वाईन उद्योगाचं भवितव्य काय? वाईनचा 9 हजार वर्षांचा इतिहास काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
वाईन या पेयाला जगभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक महत्त्व आहे. फ्रान्ससारख्या देशात तर अर्थव्यवस्थेतही वाईनचं योगदान आहे.
पण अलीकडे हवामान बदल, स्पर्धा आणि राजकीय धोरणं याचा परिणाम तसंच वाईनच्या घसरत्या किंमती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे या उद्योगावर संकटाचे ढग दाटले आहेत.
समस्या एवढी गंभीर झाली की फ्रान्समध्ये तर हजारो वाईन उत्पादकांनी नोव्हेंबर 2025 मध्ये बिझिए शहरात आंदोलन केलं आणि वाईन उत्पादनासाठी अधिक मदत द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली. '
फ्रान्सच नाही, तर इतर मोठे वाईन उत्पादक देशही अशा समस्यांचा सामना करत आहेत. महाराष्ट्रातल्या द्राक्ष आणि वाईन उत्पादकांनाही त्याची झळ सहन करावी लागते आहे.
त्यात अल्कोहोलच्या दुष्परिणामांविषयी जागरुकता वाढल्यानं काही देशांत वाईनचं सेवन करण्याचं प्रमाण घटलं आहे.
वाईनचा इतिहास काय आहे, हे पेय इतकं महत्त्वाचं का बनलं आणि त्यावरून आंदोलन करण्याची वेळ का आली? जाणून घेऊयात.
9 हजार वर्षांचा इतिहास
रॉड्रिक फिलिप्स हे कॅनडातील कार्लटन विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.
ते सांगतात की "वाईन हे फक्त एक मद्य नसून समाजात तिला एक वेगळा दर्जा आहे. वाईन योग्य प्रकारे साठवली तर वेळेनुसार तिचा स्वाद अधिक चांगला होतो. बिअर किंवा इतर मद्यांपेक्षा वाईन उंची मानली जाते, तिचा खाद्यसंस्कृतीत समावेश आहे."

फोटो स्रोत, Getty Images
काही ऐतिहासिक नोंदींनुसार सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वी वाईन बनवण्यास सुरुवात झाली, पण पहिली वाईन नेमकी कुठे बनवली गेली, हा वादाचा विषय आहे.
रॉड्रिक फिलिप्स माहिती देतात, "काहींच्या मते इराक, आर्मेनिया आणि जॉर्जिया सारख्या देशांत वाईन तयार करण्याची सुरुवात झाली. पण त्याच काळात चीनमध्येही वाईन तयार केली जात असल्याचे पुरावे समोर आले आहेत."
पण सुरुवातीला वाईन एक पेय म्हणूनच नाही, तर औषधी म्हणूनही वापरली जायची, असं फिलिप्स सांगतात. अर्थात वाईनमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत.
विसाव्या शतकात औषधशास्त्रात प्रगती झाल्यावर वाईनचा औषध म्हणून वापर कमी झाला. पण वाईन पिणे हे अनेक प्रदेशांत सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाऊ लागले.
"वाईन आणि बिअरमध्ये मुख्य फरक असा आहे की बिअर धान्यापासून बनते. तिचे उत्पादन वर्षभर आणि मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
"पण वाईन फक्त वर्षातील एका हंगामात आणि मर्यादित प्रमाणात तयार होते, त्यामुळे ती महाग असते.
"कमी लोक वाईन खरेदी करू शकतात. म्हणूनच पाश्चिमात्य देशांत वाईनचा वापर लग्न किंवा इतर खास प्रसंगी होऊ लागला."

फोटो स्रोत, Getty Images
इस्लाममध्ये वाईनचे सेवन निषिद्ध आहे. भारतात वाईनची विक्री करताना लेबलवर अल्कोहोल आरोग्याला घातक असल्याची चेतावणी लिहिलेली असते.
पण एके काळी तर वाईन चलनाचा पर्याय बनली होती. इंग्लंड आणि पोर्तुगाल यांच्यातील व्यापारात पोर्तुगालची पोर्ट वाईन चलनासारखी वापरली जात होती.
आजही वाईन ही अनेक ख्रिश्चन धार्मिक कार्यक्रम आणि परंपरांचा अविभाज्य भाग बनली आहे.
