IPL 2023 : आयपीएलची सावत्र लीग ICL तुम्हाला माहितेय का?

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
इंडियन प्रीमिअर लीग 2008 मध्ये सुरू झाली आणि बघता बघता ट्वेन्टी-२० लीग फॉरमॅटचे आयामच बदलून गेले. मात्र आयपीएलच्या आधी भारतात इंडियन क्रिकेट लीग नावाची ट्वेन्टी-२० लीग स्पर्धा सुरू झाली होती. अवघ्या दोन वर्षांत या स्पर्धेने मान टाकली. काय झालं नेमकं?
देश-विदेशातील खेळाडू मिळून टीम आणि फ्रँचाईज असा सेटअप त्या लीगनेच घालून दिला. मात्र बीसीसीआयकडून या लीगला अधिकृतऐवजी बंडखोर असा शिक्का बसल्याने अवघ्या दोन वर्षांत या लीगला गाशा गुंडाळावा लागला.
काय होतं लीगचं नाव आणि कोणी सुरू केली?
सुभाष चंद्रा यांच्या 'झी एंटरटेनमेंट एंटरप्राईज' या समूहातर्फे ICLअर्थात 'इंडियन क्रिकेट लीग' सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत डोमेस्टिक क्रिकेट खेळणाऱ्यांना खूपच कमी पैसे मिळतात.
हे क्रिकेटपटू मानधनासाठी बीसीसीआयवर अवलंबून असतात. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या खेळाडूंच्या बरोबरीने खेळता यावं तसंच त्यांना सर्वोत्तम फिटनेस ट्रेनर्स, फिजिओथेरपिस्ट यांचं मार्गदर्शन मिळावं ही लीग सुरू करण्यामागची भावना होती.

फोटो स्रोत, The India Today Group
आर्थिक समीकरणं कशी होती?
व्यावहारिक पातळीवर एस्सेल ग्रुपला म्हणजेच झी समूहाला देशातील क्रिकेट मालिकांच्या प्रसारणाचे हक्क मिळवायचे होते. त्यासाठी त्यांनी 2006 मध्ये झी स्पोर्ट्स सुरू केलं.
काही दिवसांत झी स्पोर्ट्सने मध्य पूर्वेतील देशांमधील क्रिकेट प्रसारण करणाऱ्या टेन स्पोर्ट्समध्ये 50 टक्के भागीदारी मिळवली. यामुळे झी स्पोर्ट्सला वेस्ट इंडिज, श्रीलंका तसंच पाकिस्तानमधील मॅचेस दाखवता येऊ लागल्या.
2004 मध्ये झीने बीसीसीआयच्या प्रक्षेपण हक्कांसाठी सर्वाधिक अशी 307 दशलक्ष डॉलर्सची बोली लावली होती. मात्र बीसीसीआयने ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सला हक्क दिले.
2005 मध्येही झीने बोली लावली. प्रकरण न्यायालयात गेलं आणि दूरदर्शनला प्रक्षेपण हक्क देण्यात आले. सुभाष चंद्र यांनी बीसीसीआयमधील राजकीय समीकरणांद्वारे हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
निंबस कंपनीने 2011 पर्यंत 613 दशलक्ष डॉलर्सना प्रक्षेपण हक्क मिळवले. झी-निंबस एकत्र असल्याने हा एकप्रकारे झीचा विजय असल्याचं मानलं गेलं. परंतु निंबसने निओ स्पोर्ट्स नावाचं चॅनेल लाँच केलं.
2012 मध्ये स्टार स्पोर्ट्सने 550 दशलक्ष डॉलर्स रक्कम मोजत प्रक्षेपण हक्क मिळवले. या सगळ्या शर्यतीत झी स्पोर्ट्स आणि एकूणच झीचे प्रयत्न मागे पडले.
बीसीसीआयची भूमिका
मात्र या सगळ्याने हार न मानता ऑस्ट्रेलियात केरी पॅकर यांनी सुरू केलेल्या वर्ल्ड सीरिज क्रिकेटच्या धर्तीवर झी तर्फे इंडियन क्रिकेट लीगची मुहुर्तमेढ रोवण्यात आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि देशांतर्गत खेळाडू यांची मोट बांधण्याचा प्रयत्न होता. प्रक्षेपण हक्कांच्या वितरणावेळचा अनुभव आणि स्वत:ची लीग सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने इंडियन क्रिकेट लीगला बेकायदेशीर आणि बंडखोर ठरवलं.
याचा मोठा फटका या लीगला बसला. बीसीसीआयचा पाठिंबा नसल्यामुळे लीगसाठी मैदान उपलब्ध होणंही समस्या ठरलं. बीसीसीआयने बंडखोर ठरवल्याने अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डांनी सक्रिय खेळाडूंना लीगपासून दूर राहण्यास सांगितलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे मात्र कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असलेले खेळाडू लीगसाठी उपलब्ध झाले. या लीगमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंचा टीम इंडियासाठी तसंच डोमेस्टिक मॅचेससाठी विचार केला जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. त्यावेळी उदयोन्मुख अंबाती रायुडू लीगमध्ये सहभागी झाला होता. त्याच्या कारकीर्दीला प्रचंड फटका बसला.
लीगची संरचना कशी होती?
2007 मध्ये चंदीगढ लायन्स, चेन्नई सुपरस्टार्स, दिल्ली जेट्स, हैदराबाद हिरोज, कोलकाता टायगर्स, मुंबई चॅम्प्स असे संघ होते. प्राथमिक फेरी, गटवार अव्वल संघांमध्ये सेमी फायनल आणि फायनल असं स्वरुप होतं.

