IPL 2020 : सचिनची शतकं, वाळूचं वादळ, दाऊदची उपस्थिती आणि मियांदादचा सिक्सर

सचिन तेंडुलकर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाच्या धोक्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम युएईत होत आहे. शारजा, अबू धाबी आणि दुबई अशा तीन ठिकाणी मॅचेस होणार आहेत.

या तिन्ही स्टेडियम्सशी क्रिकेटरसिकांच्या असंख्य आठवणी जोडल्या गेल्या आहेत.

1. शारजा क्रिकेट स्टेडियम

शारजाशी भारतीय क्रिकेट रसिकांच्या खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. 1998 साली याच मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन अजरामर शतकं झळकावली होती.

ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फिरकीपटू शेन वॉर्नच्या बॉलिंगच्या ठिकऱ्या उडवत सचिनने जोरदार वर्चस्व गाजवलं होतं.

तत्कालीन ऑस्ट्रेलियन संघ अजिंक्य समजला जात असे. दमदार अशा आक्रमणावर हल्लाबोल करत सचिनने श्रेष्ठ कोण हे दाखवून दिलं होतं.

शारजा क्रिकेट स्टेडियम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शारजा क्रिकेट स्टेडियम

22 एप्रिल 1998 रोजी झालेल्या गटवार लढतीत सचिनच्या शतकाने टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरली. मात्र त्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं.

सचिनने 9 फोर आणि 5 सिक्सेसह 143 धावांची मॅरेथॉन इनिंग्ज केली होती. मात्र दोन दिवसांनंतर अर्थात 24 एप्रिल रोजी आणि वाढदिवशी झालेल्या अंतिम लढतीत सचिनने आणखी एक दिमाखदार शतक झळकावलं आणि टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं.

सचिनने 12 फोर आणि 3 सिक्सेसह 134 धावांची शानदार खेळी साकारली होती.

सचिनला दोन्ही शतकी खेळींसाठी मॅन द ऑफ मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

सचिनच्या खेळीदरम्यान सँडस्टॉर्म अर्थात वाळूचं वादळ आलं होतं. मात्र सचिन त्यानेही विचलित झाला नाही. वाळूच्या वादळामुळे सर्व खेळाडूंनी मैदानावर लोळण घेतली होती.

सचिनची शतकं, सँडस्टॉर्म या घटनेला 22 वर्षं झाली आहेत. मात्र आजही जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या मनावर गारूड कायम आहे. सचिनचा अनुभव मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंसाठी उपयोगी ठरू शकतो.

सचिन तेंडुलकर

फोटो स्रोत, Getty Images

याच मैदानावर 34 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलेशिया चषकाच्या फायनलमध्ये जावेद मियांदादने चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर लगावला होता.

वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम मॅचेसमध्ये त्या मॅचची, त्या खेळीची नोंद होते. शारजाचं मैदान ही अब्दुल रहमान बुखातीर यांची संकल्पना. सर्वाधिक वनडे आयोजित करण्याचा विक्रम या मैदानाच्या नावावर आहे. फिक्सिंगसंदर्भातल्या आरोपांमुळे शारजातल्या मॅचेसची संख्या घटली.

दाऊद इब्राहिम

फोटो स्रोत, Getty Images

भारत-पाकिस्तान लढतींवेळी स्टेडियममध्ये दाऊद इब्राहिमची उपस्थिती दर्शवणारा फोटो नेहमीच चर्चेत असतो. फिक्सिंगचे आरोप सिद्ध झाले नाहीत मात्र शारजाच्या स्टेडियमचं महत्त्व कमी झालं. या मैदानावर यंदाच्या आयपीएलच्या 12 मॅचेस खेळवण्यात येतील.

2. शेख जायेद स्टेडियम, अबूधाबी

बहुचर्चित अशा यंदाच्या आयपीएलची पहिली मॅच या मैदानावर होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ समोरासमोर असतील. तब्बल 22 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम खर्चून हे स्टेडियम उभारण्यात आलं आहे. मे 2004 रोजी स्कॉटलंड आणि केनिया यांच्यातील मॅचने स्टेडियमचं उद्घाटन झालं.

या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 20,000 असून ग्रास बँकचीही व्यवस्था करण्यात आली आहे. इथे आयोजित टेस्ट मॅचेसमध्ये सहा द्विशतक पाहायला मिळाली आहेत. या स्टेडियमवर सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचे खेळाडू आहेत. पाकिस्तानने होम ग्राऊंड म्हणून युएई निवडल्याने त्यांच्या मालिका इथे होतात.

भारत पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी असती तर संघांना फायदा झाला असता. या मैदानावर 2006 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फ्रेंडशिप सीरिज झाली होती. 2005 मध्ये पाकिस्तानात भूकंप झाला होता.

भूकंपपीडितांच्या मदतीसाठी ही सीरिज खेळवण्यात आली होती. दोन्ही देशांदरम्यानचे दुरावलेले संबंध बाजूला ठेवत खेळाडू खेळले होते. इंग्लंडमधील सरे, लँकेशायर, मिडलसेक्स आणि ससेक्स हे काऊंटी संघ या मैदानावर खेळले आहेत. या मैदानावर यंदाच्या आयपीएलच्या 20 मॅचेस होतील.

3. दुबई क्रिकेट स्टेडियम

हे स्टेडियम इथल्या खास लाईटिंग रचनेसाठी प्रसिद्ध आहे. रिंग ऑफ फायर असं त्याचं नाव आहे. लाईट टॉवरची सावली पडून खेळाडूंना बॉल दिसायला अडचण होते. हे लक्षात घेऊन छताच्या इथे साडेतीनशे फ्लड लाईट्स बसवण्यात आले आहेत. या रचनेमुळे स्टेडियममध्ये लाईट टॉवर नाहीयेत. बहुउपयोगी असं हे स्टेडिअम दुबई स्पोर्ट्स सिटीचा भाग आहे.

दुबई क्रिकेट स्टेडियम

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तान सुपर लीगचे अनेक सामने इथे आयोजित करण्यात आले आहेत. इथे डे-नाईट टेस्ट मॅचेसही होतात. 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल हंगामातील पहिला टप्पा युएईतील मैदानांवर झाला होता.

शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी या स्टेडियमवर वनडेत शतकी खेळी साकारल्या आहेत. कुलदीप यादवने या स्टेडियमवर वनडेत 10 विकेट्स मिळवल्या आहेत. कुलदीपचा हा अनुभव कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मोलाचा ठरू शकतो. या मैदानावर यंदाच्या आयपीएलच्या सर्वाधिक मॅचेस (24) इथे होणार आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)