IPL 2023 : पाकिस्तानी खेळाडूंसाठी भारताची दारं बंद होण्याचं मुंबई कनेक्शन

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इंडियन प्रीमिअर लीगचा सोळावा हंगाम सुरू होत आहे.
इंडियन प्रीमिअर लीग ही जगातली लोकप्रिय ट्वेन्टी-20 लीग स्पर्धा. जगभरातले प्रमुख क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्यासाठी आतूर असतात.
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2008 मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात पाकिस्तानचे एक नव्हे तर 11 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र त्यानंतरच्या कोणत्याही आयपीएलमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू सहभागी झालेला नाही. काय आहे यामागचं कारण?
पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलेले युनिस खान, मिसबाह उल हक हे खेळाडू होते. जगातल्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये नोंद होणारे शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हफीझ आणि शोएब मलिक खेळले होते.
क्रिकेटविश्वात सर्वाधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सच्या यादीत समाविष्ट शोएब अख्तर सहभागी झाला होता. शैलीदार बॅट्समन सलमान बट्ट आणि उंचपुरा उमर गुल त्याचे कोलकाता संघातले सहकारी होते.
राजस्थान रॉयल्सने युनिस खानच्या बरोबरीने कामरान अकमल आणि सोहेल तन्वीर यांच्यावर विश्वास ठेवला. सोहेलने या विश्वासाला सार्थ ठरत परपल कॅप पटकावली होती. आयपीएलमधील सर्वोत्तम बॉलिंग आकडे हा मान सोहेलच्या नावावर अकरा वर्षं होता.
जगभराल्या बॅट्समनची भंबेरी उडवणारा मोहम्मद आसिफ दिल्लीकडून खेळला होता. गेल्या दशकभरात ट्वेन्टी-20 तसंच वनडेत सातत्याने चांगली कामगिरी करणारा मोहम्मद हफीझ कोलकाता संघाचा भाग होता.
राहुल द्रविड, मार्क बाऊचर, जॅक कॅलिस, डेल स्टेन यांच्या बरोबरीने मिसबाह उल हक बेंगळुरू संघाचा भाग होता. थोडक्यात पाकिस्तानचे तत्कालीन सगळे प्रमुख खेळाडू 2008च्या आयपीएल स्पर्धेत विविध संघांकडून खेळले.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई, चेन्नई आणि पंजाब या संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना समाविष्ट केलं नाही. आयपीएलचा पसारा वाढत गेला तसं खेळाडूंना मिळणारे पैसे आणि प्रसिद्धीही वाढत गेली. आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचा फायदा अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडीसाठी झाला.
आंतरराष्ट्रीय खेळाडूबरोबर एकत्र खेळण्याचा मोठा अनुभव मिळाला. 2008 हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंची कामगिरी चांगली झाली होती. पण त्यानंतर असं काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी आयपीएलची दारं बंद झाली. एक तप उलटून गेलं, आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे पडघम वाजू लागलेत पण पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी अजूनही आयपीएलची दारं घट्ट बंद आहेत.
मुंबईवर हल्ला अर्थात 26/11
त्याच वर्षी म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 34 विदेशी नागरिकांसह एकूण 166 जणांनी जीव गमावला तर आठशेहून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, पोलीस निरीक्षक विजय साळसकर, एनएसजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह एएसआय तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तीन दिवस हे थरारनाट्य चाललं. मुंबई पोलीस आणि सुरक्षायंत्रणांनी मिळून 9 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. अजमल कसाब हा जिवंत पकडण्यात आलेला एकमेव ठरला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मरण पावलेले सगळे हल्लेखोर पाकिस्तानचे होते. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबाचा हात असल्याचं स्पष्ट झालं. कसाब पाकिस्तानचा नागरिक असल्याचं पाकिस्तानने सुरुवातीला मान्य केलं नाही. परंतु भारताने सर्व साक्षीपुरावे पाकिस्तानसह अमेरिकेसमोर ठेवले.
या हल्ल्यानंतर संशयाची सुई पाकिस्तानच्या दिशेने रोखली गेली. पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबने दहशतवादी हल्ला केल्याची कबुली दिली. 2009 मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली. कसाबवर 86 आरोप निश्चित करण्यात आले. 3 मे 2010 रोजी विशेष सत्र न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली. 21 फेब्रुवारी 2011 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीच्या निर्णय कायम ठेवला.
