मर्चंट नेव्हीमध्ये कसे जायचे, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते आणि पगार किती असतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका झा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
समुद्राच्या लाटा फक्त किनाऱ्यावर आदळत नाहीत, तर जागतिक व्यापारालाही पुढे नेतात. समुद्र हा जगाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
या मार्गानेच जगातील अनेक देशांचा बहुतांश व्यापार चालतो.
भारतातच 12 मोठी आणि 200 छोटी बंदरे आहेत, जिथून दररोज लाखो-कोट्यवधी रुपयांच्या मालाची आवक-जावक होत असते आणि याच क्षेत्रातील एक अशी नोकरी आहे, जी अनेक तरुणांना आपल्याकडे आकर्षित करते, ती म्हणजे मर्चंट नेव्ही.
जगभरात जेवढे मर्चंट मरीनर्स आहेत, त्यापैकी सात टक्के भारतीय आहेत.
येणाऱ्या काळात शिपिंग उद्योगात अधिक वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. भारत सरकारने 2047 सालापर्यंत सागरी उद्योगात दीड कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भरघोस पगार, जगातील अनेक देश फिरण्याची संधी आणि कमी वयात मोठी जबाबदारी, या सर्व गोष्टी मर्चंट नेव्हीमधल्या करिअरला आकर्षक तर बनवतातच, पण यामध्ये आव्हानंही मोठी आहेत.
'करियर कनेक्ट'च्या या भागात आपण समजून घेणार आहोत की, मर्चंट नेव्ही म्हणजे काय, यात जाण्याचा मार्ग कोणता आहे, हे कोणत्या लोकांसाठी योग्य पर्याय ठरू शकते आणि यात कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं.
मर्चंट नेव्ही म्हणजे काय?
अनेक तरुणांमध्ये असा संभ्रम पाहायला मिळतो की त्यांनी इंडियन नेव्ही (भारतीय नौसेना) जॉईन करावी की मर्चंट नेव्ही. हे दोन्ही रस्ते समुद्राकडेच जातात, पण दोन्हीचे उद्देश एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत.
त्यामुळे सर्वात आधी त्यांच्यातील फरक समजून घेऊया.
'अॅकॅडमी ऑफ मॅरीटाइम एज्युकेशन अँड ट्रेनिंग'चे प्लेसमेंट डायरेक्टर कॅप्टन चंद्रशेखर सांगतात, "मर्चंट नेव्ही ही एक अशी शिपिंग सेवा आहे, जी समुद्राच्या मार्गाने माल वाहून नेणाऱ्या व्यावसायिक जहाजांशी संबंधित आहे. हे एक 'कॉस्ट सेंटर' आहे, जे एकतर नफा कमावते किंवा नुकसान सोसते. याउलट, नेव्ही म्हणजेच नौसेना मुख्यत्वे संरक्षणासाठी असते. ही भूदल आणि वायुदलाप्रमाणे भारतीय सैन्याचीच एक शाखा आहे."
'मर्चंट नेव्ही डिकोडेड' नावाची एड्युटेक कंपनी चालवणारे प्रणीत मेहता स्वतः एका जहाजावर 'चीफ इंजिनिअर' या पदावर कार्यरत होते.
ते म्हणतात, "नौसेनेत जाण्याचा मार्गच वेगळा आहे. त्यासाठी वेगळी परीक्षा असते, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जावे लागते. तिथे तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. मर्चंट नेव्ही हे खासगी क्षेत्र आहे, तर नौसेना पूर्णपणे सरकारी आणि देशसेवेसाठी आहे. दोघांच्या पगारामध्येही खूप मोठा फरक आहे."
मर्चंट नेव्हीवर देखरेख ठेवण्याचे काम 'डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग' कडे असते आणि यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. मग यामध्ये प्रवेश कसा मिळतो ?

फोटो स्रोत, Getty Images
नेव्हिगेशन विभाग किंवा डेक विभाग: नॉटिकल सायन्समध्ये डिप्लोमा किंवा बी.एस्सी इन नॉटिकल सायन्सच्या माध्यमातून या विभागात प्रवेश मिळू शकतो. जहाज सुरक्षित मार्गाने नेणे आणि समुद्रातील परिस्थिती समजून घेणे हे यांचे काम असते. यामध्ये डेक कॅडेट, थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर आणि कॅप्टन ही पदे असतात.
