IPL 2023 : या स्पर्धेत पाण्यासारखा पैसा येतो तरी कुठून?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज (29 मे) अंतिम लढत होऊन, यातून यंदाचा आयपीएल विजेता ठरणार आहे.
विजेत्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस रकमेने गौरवण्यात येईल. उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात येईल.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा म्हटलं की पैशाची चर्चा होते. खेळाडूंना लागणाऱ्या कोट्यवधींच्या बोली डोळ्यासमोर तरळू लागतात. ब्रॉडकास्ट राईट्स आणि स्पॉन्सरशिपची चर्चा होते. पण हे आयपीएलचं पैशाचं गणित नेमकं चालतं तरी कसं?
आयपीएलमध्ये खेळाडूबरोबरच तंत्रज्ञ, टीम मॅनेजर्स, चीअर लीडर्स, समालोचक यांना देखील चांगलं मानधन दिलं जातं. इतकं करूनही आयपीएल व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आहे. हे कसं घडतं?
आयपीएल संघांना पैसा मिळतो कसा?
आयपीएल संघांसाठी उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणजे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. उदाहरणार्थ- गेल्या वर्षी ड्रीम11 स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर होते. याव्यतिरिक्त अन्य कंपन्याही विविध कारणांसाठी प्रायोजक आहेत. हे प्रायोजक बीसीसीसाआयला एक विशिष्ट रक्कम देतात. या रकमेपैकी 60 % रक्कम आठ संघांमध्ये समान वितरित केली जाते. ही रक्कम मिळण्याची हमी प्रत्येक संघाला असते. दरवर्षी मुख्य प्रायोजक आणि अन्य छोट्यामोठ्या प्रायोजकांच्या माध्यमातून त्यांना ही रक्कम मिळते.
आयपीएल संघांचा उत्पन्नाचा दुसरा मोठा स्रोत म्हणजे ब्रॉडकास्टिंग राईट्स. सध्या आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. त्यांनी याकरता बीसीसीआयला एवढी रक्कम दिली आहे. या रकमेपैकी ठराविक रक्कम आयपीएल संघांमध्ये समान वितरित केली जाते. या रकमेचीही हमी असते कारण मैदानावर येऊन मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांच्या तुलनेत टीव्हीवर आयपीएल मॅच पाहणाऱ्यांची संख्या अधिक असते. ब्रॉडकास्ट राईट्स एका चॅनेलला दिले जातात. मात्र ही लीग जगभरातल्या विविध देशांमध्ये वेगवेगळ्या चॅनेलवर दाखवली जाते. त्यातून येणाऱ्या नफ्याचा हिस्साही आयपीएल संघांना मिळतो.
तिसरा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे प्रत्येक आयपीएल संघाचे स्वत:चे प्रायोजक असतात. खेळाडूंच्या जर्सीवर विविध ठिकाणी या प्रायोजकांची नावं तुम्हाला दिसतील. प्रत्येक प्रायोजकाकडून आयपीएल संघाला ठराविक रक्कम मिळते. जर्सीवर, सरावाच्या किटवर प्रायोजकांच्या ब्रँडचं नाव तुम्हाला दिसेल. जितके जास्त प्रायोजक, तेवढी नावं जास्त आणि तेवढी कमाईही जास्त.

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR
गेट मनी म्हणजे स्टेडियमवर तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळणारा पैसा. प्रत्येक स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ठरलेली असते. आयपीएल संघासाठी होम आणि अवे मॅचेस असतात. उदाहरणार्थ वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचेस या मुंबई इंडियन्स संघाकरता होम मॅचेस असतात. या मॅचेसला भरपूर गर्दी होण्याची शक्यता असते. काही तिकिटांची ऑनलाईन विक्री होते तर काही प्रत्यक्ष ग्राऊंडवर उपलब्ध असतात. यातून आयपीएल संघांना थेट पैसा मिळतो.
प्रत्येक आयपीएल संघ मर्चंडायझिंगच्या माध्यमातून पैसा कमावतो. जर्सी, ट्रॅकपँट, टोप्या, सॅक, सोव्हेनियर, ऑटोग्राफ बॅट, मोबाईल कव्हर अशा अनेक गोष्टी स्पर्धेआधी, स्पर्धेदरम्यान विकल्या जातात. या वस्तूंच्या विक्रीतून आयपीएल संघांना पैसा मिळतो. खेळाडूंची तसंच आयपीएल संघांचा ब्रँड अधिक ठसतो.
जेतेपद पटकावल्यानंतर विजेत्या संघाला घसघशीत बक्षीस रकमेने गौरवण्यात येतं. ही रक्कमही आयपीएल संघासाठी उत्पन्नाचा हिस्सा आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला या पैशाचा वाटा मिळतो.
आयपीएल संघांना कशावर पैसे खर्च करावे लागतात?
प्रत्येक आयपीएल संघ मालकाला संघ विकत घेतल्यानंतर ज्या रकमेला संघ विकत घेतला, त्याच्या 10% टक्के रक्कम द्यावी लागते.
आयपीएल संघ लिलावात बोली लावून खेळाडूंना संघात समाविष्ट करतात. ही रक्कम म्हणजे त्या खेळाडूंचा पगार असतो. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, लॉजिस्टिक्सची माणसं, अडमिन टीम अशी अनेक माणसं कार्यरत असतात. त्या सगळ्यांना पगार देणं हा आयपीएल संघांच्या खर्चाचा मोठा भाग असतो.