वाईन उद्योगातला तोटा
जेन एनसन फ्रान्समधल्या वाईन समीक्षक आणि लेखक आहेत. त्या सांगतात की फ्रान्समधील वाईनची जास्त चर्चा होते आहे कारण तिथे अनेक प्रकारच्या वाईन तयार होतात आणि त्याचे ब्रँड्स जगभरात प्रसिद्ध आहेत.
"जगभरात प्रसिद्ध असलेली पिनो न्वार (Pinot Noir) फ्रान्सच्या बर्गंडी प्रांतात तयार होते तर कॅबरने सॉविन्यॉं (Cabrenet Sauvignon) फ्रान्सच्या बोर्डो भागात तयार होते.
"फ्रान्सची स्पार्कलिंग वाईन'शॅंपेन' (Champagne) देखील जगभरात खूप लोकप्रिय आहे. याच कारणामुळे वाईन उद्योगात फ्रान्सचा दबदबा बराच काळ टिकून राहिला."

फोटो स्रोत, Getty Images
वाईन उत्पादक देशांनी द्राक्ष शेतीसाठी कायदेशीर संरक्षित क्षेत्रं तयार केली आहेत, जी 'अॅपलेशन' म्हणून ओळखली जातात.
फ्रान्सच्या बोर्डो प्रांतात साठपेक्षा जास्त लहान-मोठे अॅपलेशन आहेत. या विशिष्ट अॅपलेशन'मध्ये विशिष्ट प्रकारच्या ठराविक द्राक्षांचीच शेती करता येते.
उदाहरणार्थ, बोर्डोमध्ये 6 रेड वाईन आणि 6 व्हाईट वाईन तयार होतात, तर बर्गंडीमध्ये फक्त एक रेड आणि एक व्हाईट वाईन तयार होते. या प्रत्येक वाईनची ओळख त्या त्या प्रदेशाशी जोडलेली आहे.
जेन एनसन माहिती देतात की त्या वीस वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये स्थायिक झाल्या, त्या वेळी तिथे 1,20,000 हेक्टर जमिनीवर द्राक्षबागा होत्या, आता त्यात घट होऊन हे क्षेत्रफळ 85,000 हेक्टरवर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वाईनची विक्री घटल्यामुळे ही संख्या आणखी कमी होईल. फ्रान्ससाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण वाईन हा फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे, असं जेन एनसन नमूद करतात.
त्या सांगतात, "2024 मध्ये फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत वाईनचं योगदान होतं 92 अब्ज युरोचं. यात प्रत्यक्ष वाईनसोबतच ती वाईन बनवणाऱ्या कंपन्या, वाईन विकणारी रेस्टॉरंट्स आणि दुकाने यांचाही वाटा आहे.
"पण ही कमाई घटते आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये वाईन निर्यात 4 टक्क्यांनी कमी झाली. याचे एक कारण म्हणजे चीनमध्ये फ्रान्सच्या वाईनला असलेली मोठी मागणी आता घटली आहे.
"आधी चीनमध्ये प्रामुख्यानं फ्रान्सच्या बोर्डो प्रदेशातील वाईनआयात करायचे. आता ते इतर देशांतूनही वाईन खरेदी करत आहेत. शिवाय चीनने महागडी वाईन खरेदी करणे खूप कमी केले आहे."
दुसरी मोठी अडचण म्हणजे हवामान बदल.

फोटो स्रोत, Getty Images
आता एकाच हंगामात अनेक प्रकारचे बदल घडू लागले आहेत, ज्याचा फ्रान्समधल्या शेतकऱ्यांवर परिणाम होतो आहे आणि त्यामुळे द्राक्षाचे उत्पादन घटले आहे.
फक्त फ्रान्समध्येच नाही तर इटली आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातही ही समस्या जाणवते आहे.
भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचाही त्याला अपवाद नाही.
पण फ्रान्समध्ये वाईनचं अर्थकारणातलं योगदान पाहता समस्या जास्त गंभीर बनली आहे. तिथे आता सरकारने वाईन उद्योगाला 17 कोटी युरोची मदत जाहीर केली आहे.
जेन एनसन सांगतात, "फ्रान्सच्या राजकारण्यांनी द्राक्ष शेती करणाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे कारण वाईन हा फ्रेन्च समाजाचा महत्त्वाचा भाग आहे.
