राजा ढाले: आक्रमक पँथर आणि 'आंबेडकरी चळवळीचा नि:स्पृह नेता' हरपला

राजा ढाले

फोटो स्रोत, Raja Dhale faceook page

फोटो कॅप्शन, राजा ढाले माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्याबरोबर
    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"एका दलित महिलेला विवस्त्र करून तिला अर्धा किमी धावायला लावलं. या गुन्ह्याची गुन्हेगाराला 50 रुपये दंडाची शिक्षा झाली. मात्र राष्ट्रध्वजाची अवमानना करणाऱ्याला 350 रुपये दंड झाला. म्हणजे आयाबहिणींच्या वस्त्राची किंमत राष्ट्रध्वजापेक्षा कमी आहे. मग त्याचं काय करायचं?" असा सवाल करून मोठा गहजब निर्माण करणारे दलित पँथरचे आक्रमक नेते राजा ढाले काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

राजा ढालेंनी हा सवाल केला होता 'साधना' साप्ताहिकासाठी लिहिलेल्या एका लेखात. त्यावेळी साधनाचे संपादक असलेले डॉ. अनिल अवचट सांगतात, "साधना मासिकाला 25 वर्षं झाली होती. तेव्हा मासिकाच्या प्रगतीचा आलेख मांडायचा, हे काही बरोबर नाही. त्यामुळे तळागाळातल्या लोकांना विचारावं की प्रगती झाली किंवा नाही. त्यानिमित्ताने मी राजाला भेटलो. मला तेव्हा राजा म्हणाला की माझा लेख छापशील का? पण मी लेखातला शब्दन् शब्द छापणार, अशी ग्वाही दिली."

अवचट पुढे सांगतात, "त्याने जे लिहिलं त्यात मला फार काही गैर वाटलं नाही. तो उल्लेख राष्ट्रध्वजाविषयी होता म्हणून गहजब झाला. मग त्याचं (राष्ट्रध्वजाचं) काय करायचं, असा सवाल त्याने या लेखात केला आणि पुढे राष्ट्रध्वजासाठी एक अपशब्द वापरला. त्याचा मोठा गहजब झाला. मग तो एकदम प्रसिद्धीत आला."

तो लेख प्रकाशित झाला तेव्हा डॉ. अवचट तसंच एस. एम. जोशी यांच्यावर खटला दाखला झाला होता. कालांतराने हा खटला मागे घेतला गेला. पण या लेखामुळे दलित पँथर चर्चेत आली.

पण कुठल्याही परिस्थितीत, अगदी फाशी झाली तरी माफी मागणार नाही, अशी भूमिका राजा ढाले यांनी घेतली.

आक्रमक पँथर

दलित पँथर या लढाऊ आणि आक्रमक संघटनेच्या संस्थापकांपैकी एक होते राजा ढाले. नामदेव ढसाळ, राजा ढाले आणि इतर नेत्यांनी 1972 मध्ये दलित पँथरची स्थापना केली. पँथरच्या स्थापनेपासूनच राजा ढाले आपल्या आक्रमक भूमिकेसाठी चर्चेत होते. पुढे ढाले आणि ढसाळांमध्ये मतभेद झाले. ढसाळांच्या डाव्या विचारसरणीकडे झुकायला ढालेंनी जोरदार आक्षेप घेतला आणि त्यानंतर पँथर फुटली.

माईसाहेब आंबेडकर यांच्याबरोबर राजा ढाले आणि ज. वि. पवार.

फोटो स्रोत, J. V. Pawar

फोटो कॅप्शन, माईसाहेब आंबेडकर यांच्याबरोबर राजा ढाले आणि ज. वि. पवार.

मग राजा ढालेंनी 'मास मूव्हमेंट' नावाची संघटना स्थापन केली.

ढाले यांच्याबरोबर आंबेडकरी चळवळीचा भाग असलेले दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार हे त्यांचं वर्णन आंबेडकरी चळवळीचा नि:स्पृह नेता आणि बाबासाहेबांच्या चळवळीचा प्रवक्ता, असं करतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "ते आणि मी 1966 पासून एकत्र होतो. एम.ए.च्या वेळी आम्ही एका बेंचवर बसायचो. तेव्हा ते लिटल मॅगझिनमध्ये लिहायचे. भालचंद्र नेमाडे वगैरे प्रभुतीही त्या काळात या मासिकात लिहायचे. त्यानंतर बाबुराव बागूल, जयंत पवार, नामदेव ढसाळ यांच्यासारखे साहित्यिक मित्र आम्ही एकत्र आलो. त्यावेळेपासून आंबेडकरी चळवळीत होते. मग ते दलित पँथरमध्ये सहभागी झाले."

"त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीचा विचार केला. त्यापासून ते तसुभरही ढळले नाही. मी आणि ढालेंनी कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेतला नाही. कोणत्याही सरकारी समित्यांवर नेमणूक घेतली नाही. सरकारचं घरही घेतलं नाही. आमचे काही कार्यकर्ते सरकारला शरण गेले. आम्ही मात्र कायमच व्यवस्थेच्या विरोधात लढलो. आज तो निघून गेला. आता मी एकाकी झालो आहे," असं त्यांनी सांगितलं.

बंडखोरीची सुरुवात

काही वर्षांपूर्वी राजा ढालेंनी लोकप्रभा मासिकाला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांच्या बंडखोरीची सुरुवात कशी झाली, याबद्दल ते विस्ताराने सांगतात: "एकतर ती माझ्यात मुळातच असणार. मुळात बंडखोरी का होते तर समाजात साचलेपण आलं असतं. अपरिवर्तनीयता हेच ब्रह्मवाक्य होतं. तेव्हा बंडखोरीची सुरुवात होते. मी फुले आंबेडकरी चळवळीची वाट धरली होती.

Gatha Dhale

फोटो स्रोत, Gatha Dhale/facebook

"दलित साहित्य संघाशी माझा परिचय झाला. त्यात मॅट्रिक्युलेट झालो. आसपासच्या परिस्थितीचं भान यायला लागलं. साहित्यातलं साचलेपण डाचायला लागलं. चांगलं आणि वाईट साहित्य यांच्यातला फरक मला समजायला लागला. मी स्वत:ला मर्यादा घालून घेतल्या नव्हत्या. तसंच अनेक मोठ्या माणसाचा सहवास लहानपणापासून लाभला. त्यामुळे कदाचित मला मोठ्या माणसांची भीतीच संपली. त्यामुळे मी बंडखोर झालो."

'दलित पँथरचा महानायक हरपला'

"आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला" अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजा ढाले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री

फोटो स्रोत, Twitter / CMOMaharashtra

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही राजा ढालेंना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter / AjitPawarSpeaks

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राजा ढाले यांच्या निधनाची बातमी कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. "राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे," अशा शब्दांत रामदास आठवले यांनी राजा ढालेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)