'आम्ही शाईने लिहितो, तुम्ही रक्ताने लिहिता', माधव कोंडविलकरांच्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे'ची गोष्ट

फोटो स्रोत, SONIA GLORIA PUBLICATIONS
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बाप कुजक्या कातड्यांच्या टोपल्या डोक्यावर वहायचा
आणि 'माणसानं आप्ला धरम कदी सोडू नये' म्हणायचा.
पेन्सिल धरण्याच्या वयातच टाक्यात हात घालावे लागले.
मिसरूड फुटायच्या आत गाढवागत कातड्यांचे ढीगच्या ढीग उपसावे लागले.
चुना कालवताना सर्वांगाची आग आग होई.
खुंट्यावर चामडे पिळताना रक्तांचं पाणी होऊन जाई.
मित्रांनो, हे सारे हसण्याबागडण्याच्या वयात वाट्याला आले
नेमके नको तेच घडले - आयुष्य सारे नासत गेले !
समाजातील लाखो वंचितांच्या व्यथा, वेदनांना आवाज देतानाच कलात्मकता काय असते याचे दर्शन तुम्हाला घ्यायचे असेल तर 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे पुस्तक तुमच्याच साठी आहे.
वरील कवितेच्या ओळी याच पुस्तकातील आहेत.
'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या अजरामर कलाकृतीसोबतच तब्बल 60 पुस्तकं लिहिणाऱ्या माधव कोंडविलकरांचा आज स्मृतिदिन आहे.
कथा, कादंबरी, कविता, चरित्र इत्यादी विविध प्रकार हाताळणाऱ्या माधव कोंडविलकरांचे 11 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले. स्मृतिदिनानिमित्त त्यांचे कार्य आणि व्यक्तित्वाचा परिचय करुन देणारा हा लेख.
कोंडविलकरांच्या अनेक पुस्तकांमध्ये 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकाचे हिंदीमध्ये 'अंत्यज' आणि 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे दोन अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
तसेच फ्रेंचमध्ये 'INDE journal d'un intouchable' हा अनुवाद प्रकाशित झाला आहे.

फोटो स्रोत, Sonia Gloria Publications
जातिव्यवस्थेच्या शोषणामुळे दुर्बल झालेल्या समाजाचे सहाव्या आणि सातव्या दशकातील चित्रण अत्यंत तटस्थपणे आपल्याला त्यांच्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या पुस्तकात पाहायला मिळते.
हे पुस्तक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. 1977 साली 'तन्मय'च्या दिवाळी अंकात हे साहित्य पहिल्यांदा प्रकाशित झालं. त्यानंतर 1979 साली हे पुस्तक रूपातून वाचकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून आजपर्यंत मराठी साहित्यसृष्टीतील एक मानबिंदू म्हणूनच या पुस्तकाकडे पाहण्यात आलं आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने अत्यंत थेटपणे केलेली मांडणी, आजूबाजूचा समाज, परिस्थिती यांचं अस्सल चित्रण आणि हे करताना कथानकाचा धागा कुठेही खंडित होणार नाही या तंत्रावर लेखकाची हुकूमत.
या गोष्टींमुळेच आजही हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरणारे आणि समीक्षकांनी गौरवले जाणारे ठरते.
माधव कोंडविलकर यांचा जन्म 15 जुलै 1941 रोजी झाला. ते कोकणातील सोगमवाडी, मौजे देवाचे गोठणे येथे चर्मकार समाजात जन्मले होते.
एकीकडे चार्तुवर्ण्याधारित जातीची उतरंड आणि दुसरीकडे दारिद्र्य या दुहेरी कात्रीत त्यांचे बालपण गेले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांना आपले प्राथमिक शिक्षण घ्यावे लागले.
कितीही काम केलं तरी तत्कालीन सवर्ण त्या कामाचा मोबदला म्हणून त्यांच्या वडिलांना पैसे देण्यास टाळाटाळ करायचे. वर्षाला अन्नधान्याच्या स्वरूपात जे बलुतं मिळतं त्यात त्यांच्या कुटुंबाला आपला उदरनिर्वाह करावा लागत असे.
