रिंकू सिंगच्या वडिलांचं निधन; गॅस सिलिंडर डिलीव्हरी करत मुलाला कसं बनवलं क्रिकेटर?

फोटो स्रोत, FB/Rinku Singh
भारतीय क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचं शुक्रवारी (27 फेब्रुवारी) पहाटे निधन झालं आहे.
चौथ्या टप्प्यात असणाऱ्या कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर, त्यांनी पहाटे 5 वाजता ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथील यथार्थ हॉस्पिटल-ओमेगा-1 येथे अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती यथार्थ हॉस्पिटलच्या पीआरओंनी दिली आहे.
वडिलांच्या या आजारपणामुळे रिंकू सिंहला सध्या सुरू असणारा टी-20 वर्ल्डकप अर्ध्यावरच सोडावा लागला.
रिंकू सिंहच्या क्रिकेटर म्हणून यशस्वी होण्यात त्याच्या वडिलांचाही तितकाच मोलाचा वाटा होता. ते गॅस सिलिंडरची डिलीव्हरी करायचे. अशा खडतर परिस्थितीतून वाट काढत रिंकूने हा टप्पा गाठलेला आहे.
रिंहू सिंहची कारकिर्द कशी राहिलेली आहे आणि त्यामध्ये त्याच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा संघर्ष कसा राहिलेला आहे, ते पाहूयात.
रिंकू सिंग : क्रिकेटमधला उगवता तारा
भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार होऊ घातलेल्या रिंकू सिंगसाठी इथपर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता.
सर्वसाधारणपणे माणूस आपल्या भवितव्याचा विचार करताना काय विचार करतो? ज्याच्याकडे पर्याय नसतो त्याला काहीही काम करावं लागतं.

फोटो स्रोत, Facebook
ज्या माणसाचे दोर कापले गेलेले असतात ते पडेल ते काम स्वीकारतात आणि त्यात स्वत:ला झोकून देतात. उत्तर प्रदेशातल्या अलिगढच्या रिंकू सिंगचा प्रवास असाच स्तिमित करणारा.
निर्धार पक्का असेल, कामाप्रति अतीव निष्ठा असेल, विजिगीषु वृत्ती असेल तर काय भरारी घेता येऊ शकते याचं उदाहरण म्हणजे रिंकू सिंग. रिंकूची कहाणी ऐकून तुम्हालाही असं वाटू शकतं.
रिंकूचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. क्रिकेट हेच आपलं भविष्य असेल हे रिंकूला कळलं होतं पण परिस्थिती साथ देत नव्हती पण त्याने हार मानली नाही.
वडिल होते गॅसव्हेंडर
अलीगढमधील गॅसव्हेंडरच्या पाच मुलांपैकी एक रिंकू. शाळेपासूनच रिंकू क्रिकेट खेळत असे. कोलकाता नाईट रायडर्सने रिंकूच्या वाटचालीबाबतचा व्हीडिओ शेअर केला होता.
त्यात रिंकू सांगतो, "क्रिकेट खेळून वेळ फुकट घालवतो आहे, असं वडिलांना वाटे. मी क्रिकेट खेळून येत असे तेव्हा ओरडा आणि मारही पडे. मी कधी घरी येतो आणि चोपतो असं त्यांना होत असे. पण भावांनी साथ दिली. त्यांच्यामुळेच मी क्रिकेटचा ध्यास सोडला नाही. चेंडू खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. पण या वाटचालीदरम्यान काही लोकांनी मदत केली".
एका स्पर्धेदरम्यान शानदार खेळासाठी रिंकू सिंगला मोटारसायकल गिफ्ट म्हणून मिळाली. रिंकूने ही बाईक वडिलांना गिफ्ट म्हणून दिली.

