जेव्हा अण्णा भाऊ साठे रशियात म्हणाले होते 'मी 3.5 कोटी लोकांची मराठी भाषा बोलतो'

फोटो स्रोत, Raju Sanadi, Karad
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अण्णाभाऊ साठे (1 ऑगस्ट) यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा रशियात पुतळा उभा राहिला म्हटल्यावर कोणत्या मराठी व्यक्तीचे मन आनंदाने उचंबळणार नाही. आपल्या राज्यातील एका समाजसेवक आणि साहित्यिकाचा अशाप्रकारे गौरव होणं ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरते.
रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मॉस्कोतील रुडमिनो मार्गरेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेनं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला आहे.
या पुतळ्याचे अनानवरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंआहे.
भारतातील अनेक महापुरुषांचे अनेक पुतळे जगभरात उभारण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी भारतीय समुदाय प्रामुख्याने आहे त्या ठिकाणी भारतीय महापुरुषांचे पुतळे असणे ही नित्याची बाब मानली जाते.
पण रशियात अण्णा भाऊंचा पुतळा का उभा करण्यात आला आणि अण्णाभाऊंचं आणि रशियाचं नेमकं नातं काय याबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झाले आहे. याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अण्णा भाऊ साठे हे मराठीतील प्रथितयश लेखक होते ही गोष्ट तर आपणा सर्वांना माहीत आहे. अण्णा भाऊंनी लिहिलेल्या कादंबऱ्या, गीतांनी, कथांनी मराठी जनतेचे 7 दशकाहून अधिक काळ प्रबोधन आणि मनोरंजन केले आहे.
अण्णा भाऊ साठेंनी विविध कलाप्रकार आणि साहित्याचे प्रकार हाताळले होते. त्यातील महत्त्वाचा एक प्रकार म्हणजे अण्णा भाऊंनी लिहिलेलं 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन.
अण्णा भाऊंनी लिहिलेल्या या पुस्तकामुळे आपल्याला कल्पना येऊ शकते की अण्णाभाऊ साठे आणि तत्कालीन रशियाचे काय नाते होते.
स्तालिनग्रादचा पोवाडा
अण्णा भाऊ साठे हे विचारांनी साम्यवादी होते. त्यांना कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंजल्स, लेनिन यांच्या विचारांचे आकर्षण होते.

फोटो स्रोत, Maharahtra Govt
कामगार, शोषित वर्ग, समाजातील तळागाळातील लोकांचे कल्याण हे साम्यवादामुळे होईल असे त्यांना मनापासून वाटत होते. पृथ्वी ही शेषनागाच्या शिरावर नसून कामगाराच्या तळ हातावर उभी आहे असं अण्णा भाऊ म्हणत.
रशियात लेनिन यांच्या नेतृत्वात कामगार, विस्थापित, शोषित वर्गाने लढा दिला आणि त्या ठिकाणी असलेली सरंजामशाही- भांडवलशाहीच्या जोरावर असलेली सत्ता उलथवून टाकली.
त्यानंतर रशियात साम्यवादी विचारधारेचे राज्य आले. देशातील साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क आहे हे साम्यवादाचे सूत्र ज्या ठिकाणी प्रत्यक्षपणे लागू करण्यात आले होते त्यामुळे अण्णा भाऊंच्या मनात रशियाविषयी कुतूहल आणि आदर दोन्ही निर्माण झाला.

फोटो स्रोत, Government of India
त्यांनी रशियन क्रांतीवरील पुस्तकं, लेनिन यांची पुस्तकं, तसेच रशियन साहित्यिकांनी लिहिलेली विविध पुस्तकं त्यांनी वाचली होती. त्यांच्या या सर्व विचारमंथनातून त्यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी झालेल्या स्टालिनग्राडच्या लढाईवर 'स्तालिनग्राडचा पोवाडा' लिहिला होता.
या लढाईत रशियन सैन्याने जर्मनीची नाझी सैन्याचा धुव्वा उडवला होता. अण्णा भाऊंच्या मते ही लढाई केवळ दोन देशातील नव्हती तर दोन विचारधारेंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांची देखील होती.
त्यामुळे अण्णा भाऊ या लढाईचं वर्णन 'दलितांचा आशाकिरण रशियाचा प्राण' असे करतात. भांडवलदारांचे हस्तक बनलेल्या नाझी जर्मनीच्या सैन्यावर रशियन सैन्याने मिळवलेला विजय हा सर्वसामान्यांचा विजय असल्याचे अण्णा भाऊंनी आपल्या पोवाड्यातून म्हटले आहे.
