भारतीय महिला आपला मेनोपॉज नवऱ्यापासून का लपवतात?

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"माझ्या नवऱ्याचं म्हणणं असावं की, मी नेहमी आवरून सावरून छान दिसावं. चांगल्या साड्या नेसाव्यात, चांगले दागिने घालावेत. मी एक मोठी टिकली लावायचे, ठाशीव दागिने घालायचे आणि एक दिवस सगळं थांबलं.”
अतुल शर्मा आज 60 वर्षांच्या आहेत, त्या उत्तर प्रदेशमधल्या मेरठ जिल्ह्यातल्या एका गावात राहातात. त्यांची पाळी बंद झाली, तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय काय बदललं ते त्या मला सांगत होत्या.
“पुरुषाच्या बाबतीत म्हणतात अवघे पाऊणशे वयमान. पुरुष साठीचा सत्तरीचा झाला तरी तो पुरुषच असतो. पण जशी बाईची पाळी बंद होते, मग ती अगदी चाळीशी-पंचेचाळिशीची असली तरी जणू काही तिच्यासाठी सगळंच संपतं. तिचं आयुष्य, स्त्रीत्व सगळंच संपतं,” त्या निश्वास सोडतात.
अतुल सध्या मेरठ भागातल्या ग्रामीण महिलांच्या आरोग्य आणि आर्थिक सबलीकरणासाठी काम करतात.
मेनोपॉज महिलांच्या आयुष्यातला तो थांबा असतो, जिथे त्यांच्या शरीरात तर अगणित बदल होत असतातच. पण मनातही अनेक भावनांचा कल्लोळ दाटलेला असतो. लाज, भीती, असुरक्षितता यांच्या द्वंदात अडकलेल्या महिला आपलं उरलेलं आयुष्य कसं जगतात?
अतुल त्यांचा अनुभव सांगतात.
“मला वाटायचं माझ्या नवऱ्याला आता माझी गरज राहिली नाही. मला असंही वाटायचं की दुसऱ्या कुठल्या बाईकडे गेले तर? त्यांच्या लेखी माझी उपयुक्तता कदाचित संपली आहे. माझं स्त्रीत्वं संपलं आहे, मी आता पूर्णार्थाने बाई राहिले नाही. माझी पाळी गेलीये. कदाचित माझ्यातल्या लैंगिक भावनाही संपल्या असतील. मग मी लैंगिक संबंधही ठेवू शकणार नाही.”
म्हणूनच कदाचित आपली पाळी बंद झाली हे नवऱ्यापासून त्यांनी कित्येक वर्षं लपवून ठेवलं.
“त्यानंतर माझ्या नवऱ्याला माझ्याशी लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर मी त्यांना कधीच नाही म्हणाले नाही. त्याआधी मी म्हणायचे, की काय हे, आपली मुलं मोठी झालीत. आता या वयात हे शोभतं का? मी अनेक वर्षं खोटं खोटं दाखवत राहिले की मला पाळी येतेय.
“मी महिन्यातले तीन दिवस तशीच राहायचे. मी पॅड वापरायचे, ते रॅप करून फेकून द्यायचे. एकदम तसंच वागायचे जसं मला पाळी आल्यावर वागेन.”

अतुल बाहेर असं वागत असल्या तरी त्यांच्या अंतर्मनात एक वेगळीच लढाई चालू होती. त्यांना आयुष्यात कशातच रस वाटत नव्हता. त्या स्वतःला एक टाकाऊ वस्तू समजू लागल्या होत्या.
“मी रात्री दचकून उठायचे. लहान लहान गोष्टींमुळे संतापायचे. माझे पैंजण वाजले तरी मला खूप राग यायचा, की काय चालू आहे. माझं वय झालंय आणि माझे पैंजण काय वाजतात. मी चांगलं राहाणं, चांगलं दिसणं सोडून दिलं. मी स्वतःसाठी काहीच चांगलं करत नव्हते. माझं जगणंच थांबलं.”
काही वर्षांनी अतुल यांच्या पतीला कळलं की, त्या कोणत्या शारिरीक आणि मानसिक अवस्थेतून जात आहेत. त्यांच्या नवऱ्याने त्यांना समजावलं की, त्या अजूनही महत्त्वाच्या आहेत, त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.
त्यामुळे अतुल हळूहळू पूर्वपदावर आल्या.
पाळी, मेनोपॉज आणि त्यानुसार बदलणारा समाजाचा दृष्टिकोन
मेनोपॉज म्हणजे एका विशिष्ट वयात पोहोचल्यानंतर महिलांच्या शरीरातले प्रजनानासाठी कारणीभूत असणारे हार्मोन नैसर्गिकरित्या कमी होणं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पाळी बंद होणं.
तज्ज्ञांना वाटतं की, महिलांनी त्यांच्या मेनोपॉजकडे एका नव्या आयुष्याची सुरुवात म्हणून पाहायला हवं.
डॉ. रेणुका मलिक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या मेनोपॉज क्लीनिकच्या प्रमुख आहेत.
त्या म्हणतात, “भारतात मेनोपॉज झालेल्या, होणाऱ्या, होऊ घातलेल्या महिलांची लोकसंख्या खूप जास्त आहे. या लोकसंख्येने आपल्या पुढच्या आयुष्याचं नियोजन करायला हवं. महिलांना खरं आनंद वाटायला हवा की त्यांची पाळी बंद झाली, त्या मोकळ्या झाल्या, स्वतंत्र झाल्या.”
पण पुरुषसत्ताक समाजात जिथे महिलांचं शोषण होण्यासाठी कोणतंही कारण पुरतं, तिथे हा मेनोपॉज प्रत्येक बाईसाठी स्वातंत्र्य घेऊन येतोच असं नाही.

संजोगही कदाचित यामुळेच आपला मेनोपॉज लपवत राहिल्या. त्या मेरठच्या राहाणाऱ्या आहेत आणि अनेक वर्षं घरगुती हिंसेच्या बळी ठरल्या आहेत.
“माझा नवरा मारझोड करायचा, बळजबरीने लैंगिक संबंध ठेवायचा. जबरदस्ती करायचा. मी तो मरेपर्यंत त्याच्यापासून माझा मेनोपॉज लपवला. पाळी हे एकमेव कारण होतं, ज्यामुळे तो माझ्यापासून महिन्यातले ते दिवस लांब राहायचा. त्याला किंवा माझ्या आसपासच्या इतर पुरुषांना कळलं असतं की माझी पाळी बंद झालीय, मला आता मुलं होणार नाहीत, मी गरोदर राहू शकत नाही, तर मग त्यांनी माझं काय केलं असतं देव जाणे. माझ्यावर नक्कीच बलात्कार झाले असते.”
“पुरुषांना एकाच गोष्टीची भीती वाटते की, आपण एखादीवर जबरदस्ती केली आणि ती गरोदर राहिली तर? आता तेच कारण संपल्यावर त्यांना कशाची भीती. मी आसपासच्या महिलांच्या बाबतीत असं होताना पाहिलंय. माझ्या नवऱ्यानेही मला सोडलं नसतं.”
मेनोपॉजमुळे कसं बदलतं महिलांचं आयुष्य?
जगभरातल्या महिलांचं मेनोपॉजचं सरासरी वय पन्नाशीच्या पुढचं आहे, पण भारतात मात्र हेच सरासरी वय 46-47 वर्षं इतकं आहे.
डॉक्टरांच्या मते, मेनोपॉजच्या काळात महिलांना अनेक त्रास होतात.
काही मोठ्या शहरांमध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये मेनोपॉज क्लीनिक चालतात, पण बहुतांश महिलांना त्याबद्दल माहितीच नाही.
दिल्लीचं राम मनोहर लोहिया हॉस्पिटलही अशाच हॉस्पिटल्सपैकी एक आहे.
तिथे मेनोपॉजसाठी खास क्लीनिक आहे. तिथे सगळ्या सामाजिक-आर्थिक वर्गातल्या 40 ते 60 या वयोगटातल्या महिला येतात, पण त्यांच्यापैकी कोणीही थेट आलेलं नाही. अनेकदा त्रास असह्य झाल्यावर कोणाच्या तरी सांगण्यावरून तिथे आलेल्या असतात.
त्यातल्या अनेक महिला तिथे आपल्या मुलींच्या बाळंतपणासाठी आलेल्या असतात. बोलता बोलता तिथल्या नर्सेसला आपल्याला होणारे त्रास सांगतात आणि मग स्त्रीरोग विभागातल्या कर्मचारी त्यांना मेनोपॉज क्लीनिकमध्ये पाठवतात.
पण या विषयाबद्दल महिलांच्या मनात एवढी लाज आहे की इतकं करूनही काही जणी या कारणासाठी दवाखान्यात यायला नाही म्हणतात.
इथेच आम्हाला भेटल्या संगीता. त्या या हॉस्पिटलमध्ये कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. तरी त्यांनादेखील या क्लीनिकबद्दल माहिती नव्हतं.
त्रास असह्य झाल्यावर त्यांना तिथल्याच दुसऱ्या डॉक्टरांनी या क्लीनिकमध्ये जाण्याचा सल्ला दिला.


संगीता यांना गंभीर स्वरुपाचे हॉट फ्लशेश (संपूर्ण शरीरात उष्णतेची लाट येणं, शरीर अक्षरशः तापलंय असं वाटणं), गंभीर स्वरुपाचा थकवा, निद्रानाश, पाठदुखी, कंबरदुखी आणि पोटदुखीसारखे त्रास होतात.
संगीता यांना गेली दोन वर्षं सातत्याने हे त्रास होत आहेत. त्या म्हणतात त्यांचं वय 42-43 आहे आणि त्यांची पाळी दोन वर्षांपूर्वी बंद झाली.
संगीताचा दिवस पहाटे चारला सुरू होतो आणि रात्री अकराला संपतो.
एकल पालक आहेत, त्यांची मुलं लहान आहेत. त्यांचं काम, घराची जबाबदारी, स्वयंपाकपाणी, मुलांचं बघणं आणि मेनोपॉजमुळे होणारे त्रास यामुळे त्यांना जीव नकोसा झालाय.
“कधी कधी वाटतं या वेदना मी मेल्यावरच संपतील. असा त्रास घेऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं,” त्या त्रासलेल्या आवाजात म्हणतात.
मेनॉपॉजमुळे होणाऱ्या व्याधींवर वेळेत उपचार केले नाहीत तर त्यातून गंभीर स्वरूपाचे आजार, जसं की कॅन्सर, हृदयरोग, ऑस्टिओपरायसिस (हाडं ठिसूळ होणं) होण्याचा धोका असतो.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, उपचारांनी मेनोपॉजमुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो. त्यावर औषधं उपलब्ध आहेत.

डॉ. मलिक म्हणतात, “हॉट फ्लशेश कालांतराने कमी होत जातात. पोषक आहार आणि फिजिओथेरेपी, किंवा अगदी घराच्या घरी काही ठराविक व्यायाम केल्याने अंगदुखी कमी होते. इतर गंभीर स्वरुपाच्या लक्षणांसाठी HRT (हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी) सारखे उपचार आहेत.”
हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी एक अशी उपचारपद्धती आहे, ज्यात शरीरात कमी होत जाणाऱ्या नैसर्गिक हार्मोन्सची कमतरता औषधांनी भरून काढली जाते.
मेनोपॉजच्या काळात महिलांच्या शरीरातले इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनसारखे हार्मोन कमी व्हायला लागतात. हे हार्मोन महिलांच्यी प्रजनन यंत्रणास हाडं, मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे असतात.
हे हार्मोन जसजसे कमी होतात तसं तसं या यंत्रणांशी संबंधित त्रास महिलांना व्हायला लागतात.

HRT मध्ये गोळ्या, औषधं, त्वचेवर लावायची क्रीम्स, तसंच पॅचेस याव्दारे हे हार्मोन बाहेरून दिले जातात. त्यामुळे शरीरात कमी झालेल्या हार्मोन कमतरता भरून निघते.
पण हे उपचार स्वस्त नाहीत.
संगीता यांचं मासिक उत्पन्न 12 हजार रूपये आहे.
“त्यातले 2-3 हजार जर मला माझ्या औषधांवर खर्च करावे लागले तर मला परवडणारं नाही. मग मी खाऊ काय? माझ्या मुलांना काय खायला घालू?” त्या हतबल होत विचारतात.
सरकारने HRT सारखे उपचार स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावेत यासाठी तज्ज्ञ आग्रही आहेत.
गावखेड्यात तर मेनोपॉज क्लीनिक्सही नाहीत आणि त्याविषयी बोललंही जात नाही.
भारतात मेनोपॉजशी संबंधित रुग्णालयं आणि उपचारांची कमतरता
अतुल म्हणतात, “ग्रामीण भागात सरकारी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात मेनोपॉजचा त्रास सहन करणाऱ्या महिलांसाठी कोणत्याही गोळ्या, औषधं किंवा उपचार नाहीत. गावात जी नर्स येते तिला सांगितलं तर तीही म्हणते की आता यासाठी पण गोळ्या मागणार का?”
भारतीय महिलांचं सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे दरवर्षी लाखो महिला मेनोपॉजच्या वयोगटात प्रवेश करत आहेत.

डॉ अंजू सोनी इंडियन मेनोपॉज सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. त्या म्हणतात, “1947 मध्ये भारतीय महिलांचं सरासरी वयोमान 32 वर्षं इतकं होतं. आता ते वाढून जवळपास 70 इतकं झालंय. म्हणजेच भारतीय महिला आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश हिस्सा आता मेनोपॉजनंतर जगतात.”
डॉ सोनी काही आकडेवारीही विशद करतात. 2011 च्या जनगणनेप्रमाणे भारतात 9 कोटी 60 लाख महिला मेनोपॉजच्या वयात होत्या.
“2026 पर्यंत हाच आकडा अनेक पटींनी वाढून 40 कोटींपर्यंत जाईल,” त्या म्हणतात.
विकसित देशात आता खास धोरणं
2030 पर्यंत जगात मेनोपॉज झालेल्या किंवा होऊ घातलेल्या महिलांची संख्या 1.2 अब्ज इतकी असेल. यात दरवर्षी 4 कोटी 70 लाख महिलांची भर पडत राहील.
त्यामुळेच कदाचित अमेरिका, यूके, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारखे विकसित देश आता मेनोपॉजसाठी खास धोरणं राबवत आहेत.
यूकेने म्हटलं आहे की जर एखाद्या महिलेला मेनोपॉजच्या काळात दीर्घकाळासाठी खूप त्रास होत असेल आणि तिच्या रोजच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडत असेल तर अशा त्रासाला डिसेबलीटी (दिव्यांग) म्हटलं जाऊ शकतं. आणि दिव्यांग लोकांना, दीर्घकाळ आजारी असणाऱ्या लोकांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा अशा महिलांना मिळतील.
अशा महिलांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना काम करणं सोपं जाईल अशी व्यवस्था करणं ही त्या संस्थेची जबाबदारी असेल.
यूकेने HRT च्या दरातही घट केली आहे.
अमेरिकेत मेनोपॉज रिसर्च आणि इक्विटी ॲक्ट 2023 हे विधेयक संसदेत मांडलं गेलं आहे. या विधेयकात म्हटलं गेलंय की नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थच्या संचालकांनी मेनोपॉजसंबधी काय संशोधन होतंय, त्यावर काय केलं जातंय, काय करायला हवं, मध्यमवयीन महिलांना काय त्रास होतोय याचा आढावा घ्यावा आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्येही अशाच प्रकारची धोरणं राबवली जात आहेत.
पण भारतात मात्र असं कोणतंही धोरण अजून लागू केलेलं नाही.
2023 मध्ये तत्कालीन महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं होतं की सध्या तरी खासगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी कोणतीही मेनोपॉझ पॉलिसी अस्तित्वात नाही. मेनोपॉज तसंच महिलांच्या इतर आरोग्य समस्यांबद्दल पथनाट्य, जाहिराती, शैक्षणिक योजनांव्दारे जनजागृती केली जाते.
तज्ज्ञांना वाटतं की एवढंच पुरेसं नाही. सरकारने आता महिलांच्या नॉन रिप्रोडक्टिव्ह, म्हणजेच पाळी, गरोदरपणा, प्रसुती व त्याच्याशी संबंधित गोष्टी सोडून इतर आरोग्य समस्यांकडे लक्ष द्यावं.
डॉ सोनी म्हणतात, “सरकारने याआधी महिलांच्या रिप्रोडक्टिव्ह आरोग्यकडे लक्ष दिलं, त्याचा फायदा असा झाला की भारतात माता आणि बालमृत्युदरात कमालीची घट झाली. ही चांगलीच गोष्ट आहे. पण आता फक्त प्रजननक्षम नाही तर सगळ्याच वयांच्या महिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं.”
त्या पुढे म्हणतात, “सरकारकडे तळागाळात आरोग्यसेविकांचं जाळ आहे. गरोदर महिलांना आर्यन आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातातच. त्यांना पोषण आहार दिला जातो. आशा वर्कर आणि आरोग्य सेविका त्यांची नियमितपणे तपासणी करत असतात. आता याच योजना मेनोपॉजमध्ये असणाऱ्या महिलांसाठी राबवल्या पाहिजेत.”
डॉ सोनी यांना असंही वाटतं की, HRT उपचारांवर सबसिडी दिली पाहिजे, ती औषधं स्वस्तात उपलब्ध करून द्यायला हवीत.
पण ते होईल तेव्हा होईल, तोपर्यंत मेनॉपॉजसंबंधी असणारी लाज, भीती, त्यावर खुलेपणाने न बोलणं, समाजाचा रोख आणि सरकारी धोरणं नसणं यामुळे देशातल्या महिलांना मेनोपॉजनंतर एक सक्षम आणि आरोग्यदायी आयुष्य जगणं सोपं नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