कामाचा मोबदला म्हणून रोख रक्कम मिळायचे देखील दुर्मीळ क्षण असत. त्यात अत्यंत कडवट आणि जिव्हारी लागेल अशा भाषेत त्यांच्या आई-वडिलांचा पानउतारा होताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मुंबईला आपल्या नातेवाईकाकडे शिक्षणासाठी गेले. तिथे देखील एका चाळीतल्या खोलीत अनेक बिऱ्हाडे राहायची. तिथे अभ्यास करताना अनेक अडचणी येत असत.
कधी डबे पुरवून, कधी हाती पडेल ते काम करुन, कधी गिरणीत काम करुन त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली ती स्वतःच्याच गावी. आपल्याच गावात आलेले हे अनुभव म्हणजे 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे.'

फोटो स्रोत, Sonia Gloria Publications
ज्या शाळेत आपण एकेकाळी शिक्षण घेतलं आज त्याच ठिकाणी शिकवायला जायचं आहे म्हटल्यावर कुणालाही अभिमान वाटण्याचा, आनंदी होण्याचा तो क्षण. पण जातिभेदामुळे त्यांच्या या आनंदावर अल्पावधीतच विरजण पडलं.
मुख्याध्यापकांनी देखील त्यांना थेट विचारलं 'तुमची जात कोणती?' इतर जातीच्या शिक्षकांना एक वागणूक तर कोंडविलकरांना वेगळी वागणूक त्या ठिकाणी मिळत असे.
आपल्याच गावात जातीमुळे चांगल्या वस्तीमध्ये राहायला जागा मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे त्यांना राहायला शाळेपासून दूर गावाकुसाबाहेर असलेल्या आपल्या जातीच्या लोकांसोबत राहावे लागे.
शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांना कळले की आपल्या नव्या मास्तरांची जात कोणती आहे, तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी वर्गाला सुट्टी मिळाल्यानंतर सरळ कालव्याचा रस्ता धरला आणि अंघोळी केल्या.
ही गोष्ट जेव्हा कोंडविलकरांना कळली तेव्हा त्याचे त्यांना अतोनात दुःख झाले. त्यांनी या गोष्टीची तक्रार वरिष्ठांकडे देखील केली पण 'गावात अशा गोष्टी घडतातच' असे म्हणून त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केला.
तेव्हा आपल्यावर झालेला अन्याय, कोंडविलकरांनी वृत्तपत्राला पत्र लिहून सांगितला. ते पत्र प्रसिद्ध देखील झाले. त्यानंतर तथाकथित उच्चवर्णीयांच्या रोषाला त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सामोरे तर जावेच लागले. पण 'आपल्या जातीची बदनामी का केली?' असा सवाल त्यांनाच स्वजातीयांनी विचारला.
आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव कोंडविलकर त्यांना करुन देत होते, परंतु त्या लोकांचे एकच म्हणणे होते की 'आपल्या जातीतल्या गोष्टी बाहेर सांगणे बरोबर नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून राहण्यात भलाई आहे, आणि तुम्ही जे काही केले त्यामुळे जातीची अडचणच झाली.'
अशा दुहेरी त्रासाला कोंडविलकर यांना आपल्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात सामोरे जावे लागले.

फोटो स्रोत, sonia gloria publications
कोंडविलकरांना सुरुवातीच्या काळापासून पुस्तके वाचण्याचा भयंकर नाद होता. आपली आवड जोपासता यावी यासाठी ते खूप प्रयत्न करत. पण कोकणातील आडगावात पुस्तके मिळणे तर दूर, उलट टपाल सुद्धा वेळेवर येत नसे.
त्यामुळे त्यांना पुस्तकांशी सोबत करणे कठीण जाई. राहायला चांगली जागा नाही, गावातील जातिभेद, पुस्तके मिळण्याची सोय नाही, स्वजातीयांकडूनही होणारा त्रास, सवर्णांकडून मिळणारी वागणूक अशा अनेक आव्हानांना तोंड देत कोंडविलकरांनी वाचन, मनन आणि लेखन सुरू ठेवले.
सहा-सात वर्षांनी त्यांची बदली झाली आणि नंतर राहायला चांगली जागा देखील मिळाली. या काळात त्यांचे लेखन बहरले. त्यांनी विविध विषय घेऊन चरित्रे लिहिले, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना भाषणासाठी निमंत्रणं येत असत तेव्हा ते समाजप्रबोधन हा एकमेव हेतू ठेवून प्रवास करत असत.