हा पोवाडा पुढे रशियन भाषेत देखील अनुवादित करण्यात आला होता आणि रशियाचा लोकांना तो प्रचंड आवडला होता.
'तुम्ही तर तुरुंगात असता..'
या सर्व गोष्टींमध्ये रशियाला भेट देण्याची आस त्यांच्या मनात निर्माण झाली. रशियातले लोक कसे असतील, तिथे गरिबी आहे की नाही, तिथे कलाकार लोक कसे असतात हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.
'माझा रशियाचा प्रवास'मध्ये ते लिहितात, आपण वाटेल ते करून सोव्हियत संघराज्य पाहावे, असं मला फार वाटत होतं. ती आशा माझ्या मनात सारखी दिवसेंदिवस प्रबल होत होती. रशियातील ते कामगार राज्य कसे असेल, तिथे कॉ. लेनिनने केलेली क्रांती, मार्क्सचे महान तत्त्वज्ञान कसे साकार झाले असेल ती नवी दुनिया, नवी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल, या विचाराने माझं मन भारावलं होतं.
रशिया पाहण्याची त्यांची इच्छा इतकी प्रबळ झाली होती की 1948 मध्ये त्यांनी दोन वेळा पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी अण्णा भाऊंना बोलावून विश्वासात घेऊन सांगितले होते की, "बाबा तू आमचा वैरी आहेस, आम्ही चांगले लोक आहोत म्हणून तू बाहेर आहेस नाहीतर तुझी जागा तुरुंगात."
त्यानंतर अनेक वर्षं सरली पण रशिया प्रवासाचं स्वप्न अधुरं राहिलं ते राहिलंच. 1961 मध्ये त्यांच्या 'फकिरा' कादंबरीला पुरस्कार मिळाला आणि इंडो-रशियन कल्चरल सोसायटीकडून भारताच्या शिष्टमंडळात रशियाला भेट देण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.

फोटो स्रोत, Devendra Fadanvis
अण्णा भाऊंचे एक स्वप्न साकार होणार होते आणि नेहमी कुर्ता, पायजमा आणि कोल्हापुरी वहाणा वावरणारे अण्णा भाऊ आता सुट-बुटात रशियाला जाणार होते.
अण्णा भाऊ रशियाला जाणार म्हणून त्यांच्या मित्र परिवारातील लोक आनंदून गेले. सर्व महाराष्ट्रातून त्यांना लोकांनी प्रवासासाठी पैसे पाठवण्यात आले. लोकांच्या मदतीच्या ओघामुळे एकाच दमात यामुळे आपला खर्च निवारल्याचं अण्णाभाऊ सांगतात.
मुंबईहून दिल्ली, दिल्लीहून ताश्कंद आणि ताश्कंदहून मॉस्को असा प्रवास त्यांनी केला.
अण्णा भाऊ रशियाला जाणार म्हटल्यावर त्यांचे अनेक आप्तस्वकीय, मित्र त्यांना निरोप देण्यासाठी आले होते.
लोकांना हार-फुलं घातले, लोक वेगवेगळ्या सूचना देत होते. रशियात गेल्यावर हे पाहा- ते पाहा. तिथे झोपड्या किती हे पाहा, तिथले सिनेमे-नाटक पाहा, गरिबी-उद्योग पाहा अशा शेकडो सूचना लोक त्यांना देत होते.
कुणी शुभेच्छा देत होतं कुणी त्यांना काळजी घेण्याबाबतचे सल्ले देत होत होतं या सर्व गोष्टी स्वीकारत स्वीकारत ते दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसले.
दिल्लीत आल्यावर ते ज्येष्ठ साम्यवादी नेते खासदार कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या घरी उतरले. कॉ. डांगे यांच्या पत्नी उषाताई डांगे यांनी त्यांचे स्वागत केले. अण्णा भाऊंची त्यांनी आस्थेनी विचारपूस केली.
सोबत काय घेतलं काय नाही, तयारी झाली की नाही या सर्व गोष्टी त्यांनी विचारल्या. काही कमी जास्त असेल तर वस्तू खरेदी करून आणण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी ज्या प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यावरून मला माझ्या आईची आठवण झाली असं अण्णा भाऊंना वाटले.