"तरुणांना वाईन उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी सरकार वेळोवेळी योजना आणत असते. पण तरीही दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत परिस्थिती खूप कठीण बनली आहे.
"मला वाटतं, पुढच्या दोन-तीन वर्षांत अडचणी आणखी वाढतील. बोर्डोमध्ये वाईन उत्पादन सुरू राहील, पण काही मोठ्या वाईन उत्पादक कंपन्या बंद पडू शकतात."
वाईनची अर्थव्यवस्था
स्टेफानो कॅस्ट्रिओटा हे इटलीतील पीसा विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते वाईनची मागणी सातत्यानं कमी होत असून त्याचाही उत्पादकांवर वाईट परिणाम होतो आहे.
"ऐंशीच्या दशकात जगभरात विकल्या जाणाऱ्या वाईनपैकी 80 टक्के वाईन इटली आणि फ्रान्समध्ये तयार व्हायची. आता या देशांचा वाटा 60 ते 65 टक्क्यांवर आला आहे.
"या उद्योगात अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि अर्जेंटिना सारखे देशही आले आहेत. मात्र जगभरातलं एकूण वाईन उत्पादन कमी होत आहे कारण वाईनची मागणी घटत आहे."

फोटो स्रोत, Getty Images
याविषयी रॉड्रिक फिलिप्स यांना वाटतं की, "अजूनही लोकांची वाईनमधली रुची कायम आहे. वाईनशी संबंधित अनेक अभ्यासक्रमांमध्येही लोक भाग घेतात.
"इंटरनेटवर विविध प्रकारच्या वाईनबद्दल ते माहिती घेतात. वाईन पर्यटनही लोकप्रिय आहे. पण दुसरीकडे वाईनचे सेवन कमी होते आहे आणि भविष्यात काय होईल हे काळच सांगेल."
थोडक्यात, काही देशांत वाईनचे सेवन वाढले असले तरी जागतिक स्तरावर मागणीत मोठी घट झाली आहे. यामागे काय कारणं असावीत?
स्टेफानो कॅस्ट्रिओटा सांगतात, "पूर्वी फ्रान्स आणि इटलीसारख्या युरोपीय देशांत वाईनचे सेवन जास्त प्रमाणात व्हायचे, जे आता कमी झाले आहे कारण लोकांच्या कामकाजात बदल झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
आता लोकांना संगणकावर लक्ष केंद्रित करून काम करावे लागते, त्यामुळे ते आधीसारखं लंचदरम्यान वाईन पित नाहीत.
"दुसरीकडे, मद्यामुळे होणाऱ्या हानीविषयी जागरूकता वाढली आहे, लोक आरोग्याची काळजी घेऊ लागले असल्यानंही वाईनचे सेवन कमी झाले आहे.
"तरुण पिढीचा कल कुठलीही वाईन पिण्यापेक्षा चांगल्या ठिकाणाहून उत्तम दर्जाची वाईन घेण्याकडे आहे, म्हणजेच नव्या पिढीची पसंती बदलली आहे.
"स्पेनसारख्या देशांत आधी वाईन मोठ्या प्रमाणात प्यायली जायची, आता तिची जागा बिअरने घेतली आहे."
त्यामुळेच अनेक वाईन उत्पादकांनी स्थानिक बाजारपेठा सोडून निर्यातीवर लक्ष केंद्रित केलं होतं.
पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन वाईन आणि स्पिरिट्सवर 15 टक्के टॅरिफ लावलं आणि परिस्थिती आणखी बिघडली.

फोटो स्रोत, Getty Images
टॅरिफमुळे अमेरिकन ग्राहकांसाठी युरोपियन वाईन खूप महाग होऊन, त्याचा विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो, असं स्टेफानो कॅस्ट्रिओटा सांगतात.
"टॅरिफमुळे युरोपियन वाईन महाग होईल, म्हणून अमेरिकन विक्रेत्यांनी टॅरिफ लागू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात युरोपियन वाईनचा साठा करून ठेवला. त्यामुळे टॅरिफ लागू झाल्यावर अमेरिकेला होणारी निर्यात 20 ते 30 टक्क्यांनी कमी झाली.
"ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहू शकते, कारण अमेरिकन आयातदारांनी खूप मोठ्या प्रमाणात वाईन साठवून ठेवली आहे.