असे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कोंडविलकरांनी 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिली आणि ती अजरामर ठरली. अनेक समीक्षकांनी या स्वकथनाला साहित्यातील 'अक्षर लेणे' देखील म्हटले आहे.
कादंबरी, आत्मचरित्र की रोजनिशी ?
हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हापासून ते आजपर्यंत हे पुस्तक नेमके कोणत्या साहित्य प्रकारात मोडते याची बरीच चर्चा आहे. या पुस्तकाची रचना रोजनिशी सारखी आहे.
1969 ते 1977 या वर्षांमध्ये घडलेल्या घटना लेखकाने लिहिलेल्या आहेत. आत्मचरित्रात जसं स्वतःबद्दल सांगितलं जातं, आपलं भवताल नोंदवलं जातं त्या गोष्टी या पुस्तकात आहेत. त्यामुळे या पुस्तकाला आत्मचरित्र देखील म्हटले जाते.
पण लेखकाने या घटना अगदी रोजनिशीच्या स्वरुपात साचेबद्धपणे लिहिलेल्या नाहीत. त्यात कथानक आहे, पात्रं आहेत, संवाद आहेत आणि एखाद्या कादंबरीमध्ये मिळतो तो अवकाशदेखील आहे त्यामुळे या पुस्तकाला कादंबरीदेखील म्हटलं जातं.
अनेक समीक्षकांनी म्हणून मधला मार्ग स्वीकारला आहे ते या पुस्तकाला 'आत्मचरित्रात्मक कादंबरी' म्हणतात.
स्वतः कोंडविलकरांनी देखील या पुस्तकाचे वर्णन 'कल्पना टीचभर आणि वास्तव ढीगभर' असे केले आहे.
हे पुस्तक नेमके कोणत्या साहित्य प्रकारात मोडते यावर काही प्रमाणात मतभेद असले तरी एका गोष्टीत मात्र सर्वांचे एकमत आहे- ते म्हणजे या पुस्तकाची गुणवत्ता.
प्रसिद्ध नाटककार जयवंत दळवी यांनी म्हटलं होतं की 'कोंडविलकरांचे साहित्य गाजले ते केवळ दलित साहित्य म्हणून गाजलं नाही तर एक उत्तम कलात्मक पुस्तक म्हणून गाजलं.'
कोंडविलकर या पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगतात सांगतात की 19 व्या वर्षी त्यांना प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागली ती आपल्या गावातच मौजे देवाचे गोठणे, ता. राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. पुढील 29 वर्षे ते शिक्षक राहिले आणि त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून उर्वरित आयुष्य साहित्यसेवेला समर्पित केले.
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे मराठी साहित्यातला मैलाचा दगड ठरण्याचे कारण

फोटो स्रोत, Gloria Khamkar
मराठी साहित्याचे वेगळेपण हे आहे की प्रस्थापित साहित्याला, व्यवस्थेला आव्हान देणारे साहित्य अत्यंत कणखर स्वरूपात समोर आले आहे. या साहित्याला 'दलित साहित्य' किंवा 'विद्रोही साहित्य' म्हटलं जातं. अत्यंत कसदार शैलीत आणि अनुभवातून आलेल्या दलित साहित्याने केवळ मराठीच नाहीतर जगभरातील साहित्यप्रेमींना आपल्याकडे आकर्षित केलं आहे.
समाजातील एका मोठ्या वर्गाचं असं आयुष्य असतं हेच मुळात या साहित्याच्या माध्यमातून सर्वांसमोर आलं. या साहित्याने केवळ अन्यायाला वाचाच नाही फोडली तर एक संरचनात्मक कार्यक्रम देऊन फुले-शाहू-आंबेडकरी मार्गावर चालण्याची प्रेरणा पण दिली.
हे सर्व होत असताना ते साहित्य प्रचारकी राहणार नाही याकडे देखील या साहित्यिकांनी लक्ष पुरवले आणि त्यातून मराठीतील एकाहून एक सरस अशा पुस्तकांची निर्मिती झाली. त्याच श्रृंखलेतील 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे पुस्तक आहे.
एक तरुण आपल्याच गावात येतो आणि त्याला शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या जातीत जन्म घेतला आहे त्यावर होणाऱ्या अन्यायाची, आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीची चीड निर्माण होते.