अण्णा भाऊंच्या प्रवासाची सुरुवात
कॉ. डांगे यांचे आशीर्वाद घेऊन ते दिल्ली विमानतळावरुन 'चित्तोड की रानी' या विमानाने ताश्कंदला निघाले.
रशियात येण्यापूर्वीच अण्णा भाऊंची नाव साहित्यिक वर्तुळात परिचित होते. स्तालिनग्राडचा पोवाडा लोकप्रिय ठरला होता, चित्रा कादंबरी आणि त्यांची सुलतान ही कथा अनुवादित झाली होती.
अण्णा भाऊंची ओळख करून देण्यासाठी जो मजकूर छापून येत होता त्यात 'सुलतान फेम' अण्णाभाऊ साठे असा उल्लेख असे.
रशियात गेल्यावर काय पाहायचं हा प्रश्न शिष्टमंडळाला विचारण्यात आला. अण्णा भाऊ ज्या शिष्टमंडळात होते त्यात एकूण सहा लोक होते. ते सर्व विविध क्षेत्रातील लोक होते. त्यांच्या आवडी-निवडी विविध होत्या.
दोन जण डॉक्टर होते ते म्हणाले इथे ऑपरेशन कसे होतात हे आम्हाला पाहायचंय, एक आमदार होते ते म्हणाले इथली संसदीय कामकाज पाहायचंय, लोकशाही कशी आहे ते पाहायचंय असे म्हणाले, एक जण तर स्वतःवरच शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आले होते, एक वकील होते त्यांना न्यायदान पद्धती पाहायची होती.
एक पियानोवादक होते त्यांना पियानोवादन ऐकायचे होते. सर्वजणांनी आपल्याला काय काय पाहायचे हे सांगितले. शेवटी त्यांनी अण्णा भाऊंना विचारले, "मि. साठे तुम्हाला काय पाहायचेय?"
त्यावर अण्णा भाऊ म्हणाले, 'मला फक्त इथल्या फुटपाथनं भटकायचं आहे.'
त्यांचं उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
रशियात मात्र ही गोष्ट अण्णा भाऊंना दिसली नाही
रशियात अण्णा भाऊंनी अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या. पण त्यांना सर्वांत जास्त आकर्षण कुणाचे असेल तर सामान्य माणसाचे. सामान्य माणसाला या नव्या सत्तेबद्दल काय वाटतं, तो कसा राहतो वागतो कसा या सर्व गोष्टी त्यांच्या जिव्हाळ्याच्या होत्या.
तिथले भव्य प्रासाद त्यांनी पाहिले की त्यांना पहिले तिथल्या कामगाराची आठवण होत असे ज्याने ती वास्तू उभी केली आहे. तिथली स्वच्छता, टापटीप, शिस्त या सर्वांच्याच ते प्रेमात पडले होते. रेल्वे स्थानकावर त्यांनी पोस्टर्स पाहिले आणि ते अत्यंत स्वच्छ होते.
त्यावरून ते म्हणतात इथे रशियात बहुतेक पान खाऊन लोक थुंकत नसावेत. तिथल्या स्थानकावर कागदाचा एक तुकडा नसतो याचे देखील त्यांना आश्चर्य वाटले होते. असे पोस्टर मुंबईत असते तर त्याचे काय झाले असते याची मजेशीर कल्पना अण्णाभाऊंनी केली आहे.
'असं पोस्टर घाटकोपरच्या स्थानकावर लागलं असतं तर मीनाकुमारीला मिशा काढणाऱ्या आणि पृथ्वीराज कपूरच्या मिशा भादरणाऱ्या कलाकाराने काय केलं असतं,' असा प्रश्न अण्णा भाऊ विचारतात.
अण्णा भाऊंनी लेनिनग्राडला भेट दिली तेव्हा त्यांना सर्वांत जास्त काय आवडलं असेल तर जागोजागी लोक पुस्तक वाचताना दिसतात हे दृश्य. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक वास्तू पाहिल्या. रशियन माणूस हा इतिहास जतन करतो आणि निर्माण देखील करतो असं ते म्हणतात.
मॉस्को शहरात आल्यावर त्यांनी शहरातील गॉर्की रस्त्याला भेट दिली. इतक्या मोठ्या रस्त्याला लेखकाचे नाव देण्यात आले हे पाहून ते भारावून गेले. रशियात कलावंत आणि लेखकाला मान असल्याची नोंद त्यांनी घेतली.