10 ऑक्टोबर 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं. निष्पक्ष सुनावणी झालं नसल्याचं कसाबने सांगितल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. नरसंहाराचं फुटेज पाहिलं. अडीच महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
29 ऑगस्ट 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा कायम ठेवली. कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी शिफारस गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना केली. 5 नोव्हेंबर 2012 रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला. राष्ट्रपतींच्या निर्णयाची माहिती केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिली.
18-19 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधून पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलं. 21 नोव्हेंबर 2012 रोजी येरवडा तुरुंगातच कसाबला फाशी देण्यात आली.
हफीस सईदसंदर्भात भारताची भूमिका
पाकिस्तानचा हफीज सईद मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे असं तपास यंत्रणांना समजल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदकडे हफीझ आणि त्याच्या जमात उद दावा संघटनेला प्रतिबंधित सूचीत टाकण्याची मागणी केली. लष्कर-ए-तय्यबाशी संबंध असल्याच्या मुद्यावरून संयुक्त राष्ट्र संघटनेने सईदचं नाव यादीत समाविष्ट केलं.
सईदने वरील तपशील नाकारले. त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं. 2009 मध्ये लाहोर कोर्टाने त्याची सुटका केली. काही महिन्यात इंटरपोलने सईदविरुद्ध नोटीस जारी केली. त्याला पु्न्हा नजरकैदेत ठेवण्यात आलं. भारताने कसाबच्या साक्षीमध्ये सईदविषयी माहिती दिल्यानंतर पाकिस्तानला कल्पना दिली.
लाहोर उच्च न्यायालयाने मात्र सईद आणि जमात उद दावावरील आरोप मागे घेतले. भारताने पाकिस्तानाच लपलेल्या कट्टरतावाद्यांची यादी पाकिस्तानला दिली. 2012 मध्ये अमेरिकेने सईदला पकडून देणाऱ्याला 10 मिलिअन डॉलरचं बक्षीस जाहीर केलं. जमात आणि लष्कर-य-तय्यबाला ब्लॅकलिस्ट यादीत टाकण्यात आलं. सईद पाकिस्तानात वास्तव्याला असल्याचं मधल्या काळात स्पष्ट झालं.
2015 मध्ये जमात संघटनेवर बंदीची कारवाई केली. मात्र या कारवाईने फरक पडत नसल्याचं हफीजने सांगितलं. 2016 वर्षानंतर पाकिस्तानने हफीझ आणि जमात दोन्हीवर कारवाई केली. जानेवारी 2017 मध्ये अमेरिकेच्या दबावतंत्रानंतर हफीझला नजरकैदेत ठेवण्यात आलं. पाकिस्तानने हफीझच्या तेहरीक-ए-आझादी जम्मू काश्मीर या संघटनेवरही बंदी घातली. हफीझ आणि त्याच्या संघटना पाकिस्तानसाठी अडचणीचे असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.
हफीझने या वक्तव्याविरोधात आसिफ यांच्यावर 100 मिलिअन डॉलरचा खटला दाखल केला. नोव्हेंबर 2017 मध्ये दहा महिने नजरकैदेत ठेवल्यानंतर हफीझची लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली. पुढच्याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये हफीझने मिली मुस्लीम लीग या बॅनरखाली पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला. त्याच वर्षी हफीझने उर्दूतील एका वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखनही केलं.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत तसंच आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने हफीझच्या जमात संघटनेवर बंदीची कारवाई केली. संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून हफीझचं नाव वगळण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने एलईटी संघटनेसाठी निधी गोळा केल्याप्रकरणी हफीझवर 23 गुन्हे दाखल केले. दहशतवादासाठी पैसा पुरवल्याप्रकरणी हफीझला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने दोषी ठरवलं.
मुंबई हल्ला आणि त्यापुढच्या तपास घटनांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावलेलेच राहिले. याचा परिणाम दोन्ही देशांदरम्यानच्या क्रिकेटवरही पाहायला झाला.
