IPL 2022 : स्लॅपगेट, स्पॉट फिक्सिंग आणि वॉकिंग पॉर्न चीअरलीडर्स

आयपीएल

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, कीरेन पोलार्ड

आयपीएलचा पंधरावा हंगाम काही दिवसात सुरू होत आहे. एक तप पूर्ण केलेल्या आयपीएल स्पर्धेने तितकेच वादविवादही पाहिले आहेत. या वादांनी अनेकदा खेळ बाजूला पडून सर्व लक्ष त्या वादावर केंद्रित झालं होतं. अशाच महत्त्वपूर्ण वादांचा घेतलेला आढावा.

1. स्लॅपगेट-हरभजनने श्रीसंतला थोबाडीत मारली (2008)

आयपीएलच्या पहिल्याच हंगामात हरभजन सिंगने श्रीसंतला थोबाडीत मारलं. हरभजन सिंग त्यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळत होता तर श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता.

हरभजनने श्रीसंतला थोबाडीत मारणं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही, मात्र मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीआधी श्रीसंत रडत असल्याचं जगभरातील क्रिकेट चाहत्यांना दिसलं होतं.

पंजाब संघाचे तेव्हाचे कोच टॉम मूडी यांनी हरभजनचं वर्तन अस्वीकाहार्य असल्याचं सांगितलं होतं. श्रीसंतने हे प्रकरण वाढवलं नाही आणि हरभजन मोठ्या भावाप्रमाणे असल्याचं सांगितलं.

हरभजनवर कारवाई करण्यात आली आणि त्या हंगामातील उर्वरित सामने तो खेळू शकला नाही. शिस्तभंगाचा दोषी आढळल्याने त्याला मानधनही नाकारण्यात आलं.

बीसीसीआयने याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली. त्यातही दोषी आढळल्याने त्याच्यावर पाच वनडेंकरता बंदीची कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाला 'स्लॅपगेट' असं नाव मिळालं.

2. रवींद्र जडेजा एका वर्षासाठी निलंबित (2010)

आयपीएल

फोटो स्रोत, NOAH SEELAM

फोटो कॅप्शन, रवींद्र जडेजा

नियमभंगप्रकरणी ऑलराऊंडर रवींद्र जडेजावर एका वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली. जडेजा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.

राजस्थान संघ व्यवस्थापनाबरोबर कराराच्या नूतनीकरणावर स्वाक्षरी न करताच जडेजाने अधिक मानधनासाठी अन्य एका संघाशी बोलणी सुरू केली. हे उघड झाल्याने जडेजावर कारवाई करण्यात आली. यामुळे जडेजा 2010 आयपीएल हंगामात खेळू शकला नाही.

3. ललित मोदी यांची हकालपट्टी (2010)

आयपीएल

फोटो स्रोत, The India Today Group

फोटो कॅप्शन, ललित मोदी

आयपीएलची संकल्पना ज्यांनी मांडली आणि अमलात आणली त्या ललित मोदींनाच दोन वर्षांत पायउतार व्हावं लागलं.

2010 मध्ये ललित मोदींना तीन कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या. गोपनीयता कराराचा भंग, प्रक्षेपण हक्क वितरणात कथित भ्रष्टाचार आणि लिलावात फेरफार असे हे तीन आरोप होते.

बीसीसीआयचे पदाधिकारी आणि आयपीएलचे सर्वेसर्वा ललित मोदी यांचं संस्थान बघता बघता खालसा झालं. कोची टस्कर्स केरळा संघासंदर्भात गोपनीय माहिती त्यांनी ट्वीट केली होती.

या सगळ्याची परिणती म्हणजे त्याच वर्षी आयपीएल कमिशनर पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मोदी हल्ली इंग्लंडमध्ये असतात.

4. चीअरलीडरचा ब्लॉग (2011)

आयपीएल

फोटो स्रोत, RAVEENDRAN

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

गॅब्रिएला पासक्यूलोट्टो या मुंबई इंडियन्ससाठी काम करणाऱ्या चीअरलीडरने ब्लॉग लिहिला. या ब्लॉगमधील गोष्टींमुळे आयपीएलची काळी बाजू समोर आली.

गॅब्रिएलाने लिहिलं होतं, आम्ही अक्षरक्ष: वॉकिंग पॉर्न सारख्या झाल्या आहोत. हे क्रिकेटपटू अतिशय चारित्र्यहीन आणि खोडसाळ आहेत.

असभ्य वर्तन करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावंही तिने लिहिली होती. मात्र त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे अतिशय चांगले वागतात, ते त्यांच्या विश्वात असतात असंही गॅब्रिएलाने लिहिलं होतं.

गॅब्रिएलाच्या ब्लॉगमुळे काही खेळाडूंची गोपनीयता धोक्यात आली आहे असं वृत्तांकन दक्षिण आफ्रिकेतील प्रसारमाध्यमांनी केलं.

कारण याप्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचं नाव समोर आलं होतं. त्या हंगामादरम्यान मुंबई इंडियन्सने गॅब्रिएलाचा करार रद्द केला होता.

5. स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं स्पॉट फिक्सिंग (2012)

क्रिकेटविश्वाला फिक्सिंगच्या वाळवीने 2000च्या दशकात ग्रासलं होतं. आयपीएल स्पर्धाही त्याला अपवाद ठरली नाही.

2012 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आलं. फ्रँचाईज ब्लॅक मनी देतात हे पुणे वॉरियर्सचा खेळाडू मोहनिश मिश्राचं बोलणं स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघड झालं.

त्याच वर्षी मे महिन्यात टीपी सुधींद्र (डेक्कन चार्जर्स), अमित यादव आणि शलभ श्रीवास्तव (किंग्ज इलेव्हन पंजाब), अभिनव बाली (दिल्ली) यांची नावं स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आली.

हे चौघंही स्पॉट फिक्सिंगमध्ये असल्याचा आरोप झाला. या पाचही खेळाडूंना तत्कालीन आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी निलंबित केलं.

6. शाहरूख खानचा सुरक्षारक्षकाशी वाद, वानखेडेवर प्रवेशबंदी (2012)

आयपीएल

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, शाहरुख खान

मॅच संपल्यानंतर सुरक्षारक्षकाशी झालेल्या वादावादीमुळे बॉलीवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरूख खानवर पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियमवर प्रवेशास बंदी घालण्यात आली.

कोलकाताने मुंबईविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर शाहरूख खानची मुलं आणि त्यांचे मित्र ग्राऊंडमध्ये जाताना दिसले.

सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केला. रागावलेल्या शाहरूख खानने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकाशी त्याचा वाद झाला. याचं पर्यावसान म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरूखच्या वानखेडे प्रवेशावर बंदी घातली.

7. राहुल शर्मा, वेन पार्नेल ड्रग्जप्रकरणी अटक आणि सुटका (2012)

आयपीएल

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, राहुल शर्मा

पुणे वॉरियर्सकडून खेळणाऱ्या राहुल शर्मा आणि वेन पार्नेल यांना मुंबईतल्या एका रेस्तराँमधून ड्रग्जसेवनाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली.

मला नाचायला आवडतं, म्हणून तिथे गेलो होतो. मी ड्रग्ज घेत नाही. दारूही पित नाही. मांसाहारही करत नाही असं राहुलने स्पष्ट केलं होतं.

ड्रग्जप्रकरणी अटक झाल्याने उदयोन्मुख फिरकीपटू म्हणून नाव कमावलेल्या राहुलची प्रतिमा मलिन झाली. परंतु बीसीसीआयने घेतलेल्या उत्तेजकविरोधी चाचणीत तो निर्दोष आढळला. त्यामुळे त्याची सुटका करण्यात आली.

8. ल्यूक पॉमर्सबॅचला अटक (2012)

आयपीएल

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, ल्यूक पॉमरबॅच

ऑस्ट्रेलियातील डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यामुळे ल्यूक पॉमरबॅचला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने संघात समाविष्ट केलं.

मात्र खेळाऐवजी एका वादामुळे ल्यूक चर्चेत आला. अमेरिकन महिलेने ल्यूकविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी ल्यूकला अटक केली.

प्रकरणाची चौकशी होईपर्यंत बेंगळुरू संघाने ल्यूकला संघातून बाजूला काढलं. ल्यूकने माझ्या साथीदारीला मारहाण केली असा आरोप करणाऱ्या त्या महिलेने नंतर तक्रार मागे घेतली आणि ल्यूकला सोडून देण्यात आलं.

9. पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंग; चेन्नई-राजस्थानवर बंदीची कारवाई (2013)

आयपीएल

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, चेन्नई सुपर किंग्सचा गुरुनाथ मयप्पन

2013 मध्ये उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने आयपीएलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांसाठी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक केली.

मुंबई पोलिसांनी कथित सट्टेबाजी आणि बुकींबरोबरच्या संबंधांसाठी विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मय्यपन यांना अटक केली. मय्यपन हे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष तसंच चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई.

हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली.

यामुळे चेन्नई आणि राजस्थान हे संघ 2016 आणि 2017 या वर्षी स्पर्धेत खेळू शकले नाहीत. श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदीची कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणामुळे आयपीएलची एक स्पर्धा म्हणून तसंच खेळाडूंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

10.आंदोलन-विरोधामुळे ठिकाणात बदल (2016, 2018)

आयपीएल

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, आंदोलन आणि दुष्काळामुळे आयपीएलचे सामने अन्य ठिकाणी खेळवावे लागले.

