महेंद्रसिंग धोनीने घेतली निवृत्ती, इन्स्टाग्रामवर केली घोषणा

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

भारताच्या नकाशावर टिंबाएवढ्या असलेल्या रांचीला त्याने जागतिक पटलावर नेलं. छोट्या शहरातली मुलं आभाळभर कर्तृत्व गाजवू शकतात, हा विश्वास त्याने मिळवून दिला. आज महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक, जगातल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक, आक्रमक बॅट्समन आणि निष्णात विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी साधारण वर्षभरापूर्वी वर्ल्ड कपची सेमी फायनल खेळला. टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनलमध्ये नेण्याची जबाबदारी पेलण्यात तो यशस्वी झाला नाही.

10 जुलै 2019. साधारण वर्षभरापूर्वीचा दिवस. क्रिकेट एखाद्या धर्माप्रमाणे असणाऱ्या टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस. 50 ओव्हर वर्ल्ड कपची सेमी फायनल पावसामुळे दुसऱ्या दिवसावर गेलेली. न्यूझीलंडने ठेवलेलं लक्ष्य होतं 240, पण खेळपट्टी आणि वातावरण गोलंदाजांना साथ देणारं होतं.

चार शतकांसह रोहित शर्मा भन्नाट फॉर्मात होता, परंतु न्यूझीलंडच्या तिखट माऱ्यासमोर टीम इंडियाची 24/4 अशी अवस्था झाली. एवढी पडझड होत असतानाही टीम इंडियाचा माजी 'कॅप्टन कूल' आणि वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक धोनी बॅटिंगला का येत नाहीये, अशा शंका चाहत्यांच्या मनात येत होत्या.

पडझड सुरूच राहिली. धोनीचा वारसदार म्हणून पाहिला जाणारा ऋषभ पंत आऊट आला, आणि अखेर धोनी त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये खेळायला उतरला. त्या क्षणी टीम इंडियाला 163 बॉलमध्ये 169 रन्स हव्या होत्या आणि टीम इंडियाची अवस्था होती 71/5.

परिस्थिती अवघड होती पण धोनी पिचवर असल्याने न्यूझीलंडची टीमही सावधपणे खेळत होती. मॅच जिंकली तर वर्ल्ड कप फायनलचं तिकीट मिळणार,हरलो तर गाशा गुंडाळून घरी- असं थेट समीकरण होतं. न्यूझीलंडला 239 धावांचीच मजल मारता मारल्यावर टीम इंडियाचे चाहते खूश होते.

300 चेंडूत 239 म्हणजे आवाक्यातलं समीकरण होतं. मात्र न्यूझीलंडच्या बॉलर्सनी आपल्या इनिंग्जच्या अर्ध्या तासात सळो की पळो करून सोडलं. सगळी मदार धोनीवर होती.

इनिंग्जच्या सुरुवातीला सिंगल-डबल घेण्याची प्रथा धोनीने या सामन्यातही पाळली. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी टिच्चून बॉलिंग करत दोघांना फार रन्स करण्यापासून रोखलं. सँटनरने हार्दिक पंड्याला माघारी धाडलं.

हार्दिकच्या जागी आलेल्या रवींद्र जडेजाने प्रचंड आत्मविश्वासाने खेळायला सुरुवात केली. जडेजाच्या फटक्यांनी थंड पडलेल्या भारतीय चाहत्यांमध्ये जोश पसरला. एरव्ही अशा रन-चेसमध्ये सूत्रधाराची भूमिका घेणारा धोनी बॅकफूटला होता, आणि जडेजा दांडपट्यासारखे फटके खेळत होता.

धोनी आणि जडेजा

फोटो स्रोत, TWITTER / ICC

अगदी पटकन जडेजा-धोनीने 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. या जोडीने आव्हान टप्प्यात राहील याची काळजी घेतली. रनरेट वाढत होता पण धोनी पिचवर असल्याने न्यूझीलंडच्या गोटाक काळजीचं वातावरण होतं, त्यात जडेजा सहजतेने कुटत होता. त्यातूनच या दोघांनी 97 बॉलमध्ये भागीदारीची शंभरी गाठली.

भन्नाट सुटलेल्या जडेजाला ट्रेंट बोल्टने आऊट केलं आणि भारतीय चाहत्यांवरचं दडपण वाढलं. जडेजा आऊट झाला तेव्हा 13 बॉलमध्ये 32 रन्स हव्या होत्या. फिनिशर धोनीसाठी हे समीकरण सवयीचं होतं.

49व्या ओव्हरमध्ये धोनीने ठेवणीतला सिक्स लगावला. पुढचा बॉल डॉट ठरला. लॉकी फर्ग्युसनच्या तिसऱ्या बॉलवर धोनी नीटपणे बॉल टोलवू शकला नाही. बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. धोनीने दुसऱ्या रनसाठी धावायला सुरुवात केली. एरव्ही सहजी डाईव्ह लगावणाऱ्या धोनीने बॅटसह क्रीझमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्टिन गप्तीलच्या डायरेक्ट हिटने धोनीची इनिंग्ज संपुष्टात आणली.

