Mental Health : 'तुला आयुष्यात सर्वकाही मिळालंय, मग तरीही तू डिप्रेस का?'

फोटो स्रोत, Getty Images
10 ऑक्टोबरचा दिवस 'मानसिक आरोग्य दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी हा 'मानसिक आरोग्य दिन' साजरा करण्यात येतो.
मानसिक आजाराकडे समाज अजूनही चुकीच्या नजरेने पहातो. याबद्दल बोलणं, चर्चा करणं हे 'टॅबू' समजलं जातं. मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो. मग ती व्यक्ती त्याच्या जीवनात यशाच्या सर्वोच्च शिखरावर असो किंवा नसो.
शुभ्रता प्रकाश भारतीय महसूल सेवेत (IRS) उच्चपदस्थ अधिकारी आहेत. मानसिक आजाराशी लढा त्यांनीदेखील दिलाय. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी मानसिक आजाराशी दिलेल्या लढ्याबद्दल बीबीसी मराठीशी संवाद साधला....त्यांचा तो सगळा अनुभव त्यांच्याच शब्दांत मांडत आहोत...

मला मानसिक आजार असल्याचं निदान सर्वात पहिल्यांदा झालं 2011 साली. मानसिक आजाराची लक्षणं दिसू लागल्यानंतर तब्बल 5 वर्षांनंतर.
डॉक्टरांनी मला Major Depressive Disorder (MDD) म्हणजे सामान्य भाषेत 'डिप्रेशन' असल्याचं सांगितलं.
लहानपणापासूनच मी उत्साही - आनंदी मुलगी होते. आव्हानांना थेट सामोरं जायची माझी तयारी असायची. त्यामुळेच मला शिक्षणात सगळीकडेच यश मिळत गेलं.
या मेहनतीची परिणती म्हणजे, मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय महसूल सेवेत (IRS) अधिकारी बनले.
माझा मानसिक आजार केव्हापासून सुरू झाला. याचं मूळ काय होतं, हे आता पुन्हा मागे जाऊन आठवणं काहीसं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्कीच आठवतेय. माझ्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी मला खूप उदास आणि निराश वाटू लागलं. मनात सातत्याने आत्महत्येचे विचार येऊ लागले होते.
बहुदा हे Post-partum depression असावं. (महिलांना डिलिव्हरीनंतर येणारं डिप्रेशन) पण, त्यावेळी मला डिप्रेशन असल्याचं निदान झालं नव्हतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
माझं बाळावर नितांत प्रेम होतं. बाळासाठी आणि नवऱ्यासाठी जगण्याची तीव्र इच्छाशक्ती माझ्याकडे होती.
काही महिन्यांनंतर मला बरं वाटू लागलं. पण, डिप्रेशनमुळे मी आधीसारखी राहिले नव्हते. माझ्या मेंदूत बदल झाला होता. माझ्यात अमूलाग्र बदल झाला होता. मी पूर्णत: एक वेगळी व्यक्ती बनले होते.
मी अनेकदा तासंतास एकाठिकाणी बसून हरवल्यासारखं शून्यात नजर लावून बसायचे. मला सतत दमल्यासारखं आणि बेचैन वाटायचं.
शरीराची हालचाल खूप मंदावली होती. वाटत होतं जणू माझा मेंदू शरीराच्या अवयवांना हालचाल करण्याचे, काम करण्याचे संकेत देऊ शकत नव्हता. ज्या गोष्टी करताना मला आधी मजा वाटायची ती कामं करण्यात आता मला रस उरला नव्हता.
माझ्या मनात निर्माण होणारे नकारात्मक विचार, भावना सतत डोक्यात घोळत असायच्या. आणि हो, मी खूप रडायचे सुद्धा.
एव्हाना पाच वर्ष उलटून गेली होती. मी याच अवस्थेत जगत होते. अँन्क्झायटी अटॅकचं (Anxiety Attack) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेलं होतं. तेव्हा मी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
मला डिप्रेशन आणि अँन्क्झायटी डिसॉर्डर असल्याचं निदान झालं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मोठा धक्का बसला. कारण, मानसिक आजाराबद्दल मला त्यावेळी काहीच माहिती नव्हती.
माझा असा समज होता की, आयुष्यात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी जे पचवू शकत नाहीत. जे कमकुवत आहेत त्यांनाच डिप्रेशन येतं. कारण, इतरांपेक्षा मी खूप मजबूत होते.

फोटो स्रोत, Getty Images / ma_rish
मी विचार केला. हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन आठवड्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीला जाणारी व्यक्ती कमकुवत कशी असेल? पण, मला मानसिक आजार झाला होता. हे सत्य नाकारता येण्यासारखं नव्हतं.
मला एका गोष्टीचं समाधान होतं. मला ज्या गोष्टीचा त्रास होत होता. त्याला एक नाव होतं. आता याचा सामना करायचा होता. यावर मात करायची होती.
पण ही समस्या माझ्यासमोरची आयुष्यातील सर्वात कठीण समस्या असणार आहे, याची त्यावेळी मला जाणीव झाली नाही.
सुरूवातीला मला अॅंटीडिप्रेसेंट (anti-depressant) औषध देण्यात आली. मानसोपचार सुरू करण्यात आले. माझी मानसिक स्थिती सुधारल्यानंतर काही महिन्यातच औषधं हळूहळू कमी करून नंतर बंद करण्यात आली.
ऑगस्ट 2012 मध्ये पुन्हा एकदा गंभीर डिप्रेशनचा काळ सुरू झाला. यातून बाहेर पडण्यास मला तब्बल चार वर्ष लागली. मला अॅंटीडिप्रेसेंट औषध देण्यात येत होती. पण, या औषधांचा काहीच फायदा झाला नाही.
मानसोपचार थेरपी, सायको-अनॅलेसिसचा कशाचाच फायदा झाला नाही. कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपीचा मात्र फायदा झाला.
हताश होऊन या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण, कशानेच फायदा झाला नाही.
तीन वर्ष सातत्याने अॅंटीडिप्रेसेंट औषध घेतल्यामुळे माझ्या शरीरावर याचा उलट परिणाम झाला. माझी औषध बंद करण्यात आली. (सूचना- कृपाकरून मानसिक आजाराची औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू किंवा बंद करू नका)
औषधांचे विड्रॉवल सिम्प्टम्स सुरू झाले होते. माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार, कल्पना येऊ लागल्या. या काळात कुटुंबाशी माझं नातं घट्ट असल्याने मी तरून जाऊ शकले.

