IPL 2022 : आयपीएलच्या धर्तीवर जगभरात सुरू झालेल्या लीग तुम्हाला माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेने जगभरातल्या क्रिकेट बोर्डांना ट्वेन्टी-20 लीग सुरू करायला बळ दिलं. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात सुरू झालेल्या लीग हे या स्पर्धेचं यश म्हणावं लागेल. आयसीसीची मान्यता असलेल्या जगभरातल्या अशा लीग स्पर्धांचा घेतलेला आढावा.
बिग बॅश लीग
आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुरू केलेली स्पर्धा. 2011 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा ढाचा आयपीएलसारखाच आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत दरवर्षी ही स्पर्धा होते. अॅडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्क्रॉचर्स, सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर अशा आठ टीम्स या स्पर्धेत खेळतात. पर्थ स्क्रॉचर्स संघाने सर्वाधिक तीन जेतेपदं पटकावली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या शहरांचे संघ आहेत तिथल्या प्रमुख स्टेडियममध्ये रात्रीच्या वेळेस लीगच्या मॅचेस खेळवण्यात येतात. लीगमध्ये सर्वाधिक रन्स ऑस्ट्रेलियाच्याच ख्रिस लिनच्या नावावर आहेत तर श्रीलंकेचा लसिथ मलिंगा सर्वाधिक विकेट पटकावणाऱ्यांच्या यादीत टॉपवर आहे.
प्रत्येक टीमला अंतिम अकरात केवळ दोनच विदेशी खेळाडूंना खेळवता येतं. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, अफगाणिस्तान अशा विविध देशातील खेळाडू बिग बॅश स्पर्धेत नियमितपणे खेळतात. विजेत्या संघाला 4,50,000 डॉलर्स बक्षीस रकमेने गौरवण्यात येतं.
2015 पासून महिला क्रिकेटमध्येही बिग बॅश सुरू झाली आहे. त्यातही याच नावांचे संघ असतात.
पाकिस्तान सुपर लीग
पाकिस्तानचे खेळाडू पहिल्यावहिल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळले होते. मात्र त्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध दुरावल्याने पाकिस्तानी खेळाडूंसाठी आयपीएलची दारं बंद झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2016 मध्ये ही लीग सुरू केली. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सहा संघांमध्ये लीगचे सामने होतात.

फोटो स्रोत, Getty Images
इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्स, लाहोर कलंदर्स, मुलतान सुलतान्स, पेशावर झाल्मी, क्वेटा ग्लॅडिएटर्स अशा संघांमध्ये मुकाबला होतो. इस्लामाबाद संघाने दोनदा तर पेशावर आणि क्वेटा संघाने प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेत सर्वाधिक रन्स कामरान अकलमच्या तर सर्वाधिक विकेट्स वहाब रियाझच्या नावावर आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सुपर लीगचे सामने युएईत खेळवण्यात आले होते.
या स्पर्धेत सातत्याने चांगलं खेळून वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीने पाकिस्तानच्या चाहत्यांची मनं जिंकली. यामुळेच सॅमीला पाकिस्तानचं नागरिकत्व देण्यात आलं आहे.
कॅरेबियन प्रीमिअर लीग
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दरवर्षी वेस्ट इंडिजचे असंख्य खेळाडू खेळतात. मानधनाच्या मुद्यावरून वेस्ट इंडिजचे खेळाडू आणि बोर्ड यांच्यात असलेल्या वादामुळे या खेळाडूंसाठी जगभर होणाऱ्या ट्वेन्टी-20 लीग हा उत्पन्नाचा मोठा आर्थिक स्रोत आहे.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं जगभरातील लीगमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने 2013मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरू केली. अलन स्टॅनफोर्ड या अब्जाधीश उद्योगपतीने घेतलेल्या पुढाकारामुळे 2006 मध्येच स्टॅनफोर्ड ट्वेन्टी-20 लीग सुरू करण्यात आली होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून स्टॅनफोर्डला अटक झाली आणि ती लीग गाळात रुतली. वेस्ट इंडिज बोर्डाने स्वत:हून आयपीएलच्या धर्तीवर ही लीग सुरू केली.

फोटो स्रोत, Getty Images
बार्बाडोस ट्रायडंट्स, गयाना अमेझॉन वॉरियर्स, जमैका तल्लावालाज, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स, सेंट ल्युसिआ झोयूक्स, त्रिनिबागो नाईट रायडर्स अशा सहा संघांमध्ये मुकाबला होतो.
अँटिगा हॉक्सबिल्स नावाचा संघ आता खेळत नाही. लोभसवाण्या समुद्रकिनाऱ्यांनजीकच्या स्टेडियम्सवर लीगच्या मॅचेस होतात.
त्रिनबागो नाईट रायडर्सने सर्वाधिक म्हणजे चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. लीगमध्ये सर्वाधिक रन्स लेंडल सिमन्सच्या नावावर तर सर्वाधिक विकेट्स ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहेत. अभिनेता शाहरुख खान हा त्रिनबागो नाईट रायडर्स संघाचा सहमालक आहे.
मंझी सुपर लीग
दक्षिण आफ्रिकेत ट्वेन्टी-20 चॅलेंज ही डोमेस्टिक स्पर्धा होत होती. मात्र त्याला फ्रँचाईज लीगचं स्वरुप नव्हतं. क्रिकेट साऊथ आफ्रिकेने मंझी सुपर लीग सुरू केली. दोन वर्षांपूर्वी या लीगला सुरुवात झाली. आर्थिक कारणांमुळे ही लीग प्रत्यक्षात सुरू व्हायला बराच वेळ गेला.
केपटाऊन ब्लिट्झ, डरबान हिट, जोझी स्टार्स, नेल्सन मंडेला बे जायंट्स, पार्ल रॉक्स, श्वाने स्पार्टन्स. रीझा हेन्ड्रिक्सच्या नावावर सर्वाधिक रन्स तर ड्युऑन ऑलिव्हर आणि डेल स्टेनच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
क्रिकेट साऊथ आफ्रिकेचं नियमन दक्षिण आफ्रिकेच्या ऑलिम्पिक समितीकडे गेल्याने ही लीग भविष्यात होणार का याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
बांगलादेश प्रीमिअर लीग
सख्खे शेजारी बांगलादेशने आयपीएलच्या यशातून बोध घेत 2012 मध्ये स्वत:ची लीग सुरू केली. भारताप्रमाणेच बांगलादेशही क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. त्यामुळे लीगच्या मॅचेसना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