भारत, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, धोनी रनआऊट झाला तो क्षण

एरव्ही बॉलर्सला बुकलून काढणारा धोनी हल्ली तशा स्ट्राईक रेटने खेळू शकत नाही, अशी टीका होऊ वर्ल्ड कपआधी होऊ लागली होती. तो पूर्वीसारखा मॅचेस फिनिश करू शकत नाही, अशी ओरड होऊ लागली होती. त्याचे रिफ्लेक्सेस मंदावले आहेत, असंही बोललं जात होतं.

चाळिशीच्या उंबरठ्यावर असतानाही तरुणाला लाजवेल असा फिटनेस जपणाऱ्या धोनीने त्या क्षणी डाईव्ह मारली असती तर वर्ल्ड कपचं चित्र पालटलं असतं.

गप्तीलच्या थ्रोने स्टम्प्सचा वेध घेतल्यावर मँचेस्टरच्या मैदानात शांतता पसरली. दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा माही ही मॅच जिंकून देत टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या फायलनमध्ये नेईल असा अनेकांचा होरा होता. नेहमीसारखी मैफल जमली नसली तरी धोनी जिंकून देईल असा विश्वास होता. गप्तीलच्या त्या थ्रोनं धोनीची इनिंग्ज आणि टीम इंडियाचं वर्ल्ड कपचं स्वप्न दोन्ही दुभंगलं.

स्वत:वर नाराज होऊन परतणाऱ्या धोनीचा चेहरा लाखो लोकांनी पाहिला. लाडका माही परत मैदानावर कधी दिसणार हे मनात असल्याने ही धोनीची शेवटची मॅच तर नव्हे अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचकुली. त्या मॅचमध्ये धोनीने 72 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. यामध्ये एक फोर आणि एक सिक्स होता. भात्यात एकापेक्षा एक फटके असणाऱ्या आणि उत्तुंग टोलेबाजी करू शकणाऱ्या धोनीला फक्त दोन बाऊंड्री शॉट मारता यावेत यातच क्रिकेटरसिकांना काय ते समजलं.

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

ही मॅच संपल्यानंतर धोनीच्या नावावर 90 टेस्ट मॅचेस, 350 वनडे, 98 ट्वेन्टी-२० मॅचेस आहेत. 2007 मध्ये ट्वेन्टी-20, 2011 मध्ये 50 ओव्हरचा वर्ल्डकप तसंच 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार म्हणून धोनीचं नाव घेतलं जातं.

टीम इंडियाला टेस्ट रेटिंगमध्ये अढळस्थान मिळवून देणारा तसंच IPL स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सला तीन जेतेपदं मिळवून देणारा कर्णधार धोनी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचवेळी धोनीचं वय होतं 38.

पुढच्या वर्ल्ड कपवेळी म्हणजेच 2023 वेळी धोनीचं वय 42. फिटनेस असला तरी चाळिशीनंतर धोनीला निवडसमिती संघात घेईल का, याविषयी शंका दिसते. त्यामुळे गेल्या वर्षीचा वर्ल्ड कप हा धोनीचा शेवटचा वर्ल्ड कप होता, अशी चाहत्यांची धारणा होती. वर्ल्ड कपनंतर धोनीने टीम इंडियाच्या निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालं. या वर्षभराच्या काळात टीम इंडियाने 12 वनडे आणि 19 ट्वेन्टी-20 मॅचेस खेळल्या, मात्र यापैकी एकाही मॅचमध्ये धोनी नव्हता. धोनीने निवृत्तीची औपचारिक घोषणा केलेली नाही.

वर्ल्ड कप संपल्यानंतर धोनीने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी अनुपलब्ध असल्याचं सांगितलं. धोनी लष्करात लेफ्टनंट कर्नल पदी आहे. 106 टेरिटोअरिल बटालियन (पॅरा) याकरता धोनीने 30 जुलै ते 15 ऑगस्ट काम केलं. अन्य सैनिक जी कर्तव्यं पार पाडतात ती धोनीने सेवेदरम्यान पार पाडली.

गाड्या आणि बाईक्स यांचा खास शौकीन असलेल्या धोनीने लाल रंगाची जीप ग्रँड शेरोकी या SUVची ताफ्यात भर घातली. ऑक्टोबर महिन्यात त्याने निस्सान जोंगा ही गाडी खरेदी केली, जी पूर्वी भारतीय लष्कर वापरायची. सध्या या गाडीची खुल्या बाजारात विक्री होत नाही.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 1

जयपूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर धोनी आपल्या गावी म्हणजेच रांचीत असल्याचं समजतं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीत मालिका जिंकली तेव्हा धोनीने ड्रेसिंगरूममध्ये जात सगळ्या खेळाडूंची भेट घेतली होती.

