बाबूराव बागूल : 'वेदाआधी तू होतास' असं ठणकावून सांगणारा क्रांतिकारी साहित्यिक

- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"वेदाआधी तू होतास
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास....
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव
तूच साजरे कलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
तूच आनंदाने साजरे केलेस"
ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागूल यांच्या या कवितेतील ओळी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील दीन-दलितांच्या मनात जो वन्ही पेटवला होता, त्यातूनच तयार झालेली क्रांतीची मशाल म्हणजे बाबूराव बागूल यांचे साहित्य.
शेकडो वर्षांच्या अस्पृश्यतेचे, गरिबीचे ओझे लादण्यात आलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागे केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा विचार दिला, दलित समाजाला अन्यायाविरुद्ध प्रतिकार करता यावा यासाठी केवळ स्वतःची विद्वत्ता आणि जीवन समर्पित तर केलेच पण पुढील वाटचाल कशी असेल याचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केली.
त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान आणि चळवळीतून जे मंथन झाले त्यातून केवळ मराठीच नाही तर संपूर्ण भारतीय साहित्यसृष्टी उजळून निघेल अशा साहित्यकृतींचा जन्म झाला. या साहित्यकृतींपैकी जर अत्यंत महत्त्वाच्या कोणत्या साहित्यकृती आहेत असं कुणी विचारलं तर निश्चितपणे बाबूराव बागूल यांचे साहित्य अग्रभागी असेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची साहित्यिक अभिव्यक्ती म्हणजे बाबूराव बागूल यांचे साहित्य. अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याचा जो संदेश डॉ. आंबेडकरांनी दिला त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बागूल यांच्या कथा-कवितांमध्ये पाहायला मिळते.
त्याचबरोबर दलित समाजाला जो जगण्याचा, वावरण्याचा आत्मविश्वास बाबासाहेबांच्या चळवळीतून मिळाला त्याचे मूर्त रूपच बाबूराव बागूल यांच्या साहित्यातूनच नाही तर संपूर्ण जीवनातूनच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच आत्मविश्वासातून बाबूराव बागूल म्हणू शकतात की 'हे मानवा वेदाआधी तू होतास'.
वैदिक परंपरेनुसार वेद हे अपौरुषीय आहेत. म्हणजे त्यांचा निर्माता कुणी पुरुष नाहीये. त्या वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, याची आठवण ते मानवाला करुन देतात.
'वेदाआधी तू होतास', 'जेव्हा मी जात चोरली होती', 'सूड', 'अघोरी', 'कोंडी', सूर्याचे सांगाती, मरण स्वस्त होत आहे अशा एकाहून एक दर्जेदार कलाकृती देणाऱ्या बाबूराव बागूल यांचा आज स्मृतिदिन आहे.
"जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मला मिळाला नसता तर मी वेदाआधी तू होतास हे लिहूच शकलो नसतो," अशी कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला ते दिसतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून एकेकाळी अस्पृश्य असणाऱ्या वर्गाला भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीची दारं उघडून दिली.
डॉ. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या धम्मचक्र परिवर्तनानंतरच्या पुढील सहा-सात वर्षांतच बाबूराव बागूलांचा 'जेव्हा मी जात चोरली होती' हा कथा संग्रह आला आणि या तेजाने मराठी साहित्यसृष्टी दिपून गेली.

फोटो स्रोत, Maharashtra Foundation
चार दशकाहून अधिक काळ चिंतन, मनन लेखन करणाऱ्या बाबूराव बागूलांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहितगाव या ठिकाणी 17 जुलै 1931 ला झाला.
त्यांच्या लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. पण त्याही स्थितीत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर ते आपल्या मावशीसोबत मुंबईत राहायला आले. मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये एका छोट्या खोलीत त्यांचं कुटुंब राहायचं. त्यांचं पुढील शिक्षणही मुंबईतच झालं. शिक्षण घेता-घेता त्यांना विविध नोकऱ्या आणि काम करावं लागायचं.
आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बाबूराव बागूल सांगतात शेकडो वर्षांपासून जातिव्यवस्थेमुळे आई-वडिलांना ना शिक्षणाची संधी मिळाली नाही तसेच चांगला व्यवसाय, नोकरी करण्याचा हक्क देखील नाकारला होता. पुढे जायचे असेल तर काम करुन शिकण्याशिवाय पर्याय नव्हता. विविध ठिकाणी काम करत असतानाच त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी ओळख झाली आणि त्यातूनच त्यांच्यातील साहित्यिकाचा जन्म झाला.
पण लिहायचं म्हटलं तर शांत जागा तर हवी ना? लेबर कॅम्पातील खोलीत अनेकजण सोबत असताना कुठे बसून लिहिणार हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. तेव्हा ते इराणी हॉटेलमध्ये बसून आपल्या कथा-कविता लिहू लागले.


'विद्रोह' आणि 'जेव्हा मी जात चोरली होती'
बाबूराव बागूलांच्या साहित्यात 'विद्रोह' आणि 'जेव्हा मी जात चोरली होती' या दोन महत्त्वाच्या कथा मानल्या जातात. बागूलांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं की त्यांच्यासाठी आदर्श नायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर चालणारा, त्यांच्याशी बांधिलकी असणारी व्यक्तिरेखेचीच निवड ते कथा नायक साकारताना करत.
विद्रोह ही कथा पारंपरिकदृष्ट्या हाताने मैला साफ करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट आहे. यातला नायक जय याला शिक्षणाची भूक आहे. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला मैला साफ करण्याची नोकरी पत्करावी लागते.
डॉ. अनिल सपकाळ यांना दिलेल्या मुलाखतीत बाबूराव बागूल म्हणतात की 'पहिल्यांदाच मराठी साहित्यात या समुदायातील नायक केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिण्यात आली आहे.'

फोटो स्रोत, Akshar Prakashan
कथेतील नायक निवडताना बाबूराव बागूल यांनी अनेक अंगांनी विचार केलेला दिसतो. हिंदू पुराणकथांमध्ये आलेल्या वंचित समाजांतील नायकांचा ते आधी विचार मांडतात. एकलव्य आणि कर्ण सारख्या व्यक्तिरेखा वंचित समाजातील आहेत.
त्यांनाही पारंपरिक आणि प्रस्थापित व्यवस्थेनी स्वीकारलेले नाही पण ते त्याविरोधात बंड करुन पेटत नाहीत हे बाबूराव बागूल दाखवून देतात.
'जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोहाचा, अन्यायाविरोधात पेटून उठण्याचा विचार मांडला त्यानंतर ही परिस्थिती बदलली. त्यामुळे आपल्या कथेचा नायक पेटून उठतो. तो त्या व्यवस्थेविरोधात बंड पुकारतो,' असं बाबूराव बागूल सांगतात.
चळवळीतील कार्यकर्ते आणि सुधारक
बाबूराव बागूल हे केवळ एक साहित्यिक नव्हते. आधी ते चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांचा पिंड हा आंबेडकरी कार्यकर्ता आणि सुधारकाचा आहे. ते ज्या लेबर कॅम्पमध्ये राहायचे तो लेबर कॅम्प त्यांच्या तारुण्यात चळवळीचे केंद्रच होता.
त्याच ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिले. बाबासाहेबांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या सभांना हजेरी लावली.
त्यातूनच आपणही वंचित समाजातील लोकांसाठी कार्य करावे हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांच्या सोबत जगतानाच या समाजाचे अनुभव, त्यांचे दैन्य, दुःख त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. कॅम्पमधील कामगारांना संघटित करुन त्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला.