इंजिन विभाग (मरीन इंजिनिअरिंग): नेव्हिगेशन विभागाप्रमाणेच एक इंजिनिअर असतो, ज्याच्यावर जहाजाचे इंजिन, यंत्रसामग्री आणि तांत्रिक उपकरणांची जबाबदारी असते. हे पद मिळवण्यासाठी मरीन इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक किंवा डिप्लोमा करणे आवश्यक आहे.
बी.टेक इन मरीन इंजिनिअरिंगसाठी प्रवेश 'इंडियन मॅरीटाइम युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट' (IMU-CET) द्वारे दिला जातो. याशिवाय, एक वर्षाचा विशेष डिप्लोमा कोर्स - 'ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग' (GME) च्या माध्यमातूनही या विभागात प्रवेश मिळू शकतो.
यानंतर पहिली नियुक्ती ज्युनिअर इंजिनिअर या पदावर होते, त्यानंतर फोर्थ इंजिनिअर, थर्ड इंजिनिअर, सेकंड इंजिनिअर आणि शेवटी चीफ इंजिनिअर या पदापर्यंत पोहोचता येते.
इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर (ETO): ETO हा मर्चंट शिपच्या इंजिन विभागातील एक परवानाधारक सदस्य असतो, ज्याची जबाबदारी सेन्सर आणि अलार्म सिस्टमवर देखरेख ठेवणे ही असते.
यासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन सारख्या विभागांमध्ये बी.ई. किंवा बी.टेक असणे आवश्यक आहे. सोबतच डीजी शिपिंग मान्यताप्राप्त ETO कोर्स करणेही गरजेचे आहे.
जीपी रेटिंग (सपोर्ट क्रू): या विभागात कोणतेही अधिकारी पद (ऑफिसर पोझिशन) नसते, परंतु क्रू आणि जहाजाच्या देखभालीच्या दृष्टीने हे महत्त्वाची भूमिका बजावतात.
यासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वय 17.5 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे लागते. 10 वी किंवा 12 वी नंतर सहा महिन्यांचा जीपी रेटिंग कोर्स असतो, ज्याद्वारे ही नोकरी मिळवता येते.
मर्चंट नेव्ही कोणासाठी योग्य आहे?
प्रतीक तिवारी सध्या एका कंपनीत 'सीनियर चार्टरिंग (शिपिंग) मॅनेजर' आहेत. 2006 मध्ये जेव्हा त्यांनी 12 वी पूर्ण केली, तेव्हा इतर अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनाही पुढे कोणता मार्ग निवडावा हे माहित नव्हते.
त्यांनी सांगितले, "माझ्या घरच्यांची इच्छा होती की मी आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करावे, पण मला काहीतरी वेगळे करायचे होते आणि त्या काळात मर्चंट नेव्हीबद्दल जास्त माहिती उपलब्ध नव्हती. कोणतेही मार्गदर्शनही नव्हते, त्यामुळे निर्णय घेणे कठीण होते. पण मी मरीन इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर चार वर्षांच्या कोर्सनंतर माझा मरीन इंजिनिअर म्हणून प्रवास सुरू झाला"
प्रतीक सांगतात की हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या मते मर्चंट नेव्ही अशा लोकांसाठी आहे जे:
- इंजिनिअरिंग, मशिनरी, सिस्टिम्स आणि नेव्हिगेशन सारख्या तंत्रज्ञानामध्ये रस ठेवतात.
- जे प्रदीर्घ काळ घरापासून लांब राहू शकतात.
- जे अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात जबाबदारीने काम करू शकतात.
- जे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे तंदुरुस्त आहेत.
- ज्यांना फिरण्याची आवड आहे आणि देश-विदेशातील अनुभवांची इच्छा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रणित मेहता म्हणतात की, मर्चंट नेव्ही आपल्यासोबत अनेक आव्हाने देखील घेऊन येते.
उदाहरणार्थ- तुम्हाला सहा महिने समुद्रात घालवावे लागतात. इतक्या प्रदीर्घ काळासाठी कोणालाही आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून लांब राहावे लागते.
एकटेपणा जाणवतो आणि या काळात मानसिक दबावही खूप असतो. हा असा व्यवसाय आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक क्षणी शरीर आणि मन या दोन्हीने उपस्थित राहावे लागते आणि कडक शिस्तीत राहावे लागते.