ऱ्हिती स्पोर्ट्स या स्वत:च्या कंपनीतर्फे आयोजित चॅरिटी मॅचसाठी धोनी मुंबईत होता. मैत्रीपूर्ण फुटबॉल मॅचमध्ये धोनी आणि लिएण्डर पेस सहभागी झाले होते. 30 सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी झारखंड दौऱ्यावर असताना स्नेहभोजनाचे आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला धोनी सपत्नीक उपस्थित होता.

अघोषित विश्रांती काळात धोनीने SEVEN लाईफस्टाईल ब्रँडही लाँच केला. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कँपपूर्वी धोनीने झारखंडच्या संघासोबत सरावही केला. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार का, याविषयी त्याने काहीही सांगितलं नाही.

कोरोना पूर्व काळात IPLच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कँप चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी धोनी उत्तम फॉर्मात असल्याचं त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं होतं.

कोरोना काळात जगभरातले क्रिकेटपटू इन्स्टाग्राम लाईव्ह करत होते. मात्र रांचीतल्या फार्महाऊसवर असलेल्या धोनीने एकही इन्स्टा लाईव्ह किंवा सोशल मीडिया अपीअरन्स दिला नाही.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 2

कोरोना काळात पांढरी दाढी वाढलेला धोनीचा फोटो व्हायरल झाला होता. धोनी पब्जी या खेळाचा चाहता असून, त्याचा बराच वेळ हा ऑनलाईन गेम खेळण्यात जातो असं त्याच्या पत्नीने साक्षी धोनीने काही दिवसांपूर्वी एका इन्स्टा लाईव्हदरम्यान सांगितलं होतं.

शनिवारी लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर साक्षीने एका इन्स्टा पोस्टमध्ये माहीसोबतचे काही फोटो शेअर केले होते.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 3

कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून डच्चू

बीसीसीआयतर्फे दरवर्षी देशातील प्रमुख खेळाडूंना करारबद्ध केलं जातं. खेळाडू कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळतात त्यानुसार श्रेणी ठरवल्या जातात. टीम इंडियासाठी खेळायला लागल्यानंतर पहिल्यांदाच धोनीचं नाव या यादीत नव्हतं. 2018-19 वर्षासाठी धोनीकडे ए ग्रेडचं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यासाठी त्याला वार्षिक 5 कोटी रुपये मानधन मिळत होतं.

मात्र प्रदीर्घ काळ टीम इंडियासाठी न खेळल्याने बीसीसीआयने धोनीचं नाव कॉन्ट्रॅक्ट यादीतून वगळलं आहे. एकप्रकारे निवडसमितीतर्फे धोनीच्या नावापुढे देण्यात आलेला पूर्णविराम होता.

कॉन्ट्रॅक्ट नसतानाही धोनी टीम इंडियासाठी खेळू शकतो. मात्र कोरोनामुळे मॅचेसचं आयोजनच थांबलं. यंदाचं IPLसुद्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. टीम इंडियाच्या श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-20 वर्ल्ड कपचं आयोजनही धोक्यात आहे. अशा परिस्थितीत चाळीशीकडे झुकलेला धोनी पुन्हा मैदानात उतरेल का, याविषयी साशंकता होती.

महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Getty Images

2014 मध्ये धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेत क्रिकेटरसिकांना धक्का दिला होता. अनपेक्षित घोषणेमुळे धोनीची फेअरवेल टेस्ट होऊ शकली नाही. मोठे खेळाडू निवृत्ती जाहीर करतात. शेवटची मालिका किंवा शेवटची मॅच कुठली हे सांगतात. त्यावेळी सत्कार आणि अन्य कार्यक्रम आयोजित होतात, परंतु धोनी प्रसिद्धीपरान्मुख आहे.

धोनीच्या निवृत्तीवर माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतात, "हा एका युगाचा अस्त आहे. काय खेळाडू होता तो! त्याने आपल्या देशासाठी आणि जागतिक क्रिकेटसाठी भरभरून योगदान दिलं. धोनीकडे उत्तम नेतृत्वकौशल्य होतं. विशेषतः झटपट क्रिकेट फॉरमॅटमध्ये त्याची जागा इतर कुणीच घेऊ शकत नाही.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीने जगासमोर एक वेगळं उदाहरण ठेवलं. त्याच्या दर्जेदार आणि नैसर्गिक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याला दिलेली प्रत्येक जबाबदारी त्याने सर्वोत्तमरित्या पेलली. यष्टीरक्षणामध्ये त्याच्या चपळाईने जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळा मापदंड निर्माण केला आहे. त्याची संपूर्ण क्रिकेट कारकिर्द उत्कृष्ट ठरली. धोनीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!"

तर बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह म्हणाले, "महेंद्रसिंह धोनी हा आधुनिक युगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. निवृत्ती घेण्याचा त्याचा हा वैयक्तिक निर्णय आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द अत्यंत लक्षवेधी ठरली.

त्याची कर्णधारपदाची कारकिर्द कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायक ठरली आहे. आज आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देताना त्याने इतरांसाठी अतिशय मोलाचा ठेवा मागे ठेवला आहे. आगामी IPL आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)