भारत-पाकिस्तान क्रिकेट
क्रिकेटविश्वातल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये भारत-पाकिस्तान यांचा समावेश होतो. टीव्हीवर आणि प्रत्यक्षातही प्रेक्षकसंख्येचे नवनवे विक्रम भारत-पाकिस्तान लढतींनी मोडले आहेत. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या पारंपरिक अशेस द्वंद्वाप्रमाणे भारत-पाकिस्तान म्हणजे दर्जेदार क्रिकेटची पर्वणी हे समीकरण ठरलेलं.
चांगल्या खेळाच्या बरोबरीने खेळाडूंमधली वादावादी, भांडणं, मैत्रीचे किस्से जगजाहीर आहेत. परंतु दोन्ही देशांमधील दुरावलेल्या संबंधांमुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी येत नाही. केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये म्हणजेच वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप या तटस्थ स्पर्धांमध्येच हे दोन संघ आमनेसामने येतात.
भारताने पाकिस्तानमध्ये शेवटची टेस्ट 2006 मध्ये तर शेवटची वनडे 2008 मध्ये खेळली आहे. पाकिस्तानचा संघ भारतात शेवटची टेस्ट 2007 मध्ये खेळला आहे तर पाकिस्तानचा संघ वनडे सीरिजसाठी 2013 मध्ये भारतात आला होता.
आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंची कामगिरी
शोएब अख्तर- कोलकाता नाईट रायडर्स (425 अमेरिकन डॉलर्स)
प्रचंड वेगाने बॉलिंग करत प्रतिस्पर्धी बॅट्समनच्या मनात धडकी भरवणाऱ्या शोएब अख्तरला तीन मॅच खेळता आल्या. त्याने 3 मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या.
उमर गुल- कोलकाता नाईट रायडर्स (150)
उंचपुरा आणि स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध उमर गुलला सहा मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 12 विकेट्स पटकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली.
शाहिद आफ्रिदी- डेक्कन चार्जर्स (675)
तुफान फटकेबाजी, उत्तम फिल्डर आणि उपयुक्त बॉलिंग यामुळे शाहिद आफ्रिदी हा कोणत्याही संघासाठी कळीचा ठरू शकतो. आता अस्तित्वात नसलेल्या मात्र आयपीएल गतविजेत्या डेक्कन चार्जर्स संघातर्फे आफ्रिदी मॅच खेळला. 10 मॅचमध्ये त्याने 81 रन्स केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या खेळाडूंना पुढे स्पर्धेत संधी मिळाली असती तर आफ्रिदीला संघात समाविष्ट करण्यासाठी चुरस लागली असती.
मोहम्मद हफीझ- कोलकाता नाईट रायडर्स (100)
कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करण्याची क्षमता, ऑफस्पिन बॉलिंग आणि दर्जेदार फिल्डिंग यामुळे हफीझ हा ट्वेन्टी-20 फॉरमॅटसाठी साजेसा खेळाडू आहे. चिरतरुण हफीझ वर्षानुवर्षे पाकिस्तानसाठी आणि जगभरातील ट्वेन्टी-20 लीगसाठी खेळतोच आहे.
कोलकातासाठी हफीझला 8 मॅचेस खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 20 रन्स केल्या आणि एक विकेट मिळवली.
मिसबाह उल हक-रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (125)
एकहाती मॅच फिरवण्याची ताकद असलेला खेळाडू अशी मिसबाहची ओळख होती. 2007 वर्ल्डकपमध्ये त्याने पाकिस्तानला जवळपास जिंकून दिलं होतं. त्यामुळे अनेक रथी महारथी असूनही बेंगळुरूने मिसबाहला संघात घेतलं. मिसबाहने 8 मॅचेसमध्ये 117 रन्स केल्या.
कामरान अकमल-राजस्थान रॉयल्स (150)
विकेटकीपर आणि आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध कामरानच्या राजस्थान संघाने पहिल्यावहिल्या आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. कामरानला 6 मॅचेसमध्ये खेळायची संधी मिळाली. त्याने 128 रन्स केल्या. 5 कॅचेस आणि 4 स्टंपिंगसह कामरानने आपल्या भूमिकेला न्याय दिला.
सोहेल तन्वीर-राजस्थान रॉयल्स (100)
डावखुऱ्या उंच आणि वेगळी अॅक्शन असणाऱ्या सोहेलने आपल्या कामगिरीने जगभरातल्या चाहत्यांना दखल घ्यायला भाग पाडलं. राजस्थानसाठी खेळताना सोहेलने 12 मॅचेसमध्ये 25 विकेट्स मिळवत परपल कॅपवर नाव कोरलं.