फोटो स्रोत, Getty Images
चट्टोग्राम चॅलेंजर्स, कुमिला वॉरियर्स, ढाका प्लाटून, खुलना टायगर्स, राजशाही रॉयल्स, रंगपूर रेंजर्स, सिल्हेट थंडर अशा सात संघांमध्ये स्पर्धा रंगते.
बॅरिसल बुल्स हा संघ आता खेळत नाही. ढाका प्लाटूनने सर्वाधिक वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. लीगमध्ये सर्वाधिक रन्स मुशफकीर रहीमच्या नावावर आहेत तर सर्वाधिक विकेट्स शकीब अल हसनच्या नावावर आहेत.
मॅचफिक्सिंग प्रकरणामुळे लीगच्या प्रतिमेला धक्का बसला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार मोहम्मद अशरफुलवर कारवाई केली.
फिरकीपटू शरीफुल हकसह अंपायर नादिर शाह यांच्यावरही बोर्डाने कठोर कारवाई केली. ट्वेन्टी-20 प्रकारात स्पेशालिस्ट असे खेळाडू या लीगमध्ये नियमितपणे सहभागी होतात.
श्रीलंका प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीग
श्रीलंका किक्रेट बोर्डाने या लीगची घोषणा केली मात्र 2011चा पहिला हंगाम पुढे ढकलण्यात आला. 2012 मध्ये स्पर्धेची सुरुवात झाली. 2013 आणि 2014 मध्ये प्रायोजकांनी माघार घेतल्यामुळे लीग रद्द करावी लागली. भारताप्रमाणे लीग सुरू करण्याचा घाट श्रीलंकेच्या बोर्डाने घातला मात्र आर्थिक आघाडी बळकट नसल्याने हा प्रयत्न फलद्रूप झाला नाही.
बसनहिरा क्रिकेट दुंडी, कंडुराता वॉरियर्स, नागेनहिरा नागाज, रुहाना रॉयल्स, उथुरा रुद्राज, उवा नेक्स्ट, वायंबा युनायटेड अशा सात संघांमध्ये मुकाबला झाला होता.
शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल, डॅनियल व्हेटोरी असे विदेशी खेळाडू सहभागी झाले होते. उवा नेक्स्ट संघाने एकमेव जेतेपदावर कब्जा केला होता.
बोर्डाने यंदाच्या वर्षी लंका प्रीमिअर लीग या नव्या नावानिशी लीग सुरू केली आहे. माजी खेळाडू रसेल अरनॉल्ड स्पर्धेचे संचालक असतील.
2018 आणि 2019 मध्ये लीग सुरू होण्याची शक्यता होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे लीग सुरू झाली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना यंदा लीगचे सामने आयोजित करणं हे आयोजकांपुढचं आव्हान असणार आहे.
कोलंबो लायन्स, डंबुला हॉक्स, गॉल ग्लॅडिएटर्स, जाफना कोब्राज, कँडी टस्कर्स असे संघ असणार आहेत.
अफगाणिस्तान प्रीमिअर लीग

फोटो स्रोत, Getty Images
क्रिकेटविश्वात नवे असले तरी अफगाणिस्तानने दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या धर्तीवर लीग सुरू केली. अफगाणिस्तान प्रीमिअर लीगचे सामने युएईत होतात.
बाल्ख लिजंड्स, काबुल झ्वानान, कंदाहार नाईट्स, नंगारहर लेपर्ड्स, पकटिआ सुपर किंग्स असे पाच संघ असून, 40हून अधिक विदेशी खेळाडू यामध्ये सहभागी होतात.
बाल्ख लिजंड्सने जेतेपद पटकावलं आहे. लीगमध्ये सर्वाधिक रन्स मोहम्मद शाहझादच्या नावावर तर सर्वाधिक विकेट्स इसुरू उदानाच्या नावावर आहेत.
चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-20
बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट साऊथ आफ्रिका यांनी एकत्र येत चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-20 स्पर्धेची सुरुवात केली. जगभरातल्या सर्वोत्तम डोमेस्टिक ट्वेन्टी-20 संघांमधील स्पर्धा असं याचं स्वरुप होतं. सुंदर रमण या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

फोटो स्रोत, Getty Images
2008 ते 2014 या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात आली. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघांनी प्रत्येकी दोनवेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.
अन्य देशातील खेळाडू माहिती नसल्याने रोडावलेली प्रेक्षकसंख्या, प्रायोजकांनी फिरवलेली पाठ आणि अन्य कारणांमुळे ही स्पर्धा रद्दबातल करण्याचं 2015मध्ये ठरवण्यात आलं. स्पर्धेत सर्वाधिक रन्स सुरेश रैनाच्या तर सर्वाधिक विकेट्स सुनील नरिनच्या नावावर आहेत.
इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आयपीएलच्या आधीपासूनच ट्वेन्टी-20 मॅचेसना सुरुवात झाली होती. मात्र आयपीएलसारखे फ्रँचाइज संघ, पैसे, प्रसिद्धी असं वातावरण नव्हतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