फोटो स्रोत, AFP
खेळाडू कोण कोण होते?
महान फलंदाज ब्रायन लारासह न्यूझीलंडकडून ख्रिस केर्न्स, डॅरेल टफी, क्रेग मॅकमिलन, नॅथन अॅस्टल, लू विन्सेंट तर ऑस्ट्रेलियाकडून स्टुअर्ट लॉ, इयान हार्वे, मायकेल कॅस्प्रोविच, मॅथ्यू एलिएट हे खेळाडू सहभागी झाले होते.
अँड्यू हॉल, इम्रान फरहात, रसेल अरनॉल्ड, मर्वन अट्टापटू, , इंझमाम उल हक, अब्दुल रझ्झाक, अझर मेहमूद, लान्स क्लुसनर हेही खेळले होते.
भारतीय खेळाडूंमध्ये श्रीधरन श्रीराम, अंबाती रायुडू, रोहन गावस्कर, दीप दासगुप्ता, हेमांग बदानी यांच्यासह असंख्य खेळाडू सहभागी झाले होते.
कोच आणि व्यवस्थापनात कोण?
भारताचे वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव या लीगच्या व्यवस्थापनाचा भाग होते. कपिल देव यांच्यासह टोनी ग्रेग, डीन जोन्स, किरण मोरे हे माजी खेळाडू बोर्ड मेंबर्स होते.
विविध संघाच्या कोचपदी बलविंदर संधू, मायकेल बेव्हन, मदन लाल, मोईन खान, डॅरेल कलिनन, संदीप पाटील असे नावाजलेले माजी खेळाडू होते.
मॅचेस कुठे आयोजित करण्यात आल्या?
बीसीसीआयने पाठिंबा न दिल्याने स्टेट असोसिएशन्सची मदत मिळू शकली नाही. अखेर हरयाणातल्या पंचकुला इथल्या चौधरी देवी लाल क्रिकेट स्टेडियम या एकाच मैदानावर सर्व मॅचेस खेळवण्यात आल्या.
मॅचेसचं प्रसारण?
या सर्व मॅचेस झी स्पोर्ट्स चॅनेलवरून प्रक्षेपित करण्यात आल्या.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्या हंगामाचा विजेता?
चेन्नई सुपरस्टार्स संघाने चंदीगढ लायन्सला नमवत पहिल्या हंगामाचं जेतेपद पटकावलं. फायनलमध्ये 4 विकेट्स घेणाऱ्या शब्बीर अहमदला मॅन ऑफ द मॅच तर इयान हार्वेला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दुसऱ्या हंगामाचं स्वरुप?
2008 मध्ये झालेल्या हंगामात ढाका वॉरियर्स, लाहोर बादशहाज, अहमदाबाद रॉकेट्स हे संघ वाढले. पंचकुलाच्या बरोबरीने हैदराबाद आणि अहमदाबाद इथे मॅचेस खेळवण्यात आल्या.
9 संघ एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर अव्वल चार संघांमध्ये सेमी फायनलच्या मॅचेस झाल्या. फायनलला गेलेल्या दोन संघांदरम्यान बेस्ट ऑफ थ्री फॉरमॅटमध्ये मॅचेस खेळवण्यात आल्या. लाहोर बादशहाज आणि हैदराबाद हिरोज यांच्यामधील मुकाबल्यात लाहोरने बाजी मारली आणि जेतेपदावर नाव कोरले.
फायनलमध्ये शतकी खेळी साकारणाऱ्या इम्रान नझीरला मॅन ऑफ द मॅच तर नावेद उल हसनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

