इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात कशा प्रतिक्रिया उमटल्या?

फोटो स्रोत, ANI
इराणच्या आकाशात जेव्हा अमेरिका आणि इस्रायलची लढाऊ विमाने घोंगावत होती तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की एका युगाचा असा अंत होईल.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर आता भारतात विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत.
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी खामेनी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (28 फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.
खामेनी यांच्या निधनानंतर काश्मीर आणि लखनौमध्ये निदर्शने करण्यात आली आहेत, तर देशातील अनेक मुस्लीम धर्मगुरूंनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
लखनौमधील एका महिला आंदोलकाने म्हटलं, "त्यांनी खामेनी यांची फसवणूक करून हत्या केली आहे. एक खामेनी शहीद झाले असले, तरी त्यांच्या जागी हजारो खामेनी उभे राहतील."

फोटो स्रोत, ANI
शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, "हे शब्द उच्चारणेही कठीण आहे, पण हे या शतकातील सर्वात मोठे दुःख आहे. ते एक असे व्यक्तिमत्व होते, जे कधीही महासत्तांसमोर झुकले नाही. ज्यांनी नेहमीच शोषितांचा आणि दबलेल्यांचा आवाज बनून जगाला आव्हान दिले."

इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे चेअरमन आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी सदस्य खालिद रशीद फरंगी महली यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
ते म्हणाले, "इराण हा एक स्वतंत्र देश आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला करण्यात आला तो सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात आहे. आम्ही याचा कडक शब्दांत निषेध करतो आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करतो की, त्यांनी पुढे यावे आणि हे युद्ध थांबवावे."
खालिद रशीद फरंगी महली यांनी मागणी केली, "खामेनी यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवला जावा."
दुसरीकडे लखनौमधील शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "अमेरिका आणि इस्रायलने संपूर्ण मध्य-पूर्वेला युद्धाच्या खाईत लोटले आहे. संपूर्ण मुस्लीम समुदायासाठी हा अत्यंत दुखाचा दिवस आहे. कारण इराणच्या सर्वोच्च नेत्याने नेहमीच सर्व मुस्लिमांच्या हिताचा आवाज उठवला होता."

फोटो स्रोत, ANI
खामेनी यांच्या निधनानंतर शिया समुदायाचे नेते सय्यद समर काझमी यांनी सांगितले, "असा नेता गमावण्याची ही आमची पहिलीच वेळ नाही, पण आमच्या प्रिय नेत्याचा हा मृत्यू आम्ही कधीही विसरणार नाही."
"अमेरिका आणि इस्रायलने कशा प्रकारे फसवणूक करून आमच्या नेत्याची हत्या केली हे आम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना सांगू. मुस्लीम समुदायाचा एक भाग नेहमीच आपल्या प्रिय नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालला आहे आणि आम्ही नेहमीच शोषितांसाठी आवाज उठवू."
"जग शांत बसले असताना त्यांनी पॅलेस्टाईनमध्ये होणाऱ्या हत्यांविरुद्ध आवाज उठवला म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली," असंही त्यांनी म्हटलं.
राजकीय वर्तुळातून उमटलेल्या प्रतिक्रिया
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू आणि इराणमधील घडामोडींवर काळजी व्यक्त केली. त्यांनी सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आणि तणाव वाढेल असे कोणतेही कृत्य न करण्याचे आवाहन केले.
"आपल्याला हे देखील निश्चित केले पाहिजे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये जे लोक शोक व्यक्त करत आहेत त्यांना शांततेने शोक व्यक्त करण्याची परवानगी दिली जावी," असंही त्यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, पीडीपी नेत्या आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणतात, "आज इतिहासात एक अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे वळण आले आहे. जेव्हा इस्रायल आणि अमेरिका इराणचे प्रिय नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करत आहेत."
"यापेक्षाही जास्त लाजिरवाणी आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुस्लीम देशांनी आपल्या विवेकाऐवजी स्वार्थाला महत्त्व दिले त्यांनी उघडपणे किंवा शांत राहून याचे समर्थन केले. इतिहास या गोष्टीचा साक्षीदार असेल की, न्यायासाठी कोणी लढा दिला आणि अत्याचाराला कोणी साथ दिली."

जम्मू-काश्मीरचे धर्मगुरू मीरवाईझ उमर फारुख यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यांनी 'एक्स' ( ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले, "अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांची अमेरिका आणि इस्रायलच्या हातांनी ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली. त्याने संपूर्ण मुस्लीम जगताला हादरवून सोडले आहे."
"याबद्दल आम्हाला प्रचंड दुःख आणि संताप आहे. जम्मू-काश्मीरचे नागरिक या अमानुष कृत्याचा आणि इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांचा तसेच मिनाबमध्ये निष्पाप मुलींच्या झालेल्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करतात."
मीरवाईझ उमर फारुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, "या अत्यंत दुखाच्या प्रसंगी आम्ही मनापासून इराणच्या धाडसी जनतेसोबत आहोत. अल्लाह पीडित आणि शोषितांना शक्ती देवो. शहिदांना आश्रय देवो आणि या कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देवो."
दुसरीकडे, जनता दल युनायटेडचे (JDU) कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी परिस्थितीची माहिती देताना सांगितले, "देशातील अनेक लोक आखाती देशांमध्ये राहतात. आम्हाला तिथून अनेक फोन येत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, त्यांचे परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणे झाले. सध्या सर्व विमानतळ बंद असल्याने लोकांनी घरांमध्येच राहावे. जशी परिस्थिती थोडी सामान्य होईल, तसा मार्ग काढला जाईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