प्रसंगी जमलं तर समजावून, तर कधी विरोध करून तो या गोष्टींवर प्रतिक्रिया देत जातो पण त्याचा परिणाम असा होतो की तो ज्या जातीत जन्मला आहे तो समाज देखील त्याच्यावर नाराज होतो आणि जो समाज त्यांच्यावर अन्याय करत आहे त्याचा तर रोष त्यांच्यावर जन्मजातच असतो.
अशा विवंचनेत अडकेलल्या तरुणाची कथा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. अनेक प्रसंग आपल्याला सुन्न करुन टाकतात.
कथानायक आपल्यावर झालेला अन्याय वृत्तपत्रातून समोर आणतो त्यानंतर कथानायकाच्या वडिलांनी संपूर्ण गावासमोर माफी मागावी लागते. 'असं आपला मुलगा भविष्यात काही करणार नाही' याची ग्वाही द्यावी लागते.
हा प्रसंग असो की गावातील एक सवर्ण येऊन शिक्षक झालेल्या मुलालाच आपली चप्पल दुरुस्त करुन देण्याचा आग्रह धरतो तो प्रसंग असो, जातिव्यवस्थेची दाहकता आपल्यापर्यंत पोहचवतात.
आपण समोर येत असताना तथाकथित सवर्ण महिला कथानायकाची सावली अंगावर पडू नये म्हणून कसा स्वतःचा बचाव करतात आणि त्यावेळी नायकाला वाटलेला अपमान, यामुळे केवळ नायकाच्याच नाही तर आपल्याही मनात चीड निर्माण होते.
कधी वाटतं की हे सर्व हा नायक का सहन करत होता? तत्क्षणी त्याने प्रतिकार का केला नाही, तेव्हा या पुस्तकातच नायकाला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. केशव मेश्राम यांच्या आलेल्या पत्रात याचे उत्तर सापडते. प्रा. मेश्राम नायकाला सल्ला देतात की "पुढील एक दोन दशकांत समाजात नवे परिवर्तन घडेल आणि तेव्हा काळाच्या पतंगाचे दोर बहुजन समाजाच्या हातात असतील. तोवर सोसले पाहिजे. चिवटपणे उभे राहिले पाहिजे."
त्यांच्या सल्ल्याप्रमाणे कथानायक आपल्या परिस्थितीला एका बाजूने सामोरे जाताना तर दिसतो त्याचबरोबर संवैधानिक मार्गाने त्याचा प्रतिकारपण करताना दिसतो.
प्रसंगातला जिवंतपणा, शब्दांची थेट मांडणी, बोलीभाषेचा वापर आणि या सर्वांच्या वर म्हणजे मानवी मूल्यांना दिलेलं प्राधान्य या सर्वांमुळे आपण या पुस्तकात हरवत जातो.
प्रसिद्ध लेखक बाबा कदम यांनी तर कोंडविलकरांच्या साहित्याबद्दल म्हटलं होतं की 'आम्ही शाईने लिहितो तुम्ही तर रक्ताने लिहितात.' तर नामदेव ढसाळांनी त्यांच्या साहित्याला 'महाकाव्य' असे म्हटले आहे.
कोंडविलकर यांच्या साहित्याचे पैलू
पुस्तकाला मागणी असून गेली अनेक वर्षं हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. शेवटची आवृत्ती 1994 ला प्रकाशित झाली होती. त्यानंतर हे पुस्तक उपलब्धच नव्हतं. माधव कोंडविलकर यांच्या कन्या डॉ. ग्लोरिया खामकर यांनी 'सोनिया-ग्लोरिया प्रकाशना'च्या माध्यमातून 2024 साली या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रसिद्ध केली.
डॉ. ग्लोरिया खामकर या इंग्लंडमध्ये बोर्नमथ विद्यापीठाच्या मिडिया स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत. बीबीसी मराठीने त्यांच्याशी बातचीत केली आणि माधव कोंडविलकर यांच्या साहित्याचे पैलू समजून घेतले.
अनेक वर्षांच्या अवकाशानंतर हे पुस्तक पुन्हा प्रकाशित का करावे वाटले हे विचारल्यावर ग्लोरिया सांगतात, की "जात हा मुद्दा आजही तितकाच प्रासंगिक आहे. अनेक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जातिव्यवस्था काम करताना दिसते. त्याचे चटके बहुजन समाजातील लोकांना आजही बसताना दिसतात.