फोटो स्रोत, BCCI/IPL
अलिगढमध्ये व्यापारी-उद्योगपतींच्या घरी वर्षानुवर्ष गॅससिलेंडर पोहोचवण्याचं काम करुनही त्यांना कधी मोटारसायकल घेता आली नव्हती.
पण रिंकूने क्रिकेटच्या जोरावर हे शक्य करुन दाखवलं. या घटनेनंतर रिंकूला पडणारा ओरडा बंद झाला. पण कुटुंबापुढे आर्थिक अडचणी खूप होत्या.
अशाच एका दिवशी रिंकू कामाच्या शोधात होता. "मला लादी पुसायचं काम मिळालं. एका कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसण्याचं काम मिळालं. त्यांनी सांगितलं की सकाळी येऊन लादी पुसत जा.
भावाच्या माध्यमातून हे काम मिळालं. पण मी हे काम करु शकलो नाही. नोकरी सोडली. मला हे योग्य वाटलं नाही. अभ्यासतही फार गती नव्हती.
तेव्हा मला वाटलं क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करावं. कारण जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर क्रिकेटवाचून मला तरणोपाय नाही", रिंकू सांगतो.
कोणी केली मदत?
पण फक्त वाटून रिंकूचा प्रवास सुकर झाला नाही. U16 ट्रायलमध्ये काय करायचं असतं हे रिंकूला माहिती नव्हतं. दोनवेळा पहिल्या फेरीतूनच त्याची गच्छंती झाली. अलीगढच्या मोहम्मद झीशान मदतीला धावून आले.
रिंकूला अगदी सुरुवातीच्या काळापासून अलीगढच्या मसूद अमीनचं यांचं मार्गदर्शन लाभलं. ते आजही रिंकूला मार्गदर्शन करतात. मोहम्मद झीशान यांनी केलेली मदत रिंकू विसरलेला नाही.
शाहरुख खान सहमालक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2018 मध्ये रिंकू सिंगला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. कोलकाताना रिंकूला 80 लाख रुपये देऊन समाविष्ट केलं. त्यावेळी रिंकू सिंह हे नाव कुणाला ठाऊकही नव्हतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळताना त्याची कामगिरी चांगली होत होती.
रिंकू सिंहच्या मते, आयपीएलमध्ये खेळणारा अलीगढचा मी पहिलाच खेळाडू ठरलो. इतकं मानधन मिळालं की घरी कुणी इतके पैसे कधी पाहिलेही नव्हते. घरातल्या आर्थिक अडचणी एकदम दूर झाल्या. जमीन घेतली आणि घर बांधलं. जी कर्ज डोक्यावर होती ती चुकती केली.

फोटो स्रोत, Facebook
हे सगळं झालं पण खरा चमत्कार बाकी होता. आयपीएल स्पर्धेत आपल्या खेळाच्या बळावर त्याला चाहत्यांना जिंकून घ्यायचं होतं. या प्रयत्नात हंगामामागोमाग हंगाम निघून जात होते. ज्या संधी रिंकूला मिळत होत्या त्यात तो चमकदार कामगिरी करु शकला नाही.
डावखुरा फलंदाज आणि उपयुक्त फिरकीपटू असलेल्या रिंकूने गेल्या वर्षी लखनौविरुद्ध खेळताना अशाच स्वरुपाची खेळी केली होती. त्या सामन्यात रिंकूला कोलकाताला जिंकून देता आलं नव्हतं. पण रविवारी झालेल्या लढतीत रिंकूने कोलकाताला दिमाखदार विजय मिळवून दिला.
भारतासाठी खेळणं हे रिंकूचं स्वप्न आहे. यासाठी त्याला आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत राहावी लागेल. 2016 पासून रिंकू उत्तर प्रदेश कडून खेळत आहे.
शाहरुखने म्हटलं होतं अपना बच्चा
गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या लढतीनंतर शाहरुख खान सामन्यानंतर बोलत होता. त्यावेळी त्याने रिंकूचा उल्लेख ‘अपना बच्चा’ असा केला होता.
या सामन्यात कोलकाताने बंगळुरूवर 81 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्याचा शिल्पकार शार्दूल ठाकूर ठरला होता. शार्दूल आणि रिंकूच्या भागीदारीने सामन्याचं पारडं कोलकाताच्या बाजूने फिरवलं होतं.
प्रिया सरोजशी केलं लग्न
रिंकू सिंगने गेल्या वर्षी प्रिया सरोज यांच्याशी लग्न केलेलं आहे. प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांनी रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
खासदार आणि रिंकूची होणारी जोडीदार प्रिया सरोज यांनीच एक्स या सोशल मीडियावरून फोटो शेअर करत, या साखरपुड्याची माहिती दिली होती.

फोटो स्रोत, X/Priya Saroj
प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या नेत्या आहेत. त्या उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत.
प्रिया सरोज या पेशानं वकील आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी वयाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार होत्या. त्यांचा या निवडणुकीत विजय झाल्यानं सर्वात तरुण खासदारांपैकी एक म्हणून त्यांचं नाव नोंदवलं गेलं. त्याचं वय 26 वर्षे आहे.
उत्तर प्रदेशातून तीनवेळा खासदार राहिलेल्या आणि विद्यमान आमदार असलेल्या तुफानी सरोज यांची प्रिया सरोज या कन्या आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन











