LIVE Live, राज्यातील महानगर महापालिकांचे आज निकाल, थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारीला मतदान पार पडलं. आज, 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. राज्याच्या राजधानीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
थोडक्यात
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज निकाल
नऊ वर्षांनी होणारी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची
2869 जागांसाठी झाली महापालिकेची निवडणूक
निवडणुकीसाठी 15 हजार 908 इतके उमेदवार रिंगणात
लाईव्ह कव्हरेज
नितीन सुलताने, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईत निकालाआधीच भाजपची जल्लोषाची तयारी, तर पुण्यात महापौरांच्या नावाचे पोस्टर
फोटो स्रोत, UGC
गुरुवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानानंतर शुक्रवारी मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी त्याआधीच भाजपनं काही ठिकाणी जल्लोषाची तयारी केल्याचं पाहायला मिळालं.
भाजपनं निकालाच्या आधीच मुंबईत जल्लोषाची तयारी केल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजपच्या नरिमन पॉइंट या ठिकाणी भाजपनं जल्लोषाची तयारी केल्याचं दिसून आलं.
पुण्यात पोस्टरबाजी
पुण्यामध्येही निकालाच्या आधीच पोस्टरबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून विजयी उमेदवारांचे पोस्टर लावण्यात आलेले पाहायला मिळाले.
तसंच भाजप उमेदवार गणेश बीडकर यांच्या नावासमोर महापौर लिहत होर्डिंग लावण्यात आले.
तसंच नुकतेच भाजप मध्ये गेलेले सचिन दोडके यांच्याही नावासमोर भावी आमदार लिहीत पोस्टरबाजी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत 59.82 टक्के
फोटो स्रोत, Kiran Sakale/BBC
फोटो कॅप्शन, छत्रपती संभाजीनगर महापालिका
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत 59.82 टक्के मतदान पार पडले. एकूण 11 लाख 18 हजार 284 मतदारांपैकी 6 लाख 69 हजार 1 मतदारांनी मतदान केले.
ठाणे महानगर पालिका
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरूवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते.
त्यापैकी 4 लाख 83 हजार 698 पुरूष, 4 लाख 33 हजार 385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 9 लाख 17 हजार 123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 52.94 टक्के मतदान, मतमोजणीसाठी 23 कक्षात प्रक्रिया सुरू
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार एकूण 52.94 टक्के मतदारांनी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज (16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्यासह 770 अन्य सहकारी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.
निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार, तसेच माध्यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाने दिली.
पुण्यात 52.42 टक्के मतदान, तर नागपूरमध्ये 51 टक्के
पुण्यात एकूण मतदान 52.42 टक्के झालं. गेल्या वेळी साधारण 55 टक्के झालं होतं. सर्वात कमी मतदान औंध, बोपोडी येथे झालं. सर्वाधिक मतदान शिवणे प्रभागात झालं.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जवळपास 51 टक्के मतदान झालं. मागील निवडणुकीत (2017) हेच मतदान 53 टक्के झालं होतं.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (15 जानेवारी) 4 हजार 11 मतदान केंद्रांवर मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता अतिशय शांततामय वातावरणात मतदान पार पडले, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.
पुण्यात सकाळी 10 वाजल्यापासून 15 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सुनिश्चित करण्यात आलेल्या 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली होती. मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा होता. त्यामुळे प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागले. इतर 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा होत्या. काही महानगरपालिकांच्या प्रभागांत तीन किंवा पाच जागाही होत्या.
फोटो स्रोत, Getty Images
‘शाई’वरून आरोप-प्रत्यारोप,
फोटो कॅप्शन, मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली.
15 जानेवारी रोजी राज्यातल्या 29 महानगर पालिकांसाठी मतदान झालं. या मतदान सर्वाधिक चर्चेत आला तो मुद्दा म्हणजे शाईचा. मतदान झाल्यावर बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात आहे, अशी तक्रार अनेकांनी केली. यावरुन आरोप प्रत्यारोपदेखील झाले.
मतदानानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षासह मतदारांनीही मार्करच्या
‘शाई’वरुन प्रश्न उपस्थित केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी
बोलताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले की, "यापूर्वी बोटाला
शाई लावली जायची. पण आता त्यांनी पेन आणला आहे. या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत
आहेत. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटाझर लावल्यानंतर ती शाई जाते.
शाई पुसा, परत जा आणि पुन्हा मतदान करा, असा प्रकार सुरू
आहे."
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप
नाकारला असून निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी विरोधक करत असल्याचं फडणवीस म्हणाले.
मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक
आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार
परिषदेत स्पष्टीकरण दिलं.
ते म्हणाले, "महापालिका
निवडणुकीच्या मतदानासाठी ज्या मार्कर पेनची जी शाई वापरण्यात आली, त्याबाबत
बराच संभ्रम पसरवला जातो आहे. त्याबाबत माझं सांगणं असं आहे की, ही शाई जी
आहे, ती इंडेलिबल इंक आहे. भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक
वापरतो, तीच ही इंक आहे. मात्र, ती मार्कर पेनच्या
स्वरुपात आहे. असे मार्कर पेन 2011 पासून वापरात आहेत. ही शाई पुसली जात
नाही. शाई लावल्यानंतर बारा ते पंधरा सेकंदांनंतर ती ड्राय होते. या शाईविषयी
कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे, तसे व्हीडिओ बाहेर
प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय."
एकंदरीत कालचा दिवस 'शाई' आणि 'शाही' प्रकरणावरून गाजला, यावर विविध मीम्सदेखील व्हायरल झाले.
नमस्कार
बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर आपले स्वागत आहे. आज महानगर पालिका निवडणुकांचे निकाल आहेत. या पेजवर तुम्हाला निवडणुकीसंबंधी सर्व अपडेट, विश्लेषण पाहायला आणि वाचायला मिळतील.
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. नऊ वर्षांनी होणारी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठरली.
थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होईल आणि कोणत्या महानगर पालिकेवर कुणाची सत्ता राहील हे आपल्याला समजेल.