"अनेक युरोपियन वाईन उत्पादक युरोपातल्या नेत्यांना विनंती करतायत की त्यांनी ट्रम्प सरकारकडे वाईनवरील टॅरिफ हटवण्याची मागणी करावी. पण अर्थातच हे कठिण आहे."
वाईनचं भविष्य
पीटर मॅकअॅटमनी हे ऑस्ट्रेलियातील वाईन बिझनेस सोल्यूशन्स Business Solutions या कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी जगातील अनेक मोठ्या वाईन उत्पादक कंपन्यांना व्यवसायविषयक सल्ला देते.
पीटर यांना वाटतं की लोक आठ हजार वर्षांपासून वाईन पित आहेत आणि हा ट्रेंड अचानक संपणार नाही.
"वाईनच्या भविष्याविषयी अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. पण काही विशिष्ट प्रकारच्या वाईनकडे पाहिलं तर भविष्य चांगलं दिसतं.
"उदाहरणार्थ, शार्डने (Chardonnay ) वाईन सध्या जगभरात लोकप्रिय आहे, बर्गंडीलाही चांगली मागणी आहे. यूकेमध्ये वाईनची एकूण विक्री कमी होतेय, पण प्रोसेको लोकप्रिय झाली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, पूर्व युरोपमध्ये तयार होणाऱ्या काही वाईन्सनीही बाजारात स्थान मिळवलं आहे.
"जॉर्जियात वाईन तयार करताना मातीची भांडी वापरतात आणि ती जमिनीखाली ठेवली जातात.
"ही वाईन इतर वाईन्सपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. ती अतिशय स्वादिष्ट आहे आणि कोणत्याही प्रकारच्या जेवणासोबत घेता येते. मला वाटतं भविष्यात ती खूप लोकप्रिय होईल."
वाईनच्या सेवनाच्या जुन्या पद्धती बदलून तिला इतर खाद्यपदार्थांशी जोडलं तर तिची लोकप्रियता टिकून राहील असं पीटर मॅकअॅटमनी यांना वाटतं.
ते न्यूझीलंडच्या अॅरोटाऊनचं उदाहरण देतात. हे शहर वाईन उत्पादनाचं मोठं केंद्र बनलं आहे.
तिथे सुमारे चार कोटी पाउंड म्हणजे पावणे पाच अब्ज रुपयांची गुंतवणूक करून एका ठिकाणी अनेक खाद्यपदार्थांची दुकानं उभारण्यात आली. त्यामुळे तिथे नेहमीच ग्राहकांची गर्दी होते.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच वाईन कंपन्या आता स्वस्त किंवा एंट्री लेव्हल आणि मिड लेव्हल वाईनची गुणवत्ताही सुधारत असल्याचं पीटर मॅकअॅटमनी सांगतात.
त्यांच्या मते बिअर आणि इतर अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक पेयं ही वाईनसमोरची सर्वात मोठी स्पर्धा ठरत आहेत.
"वाईन उद्योगाचा मोठा हिस्सा बिअर आणि इतर दारूंनी घेतला आहे. उत्पादकांनी नॉन-अल्कोहोलिक पर्यायही आणले आहेत, जे लोकप्रिय झाले आहेत.
"वाईन उद्योगातही आता नॉन-अल्कोहोलिक वाईन तयार करण्यावर शोधन सुरू झाले आहे. पण वाईनचे असे नवे पर्याय तयार करण्यात किंवा विक्रीचे नवे मार्ग शोधण्यात वाईन उद्योग अजूनही मागे आहे.
"त्यांना नवा विचार करण्याची आणि नव्या ग्राहकांशी जोडण्याची गरज आहे. जगात पैसा असेपर्यंत वाईनचे सेवन सुरू राहील, असं मला वाटतं."
घटती मागणी, हवामान बदलाचा परिणाम आणि अनेक राजकीय कारणांमुळे वाईन उद्योगासाठी हा कठीण काळ आहे.
जगातील अनेक भागांत वाईनची मागणी कमी झाली आहे, पण काही प्रदेशांत ती कायम आहे.
लोकांची वाईन खरेदी करण्याची सवयही बदलली आहे. स्वस्त वाईन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याऐवजी ते महागडी आणि उत्तम दर्जाची वाईन कमी प्रमाण खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
वाईन उद्योग अडचणीत आहे, पण त्यांच्यासमोर नवे पर्यायही उपलब्ध होत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