बाबूराव बागूल हे आधी कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले होते. त्यांच्या साहित्यावरही मार्क्सवादाचा प्रभाव जाणवतो असे उत्तम कांबळे यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी झालेल्या चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी पोस्टर चिटकवताना त्यांना अटक झाली होती असं ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी महाराष्ट्र फाउंडेशनच्या 'संवादिनी'साठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
बाबूराव बागूलांनी कष्टाची कामे देखील अनेक वर्षं केली आहे. रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये नोकरी केली आहे. रेल्वेत नोकरी करत असताना आर्थिकदृष्ट्या समान असलेले लोक किंवा एकाच हुद्द्यावर काम करणारे लोक देखील जेव्हा एकमेकांची जात समजते तेव्हा ते कसे वागतात याचा त्यांनी जवळून अनुभव घेतला आणि त्याच अनुभवाच्या आधारावर त्यांची जेव्हा मी जात चोरली होती ही अजरामर कथा आकारला आली आहे.
या कथेवर आधारीत लघुचित्रपट सह्याद्रीच्या 'सोनपावलं' या कार्यक्रमात प्रदर्शित झाला आहे. ही कथा आपल्याला आजही युट्युबवर पाहायला मिळते.
'जितके महान साहित्यिक तितकेच महान माणूसही'
बाबुराव बागूल जितके महान साहित्यिक होते तितकेच ते महान व्यक्ती देखील होते याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या कन्या प्रा. शोभा बागूल यांनी सांगितलेल्या एका किश्शातून येतो.
डॉ. नंदा तायवाडे यांनी लिहिलेल्या 'दलित साहित्यातील युगस्तंभ - अण्णाभाऊ साठी आणि बाबूराव बागूल' या पुस्तकात हा किस्सा देण्यात आला आहे.
शोभा बागूल सांगतात, "मी लहान असतानाचा एक प्रसंग आठवतोय...त्या प्रसंगानं मला विचार करायला शिकवलं. माझं स्त्री असणं, स्त्री-देहाचा सन्मान करणंही त्याच प्रसंगानं मी शिकले. आबा (बाबूराव बागूल) सकाळी उठून महाराष्ट्र शासनाच्या केंद्रावर दूध आणण्यासाठी जात असत. थंडीचे दिवस होते. त्यामुळेच फारशी गर्दी नव्हती. आम्ही राहत होतो त्या घरापासून दूध केंद्र दूर होते. या केंद्रापासून झोपडपट्टी जवळ होती.
"हमरस्त्यावर एक गरोदर बाई बसलेली होती. ती बाई वेदनेनी तळमतळते आहे, हे फारसे कोणाच्या लक्षात आले नसावे. तिला रक्तस्राव सुरू झाल्यानंतर ती घाबरली असावी. तिच्याजवळ तिचे परिचित नव्हते. बाई आहे म्हणून तिच्याजवळ जाण्याचं धाडस इतर कोणी करत नव्हते. रस्त्यावर रक्ताचे ओघळ वाहत होते.
"हे पाहिल्यावर हातातल्या काचेच्या दुधाच्या बाटल्या टाकून देऊन आबा धावत जाऊन झोपडपट्टीतील लोकांना त्यांच्याकडून काही जुनेर मिळते का म्हणून हाका मारू लागले. त्यांची धडपड पाहून लोक धावत आले. बायकाही धावत आल्या. त्यांनी आडोसा निर्माण केला. ती बाई रस्त्यावरच बाळंत झाली. इकडे आम्ही आबांची वाट पाहत होतो," असं प्रा. शोभा बागूल सांगतात.
त्यांच्यातील हेच कारुण्य आणि माणुसकी आपल्याला त्यांच्या साहित्यात ठायीठायी पाहायला मिळते त्यामुळे बाबूराव बागूल हे सगळ्यांना आपल्या जवळचेच वाटत.
अशीच एक आठवण उत्तम कांबळे यांनी आपल्या लेखात सांगितली आहे. "नाशिकजवळ एका कार्यक्रमात एक कवी आबांना मिठ्या मारून, त्यांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला आणि म्हणाला, 'आबा माझे वडील हे तुमच्यासारखेच होते; पण कोठे गेले कोणास ठाऊक?"
त्यांच्यावर प्रेम करणारे असे अनेक लोक त्यांच्या अवतीभवती जमत असत.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी 'आंबेडकर भारत'
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीला मिळावा म्हणून त्यांनी बाबासाहेबांचे कथा रूप चरित्र लिहिले.