फोटो स्रोत, Hindustan Times
आयपीएल संघ एका हंगामात सातत्याने प्रवास करतो. विमानाची तिकीटं आणि पंचतारांकित हॉटेलात राहण्याची व्यवस्था यावर आयपीएल संघाला बरीच मोठी रक्कम खर्च करावी लागते. एका आयपीएल संघात किमान 20-22 खेळाडू असतात. 10-12 सपोर्ट स्टाफ असतो. याव्यतिरिक्त आणखी किमान दहा माणसं असतात. या सगळ्यांची विमानाने ने-आण करणं आणि ग्रेडेड हॉटेलात वास्तव्य करणं हे संघाचं काम असतं.
आयपीएल संघांचं त्या विशिष्ट शहरात ऑफिस असतं. एक हंगाम संपल्यापासून दुसऱ्या हंगामापर्यंत अनेक गोष्टी घडत असतात. या ऑफिसात काम करणाऱ्या स्टाफला पगार देणं, जागेचं भाडं तसंच बाकी खर्च आयपीएल संघाला करावे लागतात.
आयपीएल संघांना ज्या स्टेडियमवर मॅच आयोजित केली जाते त्या संबंधित क्रिकेट असोसिएशनला विशिष्ट रक्कम द्यावी लागते. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स संघाला वानखेडे स्टेडियमवर मॅच आयोजित करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पैसे द्यावे लागतील.
संघातील खेळाडू आणि संघाचा ब्रँड अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचावी यासाठी मार्केटिंग कॅम्पेन राबवली जाते. जर्सी लाँच, फॅशन शो, कनेक्टिंग ऑडियन्स, टॅलेंट स्काऊटिंग स्पर्धा, फन गेम्स, कम्युनिटी अक्टिव्हिटीज असे अनेक उपक्रम राबवले जातात. यासाठीही पैसा खर्च करावा लागतो.
प्रत्येक आयपीएल संघ थीम साँग, सरावादरम्यानचे व्हीडिओ, बर्थडे पार्टी असे व्हीडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले जातात. हे व्हीडिओ तयार करण्यासाठीही खर्च होतो.
खेळाडूंना पैसे कसे मिळतात?
लिलावाच्या वेळी प्रत्येक संघाला विशिष्ट रक्कम ठरवून दिलेली असते. तेवढ्या रकमेत ते खेळाडूंची खरेदी करू शकतात. प्रत्येक संघात किती खेळाडू असणार हे ठरलेलं असतं. त्यानुसार भारतीय खेळाडू, विदेशी खेळाडू, युवा भारतीय खेळाडू असं सगळं लक्षात ठेऊन संघबांधणी केली जाते.

फोटो स्रोत, Ritam Banerjee
खेळाडू संपूर्ण हंगामात खेळला तर त्याला जेवढी बोली लिलावात लागली होती तेवढी रक्कम मिळते. खेळाडू त्या संघासाठी खेळताना दुखापतग्रस्त झाला आणि उर्वरित मॅचेस खेळू शकला नाही तरी त्याला ठराविक टक्के मानधन मिळतं. दुखापतीच्या उपचारांचा, आवश्यकता असल्यास शस्त्रक्रियेचा खर्च संबंधित संघाकडून केला जातो. खेळाडूंच्या विम्यात तशी तरतूद असते.
मात्र खेळाडूने स्वत: हून माघार घेतली तर मानधन मिळत नाही. उदारणार्थ यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने जेसन रॉय आणि ख्रिस वोक्स या खेळाडूंना संघात समाविष्ट केलं होतं. मात्र या दोघांनीही स्वत:हून माघार घेतल्याने त्यांना कोणतंही मानधन मिळणार नाही. त्यांच्या जागी बदली खेळाडू घेतल्यास, त्याला मानधन देण्यात येईल. नवीन खेळाडूला, आधीच्या खेळाडूएवढेच पैसे देण्याचं बंधन आयपीएल संघांवर नाही.
लिलावाच्या वेळी अमेरिकन डॉलर्समध्ये बोली लागते. व्यवहार होतो. परंतु खेळाडूंना त्यांना हव्या असलेल्या चलनात मानधन बँक खात्यात दिलं जातं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