फोटो स्रोत, Shubhrata Prakash
औषध बंद केल्यानंतर काही महिन्यांनी मला बरं वाटू लागलं. माझ्या मनात संपूर्ण काळोख पसरलेल्या एका कोपऱ्यात, आशेचा एक किरण दिसू लागला होता. शरीरात हळूहळू उर्जा निर्माण होऊ लागली. हरवलेली शक्ती परत येऊ लागली होती.
औषध बंद केल्यानंतर 7-8 महिन्यांनी मी पुन्हा पहिल्यासारखी झाले.
या कठीण काळातला लढा हा फक्त अपंगत्वाशी नव्हता. तर समाजाने मला दिलेल्या दूषणांशीही हा लढा होता. जगण्यासाठीचा संघर्ष प्रत्येक दिवस सुरू होता.
मला एक प्रश्न विचारला जायचा, "तुला आयुष्यात सर्वकाही मिळालंय. मग तरीही तू डिप्रेस का?"
सातत्याने येणारे हे मेसेजेस, मला समाजाचा दृष्टीकोन दाखवून देत होते. त्यामुळे मी स्वत:लाच विचारत होते मला बरं का वाटत नाही? मी खूप प्रयत्न करतेय. मग मला बरं का वाटत नाही? असा मलाच पडलेला प्रश्न होता.
डिप्रेशन म्हणजे काय? मला नक्की काय झालं होतं? या प्रश्नाचं उत्तर शोधायला मी सुरूवात केली. डिप्रेशन एक मानसिक आजार हे मला समजलं. मेंदूला डिप्रेशनमधून रिकव्हर होण्यासाठी वेळ लागतो.
माझा स्वभाव आणि विचारात अचानक झालेले बदल, हे मी निवडले नव्हते. माझ्या मेंदूत बदल झाला होता.
मेंदू पूर्ववत होऊ शकतो याची मला जाणीव झाली. त्यामुळेच मानसिक आजार आणि मानसिक आरोग्याबद्दल समाजाच्या दृष्टीकोनाचा सामना करणं मला शक्य झालं.
माझ्या डिप्रेशनसोबतच्या लढ्यावर मी 'The D Word- A Survivor's guide to Depression' हे पुस्तक लिहिलंय.

फोटो स्रोत, Shubhrata Prakash
डिप्रेशन किंवा अँन्क्झायटी डिसॉर्डरसारख्या मानसिक आजारांवर मात करण्यासाठी ठोस उपाय नाही. प्रत्येक व्यक्तीला वेगळी उपचार पद्धत लागू पडते. मानसिक आजार झालेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला कोणत्या उपचारांचा फायदा होतोय. हे शोधून त्या दृष्टीने उपचार सुरू केले पाहिजेत.
मला देण्यात आलेल्या अॅंटीडिप्रेसेंट औषधांचा काहीच फायदा झाला नाही. पण योग, स्विमिंग, कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी आणि मेडिटेशनचा खूप फायदा झाला.
डिप्रेशनमधून बाहेर पडणं म्हणजे आयुष्य पूर्वपदावर येणं. मी डिप्रेशनमधून बाहेर पडले असले तरी, अजूनही मला अँक्झायटी डिसॉर्डरचा त्रास होतोच. मानसिक आजाराशी दोन हात केल्यावर आता या अँक्झायटी डिसॉर्डरसोबत खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात कसं जगायचं हे मी शिकलेय.
मानसिक आजाराचा सामना केल्यामुळे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम मी करते. माझे मित्र-मैत्रिणी, ऑफिसमधील सहकारी यांना गरज भासल्यास संपूर्ण मदत करते.
आपण सर्वजण आयुष्यात प्लॅनिंग करतो. पण, प्रत्येकवेळी आयुष्यात सर्व गोष्टी आपण प्लान केल्यासारख्या किंवा आपल्या मनासारख्या होतील असं नाही. पण जीवापेक्षा अधिक मौल्यवान काहीच नाही.
बहुदा नियतीने मला मानसिक आजार देताना, त्यासोबत लढण्याची अपार शक्ती दिलीये. माझ्या आयुष्यातील उद्देश पूर्ण करण्यासाठी. समाजात मानसिक आजाराला कलंक मानलं जातं. समाजाचा हा दृष्टीकोन खोडून काढण्यासाठी मला शक्ती मिळाली आहे.
(शुभ्रता प्रकाश भारतीय महसूल सेवेत (IRS) उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मानसिक आजारांवर त्यांनी पुस्तक लिहीलं असून त्या मानसिक आरोग्याविषयीची जनजागृतीही करतात. या लेखात मांडण्यात आलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