फोटो स्रोत, MANPREET ROMANA
गाशा का गुंडाळला?
2008 मध्येच एप्रिल-मे महिन्यात बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीगची सुरुवात केली. बीसीसीआयचं अपत्य असल्याने जगातले आणि भारताचे सगळे प्रमुख खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले.
देशभरातील आठ ठिकाणी मॅचेस खेळवण्यात आल्या. आयपीएलच्या प्रक्षेपण हक्कांसाठी सोनी समूहाने प्रचंड रक्कम मोजली.
खेळाडूंना दीड महिना खेळून वर्षभराची पुंजी मिळवण्याचा मार्ग आयपीएलने सुकर करून दिला. आयपीएलनंतर पाच महिन्यांनंतर इंडियन क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम झाला.
मात्र या लीगच्या मॅचेसना एवढी गर्दी झाली नाही. आर्थिक पातळीवर लीग दुय्यमच राहिली. खेळाडूंना नेमके किती पैसे देण्यात आले तसंच प्रक्षेपण हक्कांतून, जाहिरातीद्वारे किती फायदा झाला ही आकडेवारी गुलदस्त्यात राहिली.
परिणाम
नॅशनल क्रिकेट अकादमीच्या चेअरमनपदी असताना इंडियन क्रिकेट लीगमध्ये पद स्वीकारल्यामुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची एनसीएच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
डोमेस्टिक स्पर्धात खेळणारे खेळाडू या लीगकडे आकर्षित होऊ नयेत म्हणून बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात दुपटीने वाढ केली.
सीसीआयचा पाठिंबा नसल्याने आयसीसीने या लीगला अधिकृत ठरवण्यास नकार दिला. मॅचेससाठी मैदान न मिळणं, स्टेट असोसिएशनला धमक्या अशा कारणांसाठी झी समूहाने बीसीसीआयविरुद्ध न्यायालयात दाद मागितली. निकाल त्यांच्या बाजूने लागलाही.
मात्र बीसीसीआयचा मोठा पसारा लक्षात घेता त्यांचं फारसं नुकसान झालं नाही. या लीगच्या आक्रमणामुळे बीसीसीआयने सर्वशक्तीनिशी आयपीएल लाँच केलं आणि पुढं जे घडलं ते सर्वांसमक्ष आहे.

फोटो स्रोत, GREG WOOD
अॅमेन्स्टी
बीसीसीआयने या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियासाठी तसंच डोमेस्टिक मॅचेससाठी संघनिवडीसाठी विचार होणार नाही हे स्पष्ट केलं होतं.
लीगचं भवितव्य अंधारात जाईल असा दणका बीसीसीआयने दिला. बीसीसीआयने या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी अॅमेनेस्टी जाहीर केली.
सोप्या शब्दात सांगायचं तर जे खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत त्यांनी ते कायमस्वरुपी बंद करायचं. या लीगमध्ये फार पैसाही नाही आणि बीसीसीआयचा पाठिंबा नसल्याने भवितव्य अंधारमय असल्याने खेळाडूंनी लीग सोडायला सुरुवात केली आणि ही लीग गाळात रुतली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