मोहम्मद आसिफ-दिल्ली डेअरडेविल्स (650)
स्विंग बॉलिंगने प्रतिस्पर्धी बॅट्समनची भंबेरी उडवणारा बॉलर. आसिफने 8 मॅचमध्ये 8 विकेट्स मिळवत योग्यता दाखवून दिली. विकेट्सबरोबर रन्स रोखण्याची त्याच्या क्षमतेने प्रभावित केलं होतं.
शोएब मलिक-दिल्ली डेअरडेव्हिल्स (500)
बॉलिंग,बॅटिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान देणारा खेळाडू. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि भरवशाचा शोएब वर्षानुवर्षे खेळतोच आहे. दिल्लीकरता शोएब 8 मॅच खेळला. त्यात त्याने 52 रन्स केल्या आणि 2 विकेट्स काढल्या.
सलमान बट्ट-कोलकाता नाईट रायडर्स (100)
स्टायलिश डावखुरा बॅट्समन सलमाने बटने कोलकातासाठी सलामीला येत 7 मॅचमध्ये 193 रन्स केल्या.
युनिस खान-राजस्थान रॉयल्स (225)
पहिल्यावहिल्या आयपीएल विजेत्या संघाचा युनिस भाग होता. पाकिस्तानचा आधारस्तंभ असलेल्या युनिसला रॉयल्ससाठी केवळ एकमेव मॅच खेळण्याची संधी मिळाली.
पाकिस्तानचे नवे खेळाडू आयपीएलचा पैसा, प्रसिद्धीपासून वंचित
गेल्या दशकभरात पाकिस्तानचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. बाबर आझम वनडे तसंच ट्वेन्टी-20 प्रकारात सातत्याने चांगला खेळतो आहे. जागतिक ट्वेन्टी-20 रेटिंगमध्ये बाबर अव्वल स्थानी आहे. पाकिस्तानला बॉलिंगचं आगार म्हटलं जातं.
अझर अली, इमाम उल हक, फखर झमन ही मंडळी भरपूर धावा करत आहेत. पण आयपीएलमध्ये त्यांना खेळणं शक्य झालेलं नाही. मोहम्मद आमिर, मोहम्मद अब्बास, शाहीन शहा आफ्रिदी, हसन अली, वहाब रियाझ यांनी विकेट्स पटकावणं आणि रन्स रोखणं या दोन्ही आघाड्यांवर छाप उमटवली आहे.
परंतु आयपीएलपासून ते दूरच आहेत. गेल्या दहा वर्षात सईद अजमल आणि यासिर शहा या दोन फिरकीपटूंनी आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे. आयपीएल स्पर्धेत अनेक फिरकीपटू संघाला जिंकून देतात.पण अजमल-यासिर जोडी या स्पर्धेपासून वंचित आहेत.
इमाद वासिम, शदाब खान, हॅरिस सोहेल यांनी अष्टपैलू खेळाने प्रभावित केलं आहे. परंतु आयपीएलच्या व्यासपीठापासून ते दूर आहेत. सर्फराझ अहमद हा पाकिस्तानचा माजी कॅप्टन निर्णायक क्षणी उपयुक्त खेळींसाठी प्रसिद्ध आहे. परंतु आयपीएलचा टिळा त्याच्या माथी लागलेला नाही.
राखीव विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान सातत्याने आपल्या खेळाने प्रभावित करत आहे. मात्र भारतीय मैदानावर चमक दाखवण्याची संधी त्याला मिळू शकत नाही. पाकिस्तान क्रिकेटची एक अख्खी युवी फळी दोन्ही देशांमधील दुरावलेल्या संबंधांमुळे पैशाला तसंच खेळण्याला आणि प्रसिद्धीला पारखी राहिली आहे.
जगभरातील ट्वेन्टी-20 लीगमध्ये सहभाग
पाकिस्तानचे खेळाडू ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, बांगलादेश प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, श्रीलंका प्रीमिअर लीग, मझांशी सुपर लीग, ट्वेन्टी-20 ब्लास्ट असं जगभरातील ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळतात परंतु भारतात होणाऱ्या लीगची दारं त्यांच्यासाठी बंद आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