"माधव कोंडविलकरांच्या पुस्तकातून चित्रित झालेले तत्कालीन समाजाचे चित्रण हे केवळ त्याच नाही तर आजच्याही काळावर भाष्य करणारे आहे. हा एक मुद्दा होता. त्याचबरोबर कोंडविलकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं.
"नोकरी करताना त्यांना अनेक अडथळे आले असं असताना देखील ते वाचन-लिखाण करत राहिले आणि त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. आजच्या पिढीसाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरू शकते. हा विचार करुन हे पुस्तक पुन्हा आणायचे आम्ही ठरवले," असे डॉ. ग्लोरिया सांगतात.
'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या व्यतिरिक्त माधव कोंडविलकरांची इतर कोणती पुस्तके आपण वाचायला हवीत, या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. ग्लोरिया सांगतात की "कोंडविलकरांच्या पुस्तकांचा केंद्रबिंदू हा माणूसच होता. मानवाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी त्याची सर्व अंगाने प्रगती व्हावी हेच ध्येय ठेवून त्यांनी आपले लिखाण केले.
"त्यांच्या कादंबऱ्यातून त्यांनी प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेतला आणि त्यातून ते सामाजिक प्रश्न मांडत आणि संरचनात्मक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करत. उदा. 'हाताची घडी तोंडावर बोट' ही कादंबरी शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करते. तर 'भूमिपुत्र' या कादंबरीतून गावगाड्यातील कष्टकरी, मजूर, शेतकरी वर्गाचा संघर्ष त्यांनी दाखवला आहे. तर 'एक होती कातळवाडी' हे पुस्तक त्यांनी एन्रॉन प्रकल्पावर लिहिले आहे.
"असे विविध विषय घेऊन ते लिहित असत. याचबरोबर महापुरुषांची चरित्रे त्यांनी लिहिली. सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची चरित्रे त्यांनी लिहिली. चित्रपट अभिनेत्री मधुबालाचेही चरित्र त्यांनी लिहिले आहे. लहान मुलांसाठी विपुल लेखन त्यांनी केले आहे," असे ग्लोरिया यांनी सांगितले.
वडिलांच्या आठवणी सांगताना ग्लोरिया सांगतात की, "बाबा मितभाषी होते. सतत वाचन करत असत. 29 वर्षं नोकरी केल्यावर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि नंतर पूर्ण वेळ वाचन आणि लेखन केले. समाज प्रबोधनासाठी ते महाराष्ट्रभर फिरत असत. घरातील कामे करताना, भाज्या आणताना देखील त्यांच्या डोक्यात काही ना काही विषय सुरू असे आणि घरात आले की पटकन ते आपल्या टेबल-खुर्चीत बसून लिहायला लागत. त्यांच्याकडे अत्यंत दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह होता. साधारणतः दीड हजार पुस्तके आमच्या घरी होती."
'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' ही केवळ एका व्यक्तीची कथा नाहीये तर पन्नास वर्षांपूर्वीचा काळ कसा होता, त्यावेळचे लोक कसे होते, समाज व्यवस्था कशी होती हे समजून घेण्याचा दस्तावेज देखील आहे.
आज आपल्याला वाचण्यासाठी हजारो पुस्तकं उपलब्ध आहेत. पुस्तकांच्या हार्डकॉपी मिळवण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, एकदा ऑर्डर दिली की काही दिवसांत आपल्याला ते पुस्तक मिळते. त्याचबरोबर ई-फॉर्मॅटमध्ये तर काही क्षणात पुस्तक आपल्याला उपलब्ध होतं, मग 50 वर्षांपूर्वीचे हे पुस्तक आपण आज का वाचावे? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
तेव्हा ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुळकर्णी यांनी या पुस्तकाबद्दल जो अभिप्राय दिला आहे तो नक्कीच आपल्या सर्वांना उपयोगी पडणारा आहे. वा. ल. कुळकर्णी म्हणतात, "तन्मयच्या दिवाळी अंकात मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आपल्या रोजनिशीतून आपल्या चातुर्वर्ण्याधिष्ठित व्यक्तिजीवनाचे व समाजजीवनाचे जे विदारक व जीव गुदमरुन टाकणारे दर्शन घडले ते अनेक कादंबऱ्या लिहूनही घडविता आले नसते. यंदाच्या दिवाळी अंकातील आतापर्यंत वाचलेल्या सर्व लेखनात मला हे लेखन अत्यंत मोलाचे वाटते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