'शिवाजी महाराजांच्या राज्यातून मी आलो आहे'
अण्णाभाऊ यांचे ज्या ठिकाणी भाषण असायचे त्या ठिकाणी दोन दुभाषे असत. एक व्यक्ती मराठीतून इंग्रजीत भाषांतर करत असे आणि दुसरी व्यक्ती इंग्रजीचे रशियनमध्ये भाषांतर करत असे.

मॉस्कोतील पहिल्या भाषणात ते म्हणाले होते, "कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ असावी. परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे. त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात नि ती माणसं तुमच्यासारखीच नेक नि झुंजार आहेत. तुमचा अफानासी भारतात आला होता. पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर, महाराष्ट्र राज्यात, शिवाजी राजाच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलत आहे."
त्या भाषणानंतर लोकांची झुंबड उडाली आणि त्यांना ते महाराष्ट्राविषयी विविध प्रश्न विचारू लागले.
रशियात शिक्षणाची नदी वाहते
रशियाबद्दल बोलताना अण्णाभाऊ साठे म्हणाले होते रशियात शिक्षणाची नदी वाहते. आणि माणसांना विद्येचं वेड लागलं आहे. म्हणूनच प्रगतीने त्यांचा पदर धरला आहे.
त्यांनी सोव्हियत युनियनमध्ये सुरू असलेले सामुदायिक शेतीचे प्रयोग देखील पाहिले. खेड्यात आणि शहरात कसलंच अंतर उरलं नाही याचं त्यांना कौतुक वाटलं होतं.
ताश्कंदजवळ असलेल्या स्तालिन सामुदायिक शेताला त्यांनी भेट दिली होती. त्याबद्दलचं त्यांचं निरीक्षण होतं की तेथे दीड हजार हेक्टरच्या जमिनीत 1104 शेतकरी काम करतात आणि त्यात 475 महिला आहेत. त्या भागात चार शाळा असून शेतकऱ्यांच्या मुलांना तिथं शिक्षण दिलं जातं. सोबतच दुधदुभतं आणि कुक्कुटपालन कसं केलं जातं हे त्यांनी पाहिलं.
अण्णाभाऊ म्हणतात मी रशियाच्या समाजवादाच्या यशाबरोबर त्यांचे अपयशही हुडकित होतो. ऐश्वर्याबरोबर दारिद्र्यही मी शोधत होतो. परंतु मला ते दारिद्र्य दिसत नव्हते. दारिद्र्य हे दडत नसते.
अण्णाभाऊ साम्यवादाच्या प्रेमात होते पण माणूस पाहण्याचे प्रयत्न प्रामाणिक
"कॉ. लेनिन यांनी तिथे समाजवादी दुनिया निर्माण केली आहे. ती मला स्वप्नसृष्टीसारखी भासत होती आणि स्वप्नसृष्टीत माझे भ्रमण सुरू आहे," असं अण्णा भाऊ म्हणतात.

फोटो स्रोत, AFP
सत्ता कुणाचीही असली आणि कितीही निर्दयी असली तरी दारिद्र्य कधीच लपून राहत नाही आणि रशियात दारिद्र्य नाही याचं त्यांना अप्रूप वाटत होतं.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या निवडक अण्णा भाऊ साठे वाङमय या पुस्तकात समीक्षक वसुंधरा पेंडसे नाईक यांचा लेख आहे. त्यांनी अण्णा भाऊंच्या प्रवासवर्णनाचे विश्लेषण केले आहे.
त्या म्हणतात की "अण्णा भाऊंचं प्रवासवर्णन म्हणजे एका सच्च्या श्रमिकाच्या कलावंत मनाला दिसलेला रशिया या पुस्तकात आपल्याला भेटतो. ते पर्यटन स्थळ, सौंदर्यस्थळापेक्षा माणसाच्या अंतरंगात जास्त रमतात. सर्वांशी आत्मीयतेने साधलेल्या संवादातून त्यांना रशियातील माणूस पाहायचा होता."
अण्णा भाऊ साठे हे साम्यवादी विचारधारेचे होते त्यामुळे त्यांना रशियातील सर्वच गोष्टी चांगल्या दिसल्या असाव्यात असा एक टीकेचा सूर अण्णा भाऊंच्या प्रवासवर्णनाबद्दल उमटला होता.
पण त्यांच्या लेखनाची ही मर्यादा लक्षात घेतली तरी देखील त्यांचे प्रवास वर्णन हे माणूस शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मत वसुंधरा पेंडसे यांनी मांडले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