लहान मुलांना गोष्टीतून पटकन कळते, त्याच माध्यमातून त्यांच्यावर आंबेडकरी विचारांचे संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी हे चरित्र दोन खंडात लिहिले.
'आंबेडकर भारत' या शीर्षकाचा अर्थ सांगताना बाबूराव बागूल सांगतात की, "कर्णावर भारतीय भाषांमध्ये अनेक काव्ये, नाटके, कथा-कादंबऱ्या शेकडोने प्रकाशित होऊ लागल्या. एकेकाळी कौरवांबरोबर खलनायकांमध्ये जमा झालेला कर्ण आधुनिक भारतामध्ये आदराचा सन्मानाचा विषय झाला.. खलातून नायकामध्ये आला. कोणामुळे? - तर
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयामुळे त्यांच्या विचारांमुळे, त्यांच्या आंदोलनामुळे, त्यांच्या सत्ता आणि सामाजिक महत्त्वामुळे. आणि इथेच नवे महाभारत सुरू झालं. त्या नव्या महाभारताचे आदिनायक, महानायक मुंबईचा कामगार वस्तीतील डबक चाळीत वाढलेले पोर म्हणजे महान डॉ. बाबासाहेब आंबेडकर! म्हणून या नव्या महाभारताचे नाव आंबेडकर भारत !" असं बागूल यांनी या पुस्तकाच्या प्रास्तविकात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, GOVERNMENT OF MAHARASHTRA
'दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान'
बाबूराव बागूल यांनी 'दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान' हा मौलिक ग्रंथ लिहिला आहे. दलित साहित्य आणि त्याची जीवनाशी असलेली बांधिलकी त्यांनी या ग्रंथाद्वारे उलगडून दाखवली आहे. या ग्रंथाबाबत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी 'संवादिनी'मध्ये म्हटले आहे की, "अशा प्रकारचे साहित्य ( दलित साहित्य) अंतिमतः समाज परिवर्तनाच्या प्रयोजनाचा विचार करणारे साहित्य असते, म्हणूनच ते एकूण जीवनाचाच नव्या दृष्टीने विचार करीत असते असे त्यांना (बागूल यांना) वाटते."
दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान या ग्रंथाविषयी बोलताना उत्तम कांबळे म्हणतात की दलित साहित्य आणि विद्रोह यांचे नाते काय आहे, याची मांडणी पहिल्यांदा बाबूराव बागूल यांनी केली त्यामुळे हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
महाकादंबरी लिहायचे होते स्वप्न
बाबूराव बागुलांना नव्या पिढीसाठी अनेक गोष्टी लिहायच्या होत्या. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावर, नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहावर त्यांना कादंबरी लिहायची होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी महात्मा फुलेंवरही एक कादंबरी लिहायची होती पण त्यांना पक्षाघात झाल्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण लिखाण आपल्यापर्यंत पोहोचले नाही.
त्यांनी दिलेल्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानासाठी त्यांनी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळाले आहेत. तर आता त्यांच्याच नावाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे 'बाबूराव बागूल' हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या कथा-कविता या इंग्रजी-हिंदीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत आणि त्यांची दखल आंतराष्ट्रीय पातळीवरील समीक्षकांनी घेतली आहे.
26 मार्च 2008 ला बाबूराव बागूल यांचे नाशिकमध्ये निधन झाले.
त्यांच्या निधनावर त्यांची कन्या शोभा बागूल यांनी 'सूर्याचे सांगाती' या कथासंग्रहासाठी लिहिलेल्या मनोगतात म्हटले आहे, "26 मार्च 2008 रोजी 'सूर्याचा सांगाती' सूर्याकडे निघाला होता. सात-आठ महिन्यांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना, आमच्या साऱ्यांच्या अविरत धावपळीला पूर्णविराम मिळाला होता. निर्झराचे हसू निमाले होते!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











