं काही सांगितलं.
त्याचा परिणाम असा झाला की इंदिरा गांधींनी पँथरवर असलेल्या साऱ्या केसेस मागे घेतल्या.
आपली 'कमिटमेंट' ही चळवळीशी होती. त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याचा प्रश्नच नव्हता. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती, त्याला नामदेव ढसाळांनी पाठिंबा दिला होता. त्यावरुन त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पण, दलितांचे प्रश्न समजून घेणाऱ्या व्यक्तीच्या समर्थनात आपण भूमिका घेतली असं ढसाळांनी सांगितलं.
ढसाळांनी इंदिरा गांधींवर एक कविता देखील केली आहे - 'आमच्या इतिहासातील एक अपहिरार्य पात्र प्रियदर्शिनी'. ही कविता एक उद्देशिका आहे असं ढसाळ सांगतात. त्यांच्या दोन कविता या राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाच्या मानल्या जातात. एक म्हणजे मूर्ख म्हाताऱ्यानं डोंगर हलवले ( कविता संग्रह देखील याच नावाने आहे) आणि दुसरी प्रियदर्शिनी. या कवितेचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
पुढे दलित पँथर फुटली. नामदेव ढसाळ हे कम्युनिस्ट आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला. ढसाळांनी आपली कमिटमेंट ही आंबेडकरी चळवळ आणि जनतेशी आहे असं अनेक वेळा सांगितलं. पण त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर तो शिक्का मारला.
ढसाळांनी मार्क्स-लेनिन, कामगार चळवळींवर असलेले आपले प्रेम कधी लपवले नव्हते, पण तरी देखील आपल्या विचारांची बांधिलकी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याशी आहे असं ते सांगत.
'सारं काही समष्टीसाठी'
नामदेव ढसाळांचे 10 कविता संग्रह प्रकाशित आहेत. या पैकी अनेकांना पुरस्कार मिळाला. त्या कवितांचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झालं. पण त्या तुलनेत त्यांच्या गद्यात्मक लिखाणाची चर्चा नेहमीच कमी झालेली दिसते.
'हाडकी हाडवळा' आणि 'निगेटिव्ह स्पेस' या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. हाडकी हाडवळा म्हणजे तत्कालीन अस्पृश्य समाजाला सर्वांनी मिळून एक एक जागा दिली जायची. ते त्यांचं वतन असायचं आणि ती जमीन कसून त्यावर उदरनिर्वाह करायचा. ही जमीन अनेक कुटुंबांची मिळून असे. पण त्यात पिढी दर पिढी मुलांची संख्या वाढल्यावर ती पुरत नसायची. या बदल्यात समुदायातील कुटुंबांना तथाकथित सवर्णांकडे राबावं लागायचं.
त्याबदल्यात त्यांना कुठलेही मानधन, पगार दिला जायचा नाही. या व्यवस्थेमुळं अस्पृश्य वर्गाचे जीवन कसे हलाखीचे बनले याचे वर्णन या पुस्तकात आहे. त्याचबरोबर तत्कालीन समाजव्यवस्था, गावगाडा कसा चालायचा याचंही वर्णन आपल्या पुस्तकात मिळतं.
या व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेलं 'आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट' हे पुस्तक चळवळ समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. त्यांनी जे स्तंभ लिखाण केलंय ते 'आंधळे शतक' आणि 'सर्व काही समष्टी साठी' या संग्रहात समाविष्ट आहे. ढसाळ हे ग्रंथ आणि कला आस्वादक होते. याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या लिखाणातून येतो.

फोटो स्रोत, Shabd Prakashan
जगभरातील नामवंत लेखक, कवी, तत्त्वज्ञ ढसाळांनी वाचले होते. या चिंतनातून त्यांनी सामान्य माणसाच्या काळजाला भिडणाऱ्या भाषेत विविध विषयांवर लिखाण केलं. हे लिखाण वाचताना कधीकधी असं वाटतं की अरे आपण आत्ता ज्या कविता वाचल्या त्या तर एकदम वेगळ्या होत्या आणि हे लिखाण तर एकदम वेगळं आहे. खरं तर हीच त्यांच्या लिखाणाची जादू आहे.
हेराक्लिटस या तत्त्वज्ञाचं एक प्रसिद्ध वचन आहे. तो म्हणतो, 'एकच व्यक्ती नदीत कधीच दोनदा उतरू शकत नाही. कारण ती तीच नदी नसते आणि ती व्यक्तीदेखील तीच नसते.' तसं एका शैलीत, एका विषयावर लिखाण केल्यावर ढसाळ पुन्हा तसा प्रकार हाताळत नसत.
पण एक गोष्ट मात्र त्यांच्या लिखाणात कायम जाणवते ती म्हणजे गोर-गरीबांसाठी त्यांची असलेली तळमळ. 'ज्या जगण्यात माणूस सापडत नाही, ज्या ठिकाणी अनुभवातून आलेलं सारं नाही आणि मुळात म्हणजे ज्या समाजासाठी मी लढतोय त्यांच्या फायद्याचं काही नाही ते लिखाण, ती कला आपल्या काहीच कामाची नाही,' इतकी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांच्या स्तंभाला त्यांनी दिलेलं नाव अगदी अचूक होतं असं जाणवतं.
नामदेव ढसाळांनी केलेल्या अतुलनीय कामासाठी त्यांना 1999 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि 2004 साली त्यांना साहित्य अकादमीकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला. त्यांना मायस्थेनिया ग्राविस हा दुर्धर आजार झाला आणि त्यामुळे त्यांना व्हीलचेअरवरुन हालचाल करावी लागायची. असं असलं तरी त्यांच्यातील नेहमी लोकांमध्ये जाण्याचा, मिसळण्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.
पण आजाराने त्यांचे शरीर हळूहळू थकू लागले आणि 2014 साली त्यांचे निधन झाले.
त्यांच्याबद्दल एक कुतूहल मात्र सर्वांनाच राहिलं आहे आणि जेव्हा जेव्हा ते भेटले त्यावेळी त्यांच्याविषयी कुतूहल असणाऱ्या लोकांनी विविध तऱ्हेनी नेहमी हा प्रश्न विचारला आहे.
'कवी' नामदेव ढसाळ की 'चळवळी'तील नामदेव ढसाळ, तुमची कोणती ओळख तुम्हाला आवडते. असाच प्रश्न जर्मन छायाचित्रकार हेनिंग स्टेगमुलरने त्यांना विचारला होता. त्यावर ढसाळांनी दिलेलं उत्तर सर्वाधिक समर्पक वाटतं. ते म्हणतात, 'मला स्वतःला शोधण्यात आनंद मिळतो. मी जेव्हा कविता करतो तेव्हाही मी आनंदी असतो आणि जेव्हा मी देहविक्रेय करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी लढत त्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करत असतो तेव्हाही मी आनंदीच असतो.'
(संदर्भ - समग्र नामदेव ढसाळ भाग एक आणि दोन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