परंतु ते असेही म्हणतात की, "आजकाल नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. बहुतांश लोक अशा क्षेत्रांत जातात, जिथे स्पर्धा खूप जास्त आहे. याउलट, जागतिक व्यापार आणि पुरवठ्यामध्ये होणाऱ्या सततच्या वाढीमुळे येत्या 10 वर्षांत मर्चंट नेव्ही उद्योगात मोठी भरभराट पाहायला मिळू शकते. त्यामुळे मर्चंट नेव्हीचा कोर्स निवडण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे. कारण येथे स्पर्धा कमी आणि पगार उत्तम असतो. सोबतच ऑफिसरचा युनिफॉर्म घालण्याची संधीही मिळते."
शैक्षणिक पात्रता आणि कोर्सेस
डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स (DNS): डेक विभागामध्ये जाण्यासाठी एक वर्षाचा कोर्स, जो बारावी नंतर करता येतो.
बीएससी इन नॉटिकल सायन्स (B.Sc. Nautical Science): डेक विभागामध्ये जाण्यासाठी तीन वर्षांचा पदवी कोर्स.
बी. टेक मरीन इंजिनिअरिंग (B.Tech Marine Engineering): इंजिन विभागामध्ये जाण्यासाठी चार वर्षांचा इंजिनिअरिंग कोर्स.

फोटो स्रोत, @IMU_HQ
ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग (GME): जर बारावी नंतर बीटेक मेकॅनिकलमध्ये केले असेल, तर 8 ते 12 महिन्यांचा हा कोर्स करून इंजिन विभागात प्रवेश मिळवता येतो.
इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर (ETO): जर बारावी नंतर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स-कम्युनिकेशन मधून बीटेक किंवा डिप्लोमा केला असेल, तर चार महिन्यांचा हा कोर्स करून इंजिन विभागात जाता येते.
जीपी रेटिंग (GP Rating): हा सहा महिन्यांचा कोर्स असतो, जो डेक आणि इंजिन अशा दोन्ही विभागांत जाण्यासाठी केला जाऊ शकतो.
मर्चंट नेव्हीमध्ये कोण जाऊ शकते?
जर बारावीमध्ये तुमचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितविषयात 60 टक्के गुण असतील आणि इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुण असतील, तर त्यांच्यासाठी मर्चंट नेव्हीमध्ये जाणे सोपे आहे. तसेच तुमची दृष्टी 6/6 असणे आवश्यक आहे.
परंतु जर कोणाकडे कॉमर्स किंवा आर्ट्स असेल, तर त्यांना पुन्हा एकदा 11 वी आणि 12 वी पीसीएम (PCM) विषयातून करणे गरजेचे आहे.
किंवा 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग' (NIOS) मधून 11वी-12 वी करणे हा एक पर्याय उपलब्ध आहे.

फोटो स्रोत, @IMU_HQ
भारतात मर्चंट नेव्हीच्या शिक्षणासाठी 'इंडियन मरिटाईम युनिव्हर्सिटी'म्हणजेच IMU आहे.
ही युनिव्हर्सिटी दरवर्षी साधारणपणे मे महिन्यात एक प्रवेश परीक्षा घेते, जिला IMU-CET म्हटले जाते.
यामध्ये चांगला स्कोअर मिळवणारे विद्यार्थी तीन वर्षांच्या 'बीएस्सी इन नॉटिकल सायन्स' किंवा चार वर्षांच्या 'बी.टेक इन मरीन इंजिनिअरिंग' कोर्ससाठी प्रवेश मिळवू शकतात.
यासंबंधी नोंदणी कधी होईल, परीक्षा कधी आहे, असे प्रश्न मनात असतील तर त्यांची उत्तरे IMU च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
जर पीसीएम (PCM) विषयातून 11 वी-12 वी झाली नसेल, तर GP Rating च्या माध्यमातूनही मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश मिळवता येतो, परंतु हा कोर्स केल्यानंतर अधिकारी बनता येत नाही.
या सर्व कोर्सेससाठी किमान वय 17 वर्षे किंवा जास्तीत जास्त 25 वर्षे असू शकते.
पगार आणि प्रगतीची संधी
तज्ज्ञांच्या मते, कमी वयात लाखांमध्ये पगार देणारा मर्चंट नेव्ही हा करिअरचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये स्पर्धा देखील कमी आहे.
गेल्या वर्षी सुमारे 40 हजार विद्यार्थी IMU-CET परीक्षेला बसले होते, तर इंजिनिअरिंग, मेडिकल यांसारख्या इतर प्रवेश परीक्षांसाठी ही संख्या लाखांमध्ये असते.
कॅप्टन चंद्रशेखर यांनी सांगितले की, कोणत्याही कॅडेटसाठी सुरुवातीचा पगार दरमहा सुमारे 30 हजारांपासून सुरू होतो.
जर कोणी 4 वर्षांचा कोर्स पूर्ण करून ऑफिसर बनले, तर हा पगार दरमहा 45 ते 90 हजारांच्या दरम्यान असू शकतो.

फोटो स्रोत, @IMU_HQ
मर्चंट नेव्हीमध्ये जर कोणाला 'थर्ड ऑफिसर'वरून 'सेकंड ऑफिसर' बनायचे असेल, तर त्यासाठी डीजी शिपिंगतर्फे घेतली जाणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. याला 'सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी' म्हणजेच सीओसी (CoC) असे म्हटले जाते.
मात्र, ही परीक्षा म्हणजे प्रमोशनची खात्री नाही, तर प्रमोशन मिळवण्यासाठी ती आवश्यक अट आहे.
प्रतीक सांगतात की, चीफ इंजिनिअर आणि कॅप्टनच्या स्तरावर पगार दरमहा 8 ते 15 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.
अर्थात, हे संबंधित व्यक्तीचा अनुभव किती आहे आणि ती कोणत्या प्रकारच्या जहाजावर काम करत आहे यावर अवलंबून असते.
उदाहरणार्थ, तेलवाहू जहाजांवर काम करणाऱ्यांना 'बल्क कॅरिअर' जहाजांच्या तुलनेत जास्त पगार मिळतो.
शिक्षण कुठून घ्यावे?
भारतातील कोणत्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये मरीन कोर्सेस शिकवले जातात असे नाही. उलट यासाठी काही विशिष्ट संस्था आहेत, ज्या इंडियन मॅरीटाइम युनिव्हर्सिटीच्या (IMU) अंतर्गत येतात किंवा ज्यांना डीजी शिपिंगकडून मान्यता मिळालेली असते.
भारतात सुमारे 200 मरिटाईम इन्स्टिट्यूट आहेत.
IMU ही एक केंद्रीय युनिव्हर्सिटी (सेंट्रल युनिव्हर्सिटी) आहे, जिचे मुख्यालय कोलकात्यात आहे आणि त्याशिवाय चेन्नई, मुंबई, विशाखापट्टनम आणि कोची येथे तिचे कॅम्पस आहेत.
येथे तुम्ही बी.टेक इन मरीन इंजिनिअरिंग, बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स, जीएमई डिप्लोमा, ईटीओ कोर्स आणि मरिटाईम मॅनेजमेंटचे पीजी कोर्सेस करू शकता.

फोटो स्रोत, IMU
यासोबतच चेन्नई येथील 'अॅकॅडमी ऑफ मरिटाईम एज्युकेशन अँड ट्रेनिंग' (AMET) आणि पुणे येथील 'तोलाणी मरिटाईम इन्स्टिट्यूट' (TMI) मधूनही मरीन कोर्सेस करता येतात.
मात्र, जर कोणाला जीपी रेटिंग, सपोर्ट क्रू किंवा प्री-सी ट्रेनिंग यांसारख्या कोर्सेसकडे वळायचे असेल, तर त्यासाठीही काही उत्तम संस्था आहेत. जसे की,
- एंग्लो ईस्टर्न मरिटाईम अकॅडमी (कोची)
- साउथ इंडिया मरिटाईम अकॅडमी (चेन्नई)
- लॉयोला इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनिअरिंग अँड ट्रेनिंग स्टडीज (चेन्नई)
- इंटरनॅशनल मरिटाईम इन्स्टिट्यूट (नोएडा), सायंटिफिक मरीन अँड इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (कोलकाता)
फीबद्दल बोलायचे झाले तर, आयएमयूच्या कॅम्पसमध्ये बी.टेक मरीन इंजिनिअरिंग आणि बी.एस्सी नॉटिकल सायन्सची वार्षिक फी साधारण सव्वा दोन ते अडीच लाखांच्या आसपास आहे. मान्यताप्राप्त खाजगी संस्थांमध्ये ही फी वेगवेगळी असू शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