2016 वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. आयपीएलच्या मॅचेस मुंबईत वानखेडे तर पुण्यातील गहुंजे इथे होणार होत्या. राज्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची अतीव टंचाई असताना आयपीएलच्या मॅचेसकरता एवढं पाणी कसं वितरित केलं जाऊ शकतं असा सवाल समाजाच्या विविध स्तरातून करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई-पुणे इथल्या मॅचेस अन्यत्र खेळवण्याचा आदेश दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला.

दोन वर्षांनंतर पाण्याच्या मुद्यावरून चेन्नईत प्रकरण तापल्याने चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचेस अन्यत्र खेळवण्यात आल्या. पाणी सोडण्याच्या मुद्यावरून कर्नाटकशी असलेल्या वादासंदर्भात केंद्राने कावेरी मॅनेजमेंट बोर्डची स्थापना करावी अशी तामिळनाडूची मागणी होती.

चेन्नईच्या पहिल्या मॅचवेळी आंदोलकांनी मॅच बंद करण्याची मागणी केली. चेन्नईच्या एका खेळाडूच्या दिशेने बूट फेकून मारण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात घेऊन चेन्नईच्या मॅचेस अन्यत्र खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

11.व्हर्बल डायरिया (2017)

सर्व हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कीरेन पोलार्डने माजी खेळाडू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय मांजरेकर यांनी कॉमेंट्रीदरम्यान पोलार्डच्या खेळाची समीक्षा केली होती. संजय मांजरेकरांचे शब्द म्हणजे व्हर्बल डायरिया आहेत अशा शब्दात पोलार्डने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली.

वेस्ट इंडिजच्या असंख्य खेळाडूंनी त्याला पाठिंबाही दर्शवला. अजूनही या दोघांमधले संबंध पूर्ववत झालेले दिसत नाहीत.

12.अश्विन-बटलर आणि मंकडिंग (2019)

आयपीएल

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE

फोटो कॅप्शन, रवीचंद्रन अश्विन

गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने आऊट केलं आणि वादाला तोंड फुटलं.

बॉलर बॉलिंग करत असताना, नॉन स्ट्रायकरने क्रीझमध्ये असणं अपेक्षित आहे. मात्र चोरट्या रन्स घेण्याच्या प्रयत्नात असलेला बॅट्समन क्रीझ सोडून पुढे सरसावलेले असतात.

अशावेळी बॉलर अंपायरसमोरचे स्टंप्स किंवा बेल्स उडवून बॅट्समनला आऊट करू शकतो. त्याला मंकडिंग असं म्हटलं जातं. असं आऊट करणं नियमातच दिलेलं आहे. मात्र स्पिरीट ऑफ द गेमला धरून नाही असं सर्वसाधारपणे म्हटलं जातं.

बॅट्समन रिव्हर्स स्विच किंवा रिव्हर्स स्वीप, पॅडल स्कूप करताना बॉलरला आगाऊ कल्पना देत नाहीत मग बॉलरने बॅट्समनला इशारा का द्यावा असा युक्तिवाद अश्विनने केला. सोशल मीडियावर अश्विनच्या बाजूने आणि विरुद्धही अशा कमेंट्सना उधाण आलं. जोस बटलरने अश्विनच्या कृतीवर आश्चर्य व्यक्त केलं होतं.

13. कॅप्टन कुल धोनी संतापतो तेव्हा... (2019)

महेंद्रसिंग धोनी त्याच्या बॅटिंग आणि कॅप्टन्सीइतकंच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु गेल्या वर्षी धोनीचा संयम सुटल्याचं जगभरातल्या चाहत्यांनी पाहिलं.

चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील मॅचदरम्यान धोनी आऊट होऊन तंबूत परतला होता. चेन्नईला 3 बॉलमध्ये 8 रन्स हव्या होत्या. त्यावेळी लेग अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्ड यांनी मुख्य अंपायर उल्हास गंधे यांचा नोबॉलचा निर्णय बदलला. यामुळे गोंधळ निर्माण झाला.

त्यावेळी चेन्नईसाठी बॅटिंग करणारा रवींद्र जडेजा अंपायर्सवर चिडला. हे सगळं डगआऊटमधून पाहत असलेल्या धोनीचा संयम सुटला आणि तो मैदानात उतरला. चिडलेल्या धोनीला अशा पद्धतीने मैदानात उतरताना जयपूरच्या प्रेक्षकांनी पाहिलं.

धोनीने मैदानात येऊन अंपायर्सशी चर्चा केली. नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. चांगल्या वर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या मानधनातून याप्रकारासाठी 50 टक्के रक्कम कापून घेण्यात आली. धोनीकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती अशी टीका सोशल मीडियावरून करण्यात आली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)